प्लॅस्टिक पेपरच्या वापरातून तीन एकर द्राक्षबागेचे संरक्षण

पंडित यांची प्लॅस्टिक पेपरचे आच्छादन केलेली द्राक्षबाग
पंडित यांची प्लॅस्टिक पेपरचे आच्छादन केलेली द्राक्षबाग

निवाणे (जि. नाशिक) येथील डॉ. महेंद्र व संदीप या पंडित बंधूंनी द्राक्षबागेवर प्लॅस्टिक पेपरचा संरक्षणात्मक वापर करण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. मागील वर्षी सततच्या पावसामुळे अन्यत्र द्राक्षबागांचे नुकसान झाले असता पंडित यांना एकरी १२ टन उत्पादन मिळाले. दर्जेदार मालाला किलोला ९५ रुपये दर मिळाला .   निवाणे (जि. नाशिक) येथील कारभारी आहेर यांची एकूण १६ एकर शेती आहे. पूर्वी ते पारंपरिक पिके घेत. १९० च्या सुमारास व्यावसायिक शेती करताना आठ एकरांत द्राक्ष लागवड झाली. यात पाच एकर थॉमसन व तीन एकरांत सोनाका अशी लागवड केली. कळवण तालुक्यात अगदी सुरुवातीला द्राक्ष लागवड उत्पादकांत ते सर्वात आघाडीवर होते. निष्ठेने प्रयोगशील शेती आज या शेतीची जबाबदारी मुलगा डॉ. महेंद्र व संदीप यांच्याकडे आहे. नवनवीन प्रयोगांचा अवलंब करत पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादनासाठी त्यांनी काम सुरू केले. महाविद्यालयीन जीवनापासून डॉ. महेंद्र जबाबदारीने शेती पाहतात. वैद्यकीय शिक्षणासाठी औरंगाबाद येथे प्रवेश घेतल्यानंतरही सुटीच्या काळात ते आवर्जून शेती पाहायचे. बालरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. महेंद्र यांचे आज सुसज्ज हॉस्पिटल आहे. हा व्यवसाय सांभाळून द्राक्षातही प्रयोगशील शेती त्यांनी जपली आहे. बदलत्या हवामानाला सुसंगत शेती कळवण भागात आगाप द्राक्षशेती केली जाते. मात्र मागील काही वर्षांपासून अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट आदी हवामान बदलाच्या संकटातून शेती जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. पंडितही त्यास अपवाद नव्हते. नुकसानीमुळे मनोधैर्य खचून न देता जिद्दीने पुन्हा उभे राहून शाश्वत शेतीचा पर्याय शोधण्यास सुरुवात केली. दरवर्षी आगाप हंगामात गोड्या छाटणीच्या तारखांमध्ये बदल केला. मात्र काही फरक पडला नाही. फुलोरा अवस्थेतील नुकसान, घडकुज, द्राक्षमण्यांना तडे जाणे, रोगांच्या प्रादुर्भावामुळे प्रतवारी घटणे अशा अनेक अडचणी होत्या. यावर दीर्घकालीन पर्याय निवडून हवामान आधारित संरक्षित द्राक्ष शेतीचा दीड एकर क्षेत्रावर प्रयोग करण्याचे ठरविले. यासाठी इंटरनेट, तज्ज्ञांच्या भेटीतून बागेवर प्लॅस्टिक क्रॉप कव्हर वापरण्याचा पर्याय मिळाला. प्लॅस्टिक पेपरचा प्रयोग परिसरातील एका वितरकाकडून इटालियन तंत्रज्ञानाचा प्लॅस्टिक पेपरचे तंत्र मिळाले. यंदाचे हे प्रयोगाचे चौथे वर्ष आहे. सुमारे तीन एकरांत थॉमसन वाणाच्या बागेत हा पेपर वापरला आहे. बागेचा मांडव वाय (Y) प्रकारचा आहे. पेपर वापरण्यापूर्वी मांडवाच्या वर ८ मिमी जाडीची तार वापरून उभ्या आडव्या तारा बांधून सांगाडा उभारला आहे. प्लॅस्टिक पेपरसाठी साडेचार लाख व स्ट्रक्चर उभारणीसाठी मिळून एकूण खर्च साडेसहा लाख रुपये आला आहे. दरवर्षी ख्रिसमसच्या वेळी द्राक्षे बाजारात येतील असे छाटणीचे नियोजन १५ ऑगस्टच्या दरम्यान असते. प्लॅस्टिक पेपरचा वापर केल्याने तापमानवाढीमुळे भुरीसाठी पोषक वातावरण होऊ शकते. त्यामुळे विशेष प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दर चौथ्या दिवशी गरजेनुसार फवारण्या केल्या जातात. बाग पोंगा अवस्थेत असताना स्पर्शजन्य फवारण्या तर गरजेनुसार आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर केला. प्लॅस्टिक पेपरचे झालेले फायदे

