मल्चिंग पेपर अंथरणी केवळ पाचहजार रूपयांत

नाशिक जिल्ह्यातील आडगाव टप्पा (ता. चांदवड) येथील युवा शेतकरी नितीन घुले यांनी मल्चिंग पेपर अंथरणारे यंत्र विकसित केले आहे. केवळ पाच हजार रुपयांमध्ये बनवलेल्या या यंत्रामुळे वेळ, श्रम यांत बचत होऊन सहा माणसांचे काम दोन माणसांच्या साह्याने पूर्ण करणे शक्य झाले आहे.
 यंत्राद्वारे मल्चिंग पेपर अंथरणी शेतात सुरू असताना.
यंत्राद्वारे मल्चिंग पेपर अंथरणी शेतात सुरू असताना.

नाशिक जिल्ह्यातील आडगाव टप्पा (ता. चांदवड) येथील युवा शेतकरी नितीन घुले यांनी संशोधकवृत्ती, कौशल्यबुद्धी, प्रयत्नवाद यातून मल्चिंग पेपर अंथरणारे यंत्र विकसित केले आहे. केवळ पाच हजार रुपयांमध्ये बनवलेल्या या यंत्रामुळे वेळ, श्रम यांत बचत होऊन सहा माणसांचे काम दोन माणसांच्या साह्याने पूर्ण करणे शक्य झाले आहे. विविध पिकांत प्लॅस्टिक मल्चिंगचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. मात्र मल्चिंग अंथरण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुशल कामगारांची आवश्यकता भासते. त्यासाठी प्रामुख्याने ट्रॅक्टरचलित यंत्रे उपलब्ध आहेत. अनेक वेळा ती अल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडत नाहीत. मागील वर्षापासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मल्चिंग पेपर अंथरण्यासाठी मजूरटंचाई आहे. संसर्गाचा धोका होण्याची भीती असल्याने मजूर शेतात येण्यासाठी टाळाटाळ करताना दिसतात. तालुक्यातील आडगाव टप्पा येथील नितीन घुले यांना देखील याच समस्या भेडसावू लागल्या. घुले यांची कौशल्यबुद्धी पूर्वी नितीन यांचे वडील लहानू पारंपरिक पद्धतीने शेती करायचे. सन २०१३ मध्ये ‘डी.एड’ची पदविका घेतल्यानंतर नितीन घरची शेती पाहू लागले. पीकपद्धतीत बदल करून टोमॅटो, मिरची, झेंडू आदी पिके घेऊ लागले. पुढे नावीन्यपूर्ण प्रयोग करताना पाणी, खते व तण नियंत्रण असे विविध फायदे अभ्यासून २०१६ पासून मल्चिंग पेपर आच्छादनाचा अवलंब केला. सध्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या अभिनव बाल विकास मंदिर, धोंडगव्हाण येथील शाळेत प्राथमिक शिक्षकाची नोकरी ते करतात. ती सांभाळून शेतीची जबाबदारीही पाहतात. मल्चिंग पेपर अंथरण्यासंबंधी समस्या हीच संधी मानून त्यांनी किमान खर्चात त्यासाठी यंत्र बनविण्यासाठी सविस्तर अभ्यास सुरू केला. निर्मितीचे टप्पे : एप्रिल २०२१ महिन्यात काम सुरू केले. संरचना आखली. वेल्डिंग व तत्सम कामांचा अनुभव नसल्याने गावातील ‘वेल्डिंग’ व्यावसायिक व मित्र सचिन खैरनार यांच्याकडे संकल्पना मांडली. लोखंडी अँगल, पाइप, नट, बोल्ट, नांगरणी फाळ, चाके यांची उपलब्धता केली. मित्राच्या मदतीने साचा मोजमाप व जोडणी झाली. काही टाकाऊ व काही हार्डवेअर दुकानातून साहित्य आणले. यंत्राची रचना

