कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
अॅग्रो विशेष
माळरानावर फळबागांतून समृद्धी
रांजणगाव देवी (ता. नेवासा, जि. नगर) येथील संयुक्त पेहरे कुटुंबाने परिश्रम व चिकाटीतून माळरान विकसित केले. पाण्याची शाश्वती साधून नवे प्रयोग आणि फळपिकांना प्राधान्य दिले. केळी, सीताफळ, आंबा, ॲपल बेर, कलिंगड अशी विविधता व त्यास बाजारपेठ व्यवस्था उभारून कमी पावसाच्या प्रदेशात समृद्धी आणली.
रांजणगाव देवी (ता. नेवासा, जि. नगर) येथील संयुक्त पेहरे कुटुंबाने परिश्रम व चिकाटीतून माळरान विकसित केले. पाण्याची शाश्वती साधून नवे प्रयोग आणि फळपिकांना प्राधान्य दिले. केळी, सीताफळ, आंबा, ॲपल बेर, कलिंगड अशी विविधता व त्यास बाजारपेठ व्यवस्था उभारून कमी पावसाच्या प्रदेशात समृद्धी आणली.
नगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातील पूर्व भागात अनेक भागांत पाण्याची टंचाई आहे. . मुळा धरणाचे पाणी पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे पूर्वी शेतकरी कोरडवाहू पिके घेत. आता कालव्यातून पाच किलोमीटर अंतरावरुन पाणी आणत कांदा, गहू, हरभरा अशी पिके घेतली जात आहेत.
पेहरे यांचे प्रयत्न
तालुक्यातील रांजणगाव देवी येथील सोपानराव पेहरे यांचा पत्नी सुमनबाई, मुले राजेंद्र, संजय, संतोष सुना आणि नातवंडे असा एकत्रित परिवार आहे. त्यांची पन्नास एकर जमीन होती. पैकी चाळीस एकर माळरान खडक होता. त्यातून ओढा वाहायचा. जमिनीच्या दुरुस्तीसाठी पैसा नव्हता. सात-आठ एकर क्षेत्रच वहितीखाली होते. त्यालाही पाणी नव्हते. ज्वारी, बाजरी आदी कोरडवाहू पिकांवरच समाधान मानावे लागे. जोड म्हणून पेहरे यांनी गावांत किराणा दुकान सुरु केले. मग पैसे उपलब्ध होतील तशी माळरानावर सुधारणा सुरु केली. १९९८ मध्ये सुरु केलेले हे काम चार वर्षे चालले. जमिनीची ‘लेव्हल’ झाली. नाल्यातून माती आणून टाकली. टप्प्याटप्प्याने ३६ एकर शेतीची दुरुस्ती केली. आर्थिक नियोजन उत्तम साधत टप्प्याटप्प्याने दहा एकर जमीन खरेदी केली. पाण्याचा प्रश्न अजून सुटायचा होता. जुन्या विहिरीचे पाणी आटले. विंधनविहीर खोदली. त्यालाही पुरेसे पाणी निघाले नाही. मग पाच किलोमीटरवर असलेल्या मुळा धरणाच्या कालव्याजवळ नातेवाईकांकडून दोन गुंठे जागा घेऊन विहीर खोदली. तिथून पाईपलाईनद्वारे पाणी उपलब्ध केले.
फळबागा केंद्रित शेती
सन २००१ मध्ये जमिनीची सुधारणा झाल्यानंतर फळपिकांकडे लक्ष केंद्रित केले. दोन एकरांत भगवा डाळिंबाची लागवड केली. खरं तर कुटुंबाचे पहिलेच फळपीक असल्याने पुरेसा अभ्यास नव्हता. अनुभवी शेतकऱ्यांकडून सल्ला-मार्गदर्शन घेत व्यवस्थापनातून चांगले उत्पादन ते घेऊ लागले. सन २००४ पासून पारंपारिक पिकांना फाटा देत केळी मग आंबा, त्यानंतर सीताफळ अशी टप्प्याटप्प्याने पिके वाढवण्यास सुरवात केली. संतोष यांनी डी फार्मसीचे शिक्षण घेतले आहे. एका भावासह त्यांनी शेतीच समृद्ध करण्याला प्राधान्य दिले.
