संत्रा रसापासून पावडर; विद्यापीठाने विकसित केले मूल्यवर्धित तंत्रज्ञान

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कृषी अभियांत्रिकी विभागातील कृषी प्रक्रिया विभागाने संत्र्याचे मूल्यवर्धन करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. ‘फोम मॅट मायक्रोव्‍हेव ड्राइंग’ या त्या तंत्राद्वारे संत्रा रसापासून पावडरनिर्मिती केली आहे.
मायक्रोव्हेव तंत्राचा वापर.b रसापासून तयार झालेली पावडर.
मायक्रोव्हेव तंत्राचा वापर.b रसापासून तयार झालेली पावडर.

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कृषी अभियांत्रिकी विभागातील कृषी प्रक्रिया विभागाने संत्र्याचे मूल्यवर्धन करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. ‘फोम मॅट मायक्रोव्‍हेव ड्राइंग’ या त्या तंत्राद्वारे संत्रा रसापासून पावडरनिर्मिती केली आहे. उद्योग उभारणी करून या पावडरीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करणे शक्य होणार आहे.   लिंबूवर्गीय फळांच्या उत्पादनात भारताचा तिसरा क्रमांक आहे. प्रामुख्याने २६ राज्यांमध्ये या फळांखाली क्षेत्र आहे. तथापि नऊ राज्यांचा एकूण उत्पादनाच्या ८९ टक्क्यांपेक्षा जास्त वाटा आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे ०.१३५ दशलक्ष हेक्टर (४०.९ टक्के) क्षेत्र व उत्पादन ७.४२ दशलक्ष टन (२१.६१ टक्के) आहे. सरासरी उत्पादकता हेक्टरी ५.५ मे. टन आहे. विदर्भात पिकणारा नागपुरी संत्रा प्रसिद्ध असून, चवीला आंबट-गोड आहे. त्याची साल पातळ असल्याने टिकवणक्षमता कमी म्हणजे सात ते आठ दिवस आहे. त्यामुळे अन्य राज्यांत किंवा देशाबाहेर निर्यात करताना मर्यादा येतात हे अनेकदा समोर आले आहे. फळावर ‘वॅक्स कोटिंग’ केल्यास त्याची २५ दिवसांपर्यंत टिकवण क्षमता वाढू शकते. संत्र्यात तंतुमय घटक, व्हिटॅमिन्स, पोटॅशिअम आदी पोषक घटक आहेत. त्यात लिमोनिन आणि नोमिलिन हे दोन कडू घटक आढळतात. संत्र्याचे केले मूल्यवर्धन संत्र्यात प्रक्रिया सुविधांची वानवा असल्याने शेतकऱ्यांना अनेकवेळा हंगामात मिळेल तो दर पदरात पाडून माल विकावा लागतो. त्यामुळे मालाचे मूल्यवर्धन करून त्यापासून अधिक नफा मिळण्याची संधी आहे. त्या अनुषंगाने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कृषी अभियांत्रिकी विभागातील कृषी प्रक्रिया विभागाच्या सहायक प्राध्यापक डॉ. भाग्यश्री पाटील यांनी पुढाकार घेतला. त्यांनी फोम मॅट मायक्रोव्‍हेव ड्राइंग तंत्र विकसित केले आहे. त्याद्वारे संत्र्याच्या रसावर प्रक्रिया करून पावडरनिर्मिती व त्यापासून विविध पदार्थ तयार करणे शक्य होणार आहे. कुलगुरू डॉ. विलास भाले व विभाग प्रमुख डॉ. सुचिता गुप्ता यांचे मार्गदर्शन त्यासाठी लाभले आहे. अशी होते वाळवणी प्रक्रिया ८० ते ९० टक्के पाणी असणे हे देखील फळाची टिकवणक्षमता कमी असल्याचे कारण आहे. या व्यातिरिक्त फळांची