  • फळकुज, फळांचे क्रॅकिंग, डाऊनी मिल्ड्यूची तीव्रता या समस्या कमी झाल्या.
  • हवामान बदलांची तीव्रता कमी झाल्याने साखर उतरण्यास अडचण आली नाही.
  • मणी कुरकुरीत व दर्जेदार तयार झाले. (गुणवत्तापूर्ण निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन)
  • सुमारे १५ दिवस आधी माल काढणीसाठी तयार म्हणजे पक्व झाला.
  • मालफुगवणीसाठी अल्प प्रमाणावर संजीवकांचा वापर झाला.
  • फवारण्यांची संख्या सुमारे ४० टक्के कमी झाली. त्यावरील खर्चात बचत झाली.
  • तापमान संतुलित होत असल्याने फळाच्या वाढीसाठी चालना
  • पेपरखाली असलेला भाग ज्यामध्ये बोध भुसभुशीत
  • बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी
  • अल्ट्रा व्हॉयलेट किरण फिल्टर होऊन आत जातात.
  • पानांच्या आकारात वाढ, त्यामुळे अन्न तयार करण्याची क्षमता वाढली.
  • सततच्या पावसानंतरही चांगले उत्पादन यंदा सततच्या पावसामुळे परिसरात सर्वत्र द्राक्षबागांचे नुकसान झाले. पंडित यांची बाग मात्र या पावसातून वाचली. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांना एकरी १२ टनांच्या दरम्यान उत्पादन मिळाले. व्यापाऱ्यांनी किलोला ९५ ते १२० रुपये दर मिळाला. कळवण, सटाणा, मालेगाव या तीनही तालुक्यात यंदा तुमच्याकडेच दर्जेदार द्राक्षे अधिक प्रमाणात मिळाली अस व्यापाऱ्यांनी सांगितल्याचे डॉ. मच्छिंद्र म्हणाले. दरवर्षी ते निर्यातदारांना माल देतात. एकूण उत्पादनापैकी ८० टक्के निर्यात तर उर्वरित १५ टक्के माल स्थानिक बाजारात मागणीनुसार दिला. प्रामुख्याने रशियामध्ये द्राक्ष निर्यात झाली. द्राक्ष व्यवस्थापनातील ठळक बाबी

  • वर्षातून ३ वेळेस द्राक्षबागेला स्लरी
  • छाटणीनंतर पाचव्या पानावर पानदेठ परीक्षण
  • माती परीक्षणानुसार खतांचा पुरवठा
  • रासायनिक अवशेषमुक्त द्राक्षनिर्मितीसाठी जैविक खतांचा वापर
  • सूक्ष्म सिंचनाचा वापर
  • हवामानासंबंधी मोबाईलवर अपडेट्सनुसार कामे
  • डॉ. महेंद्र वैद्यकीय व्यावसाय सांभाळून व्यवस्थापन पाहतात. बंधू संदीप पूर्णवेळ शेती पाहतात.
  • दोघांमध्ये समन्वय चांगला असल्याने कामे सुकर होतात.
  • नावीन्याचा ध्यास  शेतीला आधुनिक पद्धतींची जोड मिळावी यासाठी डॉ. महेंद्र प्रयत्नशील असतात. द्राक्षशेतीत येणाऱ्या विविध अडचणी यावर मात करण्यासाठी द्राक्षतज्ज्ञांच्या भेटी घेऊन नवीन माहिती व मार्गदर्शन ते घेत असतात. वैद्यकीय व्यवसायात कार्यरत असतानादेखील द्राक्षातील घडामोडींचा अभ्यास करून नवनवीन प्रयोगांची अंमलबजावणी करण्यासाठी ते आग्रही असतात. ॲग्रोवन सच्चा साथी ॲग्रोवनचे पहिल्या दिवसापासून आपण वाचक असून, त्याद्वारे नवनवीन प्रयोगांची माहिती मिळत असल्याचे डॉ. महेंद्र आवर्जून सांगतात. स्वतःबरोबरच हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ॲग्रोवन त्यांच्याकडे दररोज उपलब्ध असतो. संपर्क- डॉ. महेंद्र आहेर- ९८२३८८५३७७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com