गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण

सेंद्रिय शेतीला सध्याच्या काळात मोठे महत्व आले आहे. मात्र सेंद्रिय मालाचे प्रमाणीकरण हा अत्यंत महत्वाचा भाग आहे.त्याची कार्यपध्दती आपण या लेखात समजावून घेऊया.
सेेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण आवश्क झाले आहे.
सेेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण आवश्क झाले आहे.

सेंद्रिय शेतीला सध्याच्या काळात मोठे महत्व आले आहे. मात्र सेंद्रिय मालाचे प्रमाणीकरण हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्याची कार्यपध्दती आपण या लेखात समजावून घेऊया. सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय कार्यक्रम २ ऑक्टोबर २००१ मध्ये खऱ्या अर्थाने सुरु झाला. त्या अंतर्गत तृतीय पक्ष निरीक्षण व सेंद्रिय प्रमाणीकरण सुरु झाले. परंतु बहुतांशी शेतकरी अल्पभूधारक व कोरडवाहू पिके घेणारे आहेत. एका शेतकऱ्याचा प्रमाणीकरणाचा खर्च हा त्यांच्या दृष्टीने फार जास्त होतो. तृतीय पक्ष प्रमाणीकरण व निरीक्षण करणाऱ्या बहुतांशी प्रमाणीकरण संस्था बहुराष्ट्रीय असल्याने त्यांचा प्रमाणीकरणाचा खर्च हा खूप जास्त होतो ही वस्तुस्थिती आहे. परंतु आंतराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार करता कुठलाही शेतमाल हा मोठ्या प्रमाणात असेल तर तो निर्यात करता येतो. मग गटाने शेती करण्याची संकल्पना यासाठी महत्वाची ठरू शकते. यात दोन फायदे आहेत. गटाने जर तृतीय पक्ष निरीक्षण प्रमाणीकरण करायचे असेल तर खर्च हा विभागून दरडोही तो फार कमी असा येतो. दुसरा फायदा आपण सर्व मिळून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊ शकतो व तो माल निर्यात करू शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी गटाने जर सेंद्रिय शेती केली व त्याचे प्रमाणीकरण केले तर त्याचा मोठा फायदा सर्वांनाच होऊ शकतो. एन.पी.ओ.पी कार्यक्रम एन.पी.ओ.पी (NPOP: National Programme for Organic Production) मानकाच्या अंतर्गत नियंत्रण प्रणालीद्वारे शेतकरी गटाचे सेंद्रिय प्रमाणीकरण करुन घेण्यात येते. प्रमाणीकरणाची ही पध्दत नियंत्रण प्रणालीवर आधारित आहे. उत्पादक गट, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, महिला बचत गट, करार शेती पध्दत आणि छोट्या प्रमाणावर असलेल्या प्रक्रिया युनिटला ती लागू होते. गटांमध्ये उत्पादकांनी एकसमान उत्पादन पध्दत वापरली पाहिजे. या शेतकऱ्यांच्या जमिनी एका गावातील एकमेकांना लागून असल्या पाहिजेत. किंवा भौगोलिक दृष्ट्या एकाच भागातील असाव्यात. शक्यतो या शेतकऱ्यांचे धारणक्षेत्र ४ हेक्टर क्षेत्र किंवा त्यापेक्षा कमी असायला हवे. ज्यांच्या कडे ४ हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त जमीन असेल ते देखिल गटांमध्ये गणले जातात. परंतु वर्षाला तृतीय पक्ष निरीक्षण व प्रमाणीकरण संस्थेद्वारा अशा शेतकऱ्यांचे वैयक्तिक स्वरूपातील निरीक्षण होणे महत्वाचे आहे. असे धारण केलेले क्षेत्र एकूण गटाने धारण केलेल्या क्षेत्रापैकी ५० टक्क्याने कमी असावे. त्यांचेही तृतीय पक्ष निरीक्षण व प्रमाणीकरण संस्थेद्वारा निरीक्षण होणे गरजेचे असते. गट संस्थेची रचना: सबंधित गटाला कायद्याचा दर्जा असणे अनिवार्य आहे. संबंधित संस्थेकडे त्याबाबत माहितीपत्रक असणे गरजेचे आहे. अंतर्गत नियंत्रण प्रणाली राबविण्यासाठी जी काही पध्दत आहे त्याची जबाबदारी प्रत्येक सभासदावर किंवा समितीकडे असावी. जेणेकरून विशिष्ट कार्यक्रम राबविता येईल. अंतर्गत गुणवत्ता प्रणाली: गट प्रमाणीकरण हे खाली दिलेल्या अंतर्गत गुणवत्ता प्रणालीच्या मूल्यांवर आधारित आहे. 1. अंतर्गत नियंत्रण प्रणाली राबविणे. 2. अंतर्गत प्रमाणके राबविणे. प्रत्येक गटाचे वर्षाला निरीक्षण करण्यासाठी निरीक्षण व प्रमाणीकरण गट नेमावा. या गटाने (प्रमाणीकरण) अंतर्गत गुणवत्ता प्रणालीची कागदपत्रे, कामगारांचे शिक्षण व सर्व शेतींचे निरीक्षण वर्षातून केले गेले पाहिजे. एखाद्या गटाला गुणवत्ता प्रणाली नेमायाच्या असतील तर त्याच्या खालील पूर्तता कराव्यात.

