सेंद्रिय कर्ब-नत्र गुणोत्तरातून वाढेल जमिनीची सुपीकता

जमिनीची सुपीकता, सेंद्रिय कर्ब किंवा कर्ब-नत्र गुणोत्तराकडे अधिक लक्ष देणे गरजेचे झाले आहे. जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांमध्ये सुधारणा करून शेतमालाची गुणवत्ता वाढवण्यामध्ये सेंद्रिय कर्बाचे मोलाचे महत्त्व आहे.
पीक अवशेषांचा वापर जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यास कारणीभूत ठरतो.
पीक अवशेषांचा वापर जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यास कारणीभूत ठरतो.

जमिनीची सुपीकता, सेंद्रिय कर्ब किंवा कर्ब-नत्र गुणोत्तराकडे अधिक लक्ष देणे गरजेचे झाले आहे. जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांमध्ये सुधारणा करून शेतमालाची गुणवत्ता वाढवण्यामध्ये सेंद्रिय कर्बाचे मोलाचे महत्त्व आहे. या कर्बामागील विज्ञान, त्यामुळे घडणाऱ्या अभिक्रिया, कार्बन साखळी जाणून घेतल्यास शेतात आदर्श सेंद्रिय व्यवस्थापन कसे करायचे, याची दिशा स्पष्ट होईल. महत्त्व सेंद्रिय कर्बाचे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जितके जास्त, तितका जमिनीचा पोत चांगला असतो. त्याचे कारण म्हणजे जमिनीत आपण दिलेली सेंद्रिय वा रासायनिक स्वरूपातील मुख्य वा दुय्यम अन्नद्रव्ये पिकांना मोठ्या प्रमाणात घेता येतात. याउलट सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असेल, तर दिलेली अन्नद्रव्ये मोठ्या प्रमाणात जमिनीत तशीच राहतात. जमिनीतील मुक्त चुन्याबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन क्षारांची निर्मिती होते. जमिनी क्षारयुक्त, चोपण होतात. सेंद्रिय कर्ब कमी का होतो? आपल्याकडील भौगोलिक परिस्थितीमुळे सेंद्रिय कर्बाची मात्रा अत्यंत कमी म्हणजे ०.०२ पासून ती जास्तीत जास्त ०.०६ टक्क्यांपर्यंत आहे. आपल्याकडे असलेल्या जास्त तापमानामुळे सेंद्रिय कर्बाचे ‘ऑक्सीडेशन’ होते. अगदी सोप्या भाषेत सांगावयाचे झाल्यास प्राणवायू व सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे त्याचे ज्वलन होते. शेतामध्ये उसाचे पाचट, कडबा, भाताचे तूस जाळण्याच्या परंपरेमुळे सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण आणखी कमी होत आहे. सेंद्रिय कर्बाचे फायदे

  • जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांमध्ये सुधारणा होते.
  • सेंद्रिय कर्ब म्हणजे मातीत असलेल्या असंख्य सूक्ष्मजिवांचे अन्न आहे. मातीतील उपलब्ध असलेल्या सेंद्रिय पदार्थांतील कर्ब पिकांना अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यासाठी; तसेच जमिनीत अन्नद्रव्ये टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
  • सेंद्रिय पदार्थ मातीच्या वस्तुमानांपैकी केवळ २ ते १० टक्के एवढ्याच प्रमाणात असतात.
  • मातीतील अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यासाठी, मातीची सुपीकता व जडणघडणीत, पाण्याची उपलब्धता व हे पाणी मातीत टिकवून ठेवण्याची क्षमता, मातीतील प्रदूषकांचे विघटन, कार्बन क्रम आणि मातीची
  • लवचिकता या क्रियांमध्ये या सेंद्रिय घटकांचा महत्त्वाचा सहभाग असतो.
  • मातीतील सेंद्रिय कार्बन सेंद्रिय पदार्थांपेक्षा वेगळा कसा? मातीतील एकंदरीत सेंद्रिय पदार्थ थेट मोजणे तसे अवघड असते. त्यामुळेच प्रयोगशाळा मातीतील सेंद्रिय कर्ब मोजून त्याद्वारे मातीतील उपलब्ध सेंद्रिय पदार्थांबाबत (organic matter) अहवाल देतात. सेंद्रिय कर्बाची क्रमवारी असते. कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण कमी करून हवामानबदल कमी करण्याचा एक मार्ग म्हणून त्याकडे पाहिले जाते. असा युक्तिवाद आहे की, शेतजमीन आणि कुरणांखालील जमिनींत सेंद्रिय कर्बाची वाढ झाल्याने वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइड लक्षणीय प्रमाणात कमी करता येऊ शकतो. ही घट दीर्घकाळ टिकण्यासाठी सेंद्रिय पदार्थ अधिक स्थिर असणे आवश्यक असते. मातीतील सेंद्रिय पदार्थ मातीतील सेंद्रिय पदार्थ प्रामुख्याने कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून बनलेला असतो.त्यातील अवशेषांमध्ये नत्र, स्फुरद, गंधक, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या घटकांचे स्वरूप अल्प प्रमाणात असते. खालील घटक मातीत अस्तित्वात असतात.

