विद्यापीठाच्या पूर्वप्रसारीत गहू वाणाचे एकरी ३० क्विंटल उत्पादन 

शेतकरीच झाले प्रसारक डब्लूएसएम १०९-४ वाण अद्याप प्रसारीत होण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे पैदासकार डॉ. गिते म्हणाले. दरम्यान डॉ. गिते यांनी आपल्या गव्हाच्या प्रयोगाला सुमारे आठवेळा भेट देऊन निरीक्षण व चर्चा केल्याचे शेतकरी काळबांडे यांनी सांगितले. सद्यस्थितीत या वाणाचा प्रसार आता शेतकरी ते शेतकरी असाच सुरू असल्याचे दिसून येते.
झाकलवाडी शिवारातील विश्वनाथ काळबांडे यांचा गव्हाच्या डब्लूएसएम १०९-४ वाणाचा प्लॉट.
झाकलवाडी शिवारातील विश्वनाथ काळबांडे यांचा गव्हाच्या डब्लूएसएम १०९-४ वाणाचा प्लॉट.

शास्त्रज्ञांनी विकसित केलेला एखादा सक्षम वाण शेतकऱ्यांच्या अर्थकारणात किती बदल घडवू शकतो त्याचे प्रत्यंतर वाशिम जिल्ह्यात दिसून आले आहे. जिल्ह्यातील झाकलवाडी येथील वासुदेव दौलत काळबांडे अकोला येथील कृषी विद्यापीठाच्या गव्हाच्या डब्लूएसएम १०९-४ या पूर्वप्रसारीत वाणाची चार वर्षांपासून शेती करीत आहेत. आदर्श व्यवस्थापन व सल्ला घेत एकरी २५ क्विंटलपुढे उत्पादन मिळवत त्यांनी गहू शेतीचे अर्थकारण सक्षम केले आहे.    गहू हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. आज एकरी सरासरी १५ क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन मिळत नाही ही अनेक शेतकऱ्यांची समस्या आहे. साहजिकच या पिकापासून सक्षम अर्थप्राप्ती होण्यावर मर्यादा येतात. मात्र अधिकाधिक उत्पादनक्षमतेचे वाण वापरण्याचे प्रयोगही अनेक शेतकरी करताना दिसतात. वाशिम जिल्ह्यातील झाकलवाडी (ता. वाशिम) येथील वासुदेव दौलत काळबांडे हे यापैकीच एक प्रयोगशील शेतकरी आहेत. या कुटुंबाची सुमारे ४० एकर जमीन आहे. खरिपात ते सोयाबीन, मूग, उडीद, भाजीपाला अशी पिके घेतात. रब्बी हंगामात गहू हे त्यांचे हुकमी पीक आहे. मात्र त्याचे उत्पादन एकरी १२ ते १५ क्विंटलपर्यंतच मिळायचे.  नव्या वाणाचा प्रयोग  अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे वाशिम येथे कृषी संशोधन केंद्र आहे.  येथे कार्यरत असताना कनिष्ठ गहू पैदासकार डॉ. बी. डी. गिते यांची डब्लूएसएम १०९-४ या गहू वाणाच्या संशोधनात महत्त्वाची भूमिका राहिली आहे. हे वाण अद्याप पूर्वप्रसारीत अवस्थेत आहे. या केंद्रातून २०१३-१४ मध्ये काळबांडे यांना या नव्या वाणाचे सव्वा किलो बियाणे मिळाले. वाणबदल म्हणून त्यांनी एक गुंठ्यात त्याची लावण केली. त्यापासून त्यांना एक क्विंटल १७ किलो उत्पादन मिळाले. पुढील वर्षासाठी याच वाणाचे बियाणे आता आयते त्यांच्याकडे उपलब्ध झाले. त्यांनी ३० गुंठ्यात बियाणे पेरत २४ क्विंटल उत्पादन घेतले. अत्यंत आश्‍वासक उत्पादन मिळाल्यानंतर या वाणाविषयीचा विश्‍वास वाढला.  वाण ठरला आश्‍वासक  सन २०१५-१६ मध्ये सात एकरांत लागवड केली. त्यातून २४२ क्विंटल म्हणजेच एकरी ३४ क्विंटलच्या आसपास हे उत्पादन झाले. यातील ३० क्विंटल उत्पादन बियाण्यासाठी ठेवून उर्वरित गव्हाची विक्री केली. सन २०१६-१७ च्या हंगामात सुमारे २६ एकरात लावण करून त्याचे ८८२ क्विंटल उत्पादन त्यांच्या हाती आले. यंदाच्या रब्बीतही सुमारे २५ एकरांत त्याची पेरणी केलेली आहे. काळबांडे यांच्याकडे जमिनीचे हलकी, मध्यम, भारी असे विविध प्रकार आहेत. अलीकडील सर्व वर्षांचा विचार केल्यास बागायती परिस्थितीत एकरी २८ ते ३२ क्विंटलपर्यंत उत्पादनक्षमता टिकवण्यात त्यांना यश आले आहे. यंदाही तेवढेच उत्पादन अपेक्षित आहे. सिंचनासाठी त्यांच्याकडे तीन विहिरी व दोन बोअर्स आहेत.  पीक नियोजनातील काही बाबी 

