agriculture story in marathi, Nilvande village in Nasik Dist. has put forth ideal example of farm road construction with their own contribution. | Agrowon

विना कंत्राट, विना अनुदान  शिवार रस्ते बांधणीचा निळवंडे पॅटर्न 

मुकूंद पिंगळे 
गुरुवार, 11 जुलै 2019

ध्येयवेडी उपक्रमशील तरुणाई
निळवंडी 
गावातील अनेक तरुणांनी व्यावसायिक शेती करून गावातच रोजगाराच्या उत्तम संधी निर्माण केल्या आहेत. ज्येष्ठ मंडळींच्या सहकार्याने विविध उपक्रम ते राबवितात. पाणी, पीक व्यवस्थापन, संरक्षित शेती विषयातील चर्चासत्रे व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करतात. ‘Nilwandi Grapes Hub’ नावाने फेसबूक पेज व काही व्हॉट्स ॲप ग्रूप त्यांना बनवले आहेत. माहिती व नवीन तंत्रज्ञानाची देवाणघेवाण त्या निमित्ताने घडत आहे. 

नाशिक जिल्ह्यात कोळवण नदीच्या काठी वसलेल्या निळवंडी गावाने शिवार रस्ते बांधणीत राज्यासाठी आदर्शवत पॅटर्न तयार केला आहे. लोकसहभाग व सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनी यांच्या माध्यमातून शासकीय मदतीविना गावात २२ किलोमीटरचे शिवार रस्ते पूर्ण झाले. त्यातून माणसांची ये-जा, वाहतूक आदी अनेक समस्या दूर होत प्रगतीच्या वाटा खुल्या झाल्या. अन्य विविध विकासकामांमधूनही ‘लोकसहभागातून स्वावलंबी ग्रामनिर्मिती’ हा प्रयत्न यशस्वी ठरला. 

निळवंडी गाव दृष्टिक्षेपात  

 • गावाचे एकूण क्षेत्रफळ - ७६१.३२ हेक्टर 
 • लोकसंख्या : २०४७ 
 • वनक्षेत्र :३७ हेक्टर 

ग्रामविकासासाठी सामूहिक पुढाकार 
अनेक गावांत बांधावरून, जागेवरून, जाती-धर्मावरून काही ना काही कुरबुरी सुरू असतात. नाशिक जिल्ह्यातील निळवंडी (ता. दिंडोरी) हे गाव मात्र याला अपवाद ठरले आहे. इथले सर्वच घटक गट-तट, भाऊबंदकी, जातधर्म विसरून आपल्या गावाच्या प्रगतीसाठी एकत्र येतात. ‘लोकसहभागातून ग्रामसमृद्धीकडे’ हे ब्रीद घेऊन प्रत्येकजण ग्रामविकासासाठी सरसावला आहे. 

आदर्शवत निळवंडी पॅटर्न 
निळवंडी गावाने सामूहिक प्रयत्नांच्या जोरावर निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात ओळख मिळवली खरी. 
पण एक समस्या मुख्य होऊन राहिलेली होती. गावशिवाराचे रस्ते अरुंद, अडचणीचे व अविकसित होते . त्यामुळे मशागत, मजुरांची ने-आण, निविष्ठांची तसेच मालाची वाहतूक अशा नानाविध अडचणी सातत्याने उदभवत होत्या. मोहाडी येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी पुढाकार घेत त्यावर तोडगा काढण्याचे ठरवले. त्यांनी शिवार रस्त्यांच्या विकासाची संकल्पना ग्रामस्थांसमोर मांडली. निळवंडी भागातील द्राक्ष बागायतदार ‘सह्याद्री’ला द्राक्षांचा पुरवठा करतात. त्यामुळे निळवंडीच्या ग्रामस्थांसमवेत कंपनीचे बंध तयार झाले होते. रस्तेविकासात सह्याद्रीशी संलग्न शेतकऱ्यांनी प्रति किलोमागे ५० पैसे जमा केले तर प्रत्येकी ५० पैशामागे सह्याद्रीकडून ५० पैसे देण्यात येतील अशी घोषणा श्री. शिंदे यांनी केली. या संकल्पनेचा स्वीकार करत ग्रामस्थ एकत्र आले अन शिवार रस्त्यांचे काम हाती घेतले. 

बघता बघता मदतीचे हात पुढे आले 
मोहाडी क्लस्टरच्या माध्यमातून एकत्र येत रस्ते बांधणीचा निर्णय झाला. द्राक्ष उत्पादकांच्या माध्यमातून 
प्रति किलो ५० पैसे याप्रमाणे पाच लाख रुपयांचा पहिला निधी उभा राहिला. हातभार लावण्यासाठी गावातील कानिफनाथ पाणी वापर संस्थेने एक लाखांचा मदत निधी दिला. अन्य गावातींल काही शेतकऱ्यांनी ८० हजार रुपये संकलित केले. काम अधिक गुणवत्तापूर्ण होण्यासाठी ‘सह्याद्री’ कंपनीनेही सात लाखांची भरीव मदत केली. कुठल्याही निविदा व कंत्राटदाराविना शिवार रस्त्याचं काम ग्रामस्थांनी यशस्वी पूर्ण केले. 