  • विरघळलेला सेंद्रिय पदार्थ
  • सेंद्रिय पदार्थांचे कण
  • ह्युमस
  • बुरशीप्रतिरोधक सेंद्रिय पदार्थ.
  • मातीतील सेंद्रिय पदार्थांची साखळी मातीचा प्रकार, त्या प्रदेशातील हवामान, मातीचे केले जाणारे व्यवस्थापन, तिची जडणघडण किंवा विघटन क्षमता हे घटक मातीतील सेंद्रिय पदार्थांवर परिणाम करतात. मातीतील जैविक पदार्थांच्या जैव- रासायनिक क्रियांना वेग देणारा प्रमुख आणि महत्त्वाचा घटक म्हणजे पाऊस. पावसाचे पाणी मातीत मुरते तेव्हा सेंद्रिय पदार्थांचे विघटन होते. मातीत विरघळलेले सेंद्रिय घटक, ह्युमस आणि विघटन होण्यासाठी कठीण सेंद्रिय पदार्थ यांची एक साखळी तयार होते. सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे सूक्ष्मजीवही या साखळीत अविरत कार्य करीत असतात. सेंद्रिय पदार्थांच्या साखळीतील घटक

  • निविष्ठा ः वनस्पती आणि प्राणी मृत पावतात त्या वेळी त्यांचे अवशेष तयार होतात. ते मातीतील सेंद्रिय पदार्थांचा भाग बनतात.
  • परिवर्तन ः मातीतील सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून सेंद्रिय पदार्थांचे सेवन करतात.
  • विविध सेंद्रिय अवशेष किंवा विकरे तयार करतात. उदाहरणार्थ वनस्पतींच्या ताज्या अवशेषांचे लहान कण तयार केले जातात. त्यातून ह्यूमसच्या साठ्यात वाढ होते.
  • अन्नद्रव्य मुक्त करणे : सूक्ष्मजिवांना आवश्यक नसलेली संयुगे मातीत सोडली जातात. त्यानंतर
  • ती वनस्पतींसाठी अन्नद्रव्यांच्या स्वरूपात उपलब्ध होतात.
  • सूक्ष्मजीव सेंद्रिय कर्बाचे ९० टक्क्यांपर्यंत पचन करतात. सेंद्रिय पदार्थांचे विघटन होत असताना कर्ब चक्र अविरतपणे सुरू असते.
  •  सेंद्रिय कर्ब आणि जमिनीच्या गुणधर्मांचे समीकरण भौतिक गुणधर्मात सुधारणा

  • सेंद्रिय कर्ब अतिसूक्ष्म चिकणमातीशी संयोग पावून चिकण माती ह्यूमस असा संयुक्त पदार्थ तयार होतो. ह्यूमसची उपलब्धता भौतिक अनुकूल प्रभाव पाडते.
  • जमिनीची घनता कमी करून मातीच्या कणाकणातील पोकळी वाढवून हवा खेळती ठेवते.
  • त्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, पाणी मुरण्याची अवस्था आणि निचऱ्याची क्षमता वाढते. जमिनीची होणारी धूप थांबते.
  • जमिनीची जलवाहक शक्ती वाढते.
  • जमिनीची जडणघडण रचना अनुकूल होते.
  • या सर्व भौतिक गुणधर्मांत सेंद्रिय कर्बामुळे सुधारणा होत असल्याने पीकवाढीला गती मिळते.
  •  रासायनिक गुणधर्म:

