agriculture story in marathi, Nagapur village has got fame in dairy farming & milk production in Vidharbha | Agrowon

नागापूरमध्ये झाली धवलक्रांती

विनोद इंगोले
शुक्रवार, 13 मार्च 2020

विविध कारणांमुळे विदर्भात दुग्ध व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर वर्धा जिल्ह्यातील नागापूर ग्रामस्थांनी तब्बल ७० वर्षांपासून या व्यवसायात सातत्य ठेवत आपले अर्थकारण उंचावले आहे. कधीकाळी अवघे चाळीस लिटर दूध संकलन असलेल्या गावातील दुग्धोत्पादनाने आजमितीला २५०० लिटर संकलनाचा पल्ला गाठला आहे. दुग्ध व्यवसायात स्वयंपूर्ण होत गावाने नवा आदर्श निर्माण केला आहे.
 

विविध कारणांमुळे विदर्भात दुग्ध व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर वर्धा जिल्ह्यातील नागापूर ग्रामस्थांनी तब्बल ७० वर्षांपासून या व्यवसायात सातत्य ठेवत आपले अर्थकारण उंचावले आहे. कधीकाळी अवघे चाळीस लिटर दूध संकलन असलेल्या गावातील दुग्धोत्पादनाने आजमितीला २५०० लिटर संकलनाचा पल्ला गाठला आहे. दुग्ध व्यवसायात स्वयंपूर्ण होत गावाने नवा आदर्श निर्माण केला आहे.
 
विदर्भातील सहा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांपैकी तब्बल पाच जिल्हे अमरावती विभागात येतात. एकमेव वर्धा जिल्हा हा नागपूर विभागात आहे. त्यामुळे आपसूकच शासकीय यंत्रणांसह राज्यकर्त्यांचे लक्ष्य या जिल्ह्याकडे असते. दोन ते दहा एकर अशी जेमतेम इथली जमीनधारणा. कपाशी, सोयाबीन अशी पारंपरिक पीक पद्धती, असमाधानकारक दर, सिंचन सुविधांचा अभाव. परिणामी उत्पादकताही जेमतेम अशी या भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागील कारणे सांगता येतील. पूरक व्यवसायांचा अभाव हेदेखील त्यातील एक कारण नमूद करता येईल.

नागापुरातील परिवर्तन
विदर्भातील अन्य आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील गावांप्रमाणेच कधीकाळी वर्धा जिल्ह्यातील नागापूरची अशीच परिस्थिती होती. वाढत्या कौटुंबिक गरजांची पूर्तता शेतीतील अत्यल्प उत्पन्नातून करणे कठीण होत होते. ग्रामस्थांची मजुरीसाठी भटकंती सुरू होती. जिल्ह्यातील सेवाग्राम येथे १९३५ मध्ये महात्मा गांधी यांचा आश्रम स्थापन झाला. नागापुरातील बहुतांश कुटुंबीय मजुरी कामासाठी येथे जात. परंतु त्यातून आर्थिक परिस्थितीत जादूची कांडी फिरवल्यागत व्यापक बदल होण्याची अपेक्षा नव्हतीच. कोलकत्याचे मुन्ना साहू हे देखील आश्रम परिसरात राहणाऱ्यांपैकी एक. नागापूरचे ग्रामस्थ मेहनती असल्याचे त्यांनी हेरले. त्यांना दुग्ध व्यवसायासाठी प्रेरित केल्यास आश्रमासाठी लागणाऱ्या दुधाची गरज भागविणे शक्‍य होईल असा विचार त्यांच्या मनात आला.

विचारांची अंमलबजावणी
विचार मूर्त स्वरूप घेऊ लागले. आश्रम परिसरात कामाला येणाऱ्या नागापूर येथील चौघांना गायी खरेदीसाठी साहू यांनी काही रक्कम दिली. पुढे या गायींचे दूध आश्रमावर पोचविण्याचे काम सुरू झाले. वीस वर्ष ते अविरत सुरू होते. महात्मा गांधी यांच्या विचारांना बळ देण्यासाठी १९३९ साली वर्धा येथे गोरस भंडारची स्थापना झाली. जिल्ह्यात उत्पादित दुधाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा त्यामागील हेतू होता. आश्रमाची दुधाची गरज भागल्यानंतर शिल्लक दूध गोरस भंडारला देण्यात येऊ लागले.

दुग्धोत्पादकांचे झाले गाव
दुग्ध व्यवसाय करणाऱ्या नागापुरातील त्या चौघांच्या परिस्थितीत हळूहळू बदल होऊ लागल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येऊ लागले. गावातील इतरांनीही त्याची प्रेरणा घेतली. हळूहळू व्यवसायास चालना मिळाली. आजमितीस ७५० लोकसंख्येच्या या गावात १२६ कुटुंबे आहेत. पैकी ९०जण दुग्ध उत्पादक आहेत. गायींची संख्या एक हजारावर असावी. पहाटे चार वाजता दूध काढून साडेपाचला संकलित झालेल्या दुधाच्या कॅन सहा वाजेपर्यंत गोरस भंडारला पोचणे आवश्‍यक असते. अन्यथा भंडार व्यवस्थापनाकडून उशिरा आलेल्या दुधावर 'असमय दंड' आकारला जातो. व्यवस्थापनाकडून दुधातील विविध घटकांची तपासणी होते. १२.५ एसएनएफ असावा लागतो. फॅटनुसार दर ठरतो. तर सरासरी ३८ रुपये प्रति लिटरचा दर मिळतो असे नागापूरचे दुग्ध उत्पादक विठ्ठल कारामोरे सांगतात.

