स्वादिष्ट हुरड्याचे उत्पादन अन् ‘मार्केटिंग’ही

परभणी जिल्ह्यातील लिमला येथील तरुण शेतकरी पांडुरंग शिंदे यांनी आपल्या दर्जेदार, स्वादिष्ट हुरडा उत्पादनासाठी पंचक्रोशीत नाव मिळवले आहे. हुरड्याचे प्रभावी ‘मार्केटिंग’ व संपर्कजाळे तयार करून मजबूत विक्री व्यवस्थाही उभारली आहे.
ज्वारी हुरडा काढणीची तयारी सुरू असताना
ज्वारी हुरडा काढणीची तयारी सुरू असताना

परभणी जिल्ह्यातील लिमला येथील तरुण शेतकरी पांडुरंग शिंदे यांनी आपल्या दर्जेदार, स्वादिष्ट हुरडा उत्पादनासाठी पंचक्रोशीत नाव मिळवले आहे. हुरड्याचे प्रभावी ‘मार्केटिंग’ व संपर्कजाळे तयार करून मजबूत विक्री व्यवस्थाही उभारली आहे.   परभणी शहरापासून सुमारे २० किलोमीटरवर लिमला (ता. पूर्णा) हे सुमारे दोन हजार लोकसंख्येचे गाव आहे. शिवारातील शेतीला जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी मिळते. परंतु धरण दरवर्षी भरण्याची खात्री नाही. त्यामुळे पाण्याची शाश्‍वती नसते. त्यामुळे भागातील शेतकरी खरीप व रब्बीतील हंगामी पीक पद्धतीचा अंगीकार करतात. अलीकडे ज्वारीचे क्षेत्र तुलनेने घटले आहे. त्याच्या काढणीत यांत्रिकीकरणास मर्यादा आहेत. मजूर मिळत नाहीत. दर वाढले आहेत. त्या तुलनेत ज्वारीस दर कमी आहेत. घरची गरज म्हणूनच उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. शिंदे यांची हुरडा ज्वारी शेती लिमला गावातील पांडुरंग बालासाहेब शिंदे २००९ पासून पूर्णवेळ शेतीत आहेत. वडील व एक भाऊ मिळून त्यांचे कुटुंब आहे. बारा एकर मध्यम जमीन आहे. विहीर, बोअर आहे. खरिपात १० एकर सोयाबीन, रब्बीत ज्वारी, गहू, हरभरा, तर उन्हाळी हंगामात भुईमूग असतो. तीन वर्षांपूर्वी शेडनेटगृहाची उभारणी करून भाजीपाला उत्पादन सुरू केले. परंतु वादळी वारे, गारपिटीत मोठे नुकसान झाले. मजुरांचीही समस्या होती. त्यामुळे पारंपरिक पीकपद्धतीवर भर देण्यास सुरुवात केली. अभ्यास ठरला महत्त्वाचा सन २०१४-१५ मध्ये परभणी जिल्ह्यात दुष्काळ पडला. त्या वेळी शिंदे यांना ज्वारीच्या हुरडा उत्पादनाबाबत माहिती मिळाली. बदलत्या काळाची गरज व व्यावसायिक दृष्टिकोनातून केवळ ज्वारी घेण्यापेक्षा हुरडा म्हणून त्याची शेती केल्यास फायदेशीर ठरेल असे अभ्यासातून त्यांच्या लक्षात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील दहेगाव येथील हुरडा उत्पादकांकडे अनेक भेटी दिल्या. लागवड, व्यवस्थापन, काढणी, विक्री आदींबाबत सविस्तर माहिती घेतली. उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन (ठळक बाबी)

