मित्रकीटक दूर करतील अमेरिकन लष्करी अळीचे संकट 

लष्करी अळीसहगुलाबी बोंड अळीसाठीही स्पेन मॉडेल ज्याप्रमाणे मका उत्पादकांसमोर अमेरिकन लष्करी अळीचे संकट उभे आहे, तसे तेकापूस उत्पादकांसमोरही गुलाबी बोंड अळीच्या रूपाने संकट उभे आहे. जनुकीय सुधारित बीजी वन (बोलगार्ड) कापूस वाण अळीपुढे निष्प्रभ ठरले. काही कालावधीनंतर बीजी टू वाणही कुचकामी ठरेल. रासायनिक कीटकनाशकांचा वापरही या अळीला रोखण्यास कमी पडतो आहे. अशा स्थितीत मित्रकीटकांचा वापर या अळीला रोखू शकेल. परोपजीवी व परभक्षी मिळून जगभरात ५० हून अधिक मित्रकीटक या अळीचे नियंत्रण करण्यात समर्थ असल्याचे कॅबी या आंतरराष्ट्रीय संस्थेने म्हटले आहे. ब्रॅकॉन, चिलोनीस, क्रायसोपर्ला, ट्रायकोग्रामा, ॲपेंटॅलीस आदींचा त्यात समावेश आहे. स्पेन देशाने खासगी कंपन्या, कृषी विद्यापीठ, शेतकरी संघ आदी विविध घटकांचे संघटन करून जैविक नियंत्रण पद्धतीचे मॉडेल उभारले आहे. तसे काम भारतात झाल्यास विविध पिकांत विविध किडींचे नियंत्रण सोपे होऊन ते शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकेल
अमेरिकन लष्करी अळी व दुसऱ्या छायाचित्रात अळीचे नियंत्रण करणारा टेलीनोमस मित्रकीटक
अमेरिकन लष्करी अळी व दुसऱ्या छायाचित्रात अळीचे नियंत्रण करणारा टेलीनोमस मित्रकीटक

अमेरिकन लष्करी अळी म्हणजेच फॉल वर्म किडीने भारतात सर्वत्र उद्रेक दाखवण्यास सुरवात केली आहे. अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी किंवा निर्मूलनासाठी केवळ रासायनिक कीडनाशकांचा उपाय पुरेसा नाही, तर जगभरात यशस्वी म्हणून सिद्ध झालेला मित्रकीटकांचा पर्याय अमेरिकन लष्करी अळीचे संकट दूर करण्यासाठी सक्षम ठरणारा आहे. गरज आहे केवळ त्या अनुषंगाने अभ्यास, संशोधन, उत्पादन, प्रयोग, प्रात्यक्षिके घेण्याची, त्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची.    स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा (अमेरिकन लष्करी किंवा फॉल वर्म) अळीने जगभरात, तसेच भारतातील विविध राज्यांत शिरकाव करून रौर्द्र रूप धारण केले आहे. महाराष्ट्रातही मका या मुख्य पिकाबरोबर ऊस, ज्वारी, नाचणी आदी पिकांतही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव करून शेतकऱ्यांचे अर्थकारण विस्कटून टाकले आहे. कृषी विद्यापीठे, कृषी विभाग, खासगी क्षेत्रे आपापल्या परीने नियंत्रणाचे उपाय सुचवीत आहेत. भारतासाठी ही कीड नवी असल्याने सद्यःस्थितीत रासायनिक कीडनाशके हाच ठोस पर्याय शेतकऱ्यांपुढे आहे. अमेरिकी व आफ्रिकी देशांमध्ये ही कीड यापूर्वीपासूनच अस्तित्वात असल्याने व मका हे त्यांचे मुख्य पीक असल्याने तेथे नियंत्रणाच्या विविध प्रभावी पद्धतींवर संशोधन झाले आहे.  जगभरात मित्रकीटकांचा पर्याय ठरतोय प्रभावी  रासायनिक कीडनाशकांऐवजी मित्रकीटकांचा वापर करून किडींचे संपूर्ण नियंत्रण होऊ शकते,  हे इस्राईल, स्पेन आदी देशांनी सिद्ध केले आहे. स्पेनमधील अल्मेरिया भागात तब्बल ६० हजार एकरांहून अधिक भाजीपाला पिकांची पॉलिहाउसेस एकवटली आहेत. तेथे रसायनांचा जराही वापर न करता केवळ विविध मित्रकीटकांच्या आधारे किडींना आटोक्यात आणले जाते. अल्मेरियात मित्रकीटक तयार करणाऱ्या कंपन्या असून त्यांच्याकडे मित्रकीटकांचे २० ते २५ हून अधिक पर्याय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत.  मित्रकीटकांच्या वापराचे फायदे 

