पुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची
अॅग्रो विशेष
दर्जेदार दुग्धोत्पादनांचा ‘गारवा’ ब्रॅंड
कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करतात. अशावेळी लघुपातळीवर त्यांची निर्मिती, बाजारपेठ हे स्पर्धात्मक आव्हानच असते. बोरपाडळे (ता. पन्हाळा) येथील सचिन व दत्तात्रय या पाटील बंधूंनी हे आव्हान पेलले. प्रक्रिया प्रकल्पाची व्यावसायिक उभारणी करून दररोज ५०० लिटर दूध संकलनातून दर्जेदार पदार्थांची निर्मिती करून वितरक व स्वतःच्या शॉपीद्वारे त्यांना गारवा ब्रॅंडद्वारे ओळख व बाजारपेठ देण्यात ते यशस्वी झाले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करतात. अशावेळी लघुपातळीवर त्यांची निर्मिती, बाजारपेठ हे स्पर्धात्मक आव्हानच असते. बोरपाडळे (ता. पन्हाळा) येथील सचिन व दत्तात्रय या पाटील बंधूंनी हे आव्हान पेलले. प्रक्रिया प्रकल्पाची व्यावसायिक उभारणी करून दररोज ५०० लिटर दूध संकलनातून दर्जेदार पदार्थांची निर्मिती करून वितरक व स्वतःच्या शॉपीद्वारे त्यांना गारवा ब्रॅंडद्वारे ओळख व बाजारपेठ देण्यात ते यशस्वी झाले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे येथील सचीन व दत्तात्रय या पाटील बंधूंची अकरा एकर शेती आहे. ऊस, गहू, सोयाबीन आदी पिके ते घेतात. चुलत भावासोबतच्या भागीदारीतून वारणा नदीतून सहा किलोमीटरवरून शेतीसाठी पाणीपुरवठा केला आहे. पाणीयोजनेतील उर्वरित पाणी एक चतुर्थ्यांश पद्धतीने इतरांना दिले जाते. ट्रॅक्टर व अन्य अवजारेही आहेत.
दुग्धप्रक्रियेकडे वाटचाल
पाटील यांच्याकडे तीन म्हशी व एक देशी गाय आहे. मात्र ते २०१४ पर्यंत परिसरातून दूधसंकलन करून त्याचा पुरवठा संघास करीत. आपणच दुधावर प्रक्रिया करून बाजारपेठ मिळवली तर नफ्यात वाढ होईल असा विचार त्यांनी केला. त्यानुसार सर्व नियोजनातून २०१४ मध्ये प्रक्रिया उद्योगाची स्थापना केली. शेती मुख्य रस्त्यानजिक असल्याने तिथेच विक्रीही करता येईल हाही उद्देश होता.
असा आहे प्रक्रिया उद्योग
सुविधा
- इमारतीसह टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करीत आजमितीला चाळीस ते पन्नास लाख रुपये भांडवल
- रत्नाकर बॅंकेकडून आर्थिक साह्य
- व्यवसायाची सुरू लस्सी उत्पादनातून.
- यंत्रसामग्री- बॉयलर, तीन स्वतंत्र क्षमतेच्या भट्या, श्रीखंड तसेच लस्सी निर्मिती यंत्रणा, क्रीम सेपरेटर, पॅकींग आदी
- एक हजार लिटरचे एक तर पाचशे लिटरच्या चार रेफ्रीजरेटर्सचा पदार्थ ठेवण्यासाठी वापर
दूधसंकलन
- दररोज सकाळी गवळी पद्धतीने संकलन, या माध्यमातून परिसरातील २०० दूध उत्पादकांचे नेटवर्क
- हंगामात दिवसाला ७०० लिटर, तर वार्षिक सरासरीनुसार दिवसाला ४५० ते ५०० लिटर दूध संकलन
- उत्पादकांना गरजेप्रमाणे १५ ते २० हजार रुपयांची रक्कम जनावरे खरेदीसाठी. त्याची परतफेड दुधाद्वारे.
- विश्वासाचे नाते तयार केल्याने गुणवत्तापूर्ण दुधाचा सातत्याने पुरवठा
पदार्थनिर्मिती
- मागणीनुसार लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, पनीर, खवा, दही ताक आदी पदार्थ निर्मिती
- २०० मिली आकारापासून आवश्यक त्या प्रमाणात पॅकींग
विक्री
काडोली-बोरपाडळे रस्त्यावर पाटील यांचा प्रकल्प आहे. पर्यटक वा प्रवाशांच्या वर्दळीचे हे ठिकाण असल्याने तेथेच शॉपी उभारली आहे. तेथे पदार्थांची चांगली विक्री होते. शिवाय ग्राहकांना काही काळ बसून पदार्थांचा आस्वाद घेता येतो. गुणवत्तेत सातत्य ठेवल्याने ग्राहकांमध्ये या पदार्थांनी ओळख तयार केली आहे.
