एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात आदर्श

गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील प्रत्येक व्यक्तीच्या योगदानातून पानोली (ता. पारनेर) गावाने आदर्श निर्माण केला आहे. येथे जलसंधारण, शिक्षण, आरोग्य आणि ग्रामविकासाला प्राधान्य दिले जाते. आदर्श गाव राळेगणसिद्धीच्या शेजारी असलेल्या पानोली शिवारात पंधरा वर्षांपासून होत असलेल्या जलसंधारणाच्या कामांतून पाणी उपलब्ध झाले.
डोंगर माळरानावर जलसंधारण.
डोंगर माळरानावर जलसंधारण.

गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील प्रत्येक व्यक्तीच्या योगदानातून पानोली (ता. पारनेर) गावाने आदर्श निर्माण केला आहे. येथे जलसंधारण, शिक्षण, आरोग्य आणि ग्रामविकासाला प्राधान्य दिले जाते. आदर्श गाव राळेगणसिद्धीच्या शेजारी असलेल्या पानोली शिवारात पंधरा वर्षांपासून होत असलेल्या जलसंधारणाच्या कामांतून पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे शेतीत पीक पद्धती बदलता आली. विविध उपक्रमामुळे पानोलीची ओळख निर्माण झाली आहे.  

नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील पानोली हे डोंगराळ गाव असून, भागात शाश्‍वत पाणी उपलब्धतेचे साधन नव्हते. पावसावर अवलंबून असलेल्या शेतीत बाजरी, हुलगे, मटकी, ज्वारी, करडई अशी हंगामी पिके घेतली जात. ग्रामस्थांना रोजगारासाठी इतरत्र जावे लागे. शेजारी असलेल्या राळेगणसिद्धी या गावचा आदर्श पानोलीकरांनी घेतला. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी लोकसहभाग, श्रमदानातून जलसंधारणाची कामे सुरु केली. माजी सरपंच नानाभाऊ भगत, नारायणराव गायकवाड, अनिलशेठ गाडेकर, बापू आनंदा भगत, अनिता गायकवाड, शाम साळवे, राधुजी साळवे, रेखा साळवे, अर्चना गायकवाड तसेच विद्यमान उच्चशिक्षित युवा सरपंच शिवाजी शिंदे यांच्यासह गावांतील प्रत्येकाने योगदान राहिले आहे. अडीच हजार लोकसंख्येच्या या गावाची धुरा सरपंच शिवाजी शिंदे व उपसरपंच मोहिनी भगत यांनी सांभाळली आहे. अशी राबविली कामे तीन लाखांची वर्गणी, विविध शासकीय योजना, जर्मन सरकारच्या मदतीने राबविलेला इंडो जर्मन पाणलोट विकास प्रकल्प याद्वारे निधी उभारण्यात आला. त्यातून गावशिवारातील ओढ्यांवर २२ बंधारे, डोंगरमाथ्यावर सलग समतल चर, ११० नालामाती बंधारे अशी कामे झाली. रोजगार हमी योजनेच्या कामातून रस्ते तयार झाले. विहिरी, विंधन विहिरी व अन्य स्रोतांना पाणी उपलब्ध झाल्याने पीक पद्धतीत सात-आठ वर्षांपासून शेतकऱ्यांनी बदल केला. गाव शिवारात कांद्याचे सर्वाधिक २५० ते ३०० हेक्टरवर पीक घेतले जात आहे. सध्या गावचे १५८२ हेक्टर क्षेत्र असून त्यातील ११८१ हेक्टर लागवडीयोग्य आहे. कांदा उत्पादन घेणारे गाव म्हणूनच पानोलीची ओळख तयार झाली आहे. दुग्ध व्यवसायाला प्राधान्य शेतीच्या विकासातून कुटुंबे आर्थिक प्रगतीकडे झुकली. चारा लागवड वाढली. शेतकरी दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देऊ लागले. पूर्वी गावांत दररोज दोन संकलन केंद्रातून दोन हजार लिटर दूध संकलन होई. आता ते आठ हजार लिटरपर्यंत पोहोचले आहे. गावांत चार संकलन केंद्रे असून त्यातील दोन सहकारी आहेत. पानोलीबाबत ठळक बाबी  

  • दलित वस्ती सुधार योजनेतून २१ लाख रुपये खर्च करून संपूर्ण गावांत सिमेंट क्राँक्रीटचे रस्ते, गावभर अंतर्गत नाल्या. प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र नळाद्वारे पाणीपुरवठा.
  • देवदरा, गाडेकर मळा, वडुले रस्ता यांसह अन्य ठिकाणी, सात हजारांपेक्षा अधिक ठिकाणी ‘बिहार पॅटर्न’नुसार दुतर्फा झाडांची लागवड. १५० चिंच व १०० वडाच्या झाडांचे रोपण.
  • जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातून शंभर कुटुंबांनी उभारले बायोगॅस. प्रत्येक महिन्याला एक लाख रुपयांच्या इंधनाची बचत.
  • आमदार नीलेश लंके प्रतिष्ठान, राजे शिवराय प्रतिष्ठानच्या माध्यमातून तरुणांचा सामाजिक कार्यात सहभाग. शाळेला ५१ हजार रुपयांची मदत. स्वच्छता, श्रमदानासाठी योगदान. गणेश ग्रामीण पतसंस्थेचा हातभार.
  • निराधार कुटुंबांची तसेच मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी ग्रामस्थांनी स्वीकारली.
  • ग्रामदैवत काळभैरव मंदिर, मारुती मंदिर, सावतामाळी मंदिर, राम मंदिर आदींचा जीर्णोद्धार. अन्य कामांसाठी दोन कोटींचा लोकसहभाग.
  • दहा वर्षांपूर्वी लोकसहभागातून दोन व्यायामशाळा. प्रमुख चौकाचे सुशोभीकरण, शाळेसाठी संरक्षण भिंत, पंचवीस लाख रुपये खर्च करून स्मशानभूमीचे सुशोभीकरण.
  • गाव हागणदारीमुक्त. ३७५ कुटुंबांकडून वैयक्तिक शौचालयांची बांधणी. दहा ठिकाणी सार्वजनिक शौचालये. रोजगार हमीसह सर्व कामांवर पाच कोटींपेक्षा अधिक खर्च.
  • राजगुरुनगरच्या कांदा-लसूण संशोधन संचालनालयातर्फे ३१ शेतकऱ्यांना एक एकर कांदा क्षेत्रासाठी निविष्ठांचे वाटप.
  • पन्नासपर्यंत तरुणांची पोल्ट्री व्यवसायात वाटचाल. नऊ महिला बचत गट. जिल्हा परिषदेकडून नऊजणांचा आदर्श शेतकरी पुरस्काराने गौरव.
  • लोकसहभागातून आदर्श शाळा गावात जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत ‘सेमी इंग्रजी’ माध्यमाची शाळा आहे. लोकसहभागातून ती आदर्श संगणकीय केली जात आहे. साधारण ४० लाख रुपये त्यासाठी खर्च केले जाणार असून, त्यासाठी ४० लाखांचा लोकसहभाग मिळाला आहे. शाळा इमारत बांधकामासाठी शासनाचा निधी, ‘कमिन्स’ व ऐक्य सेवा सेंटर यांच्याकडून आर्थिक हातभार मिळाला आहे. संपर्क- शिवाजी शिंदे, ९९२२८४००३९ (सरपंच)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com