  • किडींचे प्रभावी नियंत्रण होण्याची हमी 
  • रासायनिक कीडनाशके विकत घेण्याचा खर्च नाही 
  • पर्यावरणात कोणतेही प्रदूषण नाही 
  • अन्नात रासायनिक अवशेष राहण्याची समस्या नाही 
  • किडींमध्ये प्रतिकारशक्ती तयार होण्याचा धोका नाही 
  • जागतिक प्रयोग  केवळ रासायनिक उपायांवर अवलंबून अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण होणार नाही, ही बाब जगभरातील तज्ज्ञांनी वेळीच जाणली. त्यादृष्टीने मित्रकीटकांचा शोध व वापरावर संशोधन सुरू झाले. आफ्रिका व अमेरिका खंडातील विविध देशांत शेतकऱ्यांच्या शेतात प्रयोगही झाले.  पूश-पूल पद्धत  हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. नॉर्मन बोरलॉग यांची कर्मभूमी असलेल्या मेक्सिको येथील आंतरराष्ट्रीय मका आणि गहू सुधार केंद्राने (सीमीट) लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी पूश-पूल नावाची कमी खर्चिक पद्धत अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केली आहे.  या पद्धतीची वैशिष्ट्ये 

  • रसायनांचा वापर नसल्याने माती, पर्यावरण प्रदूषित होत नाही. 
  • मानवी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम नाही 
  • जैवविविधतेचे संवर्धन 
  • अशी आहे पद्धत 

  • नेपीयर व सिल्व्हरलीफ डेस्मोडियम (डेस्मोडियम युन्सीनॅटम) या दोन चारा पिकांचा कुशलतेने वापर. 
  • डेस्मोडियमची लागवड मक्यात आंतरपीक म्हणून, तर मका शेतीच्या चारही बाजूंनी नेपियरची लागवड. 
  • डेस्मोडियम वनस्पतीतून बाष्पशील (व्होलाटाईल) रसायने स्रवतात. त्यांच्या गंधाने अमेरिकन लष्करी अळीचा पतंग त्यापासून दूर पळतो. 
  • नेपियर गवतही विशिष्ट प्रकारचे रसायन प्रसारित करते. मात्र त्याचा गंध अळीच्या पतंगाला आकर्षित करणारा असतो. म्हणजेच आंतरपीक किडीला मक्यापासून दूर ठेवण्याचे काम करते, तर कुंपण नेपीयर पीक 
  • किडीला आपल्याकडे खेचून घेत मका शेतात प्रवेश करण्यापासून रोखते. 
  • या पद्धतीचे बहुविध फायदे 