  • एकरी बियाणे- सुमारे ६५ किलो, दोन ओळीतील अंतर १० इंच 
  • पेरणीची वेळ- सर्वसाधारणपणे १० ते १५ ऑक्टोबरदरम्यान 
  • पेरणी करताना- एकरी दोन बॅग १०ः२६ः२६ + सूक्ष्म अन्नद्रव्ये पाच किलो 
  • पेरणीनंतर २० दिवसांनी- एक १ बॅग युरिया 
  • पेरणीनंतर ९० दिवसांनी (हुरडा अवस्थेत) - ०-५२-३४ या विद्राव्य खताची फवारणी 
  • गरजेनुसार बुरशीनाशकाची फवारणी 
  • तीन वर्षातून एकदा कंपोस्ट खताचा वापर 
  • हलक्या जमिनीत १२ते १५ दिवसांच्या अंतराने व भारी जमिनीत १५ ते १८ दिवसांच्या अंतराने स्प्रिंकलरद्वारे पाणी 
  • दर व उत्पन्न  काळबांडे म्हणाले की, यंदा गव्हाला क्विंटलला २००० रुपये तर मागील वर्षी १७०० रुपये दर होता.  माझ्या बियाण्याला शेतकऱ्यांकडून मागणी आहे. त्यामुळे सुमारे ४०० क्विंटल बियाण्याची तीन हजार रुपये दराने विक्री केली आहे. एकरी ३० क्विंटल उत्पादन व दोन हजार रुपये दर मिळाल्यास खर्च वजा जाता ४० ते ४५ हजार रुपये उत्पन्न हाती पडण्यास अडचण येणार नाही, असेही काळबांडे यांनी सांगितले.  डब्लूएसएम १०९-४ वाणाविषयी 

  • ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणीस उपयुक्त 
  • उष्णता व वातावरणातील बदलांना सहनशील 
  • बुटका, कमी उंचीचा, न पडणारा 
  • ओब्यांची संख्या जास्त. ओंबीत दाण्यांची संख्या जास्त म्हणजे ६० ते १०० पर्यंत 
  • धान्याची व चपातीची प्रत चांगली 
  • धान्यात प्रथिनांचे प्रमाण जास्त (१४.५ टक्के) 
  • पीक पक्वतेचा कालावधी- ११० ते १३० दिवस 
  • महत्त्वाच्या रोगांना प्रतिकारक 
  • जमीन, पेरणीची वेळ, व्यवस्थापन, वातावरण यानुसार हेक्टरी साधारणपणे ३० ते ७० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते. 
  • बागायती शेतीस अनुकूल वाण 
  • मागील दोन- तीन वर्षांत राज्यातील काही शेतकऱ्यांनी एकरी २५ क्विंटल ते त्यापुढे उत्पादन मिळवले आहे. 
  • ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हा वाण पेरल्यास पाणी शक्यतो कमी पडत नाही. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत त्याची काढणी होते. पुढे होऊ शकणाऱ्या संभाव्य वादळी वारा, गारपिटीपासून तो वाचू शकतो. 
  • ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता चांगली आहे असे शेतकरी गव्हानंतर दुसरे पीक घेऊ शकतात. 
  • तूर व कपाशी नंतर जानेवारीच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात गहू पेरणीचे प्रमाणही सध्या वाढत आहे. अशा उशिरा पेरणीसाठी हा वाण उपयोगी ठरू शकतो. 
  • प्रतिक्रिया या वर्षी दीड एकरात डब्लूएसएम १०९-४ या वाणाची लावण केली आहे. तेवढ्या क्षेत्रात  सुमारे ५० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळेल अशी आशा आहे. यापूर्वीच्या वाणांचे एकरी १२ ते १५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळायचे.  - नारायण मुठाळ, झोडगा, ता. मालेगाव, जि. वाशीम  गव्हाचा नवा वाण मागील चार वर्षांपासून लावत आहोत. त्याची उत्पादकता चांगली आहे. दरवर्षी त्याचे बियाणे वापरतो. त्यामुळे बियाण्यावरील खर्च कमी झाला आहे. हा वाण किडी-रोगांना बळी पडणारा नसल्याचे आढळले आहे.  -वासुदेव काळबांडे 

    संपर्क- वासुदेव काळबांडे- ८८३०७८१५६९  डॉ. बी. डी. गिते- ९९२३२८३६२२  कनिष्ठ गहू पैदासकार   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com