रब्बीत मोहरीचे पीक ठरतेय वरदान

मेहकर (जि. बुलडाणा) तालुका परिसरात मोहरी बीजोत्पादन शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. कंपनीसोबत करार करून कमी खर्च व देखभालीत दत्तात्रेय राऊत (साखरखेर्डा) यांच्यासारखे शेतकरी एकरी ६० हजार ते ६५ हजार रुपयांचे उत्पन्न साडेतीन महिन्यांच्या कालावधीत घेत आहेत. रब्बीसाठी हे निश्‍चित उत्तम पर्यायी पीक ठरते आहे.
दत्तात्रेय राऊत यांचे मोहरीचे पीक सिंदखेडराजा तालुक्यात आकर्षण ठरले आहे.
दत्तात्रेय राऊत यांचे मोहरीचे पीक सिंदखेडराजा तालुक्यात आकर्षण ठरले आहे.

मेहकर (जि. बुलडाणा) तालुका परिसरात मोहरी बीजोत्पादन शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. कंपनीसोबत करार करून कमी खर्च व देखभालीत दत्तात्रेय राऊत (साखरखेर्डा) यांच्यासारखे शेतकरी एकरी ६० हजार ते ६५ हजार रुपयांचे उत्पन्न साडेतीन महिन्यांच्या कालावधीत घेत आहेत. रब्बीसाठी हे निश्‍चित उत्तम पर्यायी पीक ठरते आहे. साखरखेर्डा (ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) येथील दत्तात्रेय गणपत राऊत या तरुण शेतकऱ्याने रब्बी हंगामात मोहरीसारख्या पिकाचा हुकमी पर्याय तयार करून अन्य शेतकऱ्यांपुढे आदर्श तयार केला आहे. चार वर्षांपासून ते मोहरीचे बीजोत्पादन घेत असून, अन्य पिकांच्या तुलनेत बदललेल्या हवामानात हमखास चांगले उत्पन मिळवून देणारे हे पीक असल्याचे ते ठासून सांगतात. भागातील मोहरीची शेती

  • सिंदखेड राजा व मेहकर तालुक्यात मोहरीची होते व्यावसायिक शेती
  • बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येतो. कंपन्या शेतकऱ्यांसोबत तसा करार करतात. दर ठरवतात.
  • कंपनीकडूनच बियाण्याचा पुरवठा होतो. शेतीचे सारे व्यवस्थापन शेतकरी सांभाळतात.
  • संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी शेतीला भेट देऊन मार्गदर्शन करतात.
  • हे पीक प्रामुख्याने उत्तरेकडील राज्यांतील वातावरणात स्थिरावले आहे.
  • बुलडाणा जिल्ह्यात हिवाळ्यातील थंडीचे वातावरणही या पिकासाठी पोषक ठरत आहे.
  • मेहकर उपविभागातील तालुक्यांमध्ये ३०० एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर याची लागवड असावी असा बीजोत्पादन कंपनीच्या अधिकाऱ्यांचा अंदाज
  • बदलत्या वातावरणात टिकाव धरण्यात पीक सक्षम
  • कंपन्यांकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन
  • राऊत यांचा अनुभव फायदे

  • राऊत सांगतात की आपल्या भागात रब्बीत चांगल्या प्रकारे हे पीक येते.
  • उत्पादन व दरांची निश्‍चिती असल्याने पीक आश्‍वासक व फायदेशीर
  • अन्य रब्बी पिकांच्या तुलनेत उत्पादन खर्च कमी.
  • किडी, रोग वा वातावरणाचा कुठलाही प्रतिकूल परिणाम फारसा नाही.
  • लागवड तंत्र

