सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते साखरनिर्मिती 

माझी ३० एकर शेती आहे. पारंपरिक पद्धतीनेच ऊसलागवड करीत होतो. कारखान्याने सेंद्रिय ऊस प्रकल्पाचे महत्त्व सांगितले. सहा एकरांवर हा प्रयोग केला. कारखान्याने बिनव्याजी सेंद्रिय खतांचा पुरवठा केला. लागवडीबाबत सर्व मार्गदर्शन केले. एकरी ५० टनांपर्यंत उत्पादन मिळाले. खर्चातही बचत झाली. पाऊस चांगला झाला असता तर एकरी ७५ टनांपर्यंत उत्पादन गेले असते. -अमोल बिर्ले, हरंगुळ, ता. लातूर
कारखान्यात तयार होत असलेली सेंद्रिय साखर
कारखान्यात तयार होत असलेली सेंद्रिय साखर

लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने सेंद्रिय ऊसशेती ते सेंद्रिय साखरनिर्मितीपर्यंतचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपल्या कार्यक्षेत्रात राबविण्यास सुरवात केली आहे. सुमारे ५९९ शेतकरी यात सहभागी असून सुमारे ११६४ एकर क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने ऊस पिकतो आहे.  प्रमाणीकरण व आकर्षक पॅकिंगद्वारे लवकरच ही साखर ग्राहकांच्या भेटीस येत असून त्यास चांगला प्रतिसाद लाभेल अशी अपेक्षा आहे.  दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी मांजरा साखर कारखान्याच्या माध्यमातून मराठवाड्यात साखर उद्योग यशस्वी करून दाखविला. सद्यस्थितीत मांजरा परिवारात सात साखर कारखाने आहेत. हे राज्यातील पहिले उदाहरण म्हणावे लागेल. आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चालणारा लातूर येथील विलास सहकारी साखर कारखाना वेगवेगळे प्रयोग करीत आहे. राजकारण क्षेत्रात कार्य करण्याबरोबरच दुष्काळग्रस्त भागात साखर उद्योगातदेखील यशस्वी वाटचाल करता येते हे देखील कारखान्याने दाखवून दिले आहे.  सेंद्रिय साखरेची ओळखली बाजारपेठ  अलीकडील काळात ग्राहक आरोग्याबाबत अत्यंत जागरूक झाला आहे. त्यामुळेच सेंद्रिय अन्नाच्या सेवनाकडे त्याचा अधिक कल आहे. त्यामुळेच सेंद्रिय शेती व सेंद्रिय उत्पादनांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. हे महत्त्व ओळखूनच कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अमित देशमुख यांनी सेंद्रिय साखरनिर्मितीचा विचार केला. केवळ विचारांवर न थांबता ऊस शेती ते साखर उत्पादन ही संपूर्ण प्रक्रियाच सेंद्रिय पद्धतीने करायचे ठरवले. कृती अंमलातदेखील आणली. या प्रकल्पात  विटा (ता. सांगली) येथील ‘नेचर केअर फर्टीलायझर’ कंपनीचे सहकार्य मिळाले.  सेंद्रिय शेतीबाबत केली जागरूकता  या कारखान्याचे कार्यक्षेत्र मोठे आहे. शेतकऱ्यांची मानसिकता सेंद्रिय शेतीकडे वळवणे तसे आव्हानाचे काम होते. मात्र कारखान्याने पाच सेंद्रिय ऊस तज्ज्ञ व २२ कृषी साहायकांचे पथक तयार केले. मागील वर्षी गावा- गावात बांधावर जाऊन शेतकरी मेळावे घेतले. सेंद्रिय उसाचे महत्त्व, त्याचे शेती व मातीच्या आरोग्यावर होणारे फायदे पटवून सांगितले.  प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प  कारखान्याचे कार्यक्षेत्र दहा हजार हेक्टरपेक्षा जास्त आहे. मात्र पथदर्शक प्रकल्प राबवताना तो मर्यादित क्षेत्रावर असावा याची काळजी कारखान्याने घेतली. त्यात प्रयोगशील शेतकऱ्यांची निवड कली. असे सुमारे ५९९ शेतकरी आपल्या शेतात प्रयोग राबविण्यासाठी पुढे आले. त्यात किमान एक एकर ते कमाल पंधरा एकरांपर्यंत निवडण्यात आले.  सेंद्रिय साखरनिर्मिती प्रकल्प- ठळक बाबी 

