औषधी जायफळाचे मूल्यवर्धन

जायफळ प्रक्रिया
जायफळ प्रक्रिया

जायफळ सालीचे वजन ६० टक्के असते. जायफळ सालीमध्ये औषधी गुणधर्म व पौष्टिकता असल्यामुळे जायफळाच्या सालीपासून सिरप, मुरांबा, कॅंडी व लोणचे इत्यादी पदार्थ तयार करता येतात. १. जायफळ सालीचा मुरांबा

  • जायफळ साली धुऊन घेऊन त्यावरील पातळ साल काढून ५ सेंमी. आकाराचे तुकडे करावेत.
  • तुकडे २ टक्के मिठाच्या द्रावणात (१ लिटर पाण्यात २० ग्रॅम मीठ) वाफवून घेतल्यामुळे सालीतील तुरटपणा कमी होतो.
  • तुकडे ४० टक्के साखरेच्या (४०० ग्रॅ. साखर प्रतिकिलो पाक) पाकात उकळून रात्रभर ठेवाव्यात.
  • दुस-या दिवशी तुकडे काढून राहिलेल्या साखरेच्या पाकात आणखी थोडी साखर मिसळून ५० टक्के पाक तयार (५०० ग्रॅ. साखर प्रतिकिलो पाक) करावा. त्यात ते तुकडे परत उकळून तसेच रात्रभर ठेवावेत.
  • ही क्रिया साखरेचा पाक ७० ते ७५ टक्के होईपर्यंत परत परत करावी.
  • उकळून कोरड्या केलेल्या बरणीत ते तुकडे ठेवून त्यावर राहिलेला साखरेचा पाक ओतावा, बरणीचे झाकण घट्ट लावून हवाबंद करावे.
  • २. जायफळ सालीची कॅंडी

  • जायफळ कॅंडी ही जायफळसालीच्या मुरंब्यापासून केली जाते. मात्र, त्यापूर्वी जायफळ सालीच्या मुरंब्यातील पाकाची तीव्रता ७५ते ८० अंश ब्रिक्स करावी (याचाच अर्थ पाक तीन ते चार तारी असावा). मुरांबा तसाच आणखी एक आठवडा ठेवावा.
  • साखरेचा पाक निथळून काढावा. मुरंब्याच्या फोडी मलमल कापडाला पुसून घेऊन त्या सूर्यप्रकाशात अगर वाळवणी यंत्रात वाळवाव्यात.
  • या वाळलेल्या जायफळसाली मुरांब्याच्या फोडी म्हणजेच जायफळ कॅंडी पॉलिथीन पिशवीत सीलबंद करावी.
  • ३. जायफळ सालीचे सरबत

  • सरबत तयार करण्यासाठी जायफळ सालीवरील बाहेरील पातळ साल काढून त्याचे ५ ते १० सेंमी.चे तुकडे करावेत.
  • हे तुकडे २ टक्के मिठाच्या द्रावणात (१ लिटर पाण्यात २० ग्रॅम मीठ) वाफवून घेतल्यामुळे सालीतील तुरटपणा कमी होतो.
  • तुकडे थंड पाण्याने धुवून घेऊन १ किलो तुकड्यांसाठी १.५ लिटर पाणी घेऊन ३० ते ४० मिनिटे तुकडे नरम होईपर्यंत शिजवावेत. नंतर ते मिश्रण मलमलच्या स्वच्छ कापडात घेऊन रस पिळून काढावा.
  • १ किलो गाळलेल्या जायफळ सालीच्या रसासाठी २ किलो सार व २४ ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून थोडे गरम करावे व मिश्रणात पोटॅशियम मेटाबायसल्फाईट हे परिरक्षक ७०० मिलिग्रॅम प्रतिकिलो सरबत या प्रमाणात मिसळून सरबत थोडे गरम असतानाच ते बाटल्यात भरून हवाबंद करावे.
  • सरबताचा आस्वाद घेताना १.५ पट पाणी मिसळावे. चवीपुरते मीठ घालावे.
  • ४. जायफळ सालीचे लोणचे

  • लोणच्यासाठी जायफळाच्या ताज्या फोडी धुवून त्यावरील बाहेरील पातळ साल काढून आपल्या आवडीप्रमाणे छोटे तुकडे करावेत सदर फोडींना प्रमाणित घटकातून मीठ व हळद लावून पाणी निचरून काढावे.
  • आंबा लोणच्याप्रमाणेच मेथी, हिंग पावडर व मोहरीची डाळ यांच्या निम्म्या प्रमाणात गोडेतेल घेऊन फोडणी द्यावी.
  • फोडणी थोडी थंड झाल्यावर जायफळाच्या तयार फोडीत मिसळावी. लोणचे जास्त काळ टिकण्यासाठी १ किलोसाठी २५० मिलिग्रॅम सोडियम बेन्झोएट मिसळून लोणचे निर्जंतूक केलेल्या बरणीत भरल्यानंतर शिल्लक राहिलेले आणि उकळून थंड केलेले गोडतेल बाटलीत आतावे.
  • तेलाची पातळी लोणच्यावर राहील, याची काळजी घ्यावी. बरण्या झाकण लावून बंद कराव्यात आणि थंड व कोरड्या ठिकाणी ठेवाव्यात.
  • आरोग्यवर्धक लोणचे तयार करताना कमी मसाल्याचे, कमी तेलाचे, कमी मीठ घातलेले, चवदार व सर्व पौष्टिक गुणधर्म टिकवलेले असावे. लोणच्यासाठी पुढील प्रमाणात साहित्य वापरावे. १. जायफळाच्या फोडी- १.५ किलो, २. मीठ (तापवून घेतलेले)- २५० ग्रॅ. ३. मेथी - २० ग्रॅ., ४. हळद पूड - ३० ग्रॅ., ५. हिंग - ४० ग्रॅ., ६. लाल मिरची पावडर -४८ ग्रॅम, ७. मोहरी डाळ - १०० ग्रॅम, ८. गोडतेल - ४०० ग्रॅ.
  • संपर्क ः डॉ. वैभव शिंदे,९५१८९४३३६३ (प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये, जि. रत्नागिरी) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com