  • दोन्ही बाजूंस समांतर २ बाय २ सेंमी लोखंडी अँगल बनवून त्यास ठरावीक अंतराने तीन आधार.
  • पहिला आधार थोडा उंच. त्यात मल्चिंग पेपर बसविण्याची सोय.
  • पेपरच्या आकारानुसार सव्वातीन व चार फूट रुंदीचे पेपर बंडल गरजेनुसार त्यात बसवता येते.
  • पुढील भागात दोन लोखंडी पाइप्स समांतर. त्यास आडवा पाइप.
  • त्यास हॅंडल समजून पुढील बाजूस यंत्र ओढण्यासाठी वापर. आकार एक इंच.
  • यंत्राच्या मध्यभागी आधाराखाली चाके. त्यामुळे यंत्र पुढील बाजूस ओढताना गती येते.
  • मागील बाजूस एकसारखा पेपर अंथरल्यानंतर सरीच्या दोन्ही बाजूंना एकसारखा मातीत गाडण्यासाठी छोट्या नांगरासारखे फाळ.
  • सुधारणा व चाचण्या अखंड मेहनतीतून यंत्र तयार झाले. चाचण्या घेताना ते सदोष असल्याचे जाणवले. तिरके चालणे, अंथरण्यासाठी जोडलेला कागद फाटणे, साऱ्यावरील ठिबकच्या नळ्या उचकून येणे अशा अडचणी येऊ लागल्या. त्रुटी दूर करीत सुधारणा करणे व चाचणी घेणे असे महिनाभर चालले. दोषविरहित निष्कर्ष समोर आल्यानंतर अवघ्या पाच हजार रुपयांत यंत्र तयार करण्यात अखेर यश आले. दोन यंत्रांतील तुलना प्रचलित

  • ट्रॅक्टरचलित यंत्र महागडे आहे. इंधन खर्च वेगळा.
  • पेपर अंथरण्यासाठी सहा मजूर लागतात.
  • व्यावसायिकांची मदत घेतल्यास त्यासाठी १० ते १२ जणांचा गट असतो. प्रति रोलसाठी सहाशे रुपये दर आकारला जातो. एकरी १० ते १२ रोल्स लागतात. याप्रमाणे एकरी ६००० ते ७२०० रुपये खर्च येतो. या कामासाठी सुमारे दीड दिवस लागतो.
  • जमीन चढ- उतराची असल्यास तेथे व बांधाजवळ काही अंतर मनुष्यबळ वापरून अंथरून घ्यावे लागते.
  • नितीन यांचे यंत्र

  • मनुष्यचलित यंत्र.
  • वजन अवघे २५ किलो. त्यावर माती व्यवस्थित बसण्यासाठी ८ ते १० किलो वजन ठेवले जाते. एवढे वजन दोन माणसे ओढू शकतात.
  • सऱ्यांवर मल्चिंग पेपर एकसमान थरून तो मातीखाली दाबता येतो.
  • दोन मजुरांच्या साह्याने सहा ते सात तासांमध्ये एक एकर क्षेत्राचे काम. हा एक दिवस पकडला तरी मजुरीच्या कमी-अधिक दराप्रमाणे एकरी आठशे ते एक हजार रुपये खर्च.
  • वेळ व मजूर टंचाईवर मात
  • अल्पधारक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर.
  • मल्चिंग पेपरच्या आकारानुसार बंडल लोड करण्याची व्यवस्था
  • रचना सुटसुटीत. देखभाल खर्च कमी.
  • तुलनात्मक फरक (एकरी)

  • प्रकार... एकरी खर्च (रु.) लागणारा वेळ
  • ट्रॅक्टरचलित यंत्र ३६०० ३ तास
  • मजूर ७००० १६ तास
  • मनुष्यचलित यंत्र २००० ६ तास
  • यांत्रिकरणाला पसंती नितीन यांची चुलत बहीण हर्षाली यांनी यंत्राचा वापर सांगणारा व्हिडिओ फेसबुक, व्हॉट्सॲपवर अपलोड केला. राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी संपर्क केला. काहींनी यंत्र बनवून देण्याची मागणी केली. स्थानिक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. नितीन म्हणतात, की स्वगरजेतून यंत्र तयार केले. त्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता रास्त दरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. पेटंटसाठी अर्ज नितीन एकुलते एक असल्याने संपूर्ण सात एकर शेतीची जबाबदारी आहे. सकाळी पाच वाजता उठून सकाळी ७ ते १२ शालेय अध्यापन, दुपारी घरी आल्यानंतर शेतीची कामे असा त्यांचा दिनक्रम असतो. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार अल्पखर्चात किफायतशीर तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यास शेतीचे चित्र बदलेल असे ते म्हणतात. आपल्या यंत्राचे पेटंट घेण्यासाठी त्यांनी पेटंट कार्यालयाकडे अर्ज दाखल केला आहे. प्रतिक्रिया मल्चिंग पेपर वापरल्याने मजूर टंचाईवर मात होते. आंतरमशागत, पाणी, वेळ व पैशांची बचत होते. मनुष्यचलित यंत्र वापरण्यास सोपे व कार्यक्षमता वाढविणारे असावे. जेणे करून उत्पादन खर्च कमी होईल. चार अल्पभूधारक शेतकऱ्यांनी एकत्रित खरेदी केल्यास गरजेनुसार वापर शक्य आहे -नितीन घुले संपर्क- ९८९०९८१५३२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com