रोजंदारी सोडून डोंगराळ भागात प्रयोगशील शेती 

ठिबक, मल्चिंगवर भाजीपाला नियोजन एकेकाळी केवळ भात शेतीतच व्यस्त असलेल्या सोमा यांनी भाजीपाला शेतीत आता कौशल्य मिळवले आहे. टोमॅटो, काकडीसारख्या पिकांत ते पारंगत होऊ लागले आहेत. उपलब्ध पाणी व भांडवल यांचे नियोजन करून, ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपरवर ही पिके घेण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे.
सन २०१० मध्ये लागवड केलेल्या केशर आंब्याची झाडे यंदापासून व्यावसायिक उत्पन्न देण्यास सुरुवात करतील.
सन २०१० मध्ये लागवड केलेल्या केशर आंब्याची झाडे यंदापासून व्यावसायिक उत्पन्न देण्यास सुरुवात करतील.

तळेरान (ता. जुन्नर, जि. पुणे) या आदिवासी डोंगराळ भागातील सोमा घोडे यांना सिंचनाअभावामुळे पावसावर आधारित भात शेतीनंतर कुटुंबासह रोजंदारीने अन्यत्र शेतीत कामाला जावे लागे. शेतीत नवे काही करण्याची जिद्द पाहून त्यांना दोन संस्थांचा मोठा आधार मिळाला. विहीर मिळाली. आता पाच एकरांत विविध पिकांचे पद्धतशीर नियोजन करून शेतीत त्यांनी स्थैर्य आणले आहे. पूर्वी केवळ भातशेतीत रमणारे सोमा रोजंदारी सोडून आंबा, भाजीपाला व अन्य पिकांच्या प्रयोगात व्यस्त झाले आहेत.    पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याला निसर्गाने मुक्त हस्ताने डोंगर व वनसंपदा बहाल केली आहे.  तळेरान हा याच तालुक्यातील आदिवासी डोंगराळ भाग आहे. येथील सोमा घोडे यांची पारंपरिक दहा एकर शेती आहे. भात हे त्यांचे मुख्य पीक होते. डोंगर उतारावर असलेल्या या क्षेत्रात पावसाच्या पाण्यावर पारंपरिक पद्धतीने पाच एकरांत ते ही भात शेती करायचे.  रोजंदारीचा व्यवसाय  भात काढणी झाल्यानंतर पाण्याचा पर्याय संपल्यानंतर शेतीत अन्य कोणती कामे नसायची. मग सोमा रोजगारासाठी ओतूर, नारायणगाव येथे बागायती शेतीच्या कामांसाठी आठ ते पंधरा दिवसांसाठी मुक्कामी जात. शालेय शिक्षणानंतर लग्न झाले. त्यानंतर रोजंदारीच्या कामांना पत्नीची साथ मिळाली.  कांदा, टोमॅटो लावणी, काढणी, द्राक्ष बागा आदी कामांतून रोजची १५० ते २०० रुपये मजुरी सुटायची. हे असे अनेक वर्षे सुरू होते.  आंबा लागवड  काही वर्षांपूर्वी नाबार्ड आणि लुपीन फाउंडेशन संस्थेच्या वतीने आदिवासी भागातील कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी जलसंधारणाची कामे सुरू झाली. विविध कुटुंबांशी चर्चा व त्यांना विश्‍वासात घेऊन  वाडी प्रकल्पांतर्गत फळझाडे लागवडीचा उपक्रमही हाती घेण्यात आला. आपल्या शेतीतही काही तरी वेगळे करण्याची सोमा यांची इच्छा होती. मग उपक्रमाच्या माध्यमातून २०१० मध्ये केशर आंब्याची ५० झाडे लावण्यासाठी सोमा यांना मदत करण्यात केली. सोमा यांनी निष्ठेने झाडांचे चांगल्या प्रकारे संगोपन केले.  