agriculture story in marathi, Nikam family form Solapur Dist. is doing the Sahiwal Cow Farming & have dome value added products related to it. | Page 2 ||| Agrowon

साहिवाल गोसंगोपनासह शेण, गोमूत्राचे मूल्यवर्धन

सुनील राऊत
गुरुवार, 15 जुलै 2021

सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील निकम कुटुंबाने पाच वर्षांपासून सेंद्रिय शेती सुरू केली आहे. त्यात सेंद्रिय चाऱ्याचे उत्पादन घेताना साहिवाल देशी गायींचे संगोपन करीत आहे. दूध, तूप यांची स्थानिक पातळीवर विक्री व्यवस्था उभारली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील निकम कुटुंबाने पाच वर्षांपासून सेंद्रिय शेती सुरू केली आहे. त्यात सेंद्रिय चाऱ्याचे उत्पादन घेताना साहिवाल देशी गायींचे संगोपन करीत त्यांची संख्या ५३ पर्यंत पोहोचवली आहे. दूध, तूप यांची स्थानिक पातळीवर विक्री व्यवस्था उभारून शेण व गोमूत्रापासून विविध उत्पादनांनाही बाजारपेठ मिळविण्यास सुरुवात केली आहे.

नातेपुते (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील संतोष निकम यांचे एकत्रित कुटुंब आहे. पुणे येथून जीडी आर्टची पदवी घेतलेले कलाप्रेमी संतोष आज शेतीची धुरा कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने पेलत आहेत. त्यांची सुमारे साडेपाच एकर शेती आहे. शेतीतील उत्पादन खर्च आज वाढला आहे. रासायनिक खते व कीडनाशके यांच्यावर अधिक खर्च येतो. तो कमी करण्याच्या दृष्टीने व शेती व मानवी आरोग्य सुधारण्यासाठी निकम यांनी सन २०१६ पासून सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास सुरवात केली. डॉ.अवधूत शिवानंद, कोल्हापूर- कागल भागातील प्रसिद्ध कण्हेरी मठाचे काडसिद्धेश्‍वर स्वामी यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. सेंद्रिय शेतीला महत्त्वाचा आधार हा देशी गोसंगोपनाचा होता. सन २०१७ पासून त्यावर लक्ष केंद्रित केले.

देशी गोसंगोपन
साहिवाल या देशी जातीच्या आठ गाई कर्नाल- हरियाना येथून आणल्या. त्यांचे संगोपन सुरू झाले. मुक्त संचार गोठा उभारण्यात आला. तूपनिर्मितीचे यंत्र, पाण्यासाठी छोटे-मोठे पंप, पाण्याची टाकी असा सुमारे तीन लाख रुपये सुरुवातीला खर्च केला. एकूण सुमारे आठ लाख रुपये गुंतवणूक पहिल्या टप्प्यात झाली. गोठ्यात पैदासही सुरू होती. त्यातूनच आज लहान-मोठी संख्या पकडून गायींची संख्या ५३ झाली आहेत. सध्या १४ गायी दूध देणाऱ्या आहेत.

दूध संकलन व विक्री
दररोजचे दूध संकलन सुमारे ६० ते ७० लिटर होते. देशी गाईच्या दुधाचे महत्त्व सर्वांनाच आहे हे लक्षात घेऊन काचेच्या बाटलीमधून त्याची नातेपुते या स्थानिक स्तरावर ९० रुपये प्रति लिटर दराने, तर फलटण येथे १०० रुपये दराने विक्री सुरू केली आहे. अर्धा लिटर पासून ते पाच-सहा लिटर दूध घेणाऱ्यांपर्यंत ग्राहक आहेत. तूप व ताक यांची मागणी लक्षात घेता उत्कृष्ट पद्धतीने निर्मिती सुरू केली. शिल्लक दुधापासून दररोज तुपाचे उत्पादन केले जाते. त्याची ३५०० रुपये प्रति किलो दराने विक्री केली जाते.

मूल्यवर्धित उत्पादने
शेण व गोमूत्र यांच्या आधारे गोमूत्र अर्क, विविध पंचगव्य उत्पादने, धूपकांडी आदींची निर्मिती सुरु केली आहे. अर्क तीनशे रुपये प्रति लिटर दराने विकला जातो. संतोष यांचे बंधू ज्ञानेश यांच्या पत्नी सौ. आशा यांनी त्याबाबतचे शिक्षण घेऊन योगासने, उपचार केंद्र सुरू केले आहे. गोमयपासून धूप कांडी, शेणाच्या विटा आदी घटकही बनविण्यास सुरुवात केली आहे. मागील चार वर्षांपासून पर्यावरण पूरक म्हणून गोमयपासून गणेशमूर्तीही तयार केल्या जात आहेत. माळशिरस तालुका परिसरात गोपालकांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून साडेतीन हजार मूर्ती बनवून विक्री व्यवस्था उपलब्ध केली आहे. या वर्षी गोमय कुंडी व गोमय पणती निर्मितीचे काम सुरू केले आहे. कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन काळातही १४ गोपालकांकडून चार हजार मूर्तींची निर्मिती होत त्यांना रोजगार मिळाला आहे. पैकी मागील वर्षी सहा जणांनी मूर्ती विक्रीतून एकूण पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळविले.