  • अळीपासून मक्याचे संरक्षण झाले. 
  • केनियातील शेतकरी मातीची धूप कमी करण्यासाठी नेपियर गवताचा वापर करतात, साहजिकच तोही हेतू साध्य झाला. 
  • डेस्मोडियम द्विदलवर्गीय असल्याने त्यापासून जमिनीला नत्र उपलब्ध झाला, जमिनीची सुपीकता वाढवली. 
  • उष्ण तापमानात मक्याचे संरक्षण करण्याचेही काम डेस्मोडियमने केले. 
  • सर्वांत महत्त्वाचे म्हणजे डेस्मोडियम व नेपियरचा मुबलक चारा मक्याच्या जोडीला मुबलक उपलब्ध झाला. 
  • टेलीनोमस, ट्रायकोग्रामाचा वापर  सध्या अमेरिकन लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी टेलीनोमस रेमस हा मित्रकीटक जगभरातील शास्त्रज्ञांच्या अजेंड्यावर आहे. कार्यपद्धतीनुसार तो ट्रायकोग्रामा या मित्रकीटकाचा बंधूच म्हणावा लागेल. मित्रकीटकांचे दोन प्रकार असतात. यातील परभक्षी (प्रिडेटर) कीटक किडीवर थेट हल्ला चढवून त्याला मारून टाकतो, तर दुसरा प्रकार म्हणजे किडीच्या शरीरात परोपजीवी म्हणून राहून त्यावर आपली उपजीविका भागवून किडीचे जीवन संपवणारा पॅरासिटॉईड. यात टेलीनोमस व ट्रायकोग्रामा हे दुसऱ्या प्रकारात मोडतात. दोघेही किडीच्या अळीची अंडी शोधून त्यात आपली अंडी घालतात. अंड्यातून बाहेर आलेली मित्रकीटकांची अळी किडीच्या अंड्याचा भाग खाऊन किडीला अंडी अवस्थेतच संपवते. म्हणजेच पिकाचे नुकसान करणारी अळी अवस्था जन्मच घेऊ शकत नाही.  ठळक बाबी  १) स्वित्झर्लंड, पर्यावरण विज्ञान व व्यवस्थापन विभाग, नॉर्थ वेस्ट विद्यापीठ, दक्षिण आफ्रिका,  इक्रिसॅट, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल ॲग्रिकल्चरल , बेनीन, इथिओपिया, केनया, कॅबी- इंग्लंड, नॅचरल हिस्ट्री म्युझियम, इंग्लंड आदींच्या संयुक्त विद्यमाने संशोधन पत्रिका, तसेच माहिती उपलब्ध केली आहे. त्यानुसार आफ्रिकी देशांतील सर्वेक्षण अभ्यासातून अमेरिकन लष्करी अळीच्या अंड्यांचे टेलेनोमस कीटकांद्वारे परोपजीवीकरण म्हणजेच नियंत्रण झाल्याचे आढळले आहे. आफ्रिका खंडातील पाच देशांत हा कीटक आढळल्याने अळीचे प्रभावी नियंत्रण करण्याची नामी दिशा मिळाल्याचे ते द्योतक आहे.  २) अळीच्या मक्यावरील आक्रमणामुळे तब्बल २०० दशलक्षाहून अधिक आफ्रिकी शेतकऱ्यांची मका शेती धोक्यात आली, त्यावरून अळीचे हे संकट किती भयानक आहे त्याची कल्पना करता येते.  ३) मका हे मुख्य पीक असलेले आफ्रिका खंडात सुमारे १२ देश आहेत. इथल्या शेतकऱ्यांना नियंत्रणाचे प्रभावी उपाय उपलब्ध न झाल्यास वर्षाला ८ ते २० दशलक्ष टन मका उत्पादनाचे अपरिमीत नुकसान होईल असे अभ्यासातून निष्पन्न झाले आहे.  मित्रकीटकांद्वारे नियंत्रण करण्याच्या तीन मुख्य रणनीती 

  •  टेलीनोमस वा कोणताही प्रभावी मित्रकीटक ज्या ठिकाणी आढळतो तेथून त्याची प्रादुर्भावग्रस्त भागात (देशांत) आयात करणे, यालाच शास्त्रीय भाषेत क्लासिकल बायोलॉजिकल कंट्रोल म्हणतात. 
  • अनोळखी प्रदेशात मित्रकीटक सुस्थापित करणे ही सोपी बाब नसते. त्यांची संख्या वाढवण्यासाठी त्यांचे प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणात उत्पादन करावे लागते. 
  • पहिल्या दोन्ही पायऱ्या यशस्वी झाल्या तरी या मित्रकीटकांचे संवर्धन हा महत्त्वाचा भाग असतो. 
  • म्हणजेच त्यांची हानी होणार नाही अशा कीटकनाशकांचा किंवा पर्यावरणपूरक पद्धतींचा वापर करावा लागतो. 
  • ठळक नोंदी 

  • टेलीनोमसच नव्हे तर अशा दीडशेहून अधिक परोपजीवी मित्रकीटकांची अमेरिकी प्रदेशांत नोंद. 
  • अमेरिकन लष्करी अळी ही लेपिडोप्टेरा कुळातील आहे, या कुळातील किडींच्या नियंत्रणासाठी 
  • टेलीनोमस तसेच ट्रायकोग्रामा मित्रकीटक महत्त्वाचा मानला गेला आहे. 
  • टेलीनोमसचे प्रयोगशाळेत उत्पादन करून संख्या वाढवता येते. 
  • त्याची एक मादी संपूर्ण जीवनक्रमात २७० अंडी देऊ शकते. विशेष म्हणजे 
  • संपूर्ण अंडीपुंजाचे (एगमास) परोपजीवीकरण (नियंत्रण) करण्याची क्षमता या कीटकात आहे. 
  • ट्रायकोग्रामा कीटक असेच कार्य करीत असला, तरी तो अंड्याच्या केवळ वरील भागाचेच परोपजीवीकरण करू शकतो. 
  • जगभरात मका उत्पादकांच्या शेतात टेलेनोमसचे प्रसारण करण्याचे कार्यक्रम राबवण्यात आले. 
  • त्यात अमेरिकन लष्करी अळीचे तब्बल ८० ते १०० टक्के परोपजीवीकरण (नियंत्रण) झाल्याचे आढळले. 
  • अर्थात प्रयोगशाळेत या कीटकाचे गुणन करण्याची पद्धत आव्हानात्मक असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, ते अशक्य नक्कीच नाही. 
  • परभक्षी स्टिंक बगदेखील महत्त्वाचा पर्याय  अमेरिकन लष्करी अळीच्या नियंत्रणात टेलेनोमससारख्या परोपजीवी मित्रकीटकाप्रमाणे  स्टिंक बगसारखा परभक्षी मित्रकीटकदेखील उपयुक्त आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाने यासंबंधी  महत्त्वाचा अभ्यास करून त्याविषयीची माहिती प्रसिद्धही केली आहे.  असा आहे स्टिंक बग 