  • आधीचे पीक घेतलेल्या शेतात वखराच्या दोन पाळ्या घेतात.
  • वाफसा तयार झाल्यावर जमीन भुसभुशीत झाली, की ऑक्टोबर महिन्यात शेवटी किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पेरणी. बी हाताने कमी खोलीवर फोकून द्यावे लागते.
  • दोन ओळींतील अंतर १८ इंच. मध्ये साडेतीन फुटांचा पट्टा सोडला जातो.
  • पेरणी शक्यतो उत्तर-दक्षिण. साधारणपणे एकरी सव्वा ते दीड किलो बियाणे
  • उगवणीनंतर झाडांची विरळणी
  • दर २० व्या दिवसाला पाणी. (ठिबक किंवा दांड पद्धतीने सिंचन). साधारणतः पाच पाण्यांमध्ये पीक निघून येते.
  • रासायनिक खतांची फारशी गरज नसते. एकरी ३० किलो नत्र व ५० किलो स्फुरद एवढी मात्रा दिली जाते.
  • अळीचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. मावा येतो. त्यासाठी एक ते दोन वेळा कीटकनाशकाची फवारणी होते.
  •  उत्पादन व अर्थकारण राऊत यांचा या पिकात चार वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. एकरी उत्पादन सरासरी १२ ते १५ क्विंटल दरम्यान येते. दरवर्षी कंपनीसोबत ५८०० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल दराचा करार होतो. एकरी सुमारे ८ हजार ते १० हजार रुपये खर्च होतो. साडेतीन ते चार महिन्यांच्या कालावधीत सुमारे ६० हजार ते ६५ हजार रुपयांचा नफा हाती येऊ शकतो. प्रातिनिधिक उत्पादन

  • सन २०१६
  • क्षेत्र- एक एकर
  • उत्पादन- १२ क्विंटल ६० किलो
  • मिळालेला दर- ५८०० रुपये क्विंटल
  • उत्पन्न (सुमारे- ६९,६०० रु.
  • खर्च- ७००० रु.
  • नफा- ६२,६०० रु.
  • सन २०१७
  • क्षेत्र- २ एकर
  • त्यातील उत्पादन- २२ क्विंटल ८५ किलो
  • दर- ५८०० रु.
  • बीजोत्पादनात हातखंडा राऊत यांची पाच एकर बागायती शेती आहे. खरिपात ते कपाशी बीजोत्पादन करतात. हळद, सोयाबीन आदी आंतरपिके घेतात. यंदा दोन एकर २० गुंठे क्षेत्रावर फुले संगम सोयाबीन वाण घेतले. टोकण पद्धतीत एकरी १२ क्विंटल उत्पादन मिळाले. हळदीत आंतरपीक म्हणून चार क्विंटल उत्पादन मिळाले. कपाशीच्या ३० गुंठे बीजोत्पादन क्षेत्रात सहा क्विंटल उत्पादन झाले. त्याचा हमीभाव १८ हजार रुपये प्रतिक्विंटल असा आधीच निश्‍चित झाला होता. दीड एकरांत बीजोत्पादन कांदा तर एक एकरात आले घेतले आहे. विविध पिकांत कंपन्यांसोबत बीजोत्पादनाचा करार करून शेतीतून हमखास चांगले उत्पन्न ते मिळवतात. प्रतिक्रिया मागील काही वर्षांत सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकरी पीक बदलाकडे वळाले आहेत. त्यातूनच मोहरीसारख्या पिकाचे क्षेत्र रब्बीत विस्तारत आहे. शेतकऱ्यांना कृषी विभाग कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळेल याचे तंत्र, वाण निवडण्यासाठी प्रसार, प्रचाराचे काम करीत आहे.  -वसंत राठोड, तालुका कृषी अधिकारी, सिंदखेडराजा साखरखेर्डा परिसरात सोशल मीडियाचा वापर करीत एक हजार शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभागाचे संदेश, नवीन पीक, वाण, तंत्र, वातावरणातील बदल यांची माहिती पोचविली जाते. यातून शेतकऱ्यांमध्ये प्रयोगशीलता वाढीस लागली आहे. -समाधान वाघ, कृषी सहायक, साखरखेर्डा संपर्क- दत्तात्रेय राऊत, ९११९४१०२००  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com