सेंद्रिय पद्धतीने शेती
सध्या संपूर्ण क्षेत्रात चाऱ्यासाठी मका, ज्वारी, दशरथ, मेथी घास, शेवगा, ज्वारीचा कडबा आणि मुरघास तयार केला जातो. यंदाच्या वर्षी व्यवसायातील एकूण उलाढाल २५ ते ३० लाख रुपयांपर्यंत नेण्याचा प्रयत्न निकम यांनी केला आहे. शेती, गोठा यासाठी चार, विक्रीसाठी दोन तर दूध प्रक्रियेसाठी एक अशा सात जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. शेण व गोमूत्राचा उपयोग कंपोस्ट खत, स्लरी यासाठीही होत आहे. गांडूळ खताची निर्मितीही सुरू केली आहे. ज्ञानेश, विजय हे बंधू आपापले व्यवसाय सांभाळून संतोष यांना मदत करतात. तर उत्पादने निर्मितीची जबाबदारी संतोष यांच्या पत्नी सौ. ज्योती सांभाळतात.

शेतकरी कंपनीची स्थापना
व्यवसाय एकट्याने करण्यापेक्षा गोपालकांना एकत्र करून संतोष यांनी २०१८ मध्ये नेटकोस्ट शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली आहे. सेंद्रिय शेती व देशी गोवंश पालन करू इच्छिणाऱ्यांचा गट तयार केला आहे. याद्वारे विविध प्रशिक्षण देऊन विविध उत्पादनांसाठी ऑनलाइन विक्री व्यवस्था उभारण्यात येत आहे. गोमय गणेश मूर्तीच्या विक्रीतील नफ्यातून कंपनीचे विक्री दालन, इमारतीची उभारणी केली आहे. यात सध्याच्या उत्पादनांसोबत लाकडी घाण्याचे तेल, सेंद्रिय गूळ, त्याची पावडर, काकवी, डाळी, खपली गहू, तांदूळ, मसाले, मातीची भांडी, मध आदी उत्पादने उपलब्ध केली आहेत.

प्रतिक्रिया
येत्या काळात शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे आहे. स्वतःचे आणि कुटुंबाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ती काळाची गरज आहे. आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी पर्यावरणपूरक उत्पादनांचा वापरही तितकाच महत्त्वाचा ठरत आहे.
-संतोष निकम, ७७७६०७१४९०
 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
पूरक उद्योगातून गटाने तयार केली ओळखदेवनाळ (ता. जत, जि. सांगली) गावातील उपक्रमशील...
खारपाणपट्ट्यात फुलवली प्रयोगशील...सांगवी मोहाडी (ता.. जि.. अकोला) येथील मनोहर...
केळी निर्यातीत ‘सुरचिता’चे पदार्पण करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुरचिता ॲ...
फळबागांसाठी प्रसिद्ध झाले सोनोरीपुणे जिल्ह्यात सासवड शहरापासून काही किलोमीटरवर...
पेठमधील मोगऱ्याचा नाशिकमध्ये दरवळनाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात आदिवासी...
सणासुदीच्या आशेवर कोल्हापूरचा फुलबाजार...गेल्या चार महिन्यांपासून अत्यंत कमी दरांवर...
यांत्रिकी पूरक उद्योग ठरताहेत...औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्‍यातील आठवडी...
दर्जेदार रेशीम कोष उत्पादनात पाटील...जळगाव जिल्ह्यात देवपिंप्री येथील विकास पाटील...
उपक्रमशीलतेतून महिला झाल्या सक्षमटिमटाळा (जि.अमरावती) येथील सरस्वती स्वयंसाह्यता...
सुरू उसाचे एकरी १२२ टन उत्पादनअभ्यासपूर्ण, शास्त्रीय व्यवस्थापन व तंत्रज्ञान या...
बटाटा चिप्सचा ‘नेचर टॉप’ ब्रॅण्डपुणे जिल्ह्यातील साबळेवाडी येथील आदेश सुदाम काटकर...
आधुनिक तंत्र शेतीच्या लाटेवर मंगरूळपरभणी जिल्ह्यातील मंगरूळ बुद्रूक गेल्या चार...
बारमाही भाजीपाला उत्पादन : ‘गेडेकर...सुसूत्रता, पीक विविधता, तंत्रज्ञानाचा प्रभावी...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून जोपासलेली नारळ...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे (ता. वेंगुर्ला)...
तंत्र व चोख व्यवस्थापानातून वाढवली...दीडशे दिवस पीक कालावधी, टोकण पद्धतीची लागवड, ठिबक...
पंचवीस वर्षांपासून सीताफळाची जोपासनासांगली जिल्ह्यात अंजनी (ता.. तासगाव) येथील...
उस्मानाबादी शेळ्यांचा यशस्वी जोपासलेला...परभणी शहरापासून नजीक पारवा शिवारात सतीश रन्हेर व...
जल प्रदूषण मुक्तीसाठी ‘गोदावरी नदी संसद...नांदेड जिल्ह्यात ‘गोदावरी नदी संसद’ ही जलसंवर्धन...
भाजीपाला, पूरक उद्योगातून गटांची प्रगतीरत्नागिरी जिल्ह्यातील महिला बचत गटातील सदस्यांनी...
संत्रा रसापासून पावडर; विद्यापीठाने...अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...