दूध संकलन
सुरुवातीला अवघे ४० ते ८० लिटर दूध संकलित व्हायचे. गावात सरासरी २५० दुधाळ गायी व त्यापासून सरासरी १० लिटर दुधाची उत्पादकता धरल्यास आज २५०० ते ३००० लिटर दूध संकलन गावात होते. सध्या संघाचे अध्यक्ष नारायण रेवडे आहेत.

दूध संघ
नागापूरला दुग्ध व्यवसायात नवी ओळख मिळाली. सन १९६५ साली नागापूर गो दुग्ध उत्पादक सहकारी संस्था स्थापन झाली. गोरस भंडारला लागणाऱ्या दुधाचा पुरवठा संस्थेमार्फत करणे, धनादेशाद्वारे गावातील दुग्धोत्पादकांना रकमेचे वितरण, सभासदांना गाय व चारा खरेदीसाठी कर्जाच्या माध्यमातून पैशाची उपलब्धता करून देणे अशी कामे संस्थेमार्फत होऊ लागली. मध्यंतरीच्या काळात गैरव्यवहाराच्या कारणांमुळे संस्था बंद पडली. त्यामुळे गोरस भंडारऐवजी करंजी भोगे येथे शासकीय दुग्ध योजनेला दुधाचा पुरवठा शेतकरी करू लागले. परंतु अनेक निकष व नियमांच्या परिणामी दुधाला दर कमी मिळू लागल्याने नागापूर येथील दुग्ध उत्पादक वैतागले. वर्ध्यातील सामाजिक कार्यकर्ते उल्हास जाजू यांनी ही अस्वस्थता वेळीच हेरली. श्री. जाजू यांचे आजोबा नारायणदास जाजू यांना महात्मा गांधी यांचा सहवास लाभला होता. तर वडील नारायण जाजू देखील गांधी विचारांचे पाईक होते. त्यामुळेच उल्हास यांनी गांधी विचारांपासून प्रेरणा घेत सुरू झालेला नागापुरातील दुग्धोत्पादनाचा पॅटर्न टिकून राहावा यासाठी पुढाकार घेतला.
सन १९८२ मध्ये सूत्रे आपल्याकडे घेत संस्थेचे पुनरुज्जीवन केले. संस्थेचा कारभार सुरळीत सुरू राहावा व गैरकारभाराला थारा नसावा या हेतूने नियमावली तयार केली. असमय दंड किंवा फॅटमुळे दुधाला दर कमी मिळाल्यास संस्था त्या दिवसाचे पैसे दूध उत्पादकांना न देता संस्थेच्या खात्यात जमा करेल असा निर्णय घेण्यात आला. त्या बळावर संस्थेला दैनंदिन कामांसाठी लागणाऱ्या पैशाची तरतूद करण्यात आली.

ठळक बाबी

  • जनावरांना वैद्यकीय सेवादेखील सहकारी संस्थेमार्फत उपलब्ध करून देण्याची तरतूद
  • नागपूर ते वर्धा दूध वाहतुकीसाठी संस्थेद्वारा भाडेतत्त्वावर वाहन
  • एखाद्या दूध उत्पादकाच्या चुकीचा फटका साऱ्यांना बसू नये यासाठी ९० दुग्ध उत्पादकांपैकी प्रत्येकी नऊ जणांचा समावेश असलेले दहा गट तयार केले. त्या-त्या गटाचे दूध एकत्रित जाते. यातून उत्तम प्रतीच्या दुधाच गोरस भंडारला होतो पुरवठा.
  • संस्थेद्वारा गाय खरेदीसाठी तीस हजार रुपयांचे कर्ज. ते दहा हप्त्यात भरावे असे अपेक्षित.
  • पूर्वी घेतलेल्या कर्ज रकमेचा भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर आळा बसावा यासाठी
  • कर्ज घेणाऱ्याने दोन जामीनदार आणावे असा नियम लागू. परिणामी कर्ज थकविणाऱ्याऐवजी जामीनदारांकडून कर्ज रक्कमेची वसुली. या नियमामुळे संस्थेचा तोटा आपसूकच कमी झाला.

गावाला मिळाली दिशा
कधीकाळी निराशेच्या गर्तेत असलेल्या आमच्या गावाला दुग्ध व्यवसायाने आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिले आहे. टुमदार घरे, थाटामाटात लग्न व कौटुंबिक सोहळे उत्साहात पार पाडणे यापूर्वी स्वप्नवत वाटणाऱ्या बाबी प्रत्यक्षात साकार झाल्याचे समाधान ग्रामस्थांना आहे.

