आदिवासीबहुल भागात ‘निसर्गराज’ची घौडदौड 

निसर्गराज शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक व कर्मचारी
निसर्गराज शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक व कर्मचारी

धुळे जिल्ह्यातील हारपाडा (ता. साक्री) या आदिवासीबहुल गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत सोयाबीन, भात, गहू, बाजरी, हरभरा आदी आपल्या मालाला राज्यातील बाजारपेठ मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक रोजगाराची निर्मिती करीत ‘निसर्गराज ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी’ची स्थापना केली आहे. तीन वर्षांच्या कालावधीत उत्तम समन्वय, व्यवस्थापनाच्या आधारे वर्षाला एक कोटी रुपयांपर्यंत उलाढाल करण्यापर्यंत या कंपनीने मजल मारली आहे.  धुळे जिल्ह्यात हारपाडा (ता. साक्री) हे शंभर टक्के आदिवासीबहुल गाव असून, लोकसंख्या सुमारे १३०० पर्यंत आहे. सुकापूर ग्रामपंचायतीला हे गाव जोडले आहे. भागात पर्जन्यमान बऱ्यापैकी आहे. जमीन पाण्याचा निचरा होणारी, मध्यम प्रकारची आहे. खरिपात भात, सोयाबीन तर सिंचनाच्या सुविधा चांगल्या असल्याने रब्बीत मका, गहू, बाजरी, नागली ही पिके घेतली जातात. या भागातील पाडे व गावांसाठी पिंपळनेर ही नजीकची तर धुळे ही मोठी बाजारपेठ आहे.  गरजेतून कंपनीची निर्मिती  हारपाडा हा शेती व धान्य व्यापार या अनुषंगाने दुर्लक्षित भाग होता. इथल्या शेतकऱ्यांच्या मालाला  चांगली बाजारपेठ मिळणे, त्यांचे उत्पन्न वाढणे गरजेचे होते. शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा मिळणे, त्यांचा वाहतूक खर्च कमी होणे या देखील बाबी होत्या. त्यासाठी हारपाडातील काही शेतकरी एकत्र आले. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा पर्याय त्यांना महत्त्वाचा वाटला. त्यासाठी स्थानिक संजीवनी संस्थेचे मार्गदर्शन झाले.  कंपनी स्थापना व वाटचाल 