  • सुमारे ५९९ शेतकऱ्यांचा सहभाग 
  • एकूण निवडलेले क्षेत्र- ११६४ एकर 
  • पुढील वर्षी हे क्षेत्र २००० एकरांवर नेण्याचे उद्दीष्ट 
  • प्रकल्प वर्ष- १०१७-१८ 
  • को ८६०३२ व व्हीएसआय ८००५ या ऊसजातींची निवड 
  • सेंद्रिय प्रमाणीकरण  बाजारपेठेत सेंद्रिय प्रमाणित मालाला अधिक महत्त्व आहे. साहजिकच कारखान्याने सेंद्रिय शेतीच्या उसाचे प्रमाणीकरण करून घेण्याचे ठरवले. त्यादृष्टीने अपेडा मान्यताप्राप्त प्रमाणीकरण कंपनीकडे हे काम सोपवले. ही प्रक्रिया प्रगतावस्थेत आहे.  सेंद्रिय खतेही पुरवली  सेंद्रिय शेती करताना निविष्ठांचा प्रश्न होता. बाजारपेठेत जाऊन शेतकऱ्यांना सेंद्रिय घटक विकत घ्यावे लागू नयेत, यासाठी याची काळजी कारखान्याने घेतली. स्वतः कारखान्याने उधारी तत्त्वावर सेंद्रिय खतांचा पुरवठा केला. लागवडीपासून ते तोडणीपर्यंतचे नियोजन करण्याबरोबरच निविष्ठा वापरांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. रासायनिक खतांचा वापर एकरी २० ते २५ हजार रुपयांपर्यंत होऊ शकतो. पण येथे तो एकरी साडे तेराहजार रुपयांपर्यंतच आला आहे. यात शेतकऱ्यांच्या पैशांची बचत झाली. उसाच्या पाचटाचे आच्छादनही करण्यात आले.  पावसाचा ताण तरी उत्पादन छान  लातूर तालुक्याला सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी तालुक्यात सरासरी ४०८ मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या ५७ टक्के पाऊस झाला. त्यात मागील दीड महिना पावसाने उघडीप दिली. परतीचा पाऊसच झाला नाही. अनेक ठिकाणचा ऊस वाळून गेला. मात्र सेंद्रिय उसाने तुलनेने चांगली तग धरली. सुमारे बारा महिन्यांचा हा ऊस गाळपाला घेण्यात आला. शेतकऱ्यांना दुष्काळी स्थितीत सरासरी एकरी ३७ टन उत्पादन मिळाले. काही ठिकाणी ते ५० ते ५५ टन मिळाले.  उसात घेतला हरभरा  हा प्रकल्प राबविताना लागवड अंतराची काळजी घेण्यात आली. किमान चार ते कमाल सहा फूट अंतर सरीमध्ये ठेवण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना ताग, धैंचा सारखी हिरवळीची पिके घेता आली. अनेकांनी उसात हरभरा घेतल्याने ऊसलागवडीचा खर्चही कमी झाला.  साखरनिर्मिती  ऊस शेतीबरोबरच साखरनिर्मितीतही सेंद्रिय पद्धतीचा वापर करण्यात आला. साधारण भुरकट रंगाची ही साखर असून नवी दिल्ली येथे ती पृथ्थकरणासाठी पाठवण्यात आली आहे. लवकरच आकर्षक पॅकिंग व प्रमाणीकरणाद्वारे ती बाजारपेठेत सादर होणार आहे.  शेतकऱ्यांना प्रोत्साहन  मराठवाड्याला निसर्गाची साथ नाही. तरीही शेतकऱ्यांच्या सहकार्याने साखर कारखानदारीत आम्ही नवे प्रयोग करीत आहोत. आज अनियंत्रित रासायनिक शेतीमुळे आरोग्याचे प्रश्न वाढले आहेत. कर्करोगासारख्या आजारांशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे सेंद्रिय उत्पादनाची जगभर चर्चा सुरू झाली आहे. सेंद्रिय मालाला मागणी वाढू लागली आहे. हे लक्षात घेऊन आम्ही सेंद्रिय ऊस व साखरनिर्मितीचा प्रयोग केला. तो देशातील पहिलाच असावा. या साखरेला जगभराची बाजारपेठ खुली आहे. या उसासाठी प्रतिटन शंभर रुपये प्रोत्साहनपर रक्कम अधिकची दिली जाणार आहे.  -अमित देशमुख,  आमदार, संस्थापक अध्यक्ष, विलास सहकारी साखर कारखाना, लातूर  संपर्क- सुभाष कल्याणकर- ८००७७७१५६३  मुख्य शेती अधिकारी, ‘विलास’ साखर कारखाना  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com