  • विविध पिकांच्या अवशेषातील कर्ब ः नत्र गुणोत्तर प्रमाण ४०-१ ते ९०-१ पर्यंत असते.
  • ह्यूमस किंवा जमिनीतील सेंद्रिय पदार्थांमध्ये एकूण नत्राचे प्रमाण ५ ते ५.५ टक्के आणि कर्बाचे प्रमाण ५० ते ५८ टक्के असते.
  • कर्ब- नत्र गुणोत्तर

  • सुपीक जमिनीतील ह्यूमसचे कर्ब - नत्र गुणोत्तर ९-१ ते १२-१ च्या दरम्यान असते.
  • विविध सेंद्रिय अवशेषांमध्ये हेच गुणोत्तर पुढीलप्रमाणे वेगवेगळे आढळते.
  • उदा. शेणखत २०-१, भाताचा पेंढा ८०-१, झाडांची पाने २५-१, उसाची पाने ११०-१, वाळलेले गवत ९५.१, गव्हाचा भुसा २५-१, धान्याचा कोंडा ९०-१, गिरिपुष्पाची पाने वा कोवळ्या फांद्या १३-१,
  • सुबाभळीची पाने ७-१, धसकटे १०४-१, जनावरांचे मूत्र २-१, मक्‍याचा पेंढा वा पाने ६०-१,
  • तणे ३०-१
  • आदर्श कर्ब-नत्र गुणोत्तर गुणोत्तराचे प्रमाण जेवढे जास्त तेवढा कुजण्यास वेळ जास्त लागतो. त्यामुळे असे सेंद्रिय पदार्थ कुजविण्यासाठी युरिया, विघटन करणारी जैविक खते वापरावी लागतात. म्हणजे कर्ब- नत्र गुणोत्तर जास्त असलेल्या सेंद्रिय द्रव्यांचे विघटन होऊन ते ११-१ पासून २०-१ पर्यंत कमी होते. कमी झालेल्या या गुणोत्तरामुळे सेंद्रिय स्वरूपातील नत्र, स्फुरद, गंधक आणि सूक्ष्मद्रव्यांचे रूपांतर रासायनिक स्वरूपात होते. ते पिकांना उपलब्ध होते. मात्र २०-१ गुणोत्तरापेक्षा अधिक कर्ब - नत्र असेल तर ती सर्व अन्नद्रव्ये सेंद्रिय स्वरूपात परावर्तित होऊन त्याचे स्थिरीकरण होते. पिकांना ती उपलब्ध होत नाहीत.  साधारणतः १३-१ ते १६-१ हे गुणोत्तर अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने अधिक उपयुक्त ठरले आहे. आदर्श गुणोत्तराचा सकारात्मक परिणाम

  • रासायनिक द्रव्यांची उपलब्धता वाढते.
  • नत्र आणि स्फुरदाच्या उपलब्धतेवर अनुकूल परिणाम होतो.
  • रासायनिक नत्राचा ऱ्हास टळतो.
  • स्फुरद स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते आणि स्फुरदाची उपलब्धता वाढते.
  • सेंद्रिय कर्बातील फुल्विक आम्ल आणि अन्य ह्युमिक पदार्थांमुळे रासायनिक सूक्ष्मअन्नद्रव्ययुक्त पदार्थाचा ऱ्हास अथवा स्थिरीकरण होत नाही. विद्राव्य स्वरूपात ते पिकांना उपलब्ध होते.
  • एकूणच शेतमालाच्या गुणवत्तेत सुधारणा होऊन जमिनीची सुपीकताही वाढते.
  • (लेखक आंतरराष्ट्रीय सेंद्रिय प्रमाणीकरण अधिकारी व सेंद्रिय शेती विषयातील तज्ज्ञ आहेत.) संपर्क- डॉ. प्रशांत नायकवाडी-८८८८८१०४८६, ९६२३७१८७७७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com