डाळिंबातील फॉस्फोनीक ॲसिड अवशेष समस्या

डाळिंब निर्यातीकरिता कोणत्या घांटकांचा वापर कोणत्या उद्दीष्टासाठी करायचा हे माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. (छायाचित्र ः संग्रहित)
डाळिंब निर्यातीकरिता कोणत्या घांटकांचा वापर कोणत्या उद्दीष्टासाठी करायचा हे माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. (छायाचित्र ः संग्रहित)

बाजारपेठेत स्फुरदयुक्त विविध घटक त्यांच्या रासायनिक रचनेनुसार खत व बुरशीनाशक म्हणून ओळखले जातात. त्यांचा वापर कोणत्या उद्दीष्टासाठी करायचा हे माहीत असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अन्यथा परदेशात डाळिंब निर्यात करताना त्यांची अवशेष मर्यादा ही गंभीर समस्या होऊ शकते. स्फुरद (फॉस्फरस) हे सर्व सजीवांच्या वाढीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेले प्रमुख अन्नद्रव्य आहे. ते निसर्गतः असेंद्रिय फॉस्फोरिक फॉस्फेट खडकांमध्ये आढळून येते. फॉस्फरसचा सर्वात महत्त्वाचा व्यावसायिक वापर म्हणजे फॉस्फोरिक ॲसिडपासून फॉस्फेटयुक्त खते तयार करणे व फॉस्फाइटयुक्त बुरशीनाशकांची निर्मिती करणे हा होय. फॉस्फोरस आधारित बुरशीनाशके फॉस्फोरस आम्ल, फॉस्फोसाइट, फॉस्फोनाइट किंवा फॉस्फोनेट यांसारख्या नावांनी ओळखली जातात. मात्र फॉस्फोरिक ॲसिड आणि फॉस्फरस ॲसिड यामध्ये सुस्पष्ट असा फरक आहे. फॉस्फोरिक ॲसिड हे अन्नद्रव्य म्हणून उपयुक्त आहे. तर फॉस्फरस ॲसिड प्रामुख्याने बुरशीनाशकांमध्ये वापरले जाते. फॉस्फोरिक ॲसिड आणि फॉस्फोरस ॲसिड यांच्या नावांमध्ये असणारे साध्यर्म हे दिशाभूल करणारे ठरू शकते. फॉस्फोरिक ॲसिड आणि फॉस्फोरस आम्ल यातील फरक.

नाव फॉस्फोरिक ऍसिड फॉस्फोरिक ऍसिड
सूत्र H३ PO४ H३PO३
उपयोग वनस्पतीसाठी उपयुक्त अन्नद्रव्य उपयोग प्रामुख्याने फॉस्फेट युक्त खतांच्या उत्पादनासाठी उपयोग प्रामुख्याने उमायसीट्चा नाश करणाऱ्या बुरशीनाशकांच्या उत्पादनासाठी उदा. अल्युमिनीयम फोसेटाईल एल.
प्रमुख उप-पदार्थ सिंगल सुपर फॉस्फेट, ट्रिपल सुपर फॉस्फेट, डाय अमोनियम फॉस्फेट आणि मोनो पोटॅशियम फॉस्फेट --

अन्न पदार्थांमधील फॉस्फाइटच्या कमाल मर्यादेवर निर्बंध आहेत. युरोपीय महासंघाने डाळिंबासाठी २ मिलीग्रॅम प्रतिकिलो इतकी कमाल मर्यादा (एमआरएल) फॉस्फाइटच्या वापरासाठी निश्‍चित केली आहे. त्यापेक्षा अधिक प्रमाण असल्यास फळांचे कंटेनर स्वीकारण्यास युरोपीय देशांनी स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळेच फॉस्फरस समूहातील विविध उत्पादनांची सर्वसमावेशक यादी प्रसिद्ध करणे जरूरीचे ठरले आहे. ज्यामध्ये फॉस्फाइट समूहातील सुरक्षित उत्पादनांचा समावेश असेल. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाता (डाळिंबात) फॉस्फाईटची कमाल मर्यादा नियंत्रित ठेवणे शक्य होईल.

