उत्कृष्ट व्यवस्थापनातून पपईत मिळवली ओळख

पपईच्या बागेत पाटील पितापूत्र
पपईच्या बागेत पाटील पितापूत्र

नंदुरबार जिल्ह्यात धमडाई येथील सुभाष व प्रनील या पाटील पितापुत्रांनी विविध संकटांवर मात करून फळपिकांच्या शेतीत आपली ओळख तयार केली आहे. केळी, मिरची या पिकांबरोबरच पपई हे देखील त्यांचे अनेक वर्षांपासूनचे हुकमी पीक झाले आहे. उत्तम व्यवस्थापनाच्या आधारे एकरी सरासरी २८ ते ३० टनांच्या आसपास ते उत्पादन घेतात. राजस्थान, दिल्लीच्या व्यापाऱ्यांकडून त्यांच्या दर्जेदार पपईची खरेदी होते. शेतीचे अर्थकारण उंचावण्यास या फळबागांनी पाटील यांना मोठा आधार दिला आहे. खानदेशात कापूस, केळीपाठोपाठ पपईचे पीकही शेतकरी जोमात घेतात. हे पीक तापी, गिरणा, पांझरा, वाघूर, सुसरी, गोमाई, भोकरी आदी नदीकाठच्या भागात जोमाने येते. नंदुरबार जिल्हा हा पपईचा महत्त्वाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील शहादा, नंदुरबार व तळोदा हे तालुके, धुळ्यातील शिरपूर व धुळे आणि जळगावमधील यावल, चोपडा, रावेर व जामनेर हे तालुके या पिकासाठी प्रसिद्ध आहेत. उन्हाळ्यात लागवड केल्यास या भागातील पपईवर त्याचा परिणाम जाणवतो. विषाणुजन्य रोगाचीही समस्या या पिकात जाणवते. अनेकवेळा दरही चांगले मिळत नाहीत. अशा विविध संकटांमुळे पीक सोडून देण्याची वेळ येते. केळीपेक्षा हे अधिक नाजूक पीक आहे. या सर्व परिस्थितीशी सामना करून नंदुरबार तालुक्यातील धमडाई येथील सुभाष व प्रनील या पाटील पितापुत्रांनी चिकाटीने पपई पिकाच्या लागवडीत सातत्य ठेवले आहे. अशी आहे पाटील यांची पपई शेती सुमारे १२ वर्षांपासून पाटील यांनी पपईचे पीक जपले आहे. दरवर्षी सहा ते १० एकर असे त्याचे क्षेत्र असते. तैवान ७८६ हे वाण असते. गादीवाफा व ठिबक पद्धतीने उन्हाळी हंगामात लागवड होते. त्यासाठी पाण्याचा निचरा होणारी, मध्यम जमीन निवडण्यात येते. सुरुवातीच्या दरांचा लाभ घेण्यासाठी मार्च ते एप्रिल लागवडीच्या वेळेल प्राधान्य देण्यात येते. नाशिक येथील नर्सरीकडून १२ रुपये प्रति नग या दरात रोपे घेण्यात येतात. एकरात सुमारे ९०० ते ९५० रोपे बसतात. क्रॉप कव्हरचा प्रयोग खानदेशात उन्हाळ्यात कमाल तापमान ४६ अंशांपर्यंत पोचते. लागवडही नेमकी याच काळात होत असते. अशावेळी कोवळ्या रोपांना उष्णतेचा फटका बसू नये यासाठी प्रत्येक रोपाला क्रॉप कव्हरचा वापर करण्यात येतो. एक रुपया प्रतिनग असा एकरी ९५० ते एक हजार रुपये त्याचा खर्च येतो. यामुळे रोपांची मर होण्याचे प्रमाण किंवा तुटीचे प्रमाण अत्यंत नगण्य झाले आहे, त्यामुळे नांग्या भरण्याची वेळ शक्यतो येत नाही. सुमारे ३५ दिवसांपर्यंत या कव्हरचा वापर होतो. तोपर्यंत झाडांची वाढ जोमात होऊन उष्णतेत तग धरण्याची रोपांची क्षमता वाढीस लागलेली असते. चोख व्यवस्थापन सुरुवातीच्या काळात दररोज एक तास, तर फुले लागण्याच्या वेळेस किंवा पावसाळ्यात पावसाचा खंड पडल्यास हे प्रमाण प्रतिदिन चार तासांपर्यंत वाढविण्यात येते. लागवड तसेच पाणी व खते व्यवस्थापनासाठी पाटील यांनी सल्लागाराची नियुक्ती केली आहे. प्रतिएकर एक हजार रुपये शुल्क त्यासाठी देण्यात येते. खते देण्यासाठी वेळापत्रक तयार करून घेतले आहे. विषाणुजन्य रोगामुळे यंदा जळगाव, चोपडा, यावल, शहादा भागात पपईचे पीक अनेकांना सोडून द्यावे लागले. मात्र प्रनील यांचे पीक जोमात आले आहे. किमान दोन व कमाल चार- पाच किलो वजनापर्यंतची