जनावरांचे आरोग्य
गायींचे एचएफ संकरित आणि जर्सी वाण आहेत. घरच्या मुलाबाळांची काळजी घ्यावी तशी जनावरांची काळजी घेतली जाते. जनावरांच्या आरोग्यासाठी खासगी पशुधन विकास अधिकाऱ्यांची सेवा घेण्यात येते. त्यापोटी महिन्याला दीड लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च होत असल्याचे विठ्ठल कारेमोरे सांगतात. जनावरांचे लसीकरण नियमित होते.

गवळाऊ गाईचे संवर्धन
प्रत्येक कुटुंबाकडे एक याप्रमाणे सुमारे २० गवळाऊ गाई (स्थानिक ब्रीड) आहेत. या जातीचे अस्तित्व राहावे असा ग्रामस्थांचा प्रयत्न आहे. दोन्ही वेळचे मिळून चार ते पाच लिटर इतके कमी दूध असले तरी शेतीकामी काटक बैल मिळतात असे शेतकरी सांगतात. जातिवंत गवळाऊ गायीची किंमत २५ ते ४० हजार रुपयांपर्यंत राहते, असे डॉ. राजेंद्र निखाते सांगतात. शेणाचा वापर शेतीत होत असल्याने जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत झाली आहे.

चाऱ्याचे वाण
जनावरांसाठी चारा हेच गावातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक झाले आहे. यशवंत, जयवंत, कोईमतूर ५, संकरित नेपीयर असे वाण घेण्यात येतात. पशुवैद्यकीय दवाखान्यात चारा बाग आहे. तेथून ठोंब पुरविण्यात येतात. गोरस भंडारने पशुखाद्य तयार केले आहे. गोरस नावाने त्याची विक्री होते. ढेप आणि पशुखाद्य खरेदी केल्यानंतर दूध खरेदीच्या पैशातून पैसे कापले जातात. कृषी विभागाने गावात चारा पीक लागवडीला प्रोत्साहन दिले आहे.

संपर्क- विठ्ठल कारामोरे- ९५२७८६३३४५


फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
‘कोरडवाहू‘ला दिशा देण्यासाठी संस्था...कोरडवाहू क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी...
आदर्श कामांच्या उभारणीतून ठसा उमटवलेले...द्राक्ष, डाळिंब,कांद्यासाठी जगभर प्रसिद्ध नाशिक...
कुडावळेमध्ये `शत प्रतिशत भात लागवड'...गाव आणि शेतीचा शाश्वत विकास करायचा असेल तर...
कृषीसंपन्नता, आरोग्य, पर्यावरण हेच...कोटमगावाने (ता. जि. नाशिक) कृषीसंपन्न, आरोग्य व...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
जलसंधारणातून शिवार फुलले, समाधानाचे...मामलदे (जि.जळगाव) गावाने शिवारातील पाण्याची टंचाई...
चला, झाडांच्या गावाला जाऊया...गावातील सर्व घरावरील छताच्या पाण्याचे रेन वॅाटर...
प्राथमिक निवड झाल्यानंतर गाव, संस्थेने...आदर्शगाव योजनेमध्ये गावाची प्राथमिक निवड...
ग्रामविकासातील अडथळे आणि उपाययोजनाग्रामविकास करताना स्थानिक पातळीवर नियोजन तसेच...
कृषी, पर्यावरण, आरोग्य प्रकल्पांतून...वेगाने होणाऱ्या शहरीकरणातही कृषी, पर्यावरण,...
ग्राम परिवर्तनासाठी तरुणाईने घडविली...लोकसहभागातून काम केल्यास ग्रामीण भागाचा जलद गतीने...
मांडा ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रकआपल्या गावाचा ग्रामविकास आराखडा आपण सर्वांनी...
रेशीम शेतीतून टाकळीने बांधले प्रगतीचे...यवतमाळ जिल्हयात रेशीम शेतीच्या माध्यमातून आर्थिक...
समजाऊन घ्या ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प ‘आमचं गाव-आमचा विकास' या लेखमालेमध्ये आपण शाश्वत...
शेती. शिक्षण, विकासकामांतून पुढारलेले...भाटपुरा (जि.धुळे) गावाने सिंचनाचे शाश्‍वत स्त्रोत...
ज्ञानग्राम-शाश्‍वतग्राम निवडीचे निकषज्ञानग्रामासाठी निवड करण्याची मागणी गावाकडूनच आली...
नॉलेज-कॉलेज-व्हिलेज' योजनेचा आराखडा‘नॉलेज- कॉलेज- व्हिलेज' सहयोगी योजना ही मागणी...
आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनात झाला बदलटाटा ट्रस्ट `सेंट्रल इंडिया`च्या माध्यमातून...
स्नेहग्राम बनलंय उपेक्षित मुलांचा आधारसमाजातील वंचित, उपेक्षित घटकासह, एकल पालकांच्या...
सर्वसमावेशक ग्रामविकास आराखडा महत्वाचाविविध प्रकारच्या स्वयंसेवी संस्था ग्रामीण भागात...