दर पडले? चिंता नको इंगळे घेऊन आले प्रक्रिया तंत्र

इंगळे यांचे फळप्रक्रिया युनीट
इंगळे यांचे फळप्रक्रिया युनीट

शेतकऱ्यांच्या मालाला अनेक वेळा समाधानकारक दर मिळत नाही. अशा वेळी त्यावर प्रक्रिया करून कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवून योग्य वेळी विकण्याचे तंत्र वाळुंज (जि. पुणे) येथील नितीन इंगळे यांनी आत्मसात केले आहे.   पुणे-जेजुरी रस्त्यावर वाळुंज (ता. पुरंदर) हे सुमारे साडेबाराशे लोकसंख्येचे छोटेसे गाव आहे. पावसाचे प्रमाण येथे नेहमीच कमी असते. गावातील नितीन इंगळे यांची वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. पाणी परिस्थिती पाहून तेदेखील सात वर्षांपासून फळपिकांची शेती करीत आहेत. यात पेरू पाऊण एकर, डाळिंब एक एकर, सीताफळ व चिकू सुमारे पाऊण ते एक एकर अशी त्यांची बाग व काही भाजीपाला आहे. शेतमालावर प्रक्रिया बाजारात फळे, भाजीपाल्याचे दर पडून अनेक वेळा नुकसान होते. शेतकऱ्यांच्या हाती काहीच पडत नाही. अशा वेळी हाच माल जर कोल्ड स्टोअरेजमध्ये असता किंवा त्यावर प्रक्रिया केली असती तर त्याला भविष्यात चांगला दर मिळू शकला असता. हीच संकल्पना नितीन यांना पटली. कृषी विभागाचे सुनील बोरकर यांनी त्यांना त्याबाबत प्रेरणा दिली. सर्वांगीण अभ्यास करून प्रक्रिया प्रकल्प उभा करण्याचे निश्‍चित झाले. अनेक वर्षांच्या शेतीतील उत्पन्नातून शिल्लक बाजूला ठेवत नितीन भांडवल उभे करीत गेले. बॅंकांकडेही प्रयत्न झाले. मात्र कर्ज द्यायला कोणी तयार नव्हते. अखेर प्रकल्प उभारला अखेर अनेक प्रयत्नांतून नितीन यांनी आपल्या शेतातच प्रकल्प उभा करण्यात यश मिळवले. सुमारे ८० टन क्षमतेचे कोल्ड स्टोअरेज त्यांनी उभारले आले. यात ६० टन व २० टन असे दोन भाग आहेत. यामध्ये शेतमालावर ब्लास्टिंगची प्रक्रिया केली जाते. तापमान उणे ३५ अंश खाली आणण्यात येते. कोल्ड स्टोअरेजमध्ये उणे १८ ते २० अंशाला फळे व भाजीपाला टिकवून ठेवण्यास मदत होते. जेव्हा दर वाढतात त्यावेळी कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवलेल्या मालाची विक्री केली जाते. तंत्र व यंत्र

  • पुढील शेतमालावर होते प्रक्रिया
  • सीताफळ, आंबा, चिकू, पेरू, अंजीर, स्ट्रॉबेरी, जांभूळ, मका, वाटाणा, पावटा, प्लॉवर,
  • बिन्स.
  • आंबा, चिकूचे स्लाईस वा पल्प तयार केले जातात. सीताफळापासून गर वेगळा केला जातो.
  • वाटाणे फ्रोजन स्वरूपात विकले जातात.
  • त्यासाठी विविध यंत्रांची खरेदी केली आहे.
  • या प्रकल्पासाठी सुमारे एक ते दीड कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
  • शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी केली जाते. सुमारे शंभर शेतकऱ्यांचे नेटवर्क उभारले आहे.
  • विक्री

  • नितीन यांनी आपल्या उत्पादनांसाठी मार्केट तयार केले आहे. ज्यूस व्यावसायिक, केटरर्स, कंपन्या यांना हा माल पुरवण्यात येतो. ज्या वेळी फळे-भाजीपाल्यांना दर चांगले असतात, त्या वेळी त्यांची थेट विक्री केली जाते. प्रामुख्याने धान्य महोत्सव, सासवड येथील आठवडे बाजार येथे ही विक्री होते. चिकूला ज्या वेळी किलोला सात रुपये दर सुरू असतो, त्या वेळी शेतकऱ्यांना १५ रुपये दर दिला जातो. पुढे त्यावर प्रक्रिया होते. कोल्ड स्टोअरेजमध्ये तो ठेवण्यात येतो. पुढे याच प्रक्रियायुक्त चिकूची किलोला ६० रुपयांपर्यंत किंमत होते.
  • प्रक्रिया केलेल्या मालाचे दर फळनिहाय प्रति किलो १०० ते २०० रुपयांपर्यंतही जाऊ शकतात.
  • फूड सेफ्टीच्या निकषांनुसार निश्‍चित मायक्रॉनच्या प्लॅस्टिक पिशव्यांमधून विक्री होते.
  • साधारणपणे दरवर्षी ८० ते ९० टन या प्रमाणात विक्री होते. दरवर्षी एक ते सव्वा कोटी रुपयांच्या दरम्यान उलाढाल होते. वाहतूक, मालाची खरेदी, मजुरी व अन्य असा खर्चही भरपूर असतो.
  •   नितीन यांची प्रयोगशील शेती प्रक्रिया प्रकल्प सांभाळून नितीन शेतीही पाहतात. दोन्ही जबाबदाऱ्या कुटुंबातील सर्व मंडळी पाहतात. त्यामुळेच कामे हलकी होत असल्याचे ते सांगतात. तालुका कृषी अधिकारी अंकुश बर्डे, ‘आत्मा’चे राजेंद्र साबळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक स्मिता वर्पे, गणेश जाधव यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. नितीन अलीकडील वर्षांत विषमुक्त शेतीकडे वळले आहेत. त्यांच्याकडे तीन देशी गायी आहेत. गोमूत्र व शेणाचा वापर ते शेतीत चांगल्या प्रतीचा शेतमाल उत्पादित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. काढणीनंतर फळांची प्रतवारी होऊनच वाहतूक क्रेटमधून होते. त्यामुळे फळे खराब होण्याचे प्रमाण कमी होऊन चांगल्या प्रतीची फळे ग्राहकांना मिळतात. दुष्काळी स्थितीवर पर्याय म्हणून एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे घेतले आहे. शिवाय ठिबक सिंचन आहेच. पुरस्कार

  • आत्माअंतर्गत उत्कृष्ट शेतकरी- २०१७-१८
  • कडेपठार पतसंस्थेचा कृषिभूषण- २०१८-१९
  • प्रतिक्रिया प्रक्रियायुक्त मालाची विक्री आम्ही पुण्यात सेंद्रिय महोत्सवात केली. त्याला ग्राहकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. आम्ही इथे माल घेतला, पण पुढे तो कुठे उपलब्ध होणार, असे प्रश्‍न ग्राहक विचारत होते. सरकारने आम्हाला मार्केट मिळवून देण्यासाठी आम्हाला मदत केली किंवा प्रक्रियेसाठीही साह्य केले तर आमच्या बऱ्याच समस्या कमी होतील. - नितीन अंकुश इंगळे- ९६२३२८१०२१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com