  • अंतर्गत नियंत्रण प्रणालीचा विकास
  • उत्पादक गटाची निवड
  • गट प्रमाणीकरणाच्या गरजेची जाणीव जागृत करणे.
  • अंतर्गत नियंत्रण प्रणाली व्यवस्थित राबविण्यासाठी सुशिक्षित लोकांची
  • निवड
  • अंतर्गत नियंत्रण प्रणालीच्या विकासासाठी व उत्पादनासाठी प्रशिक्षण
  • पुरविणे
  • योजना व पध्दती असलेले पुस्तक तयार करावे व त्यानुसार पध्दती राबवाव्यात.
  • अंतर्गत गुणवत्ता प्रणाली व्यवस्थित राबविण्यासाठी त्या प्रणालीच्या कागदपत्रात पुन्हा पुन्हा सुधारणा करणे.
  • अंतर्गत गुणवत्ता प्रणालीचा व्यवस्थापक अंतर्गत गुणवत्ता प्रणालीचा व्यवस्थापक हा अंतर्गत गुणवत्ता प्रणाली विकसित करतो व राबवितो. त्याच्यावर अंतर्गत निरीक्षण शेतावरील कर्मचारी, मान्यताप्राप्त कर्मचारी व प्रमाणीकरण संस्था यांचा सहाय्यक म्हणून जबाबदारी असते. व्यवस्थापकाकडे शेतकऱ्यांच्या निवडीसाठी ठोस पध्दती असली पाहिजे. गटामध्ये प्रमाणीकरण करण्यासाठी सर्व व्यवस्थापन व्यवस्थापकाकडे असते. अंतर्गत निरीक्षक गटामधूनच काही अंतर्गत निरीक्षक निवडावेत. निरीक्षक हे सुशिक्षित असावेत. त्यांना निरीक्षण करण्याकरिता सेंद्रिय मानके व्यवस्थित माहिती असली पाहिजेत. मान्यता देणारा व्यवस्थापक वा समिती गटामधून मान्यता देण्याचा निर्णय घेणारी सुशिक्षित व्यक्ती किंवा समिती नेमावी. या व्यवस्थापकाला किंवा समितीला अंतर्गत गुणवत्ता प्रणालीच्या सेंद्रिय पध्दती, अंतर्गत प्रमाणके व या शेतीच्या राष्ट्रीय कार्यक्रमाप्रमाणे मानके व प्रमाणके माहित असणे आवशक आहे. शेतकी अधिकारी / पर्यवेक्षक शेतकी अधिकारी / पर्यवेक्षक हे त्या गटामधूनच प्रत्येक विभागाला एक असे निवडावेत. या अधिकाऱ्यांनी शेती विस्तार सेवा पुरवून शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. खरेदी अधिकारी खरेदी अधिकारी हे त्या गटामधीलच असावेत. खरेदी अधिकाऱ्याकडे शेतकऱ्याकडून व्यवस्थित माल खरेदी करण्याची जबाबदारी असतें. तो अंतर्गत गुणवत्ता प्रणालीशी संबंधित असला पाहिजे. कोठार व्यवस्थापक जर कोठारे वेगवेगळी असतील तर त्यासाठी व्यवस्थापकाची गरज आहे. त्याच्यावर माल हाताळण्याची जबाबदारी असते. त्याला अंतर्गत गुणवत्ता प्रणालीबद्दल व्यवस्थित माहिती असली पाहिजे. जेणेकरून त्या प्रणाली व्यवस्थित राबविता येतील. प्रक्रिया व्यवस्थापक जर प्रक्रिया युनिट हे अंतर्गत गुणवत्ता प्रणालीचा भाग असेल किंवा त्या गटातील शेतकरी युनिटचा वापर करणार असेल तर त्यासाठी प्रक्रिया व्यवस्थापक नेमावा लागतो. हा व्यवस्थापक हाताळणीच्या पध्दतीमध्ये प्रशिक्षित असला पाहिजे. जर एखाद्या मालाची प्रक्रिया या युनिटमध्ये होत असेल तर त्यानंतर निरीक्षकाकडून आणि अंतर्गत हाताळणी नियमाप्रमाणे त्याची प्रकिया होते कि नाही हे पाहणे त्याची जबाबदारी आहे. अशावेळी प्रकिया युनिटचा शेतकऱ्यांच्या गटाशी करार असणे आवशक असते. 

    (लेखक सेंद्रिय शेती विषयातील तज्ज्ञ व आंतरराष्ट्रीय़ प्रमाणीकरण अधिकारी आहेत.)

    संपर्क- डॉ. प्रशांत नायकवाडी-९६२३७१८७७७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com