फळे मिळाली आहेत. काढणी लवकर, मागणी परराज्यांत अन्य शेतकऱ्यांच्या बागांच्या तुलनेत प्रनील यांच्या बागेत लवकर म्हणजे नोव्हेंबरच्या सुमारास काढणी सुरू होते. यंदाही वेळ साधत सुरुवातीलाच १८ रुपये प्रतिकिलोचा दर त्यांनी मिळवला. ते म्हणाले, की हंगाम सुरू झाल्यानंतर राजस्थान, दिल्ली येथील शंभरहून अधिक व्यापारी शहादा भागात येऊन काही दिवस मुक्काम करतात. त्यांच्याकडून पपईची खरेदी होते. काही रक्कम आगाऊ देण्यात येते. प्रनील यांच्याकडील पपईची गुणवत्ता व वजन दोन्ही प्रमाणबद्ध असल्याने एक लाख रुपये रक्कम आगाऊ मिळाली. जशी काढणी होईल तशी या रकमेची कपात पपई विक्रीपोटी मिळणाऱ्या पैशांमधून होईल. यंदा १० दिवसांआड काढणी होत आहे. थंडी वाढेल तशी फळे पक्व होण्याची प्रक्रिया मंद होईल. काढणीसाठी प्रतिटन ३६० रुपये मजुरी द्यावी लागते. नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत काढणी वेगात सुरू असते. फेब्रुवारीत क्षेत्र रिकामे करण्यात येते. थंडी अधिक असते त्या वेळी दर चांगले किंवा टिकून असतात. उष्णता वाढते तसे दर कमी होतात. यंदा उत्तरेकडे थंडी वाढली आहे. दुसरीकडे खानदेशात पपईचे ५० ते ६० टक्के नुकसान रोगराई व विषम वातावरणात झाल्याने दर टिकून राहण्याची अपेक्षा प्रनील यांना आहे. उत्पादन, दर व उत्पन्न दरवर्षी एकरी २८ ते ३० टन उत्पादन मिळते. कमाल ४० टन उत्पादनापर्यंतही पोचल्याचे प्रनील सांगतात. उत्पादन खर्च एकरी किमान ४० हजार रुपयांपर्यंत येतो. गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता किलोला ४ ते ५ रुपये सरासरी दर मिळतो. सन २०१३ मध्ये हाच दर ९ रुपये मिळाला होता. त्या वेळी एकूण क्षेत्रातून पंधरा लाख रुपयांच्या पुढे उत्पन्न मिळाले होते. यंदा अनेक वर्षांच्या काळात सर्वोच्च म्हणजे १८ रुपये दर मिळाला आहे. खर्च वजा जाता या पिकातून सुमारे ६० हजार ते ७० हजार रुपयांचा नफा मिळतो असा दरवर्षीचा अनुभव आहे. जागेवरच बाजारपेठ पपईला उत्तर भारतातील दिल्ली, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेशात उठाव असतो. पपईच्या खरेदीसाठी म्हणूनच नोव्हेंबरच्या काळात राजस्थान व दिल्लीमधील खरेदीदार शहादा येथे दाखल होतात. उत्तर भारतात खानदेशातून नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये दररोज सरासरी ५०० टन पपईची पाठवणूक होते. शेतात खरेदी, वजन होते. काढणीसाठी लागणारे मजूरही खरेदीदार सोबत आणतात. यामुळे त्यांची शोधाशोध करण्याची गरज किंवा मजुरीचे दर ठरविण्याची समस्याही शेतकऱ्यांपुढे नसते. धुळ्यातील शिंदखेडा, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, जळगावमधील रावेर येथील पपईचे मोठे व्यापारी खानदेशात पपईची खेडा किंवा शिवार खरेदी करतात. जळगाव, धुळे, नंदुरबारच्या बाजारातही दररोज किमान मिळून ३०० ते ४०० टन पपई खरेदी-विक्रीपोटी उलाढाल होते असे व्यापारी सूत्रांनी सांगितले. अन्य पिकांचेही उल्लेखनीय उत्पादन पाटील यांच्याकडे पाच- सहा एकरांत उतिसंवर्धित केळी असते. प्रति २५ किलो वजनाची रास ते घेतात. तापी नदीहून नऊ किलोमीटरची पाइपलाइन करून पाटील यांनी पाणी उपलब्ध केले आहे. खरिपात मिरची असते. त्याचे एकरी ३० टनांपर्यंत उत्पादन घेण्यात येते. यंदा त्यास किलोस २० रुपये दर मिळाला आहे. संपर्क - प्रनील पाटील - ८९९९४३८९८२, ८८०५१६४२०२  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com