अयोग्य हाताळणी व साठवणुकीच्या अपुऱ्या सुविधांमुळे जवळपास सुमारे ३० ते ३५ टक्के उत्पादन दरवर्षी वाया जात असते. त्यामुळे फळातील पाण्याचे प्रमाण कमी करणे अत्यावश्यक ठरते. वाळवणी (drying) प्रक्रियेद्वारे ७० ते ८० टक्के पाणी काढले जाते. त्यामुळे फळाची टिकवण क्षमता वाढते. साठवणुकीला जागा कमी लागते. पारंपरिक पद्धतीत पाण्याचे प्रमाण कमी करताना फळातील पोषक तत्त्वे मोठ्या प्रमाणात ऱ्हास पावतात. मात्र विद्यापीठाच्या तंत्रवापरात फळांमधील पोषक घटकांचे प्रमाण कायम राखण्यास मदत झाली आहे. शिवाय संपूर्ण फळ प्रक्रियेसाठी वापरल्यास त्यातील कडू पदार्थांचा स्वाद उतरू शकतो. त्यामुळे केवळ फळाच्या रसावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले. असे आहे विद्यापीठाचे तंत्र पूर्ण पिकलेली मध्यम दर्जाची फळे निवडून त्यांची साल काढण्यात येते. ज्यूसरच्या साह्याने रस तयार करून घेतला जातो. त्यात फोमिंग एजंट (सोयाप्रोटीन आयसोलेट, ग्लिसरॉल मोनो स्टेरेट), फोम स्टॅबिलायझर (कार्बोक्साइल मिथाइल सेल्युलोज) आणि प्रिझर्व्हेटिव्ह (साखर) मिसळण्यात येतात. मिश्रण पाच मिनिटे ढवळून घेतले जाते. ढवळताना मिश्रण अत्यंत दाट (थीक) तयार होते. त्यानंतर ‘मायक्रोव्हेव तंत्र’ किंवा ‘रिफ्रॅक्टिव्ह विंडो ड्राइंग’मध्ये हे दाट मिश्रण वाळवून पावडर तयार केली जाते. ती हवाबंद पॉलिथिन बॅगेत पॅक केली जाते. साधारण तीन महिन्यांपर्यंत टिकू शकते. त्याचा वापर ‘रेडी टू इट’ किंवा आइसस्क्रीम, कुकीज, चॉकलेट, फ्लेवरिंग एजंट, संत्रा बर्फी आदींमध्ये करता येतो. उद्योग उभारणी एक किलो संत्र्यात जवळपास ६० टक्के रस आणि ४० टक्के साल, लगदा, बिया असे प्रमाण राहते. हा रस प्रक्रियेसाठी वापरला जातो. संत्र्याची १०० ग्रॅम पावडर तयार करण्यासाठी साधारणपणे ४ ते ५ किलो संत्रा फळे लागतात. आज बाजारामध्ये संत्रा पावडर उपलब्ध नाही. परंतु अन्य फळांच्या पावडरची किंमत साधारणतः ३०० ते ३५० रुपये आहे. हा प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी एक ज्यूसर, ब्लेंडर आणि वाळवणूक यंत्र आवश्यक आहे. लघू किंवा गृह उद्योग म्हणून सुरू करायचा असेल, तर साधारण दीड लाख ते दोन लाख रुपये किमान खर्च येऊ शकतो. मोठा उद्योग सुरू करण्यासाठी ४० ते ५० लाख रुपये भांडवल लागू शकेल. तंत्रज्ञान प्रसाराची गरज संत्र्याच्या रसाचा लगदा अनेक दिवस साठवून ठेवता येणे शक्य असल्याने हे तंत्रज्ञान अधिक व्यापक प्रमाणात वापरण्याची गरज आहे. व्यापक प्रमाणात त्याचा प्रसार झाल्यास त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग उभे राहू शकतात. आगामी काळात संत्रा उत्पादकांसाठी मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात, असे तंत्रज्ञ डॉ. भाग्यश्री पाटील यांचे म्हणणे आहे. संपर्क- डॉ. भाग्यश्री पाटील, ८३२९५१७९९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com