  • सन २०१५-१६ च्या रब्बी हंगामात महू या देशी वाणाच्या दोन एकरांवरील लागवडीपासून सुरुवात
  • गोड, स्वादिष्ट, हिरवा दाणा असे वाणाचे वैशिष्ट्य
  • पाऊसमान व हवामान स्थिती पाहून क्षेत्र दोन, तीन ते चार एकर.
  • हुरड्यासाठीच्या वाणाची लागवड लवकर केल्यास थंडी चांगली मिळून चांगले उत्पादन मिळत असल्याचा अनुभव
  • त्यासाठी खरिपात कमी कालावधीतील सोयाबीन, मुगाची लागवड
  • पाऊस वेळेवर उघडल्यास पहिल्या टप्प्यात एक ते १५ सप्टेंबर, तर दुसऱ्या टप्प्यात १५ ते ३० सप्टेंबर कालावधीत लावणीचे नियोजन
  • दोन ओळींतील अंतर १८ इंच ठेऊन बैलचलित तिफणीने पेरणी
  • एकरी ५ ते ७ किलो बियाणे. या पद्धतीने बैलचलित कोळप्याद्वारे आंतरमशागत व तण व्यवस्थापन करता येते.
  • ४५ दिवसांनी पहिली व त्यानंतर २० दिवसांनी पीक पोटरीत आल्यावर दुसरी पाणीपाळी
  • भारी जमिनीत कोरडवाहू क्षेत्रातही चांगले उत्पादन मिळते.
  • हुरड्याची मागणी व चांगले दर सहा वर्षांच्या अनुभवानुसार शिंदे सांगतात की १५ ते ३१ डिसेंबर हा कालावधी म्हणजे वर्षअखेरच व नव्या वर्षाची सुरुवात असा असतो. या काळात लोक सुट्ट्यांवर व सहलीवर असतात. हुरडा पार्टी सुरू असतात. या काळात हुरड्यास अधिक मागणी असते. किलोला २०० ते २५० रुपयांपर्यंत दर मिळतो. जानेवारीनंतर दर कमी होऊ लागतो. सन ०१५ मध्ये दोन एकरांत ८ क्विंटल, पुढील वर्षी अडीच एकरांत १० क्विंटल याप्रमाणे सन २०१९-२० मध्ये एकरात ५ क्विंटल व मागील वर्षी एकरांत ३ क्विंटल उत्पादन मिळाले. दर प्रति किलोस १२० रुपये, २०० रुपये व १५० रुपये याप्रमाणे मिळाले. विक्री व्यवस्था

  • सुरुवातीच्या काळात परभणी शहरात बाजारपेठांच्या मोक्याच्या विविध ठिकाणी थेट विक्री
  • त्यासाठी विशिष्ट कमिशन देऊन कर्मचारी ठेवले. त्यातून संपर्कजाळे वाढण्यास सुरुवात
  • पूर्णा तालुक्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा शेती सेवा गट कार्यरत. त्यातून गटातील प्रत्येकाकडील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनाचा प्रचार
  • व्हॉट्‍सॲप, फेसबुक आदींद्वारेही हुरड्याचे ‘प्रमोशन’.
  • परभणीसह नांदेड, पुणे, नगर जिल्ह्यांतून मागणी. त्यानुसार मजुरांकरवी काढणी व वाहतूक व्यवस्थेद्वारे संबंधित ठिकाणी पोच
  • परभणी भागातील कृषी पर्यटन व्यावसायिक हुरडा पार्टीसाठी शिंदे यांच्याकडून खरेदी करतात.
  • परभणी, नांदेड, अन्य ठिकाणच्या मॉलमध्ये पुरवठा.
  • वेळ, जबाबदारी महत्त्वाची व्यावसायिकांना पार्टीसाठी हुरडा पुरवताना वेळेला उपलब्ध करणे ही मोठी जबाबदारी असते. त्यादृष्टीने पेरणी, काढणी, मनुष्यबळ, वाहतुकीचे नियोजन करावे लागते. त्यासाठी कुशल व्यवस्थापन व अनुभव कामी येत असल्याचे शिंदे सांगतात. बन्सी गव्हाला मागणी पाच वर्षांपासून बन्सी गव्हाचे उत्पादन अडीच एकरांत होते. या गव्हात तंतुमय पदार्थाचे प्रमाण अधिक असते. पोळी नरम, पिवळ्या रंगाची होते. स्वच्छता, प्रतवारी करून ३० किलो वजनाच्या पॅकिंगमधून प्रति बॅग दोनहजार रुपयांप्रमाणे विक्री होते. दर्जा उत्तम असल्याने परभणी, नांदेड जिल्ह्यांतील ग्राहक आगाऊ नोंदणी करून खरेदी करतात. एकरी ८ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. शेतीतील वैशिष्ट्ये

  • किडींच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्काचा वापर. त्यासाठी निंबोळ्या गोळा करून शेतातच निर्मिती.
  • जिवामृताचा वापर. घरगुती निविष्ठांमुळे खर्च कमी होण्यास मदत.
  • बैलजोडी, गाय, म्हैस आदी जनावरे
  • बंधू मनोज, विठ्ठल यांचे सहकार्य.
  • हवामानाचा अंदाज, बाजारातील मागणीनुसार लसूण, बटाटा यांचेही उत्पादन
  • यंदा पाण्याची उपलब्धता अजून काही काळ थंडी राहण्याची शक्यता. त्यामुळे उन्हाळी सोयाबीनचे बीजोत्पादन घेण्याचा मानस.
  • संपर्क-  पांडुरंग शिंदे, ७३५०१५४७१०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com