प्रत्येकाचा राहिला सहभाग 
ग्रामस्थ रमेश पाटील यांनी आपल्या घराचा कोपरा रस्त्याला अडचण ठरत असल्यामुळे तो काढून 
जागा मोकळी करून दिली. त्यासाठी कुठला मोबदला घेतला नाही. रस्ते तयार करताना कुणीही 
अडथळा आणला नाही की वाद घातला नाही. काहींनी शेतीलगत जमिनीचा भाग रस्तेबांधणीत दिला. 
कुणी द्राक्षवेली काढल्या, तर कुणी ऊस काढला. वाटेतील काट्या-कुट्या, अडचणीची झाडे काढली. ग्रामस्थांनी पहिल्या टप्प्यात तब्बल १५ किलोमीटर शिवार रस्ते कुठल्याही शासकीय मदतीविना तयार केले आहेत. त्यातून शिवार रस्तेबांधणीचा ‘निळवंडी पॅटर्न’ राज्यासाठी तयार झाला. तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्णण. बी यांच्या हस्ते रस्त्यांचे उदघाटन झाले. या कामांचे त्यांनी विशेष कौतुक केले. 
पालकमंत्री पानंद रस्ते विकास योजनेतून सात लाख रुपयांचा निधी दिला. यातून पुन्हा सात किलोमीटर रस्त्यांचे काम झाले. 

विकासकामांचे ठळक मुद्दे 

 • पहिला टप्पा – १५ किमी 
 • चार किमी. नवे रस्ते, तर ११ किमी रस्त्यांची दुरुस्ती 
 • दुसरा टप्पा – ७ किमी 
 • लोकसहभाग, मदतनिधी व सीएसआर फंडातून निधी उभारणी 
 • शिवाररस्ते बांधणी कामात एकही वाद नाही. 
 • विना निविदा आणि विना ठेकेदार गुणवत्तापूर्ण रस्ते बांधणी 

जलव्यवस्थापनातून स्वयंपूर्णतः 
सन २००६ मध्ये गावात जय कानिफनाथ पाणीवापर संस्था स्थापन करण्यात आली. ५४२ शेतकरी सभासद संस्थेशी संलग्न आहेत. संस्थेच्या माध्यमातून हक्काच्या पाण्याचे व्यवस्थापन, वितरण,  सिंचन विषयक पायाभूत सुविधांचे परीक्षण व सूक्ष्मसिंचनावर भर देण्यात आला आहे. पाण्याचा तुटवडा भासतो अशा ठिकाणी शेततळी, विहिरी, बोअरवेल्स यांचा आधार घेण्यात आला आहे. 

ठळक मुद्दे 

 • सिंचन क्षेत्रात लक्षणीय वाढ 
 • बारमाही सिंचन व्यवस्था 
 • पाण्याची हमी असल्याने पीक रचनेत बदल 
 • शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभले असून त्यांच्या जीवनमानात बदल 

निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात ओळख 
गावातील अनेक शेतकरी अल्पभूधारक आहेत. दरडोई क्षेत्र कमी असल्याने नवे तंत्रज्ञान वापरण्याकडे कल आहे. गावातील अनेक शेतकरी निर्यातक्षम द्राक्ष पिकवतात. द्राक्ष शेतीचे नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी येथील तरुणांनी ब्राझील, दक्षिण आफ्रिका, स्पेन, ऑस्ट्रेलिया, येथे अभ्यास दौरे केले आहेत. तज्ञ, संशोधक व संबंधित घटकांच्या संपर्कात हे तरुण नेहमी असतात. सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून गावात २००४ मध्ये द्राक्षनिर्यातीचे काम सुरू झाले. द्राक्ष निर्यातीत गावाने आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. सन २०१८-१९ हंगामामध्ये निगावातून १८५८ टन द्राक्षांची विक्रमी निर्यात झाली. त्यामध्ये १२४ कंटेनर्सचा समावेश होता. 

ठळक मुद्दे 

 • गावातील निर्यातक्षम द्राक्षाचे क्षेत्र - १९६.४७ हेक्टर 
 • स्थानिक बाजारपेठ विक्रीसाठीचे द्राक्ष क्षेत्र : १५ एकर 
 • 'सह्याद्री’ कंपनीशी संलग्न शेतकरी : ८१ 
 • प्रमुख द्राक्षवाण- थॉमसन, सोनाका, सुधाकर, तास-ए-गणेश, नानासाहेब पर्पल, शरद सीडलेस, फ्लेम, क्रिमसन 

ग्रामविकासाची संकल्पना रुजली 
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी मांडलेल्या PURA (Providing Urban Amenities to Rural Areas ) या संकल्पनेवर आधारित ‘सह्याद्री’ कंपनीने ‘मोहाडी क्लस्टर’ योजनेची मांडणी केली आहे. त्याद्वारे ग्रामीण भागात व्यावसायिक संधी निर्माण करणे, वाहतूक सुविधांचा विकास, संपर्क सुसूत्रता, तांत्रिक व व्यावसायिक संकल्पनांची देवाणघेवाण या माध्यमातून निळवंडीत होत आहे. 