शेती व व्यवस्थापनातील काही बाबी
- शेती- ६० एकर. बागायती. अनुभव- सुमारे २० वर्षे.
- केळी- जुनी व नवी प्रत्येकी ३ एकर. एक एकर खोडवा. सहा बाय पाच फूट.
- सीताफळ- २.५० एकर. १६ बाय ५ फूट.
- आंबा- जुनी लागवड १ एकर (केशर व बदाम). नवी लागवड- ५ एकर
- ॲपल बेर- १ एकर दहा गुंठे.
- डाळिंब- १ एकर
- केळी
- गादीवाफा (बेड), ग्रॅंडनैन वाणाच्या उतीसंवर्धित रोपांची लागवड.
- दोन ओळीत एकरी 30 किलो तागाची पेरणी. दीड महिन्यानंतर तो मातीत गाडला जातो.
- लागवडीआधी बेडमध्ये प्रती झाडाला दहा किलो शेणखत, सव्वा किलो कोंबडीखत
- सुरवातीला पंधरा दिवसाच्या अंतराने ट्रायकोडर्मा ठिबकमधून एकरी दोन लिटर दोन वेळा.
- झाड वाढीसाठी लागवडीनंतर दर चार दिवसांनी ठिबकद्वारे खते
- आंब्यातही प्रति झाड २० किलो शेणखत, २ किलो कोंबडीखत
- सीताफळ- बहार धरण्याआधी मेमध्ये छाटणी, खोडाला बोर्डो पेस्टिंग
- पीक .. .. उत्पादन ...........दर (किलो)
- केळी.....२५-३० किलो घड ८ ते १०
- आंबा.... एकरी अडीच टन ..८० ते १००
- सीताफळ. .४० किलो - ५० ते ६०
(प्रति झाड)
ॲपल बेर ३० किलो १० ते १२ .
(प्रति झाड) - दर रूपयांमध्ये.
बाजारपेठ
डाळिंबाची नाशिक व नंतरच्या काळात राहाता बाजार समितीत विक्री केली. सन २०१७ मध्ये तेलकट डाग रोगाच्या प्रादुर्भावामुळे बाग काढली. दर्जेदार उत्पादनामुळे स्थानिक व्यापारी, ग्राहकांना विश्वास मिळाल्याने जागेवर तसेच नजीकच्या बाजारपेठांमध्ये विक्री करून अधिकचा नफा मिळवतात. नगर, घोडेगाव, राहाता, पुणे येथेही माल पाठवतात. केळीला गणपती व पुढे दिवाळीपर्यंत मागणी अधिक असते. हा अभ्यास करून सर्व पिकांचे नियोजन असते.
उल्लेखनीय बाबी
- फळपिकांना जोड म्हणून ऊस. त्यात कांद्याचे आंतरपीक.
- घरातील बहुतांश सर्व सदस्य राबतात. दररोज दहा मजूर कार्यरत.
- सीताफळात यावर्षी शेवगा लागवडीचा प्रयोग.
- फवारणी व अन्य मशागतीसाठी टॅक्टर, पॉवर टिलर.
- केळीची काढणी झाल्यानंतर अवशेष कुजवून खतनिर्मिती.
- उन्हाळ्यात पाणी कमी पडू नये यासाठी २००२ मध्ये पहिले व त्यानंतर २०१५ पर्यंत एकूण चार शेततळी उभारली. तेव्हापासून कमी पाण्याचा वापर काटेकोर व्हावा यासाठी ठिबकचा वापर.
- शेतीतील उत्पन्नातूनच सोपानरावांना मुलाला नामांकित शिक्षण संस्थेच्या पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण देता आले. दोन मुलींचे लग्न करता आली. तिघां मुलांसाठी गावांत स्वतंत्र चांगल्या दर्जाची घरे बांधली आहेत. नातू अजिंक्य बीएस्सीचे शिक्षण घेत आहे.
- सन २००० पासून दुधव्यवसायाची जोड. पूर्वी देशी गायी होत्या. अलीकडील काळात वाढ केली. सध्या सात गायी, तीन वासरे. दररोज वीस लिटर दूध संकलन. वर्षाला २५ टन शेणखत उपलब्ध होते.
संपर्क- संतोष पेहरे-८२०८६५४००८
फोटो गॅलरी
- 1 of 696
- ››