‘गारवा’ ब्रॅंडने मार्केटिंग
सर्व उत्पादनांची विक्री गारवा ब्रॅंडनेमने होते. पूर्वी लस्सी या नावाने विकली जायची. ग्राहकांना त्याचा थंडावा मिळवा असा उद्देश होता. स्वतःच्या शॉपी व्यतिरिक्त वितरकही नेमले आहेत.
व्हॅनच्या माध्यमातून मच्छिंद्र कणेरकर हे नातेवाईक बांबवडे, मलकापूर, आरळे, सातवे, सावर्डे, थेरगाव, मांगले, आदि गावांत जाऊन मालाची घरपोच डिलीव्हरी करतात. दोन ते तीन दिवसांनी एकदा गावात फेरी होते. माल दिल्यानंतर लगेच रक्कम घेतली जाते. दूरध्वनीच्या माध्यमातूनही ऑर्डर घेण्यात येते.
ठळक बाबी
- तुळशी विवाहापासून ते पुढे लग्नसराईपर्यंत पदार्थांना कायम मागणी
- जिल्ह्याव्यतिरिक्त लगतच्या कोकण भागातूनही पदार्थांना मागणी
- ग्राहकांच्या गरजेनुसार घरपोच पदार्थ देण्याची व्यवस्था
- हंगामात दररोज दहा हजार रुपयांपर्यंत विक्री. काहीवेळा दिवसाला ३० ते ४० हजार रूपयांपर्यंतही
- ऑर्डर मिळते.
- उद्योगातून सुमारे वीस ते पंचवीस टक्के नफा
- मागणी कमी असलेल्या काळात दुधाचा संघाला पुरवठा. प्रति ४० लिटरच्या कॅनमधून हा पुरवठा झाल्यास त्याचे ७० रुपयांपर्यंत कमिशन मिळते. हेच पदार्थ तयार केल्यास उत्पन्नाची रक्कम
- त्याहून अधिक होते. यामुळे जास्तीत जास्त प्रक्रिया होण्याकडे लक्ष दिले जाते.
- दररोज खेळते भांडवल राहिल्याने आर्थिक घडी स्थिर होते.
- वार्षिक उलाढाल सुमारे १५ ते २० लाख रुपयांच्या आसपास.
जबाबदारी
सचिन पूर्णवेळ उद्योगात कार्यरत आहेत. पत्नी ज्योती यांची त्यांना मोठी मदत होते. दत्तात्रय नोकरी सांभाळून दूध संकलनाबरोबर बॅंकिंमचे व्यवहारही पाहतात. त्यांनाही पत्नी जयश्री व मुलगा विवेक यांचे सहकार्य होते. या उद्योगाच्या माध्यमातून सुमारे ७ ते १० जणांना रोजगारही मिळाला आहे.
सोलरच्या माध्यमातून विजेची बचत
या उद्योगासाठी वीजबील जास्त येते. त्यावरील खर्च कमी करण्यासाठी पाटील यांनी सोलर पॅनेलची उभारणी केली आहे. सुमारे २७ पॅनल्स उभारले आहेत. त्यासाठी पाच लाख रूपये खर्च केला आहे. या तंत्रासाठी कोणतेही अनुदान उपलब्ध नसल्याचे सचीन म्हणाले. या यंत्रणेमुळे महिन्याला सुमारे पंधरा हजार रुपयांची बचत करणे शक्य झाले आहे.
‘ॲग्रोवन’ ठरतोय दिशादर्शक
पाटील बंधू ‘ॲग्रोवन’चे नियमित वाचक आहेत. त्यातील दुग्धजन्य पदार्थांविषयकच्या यशकथा, माहिती व्यवसाय उभारणीसाठी खूप महत्त्वाची ठरल्याचे सचिन म्हणाले. दूध संकलन करून पुढे उद्योग सुरू करण्याची प्रेरणा ‘ॲग्रोवन’मुळेच मिळाली. तांत्रिक मार्गदर्शनाचाही उपयोग झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
संपर्क- सचिन पाटील-९९७५२०२८१५
फोटो गॅलरी
- 1 of 433
- ››