  • पोडीयस मॅक्युलीव्हेंट्रीस अर्थात स्पाईन्ड सोल्जर बग असे त्याचे नाव 
  • स्टिंक बगचाच तो प्रकार 
  • संपूर्ण अमेरिकेत त्याचा आढळ 
  • विशेष म्हणजे पिले व प्रौढ असे दोघेही लष्करी अळीला खातात 
  • पिले लाल, काळ्या रंगाची. 
  • पिले व प्रौढ अशा दोघांनाही अणकुचीदार निमुळत्या टोकदार सुयांसारखा अवयव. ज्याआधारे आपल्या भक्षाला ते जखमी करतात. खाण्याची वेळ नसते तेव्हा भक्षांना पकडून ठेवणेदेखील त्यामुळे सोपे. 
  • मक्याव्यतिरिक्त बटाटा, टोमॅटो, मधुमका, घेवडावर्गीय, काकडीवर्गीय पिके, सफरचंद, कांदा अशा विविध पिकांवर या मित्रकीटकाचा आढळ. 
  • वर्षभरात त्याच्या दोन ते तीन पिढ्या तयार होतात. 
  • प्रयोगशाळेत प्रौढ दोन ते तीन महिने जिवंत राहू शकतात. 
  • - एका हंगामात एक मित्रकीटक मोठ्या अवस्थेतील १०० लष्करी अळ्या खाऊ शकतो. 
  • वॉश्‍गिंटन राज्यात बटाटा शेतात स्पाईन सोल्जर बगचे प्रसारण करण्याचा प्रयोग राबवण्यात आला. 
  • यात ‘टू स्पॉटेड स्टिंक बग’ कीटकाचाही समावेश केला. त्यातून कोलोरॅडो बटाटा बीटल या किडीचे ५० टक्के नियंत्रण झाल्याचे सिद्ध. 
  • या मित्रकीटकांना शेताकडे आकर्षून घेण्यासाठीदेखील गंध रसायनांची निर्मिती झाली असून ती बाजारपेठेत उपलब्ध . 
  • अमेरिकन लष्करी अळी नियंत्रणासाठी अन्य आश्‍वासक मित्रकीटक 

  • कॅंपोलेटीस क्लोरिडी- परोपजीवी प्रकारातील मित्रकीटक 
  •  भारतासह जपान, चीनमध्ये आढळ 
  • बोंड अळीच्या नियंत्रणासाठीही उपयोगी 
  • ब्राझीलच्या एका संस्थेने उपलब्ध केलेल्या माहितीनुसार तेथेही टेलीनोमस, ट्रायकोग्रामा यांच्या वापराचे परिणाम सकारात्मक आढळले आहेत. 
  • तेथेही कॅंपोलेटीस फ्लॅव्हीसिंक्टा हा परोपजीवी, तर परभक्षी कीटकांमध्ये इअर विंग (डोरू ल्युटेपेस), स्पाईन्ड सोल्जर बग यांचा वापर यशस्वी ठरला आहे. 
  • परोपजीवी मित्रकीटकांचे मुख्य वैशिष्ट्य 

  • हे कीटक ठरावीक किडींनाच भक्ष म्हणून लक्ष्य करतात (स्पेसिफीक). साहजिकच प्रभावी नियंत्रणाला चालना मिळते. 
  • मित्रकीटकांद्वारे यशस्वी नियंत्रण - प्रातिनिधिक उदाहरणे 

  • महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी उसात लोकरी माव्याने हाहाकार माजवला होता, त्यावेळी कोनोबाथ्रा तसेच अन्य मित्रकीटकांवर अभ्यास होऊन त्यांचे यशस्वी प्रसारण राज्यात झाले. त्यांच्यामुळे ही कीड आटोक्यात आली. 
  •  अलीकडील वर्षांतच भारतात विशेषतः दक्षिणेकडील राज्यांत पपई मिलीबगनेही (पॅराकोकस मार्जिनॅटस) असाच हाहाकार उडवला होता. महाराष्ट्रातही पुणे, खानदेश, नंदुरबार आदी भागात त्याचा अत्यंत गंभीर प्रादुर्भाव झाला होता. पुणे जिल्ह्यातील लोणीकंद येथील एका पपई उत्पादकाच्या शेतात हा प्रादुर्भाव नियंत्रणापलीकडे गेला होता. त्या वेळी ॲसिरोफॅगस पपए या मित्रकीटकाने या पपईवरील मिलीबगचे नियंत्रण केले. आज अशाच मित्रकीटकांनी राज्यातील पपई शेती संरक्षित करण्यात यश मिळवले आहे. 
  • अमेरिकन लष्करी अळी नियंत्रणाचे अन्य पर्याय 

  • बॅसिलस थुरीनजेंसीस- मित्रजीवाणूवर आधारित कीटकनाशक 
  • न्यूक्लीओ पॉलीहेड्रॉसीस व्हायरस (एनपीव्ही) 
  • बॅक्युलोव्हायरस 
  • तुमच्या शेतात शोधा मित्रकीटक 

  • आपल्या मका शेतातही वेगळे कीटक, वेगळी अळी, अंडी, पतंग आढळल्यास 
  • त्वरित तज्ज्ञांना त्याची सूचना द्यावी. कदाचित तो मित्रकीटक असू शकेल. 
  • अळीच्या नियंत्रणासाठी लेबल क्लेमयुक्त कीटकनाशकांचा वापर करावा. 
  • विनाकारण कोणतीही दोन कीटकनाशके एकमेकांत मिसळून फवारू नयेत. 
  • समान कार्यपद्धती असलेली (मोड ऑफ ॲक्शन ) म्हणजेच समान रासायनिक गट असलेली 
  • दोन कीटकनाशके तर एकमेकांत कधीही मिसळू नयेत. 
  • चुकीच्या कीटकनाशकाची निवड व फवारणीची चुकीची पद्धत यामुळे खर्च वाढेल. शिवाय, शेतातील मित्रकीटकांचाही नाश होईल. 
  • कृतिशील आराखडा- ठळक बाबी  (अमेरिकन लष्करी अळी व गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी) 

  • आफ्रिकेतील वनस्पतींच्या स्थानिक प्रजातींच्या आधारे ‘पूश-पूल’ पध्दती विकसित झाली. भारतातही अशा स्थानिक वनस्पती निवडून ही पध्दती शेतकऱ्यांना उपलब्ध करणे गरजेचे. 
  • मित्रकीटकांच्या केवळ शिफारसी पुरेशा नाहीत. स्पेनने मित्रकीटकांच्या स्थानिक प्रजातींचा शोध घेऊन वापर केला. भारतातही मित्रकीटकांच्या प्रभावी स्थानिक जाती शोधून, त्यांचे उत्पादन तसेच शेतकऱ्यांच्या शेतात त्यांचे संवर्धन कसे होईल ते पाहणे गरजेचे. त्यांची मुबलक उपलब्धता हवी. थोडक्यात मित्रकीटकांचा वापर ‘रिझल्ट ओरिएंडेट’ हवा. 
  • अमेरिकन लष्करी अळीसाठी सद्यस्थितीत लेबल क्लेमअंतर्गत अल्प कीटकनाशके उपलब्ध. 
  • त्यांची संख्या वाढवण्यासाठी सर्वांच्या पुढाकाराची गरज 
  • सूक्ष्मजीवांवर आधारीत कीटकनाशकांचे प्रभावी परिणाम मिळण्यासाठी अनुकूल हवामानाच्या घटकांबाबत शेतकऱ्यांत अधिक जागरूकता, त्यासाठी प्रात्यक्षिके गरजेची. 
  • कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विकास केंद्रांचे चालक, वितरक, वर्तमानपत्रे तसेच इलेक्ट्रॉनीक माध्यमांतील प्रतिनिधी यांनाही किडीची सद्य:स्थिती, गंभीरता, उपाययोजना याबाबत तांत्रिक प्रशिक्षणाची गरज. जेणेकरून अचूक व प्रभावी प्रबोधन होण्यास मदत.  (लेखक ‘ ॲग्रोवन’चे उपमुख्य उपसंपादक व पीक संरक्षण विषयाचे अभ्यासक आहेत.) 
  • संपर्क - मंदार मुंडले - ९८८१३०७२९४   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com