भरीव कामे 

 • पाझरतलाव, जिल्हा परिषद शाळेत स्वच्छतागृह बांधकाम, वृक्षलागवडीत संरक्षण जाळ्या, सुंदर विद्यालये, ग्रामपंचायत इमारत, अंगणवाड्या, व्यायाम शाळा, भूमिगत गटारी कामे, पाणीपुरवठा योजना, पेव्हर ब्लॉक्स बसविणे, जीर्ण घरांचे सपाटीकरण व सुशोभीकरण आदी कामे करण्यात आली आहेत. 

पुढील योजना 
निळवंडी गावाला कोळवण नदीमुळे सृष्टीसौंदर्य लाभलेलं आहे. धर्मेंद्र, शक्ती कपूर यांच्या भूमिका असलेल्या ‘करिष्मा कुदरत का’ या चित्रपटाचे चित्रीकरण गावात झालेले आहे. व्यवसायाभिमुख संधी गावात निर्माण करण्याचा प्रयत्न मोहाडी क्लस्टरच्या माध्यमातून केला जाणार आहे. पर्यावरणपूरक कृषी पर्यटन तसेच कृषीसंबंधित नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्यासाठी गाव प्रयत्नशील आहे. या माध्यमातून सुशिक्षित तरुणांना स्थानिक रोजगार मिळेल. 

मान्यवरांच्या भेटी 
भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी, राष्ट्रीय बागवानी बोर्डचे व्यवस्थापकीय संचालक नेदरलॅंड बॅंकेचे उच्चाधिकारी, ख्यातनाम द्राक्षतज्ञ ऑस्कर सल्गाडो, राॅड्रीगो आदी विविध मान्यवरांनी निळवंडीला भेट दिली आहे. 
 
संपर्क : रोहिदास कृष्णा पाटील : ९९२३९४१३३२ 
सोमनाथ पाटील : ९८२२४१४५६४ 

 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
सेंद्रिय धान्य महोत्सवातून हक्काची...तीन-चार वर्षांपासून कृषी विभागातर्फे पुणे येथे...
प्रयोगशीलतेने घडविली समृद्धी..अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील पाटेगाव (जि. नगर)...
सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षकाची...औरंगाबाद शहरापासून सुमारे बारा किलोमीटरवर...
'सोया’ पदार्थांना मिळवली ग्राहकांकडून...अमरावती जिल्ह्यातील दुर्गम अंजनसिंगी (ता. धामणगाव...
दर्जेदार फरसबीचे वर्षभर उत्पादनकमी कालावधीतील पिके वर्षभर टप्प्याटप्प्याने...
तंत्रज्ञान, सहकार, बॅंकिंग क्षेत्रात...जर्मनी हा युरोपातील प्रगत देश. तंत्रज्ञान आणि...
जमिनीची सुपीकता जपत पीक उत्पादनात...नाशिक जिल्ह्यातील कारसूळ (ता. निफाड) येथील संकिता...
पाच भावांच्या एकीतून पुढारलेली...ब्राह्मणी गराडा (जि. औरंगाबाद) येथील दुलत...
शेतकरी गट ते कंपनी चांगदेवच्या...चांगदेव (जि. जळगाव) येथे शेतकऱ्यांनी सातत्याने...
व्हॅलेंटाइन डेसह विविध रंगी गुलाबांना...वासाळी (ता. जि. नाशिक) येथील संजीव गजानन रासने...
व्हॅलेंटाईन डेसाठी गुलाब उत्पादक झाले...तोंडावर येऊन ठेपलेल्या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या...
दर पडले? चिंता नको इंगळे घेऊन आले...शेतकऱ्यांच्या मालाला अनेक वेळा समाधानकारक दर मिळत...
यांत्रिकीकरणातून शेती झाली कमी श्रमाचीतांदलवाडी (जळगाव) येथील प्रेमानंद हरी महाजन यांनी...
गांडूळखत व्यवसाय विस्तारातून अर्थकारण...लोहगाव (जि. परभणी) येथील अल्पभूधारक सीताराम ऊर्फ...
ज्ञान, अभ्यासातून यश साधलेले तोडकरज्ञान, अभ्यास, अपेक्षित ते साध्य करण्यासाठी मेहनत...
फळबाग, भाजीपाला शेतीतून मिळविली आर्थिक...शेतीचा कोणताच अनुभव नसताना कुऱ्हा (ता. तिवसा, जि...
ग्रामविकास, जलसंधारण, शिक्षणासाठी ‘...सोनई (ता. नेवासा, जि. नगर) येथील यशवंत सामाजिक...
फुलांनी घेतला आकार घडले सजावटीचे प्रकारजालना जिल्ह्यातील पानशेंद्रा येथील मद्दलवार या...
एकात्मिक, व्यावसायिक शेतीचे आदर्श मॉडेलमौजे पेठवडज (जि. नांदेड) येथील श्‍याम जोशी...
प्लॅस्टिक पेपरच्या वापरातून तीन एकर...निवाणे (जि. नाशिक) येथील डॉ. महेंद्र व संदीप या...