सन २०१३ मध्ये याच दोन्ही संस्थांच्या वतीने विहिरीचे कामही करून देण्यात आले.  पाच एकरांत पिकांचे नियोजन  विहिरीला चांगले पाणी लागले. रोजंदारी करताना सोमा यांच्या गाठीस विविध पिकांचा अनुभवही जमा झाला होता. त्या जोरावर थोड्या-थोड्या क्षेत्रावर वाटाणा, शेंगावर्गीय भाजीपाला, गहू अशी पिके ते घेऊ लागले. पहिल्या टप्प्यात अधिक उत्पादनाची आशा नव्हतीच. पण, प्रयोगशीलता दाखवून कामास सुरुवात केल्याने क्षेत्राचा विस्तार करण्यास सुरुवात केली. आता पाच एकरांत उपलब्ध पाण्याचा वापर करून विविध टप्प्यांमध्ये विविध पिकांचे उत्कृष्ट नियोजन सोमा करीत आहेत. एक एकरवरील वाटाण्याने त्यांना वीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले तेव्हा सोमा समाधानी झालेच. पण, अजून उत्पन्न वाढवण्यासंबंधी आत्मविश्‍वास उंचावला. सध्या अर्ध्या एकरातील शेंगावर्गीय पीक फुलोऱ्यात आहे. त्याचे पैसे लवकरच हाती येतील. गेल्या वर्षी याच पिकाने त्यांना वीस हजार रुपयांचे तर गव्हाने सात पोती व यंदा पाच पोती उत्पादन दिले आहे.  भाताचे प्रमुख उत्पन्न  तळेरान भागात बहुतांश शेतकरी भात उत्पादकच आहेत. सोमादेखील आपल्या पाच एकरांतून सुमारे ४० पोती तांदळाचे उत्पादन घेतात. पैकी १५ ते २० पोती तांदूळ विक्रीतून सुमारे ३० ते ४० हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळते. सोबतीला हिरडा पिकातूनही वर्षाला सुमारे ४० हजार रुपये उत्पन्नाचा चांगला आधार राहतो. याच पिकांसह उन्हाळी पिकांमधून वर्षाला सुमारे दीड लाख रुपयांची मिळकत सोमा करतात.  यंदा केशर आंबा देणार उत्पन्न  सन २०१० मध्ये लागवड केलेल्या केशर आंब्याच्या ३० झाडांपासून गेल्या वर्षीपासून उत्पादन सुरू झाले. पहिलेच उत्पादन असल्याने विक्री न करता नातेवाईक आणि मित्रांना आंबा वाटला. यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती. थंडीत मोहोर चांगला होता. मात्र, सध्याच्या वाढत्या उन्हामुळे तो करपला. काही प्रमाणात कैऱ्या लागल्या आहेत. त्याचे काही प्रमाणात उत्पादन मिळेल.  शेतीतील जिद्दीचा झाला गौरव  रोजंदारी सोडून आपल्या शेतीत विविध प्रयोग करण्याची जिद्द, चिकाटी व प्रयोगशीलता बाळगलेल्या  सोमा यांच्या कामांची दखल शासन स्तरावर घेण्यात आली. पुणे जिल्हा परिषदेने २०१५-१६ मध्ये कृषिनिष्ठ, तर राज्य कृषी विभागाच्या १०१५ मधील शेतीनिष्ठ पुरस्काराने सोमा आणि शोभा या घोडे दांपत्याचा गौरव करण्यात आला आहे.  मुलीला कृषी पदवीधर करण्याचे स्वप्न  सोमा यांना विद्या आणि विशाल अशी मुले आहेत. पैकी विद्या बारावी इयत्तेत गेली असून, विशालने दहावीची परीक्षा दिली आहे. शेतीत अजून प्रगती करण्याचे ध्येय ठेवलेल्या सोमा यांनी विद्याला कृषी पदवीधर करण्याचे स्वप्न ठेवले आहे.  संपर्क- सोमा धर्मा घोडे-७५०७८४९१०४ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com