यांत्रिकीरणातून शेती केली सुलभ, रोजगारही मिळवला

पाॅली मल्चिंग पेपर अंथरण्याचे यंत्र
पाॅली मल्चिंग पेपर अंथरण्याचे यंत्र

नगर जिल्ह्यातील बेलापूर येथील बाळासाहेब मारुतराव राशीनकर या तरुण शेतकऱ्याने मजूरटंचाईवर मात करण्यासाठी यांत्रिक शेतीवर भर दिला आहे. कांदा पेरणी, गादीवाफा तयार करणे, पॉली मल्चिंग पेपर अंथरणे, कापसाच्या पर्हाट्यांचा भुगा करून शेतात पसरवणे आदी कामे यंत्राद्वारे सुलभ व कमी वेळेत करणे शक्य झाले आहे. इतरांना देखील ही सेवा देताना उत्पन्नाचा स्रोत तयार केला आहे. नगर जिल्ह्यात बेलापर (ता. श्रीरामपूर) व चांदेगाव (ता. राहुरी) हा परिसर तसा शेतीत पुढारलेला. प्रवरा नदीच्या पट्ट्यांतील शेती त्यामुळेच सधन, बागायती झाली आहे. या भागातील बहुतांश शेतकरी उसाचे पीक घेत. अलकडील काळात मात्र अन्य पिकांचेही क्षेत्र वाढत आहे. बेलापूर येथील मारुतराव राशीनकर यांची दोन्ही ठिकाणी मिळून एकरा एकर शेती आहे. त्यांचा मुलगा बाळासाहेब हे पूर्णवेळ शेती करतात. राशीनकर कुटुंबाने पूर्वीपासूनच यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. तीस वर्षांपूर्वीच त्यांनी टॅक्टर खरेदी केला होता. ठिबक सिंचनाचाही बारा वर्षांपूर्वी वापर सुरू केला. काळानुसार ते अवजारांचा वापर वाढवत गेल. सुमारे तीन वर्षांपूर्वी राशीनकर यांनी चाळीस हजार रुपयांना ट्रॅक्टरचलित कांदा पेरणी यंत्र खरेदी केले. आज स्वतःच्या शेतीत वापर करण्याबरोबर ते भाडेतत्त्वावरही हे यंत्र शेतकऱ्यांना देतात. या यंत्राच्या वापरामुळे उत्पादन खर्चात २० ते ४० टक्क्यांपर्यंत बचत झाल्याचे ते सांगतात. पॉली मल्चिंग पेपर अंथरणे यंत्राचा वापर पपई व कांदा ही राशीनकर यांची सध्याची मुख्य पिके आहेत. ऊसही आहे. त्याचबरोबर हंगामी म्हणून कलिंगड व खरबूज देखील ते घेतात. या हंगामी पिकांत गादीवाफे (बेड) तयार करण्यापासून खत घालणे, मल्चिंग पेपर अंथरणे, ठिबक अंथरणे असा एकरी किमान सहा हजार रुपये खर्च यायचा. अशावेळी खर्चात बचत करण्याच्या उद्देशाने एक लाख रुपये खर्च करून त्यांनी बहुविध कामे करणारे यंत्र खरेदी केले. आताही ही सर्व कामे करण्यासाठी एकरी साडेतीनहजार रुपये केवळ खर्च येतो असे राशीनकर सांगतात. आपल्यासोबत एका शेतकऱ्यासाठी २० एकरांवर देखील हे काम करून दिल्याचे ते सांगतात. कापसाच्या काड्यांची कुट्टी कपाशी पिकाचाही राशीनकर यांना अनुभव आहे. त्याच दृष्टीने कापसाच्या पऱ्हाट्यांची कुट्टी करणारे यंत्र त्यांनी एक लाख चाळीस हजार रुपयांना आणले आहे. ही कुट्टी शेतात जागेवरच पसरवली जाते. एक एकर क्षेत्र कव्हर करण्यासाठी या यंत्राला सुमारे दोन तासांचा अवधी पुरतो. ४० ते ४५ एचपी क्षमतेच्या ट्रॅक्टरला हे यंत्र जोडता येते. यांत्रिकरणाने दिला रोजगार राशीनकर यांनी स्वतःची शेती यांत्रिकरणाच्या साहाय्याने सोपी केलीच पण अन्य शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर ही सेवा देताना उत्पन्नाचा स्रोतही तयार केला आहे. कांदा पेरणी यंत्र एकरी अडीचहजार रुपये दराने, कापसाची कुट्टी एकरी दोन हजार रुपये तर बेडनिर्मिती, मल्चिंग पेपर अंथरणे आदी कामे ते चार हजार रुपये प्रतिएकर या दराने करतात. मका लागवड तंत्रात बदल लागवड तंत्रात बदल ही राशीनकर यांच्या शेतीची खासीयत आहे. कापसाची पाच बाय एक फूट अंतरावर त्यांनी लागवड केली आहे. कांदा पेरणी यंत्राचा वापर व एकूण व्यवस्थापन यातून एकरी २३ टनांपर्यंत उत्पादनापर्यंत पोचल्याचे ते सांगतात. अलिकडील वर्षांत स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा या अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मका पिकात राज्यात सर्वत्र झाला. हे पीक मोठे किंवा उंच झाल्यास त्यात फवारणी करणे शक्य होत नाही. अशावेळी राशीनकर यांनी दोन ओळीत साडेचार फूट व दोन बियांत आठ इंच असे अंतर ठेऊन मक्याचे पीक घेतले. ठिबकच्या दोन्ही बाजूंस मका लावला. या तंत्रामुळे पिकाच्या मधून फवारणी करणे सोपे झाले आहे. शिवाय हवादेखील खेळती राहिली आहे. लष्करी अळीचा प्रादुर्भाव या तंत्राने रोखता येईल असा विश्वास त्यांना आहे. खोडवा उसाचे पीकदेखील ते अनेक वर्षांपासून विनामशागत तंत्राने घेतात. उसाचा पाला न जाळता तो कुट्टी करून सरीतच गाडण्यात येतो.

संपर्क- बाळासाहेब राशीनकर-७९७२६८७१८१  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com