  • हारपाडा व लगतच्या पाड्यांमधील १३ आदिवासी शेतकऱ्यांनी २०१६ मध्ये कंपनीची केली स्थापना 
  • निसर्गराज ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी असे नामकरण 
  • शिवाजी बहिरम (सुकापूर, ता. साक्री) कंपनीचे अध्यक्ष तर उपाध्यक्ष म्हणून सुनील बुधा भवरे (खरगाव, ता. साक्री) यांची जबाबदारी. 
  • मुंबई येथील टाटा ट्रस्ट, शिनी संस्था, नाबार्ड, जीआयझेड आदी संस्थांचे सहकार्य 
  • धुळे येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ डॉ. पंकज पाटील, अन्य तज्ज्ञ तसेच कृषी विभागाशी नियमित संपर्क 
  • कंपनीचे १३९५ सभासद. कमाल सभासद अल्पभूधारक. त्यांच्याकडून प्रति व्यक्ती ५०० रुपये शेअर्स 
  • धान्याचे संकलन, प्रतवारी  निसर्गराज कंपनी धान्याची खरेदी करते. परिसरातील प्रमुख बाजारात जे दर सुरू आहेत त्या दरांत खरेदी केले जाते. यात कटती व अन्य प्रकार केले जात नाहीत. धान्य मळणी करून आणल्यानंतर त्याचे वजन करून त्यासंबंधी रकमेचा धनादेश त्वरित शेतकऱ्याला दिला जातो. धान्य खरेदी व प्रतवारीचे काम आजूबाजूच्या ७४ पाड्यांवरील महिला बचत गटांना दिले आहे. गटांमध्ये समन्वय, कार्यवाहीसाठी २८ महिलांचा समिती गट तयार केला आहे. प्रति गटात सात ते दहा महिला सक्रिय आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनाही हंगामी रोजगाराची संधी धान्य प्रतवारी, खरेदीसंबंधी मिळते. सुकापूर, हारपाडा, कुडाशी, वारसा व मांजरी येथे नियमित, तर गरजेनुसार अन्य गावांमध्ये हंगामी धान्य खरेदी होते.  राइस मिल, ऑइल मिल  कंपनीने भाडेतत्त्वावर ६० बाय २५ फूट क्षेत्रफळाचे शेड उभारले आहे. त्यात प्रतवारी, पॅकिंग केले जाते.  चार मिनी राइस मिल्स तर अलीकडेच मिनी ऑइल मिलही घेतली आहे. सोयाबीनवर प्रक्रिया करून तेलाची स्थानिक शेतकरी, अन्य खरेदीदारांना कमी नफा तत्त्वावर विक्रीचे नियोजन केले आहे.  नंदुरबार, औरंगाबाद, नगर, पुणे, धुळे आदी भागांतील मोठ्या खरेदीदारांना ‘निसर्गराज’ ब्रॅण्डने धान्याची  विक्री केली जात आहे.  अवजारे बॅंक, कृषी सेवा केंद्र  यांत्रिकीकरणाची गरज लक्षात घेऊन अवजारे बॅंकही कंपनीकडून चालविली जात आहे. यात ट्रॅक्‍टरचलित सोयाबीन, भात, गहू कापणी यंत्र, रोटाव्हेटर, पॉवर टिलर, चिखलणी आदी अवजारे आहेत. प्रति तास ४०० रुपये भाडेशुल्क यंत्रांच्या भाडेपोटी आकारण्यात येते.  हारपाडा येथे कृषी सेवा केंद्र उभारले आहे. त्या माध्यमातून रासायनिक खते, दर्जेदार बियाणे, कीडनाशके उपलब्ध करण्यात आली आहेत. सदस्य शेतकऱ्यांना काही टक्के कमी दराने य निविष्ठा  उपलब्ध केल्या जातात. निविष्ठा कंपन्यांतर्फे दरवर्षी मेळावे, शेतकरी मार्गदर्शन उपक्रम व कीड-रोगनियंत्रण जागृती मोहीम राबविली जाते. अलीकडे एका कंपनीच्या ठिबक यंत्रणेची एजन्सी घेतली आहे.  आश्‍वासक उलाढाल  निसर्गराज कंपनीने गेल्या तीन वर्षांत विविध उपक्रमांतून आपली आर्थिक उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. मागील दोन वर्षांत मिळून कंपनीची एकूण वार्षिक उलाढाल ८० लाख रुपयांपर्यंत पोचली. यंदा कंपनीने सुमारे ९० लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत आपली उलाढाल नेण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीत मुख्याधिकारी, व्यवस्थापक, लेखाधिकारी असाही स्टाफ आहे. तोही शेतकरी कुटुंबातीलच आहे. त्यांचे वेतन कंपनीच्या नफ्यातून दिले जाते. कंपनीत धान्य प्रतवारीचे काम बारमाही सुरू असते. यातही महिला व शेतकऱ्यांना मजुरी उपलब्ध करून देण्यात येते. विविध कंपन्यांनी केलेली आर्थिक मदत तसेच शेअर्स याद्वारे सुमारे ३१ लाख रुपयांची गुंतवणूक झाली आहे.  मागील दोन वर्षांतील धान्य खरेदी- विक्री (टनांमध्ये) 

  • भात- २० 
  • गहू-१०० 
  • मका- ४०० 
  • सोयाबीन- १५० 
  • बाजरी- १० 
  • संपर्क- शिवाजी बहिरम- ९८२२६२९६००, ७३९१९४५६००

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com