फॉस्फाईटबाबत अत्यंत महत्त्वाचे

  • कोणत्याही रासायनिक घटकाची बुरशीनाशक म्हणून नोंदणी करताना त्या घटकाचे विस्तृत मूल्यमापन तसेच असंख्य कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते.
  • बहुतांश फॉस्फाईट आधारित घटक हे प्रथमतः बुरशीनाशक म्हणून व त्यानंतर पोषक अन्नद्रव्ये म्हणून कार्य करतात. तथापि नोंदणी प्रक्रियेचा खर्च आणि वेळ वाचवण्याकरिता प्राथमिकदृष्ट्या बुरशीनाशक असणाऱ्या फॉस्फाईट युक्त घटकांची पोषक अन्नद्रव्ये (खते) म्हणून नोंदणी केली जाते. अनेक युरोपीय देशांमध्ये अशा उत्पादनांचा सेंद्रिय शेतीत खत म्हणून अधिकृतपणे वापर केला जातो. साहजिकच बहुवार्षिक पिकांमध्ये फॉस्फोरिक आम्लांचे अवशेष कालांतराने आढळून येतात. अमेरिकन व युरोपी बाजारपेठेत फॉस्फाईटयुक्त काही उत्पादने खालीलप्रमाणे आहेत.
  • देश सक्रिय घटक उपयोग (विक्रीसाठी)
    जर्मनी फोसेटील ए.एल. बुरशीनाशक
    अमेरिका फॉस्फाइट्स आणि सेंद्रिय आम्ल खत
    अमेरिका फॉस्फरस ऍसिड फवारणीचे खत
    अमेरिका मोनो पोटॅशियम फॉस्फोइट आंतरप्रवाही बुरशीनाशक
    अमेरिका पोटॅशियम फॉस्फॉइट खत तसेच बुरशीनाशक
    अमेरिका फॉस्फरस ऍसिड जैवरासायनिक कीटकनाशक
    अमेरिका मोनो पोटॅशियम फॉस्फॉइट बुरशीनाशक
    ऑस्ट्रेलिया मोनो पोटॅशियम फॉस्फॉइट बुरशीनाशक
    अमेरिका मोनो पोटॅशियम फॉस्फॉइट बुरशीनाशक
    इटली पोटॅशियम फॉस्फाईट बायो स्टिम्युलंट (जर्मनी, फ्रान्स आदी देशांतही याचा खत म्हणून वापर)

    फाॅस्सफरस समूहातील उत्पादनांची वैशिष्ट्ये

  • फाॅस्सफरस समूहातील सर्व उत्पादने फॉस्फरस आम्लाचे अल्कली सॉल्ट म्हणून तयार केली जातात. त्यापैकी बहुतांश उत्पादने खत कायद्यांतर्गत नोंदणीकृत केली आहेत. तथापि फॉस्फॉइट युक्त उत्पादनांचा अन्नद्रव्य (खत) म्हणून सुरू असलेल वापर हाच कळीचा मुद्दा आहे. यामुळे वितरक, शेतकरी यांच्यात संभ्रमावस्था निर्माण होऊ शकते.
  • सद्यःस्थितीत असंख्य वैज्ञानिक प्रकाशने असे दर्शवितात की फॉस्फाइट हे पाने आणि मुळे याद्वारे योग्य प्रकारे शोषले जाऊ शकते. परंतु त्यांचा वनस्पतीसाठी फॉस्फेटिक खत म्हणून उपयोग नाही.
  • फॉस्फाइट हे खत नाही 

  • फॉस्फाइट हे वनस्पतींच्या चयापचय प्रक्रियेमध्ये सहभागी होत नसल्यामुळे त्यांचे पीक उत्पादन वाढीतील योगदान नगण्य आहे. तथापि फॉस्फाइटची प्रक्रिया इथेनॉलबरोबर झाल्यावर इथाइल फॉस्फोनेट तयार होते. हा घटक उमायसीटस् वर्गातील मातीतून उदभवणाऱ्या बुरशींची विशेषतः फायटोप्थोरा बुरशीची वाढ रोखण्यास मदत करते. याचबरोबर फॉस्फाइटचे पोटॅशिअम सॉल्ट हे संयुगही फायटोप्थोरा बुरशीची वाढ नियंत्रित करण्यास तितकीच प्रभावी काम करते.
  • अनेक शेतकरी फवारण्यांमध्ये फॉस्फोनेट किंवा फॉस्फोनिक आम्ल युक्त साबणांचा किंवा डिटर्जंट पावडरचा वापर सर्रासपणे करतात. अशा विविध प्रकारे फॉस्फाइटचा आपल्या अन्नचक्रामध्ये प्रवेश होतो.
  • फॉस्फेट हे दीर्घ कालावधीकरिता वनस्पतीमध्ये साठवले जात असल्याने ते बुरशीनाशक म्हणून प्रभावी ठरते. ठरावीक कालावधीनंतर ते मूळ स्वरूपात अवशेषरूपी फळांच्या उतीत राहते. सद्यःस्थितीमध्ये फॉस्फाइटयुक्त घटक वापरलेल्या शेती उत्पादनांमधील फॉस्फाइट वापराची कमाल पातळी तात्काळ ठरवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अशा अन्नपदार्थांचे सेवन करताना ग्राहकांच्या आरोग्यास धोका पोचणार नाही.
  • संपर्क ः ०२१७ - २३५४३३० (लेखक राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर येथे कार्यरत आहेत.) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com