agriculture story in marathi, Pimpari Gavali village of Nagar Dist. has became ideal village with the help of community based development works. | Agrowon

लोकसहभागातून दुष्काळी पिंपरी बनले आदर्श गाव

मनोज कापडे
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

गावात पूर्वी दुग्ध व्यवसाय केला. मात्र परवडले नाही. आता शेती आणि ग्रामविकास हाच ध्यास घेतला आहे. गाव आणि काम करणारी संस्था यांच्यात समन्वय ठेवण्याचे काम मला मिळाले. राळेगणसिद्धी, हिवरेबाजारप्रमाणेच देशात पिंपरी गवळीचे नाव व्हावे ही गावकऱ्यांची इच्छा आहे.
-धनंजय गवळी- ७७४४९४६४३४
ग्रामकार्यकर्ता

पुणे-नगर सीमेलगत पारनेर तालुक्यात सुपे गावापासून सात किलोमीटरवर वसलेल्या एक हजार लोकसंख्येच्या पिंपरी गवळीची ओळख आता आदर्श गाव म्हणून झाली आहे. सुमारे ११३० हेक्टर क्षेत्र असलेल्या या गावात कधी काळी २०० ते २५० मिलिमीटर पाऊस पडायचा. तेव्हा गावात पिण्यासाठी पाणी नव्हते आणि शेतीही बागायती नव्हती. गावात जलसंधारणाची कामे लोकसहभागातून झाली. ग्रामविकासाची कामे झाली. आता पाऊस १५० ते २०० मिमी.वर आला असला तरी गावात फिल्टर पाणी आले असून, शेती हंगामी बागायती झाली आहे. ही किमया अर्थात आदर्श गाव योजनेतून घडली आहे.

नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील कायम दुष्काळाच्या छायेत वावरणाऱ्या पिंपरी गवळी गावाने आदर्श गाव योजनेत सहभागी व्हावे ही इच्छा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीच बोलून दाखविली होती. तेव्हा ते राज्याच्या आदर्श गाव उपक्रमाचे प्रमुख होते. गावातील प्रतिष्ठित व्यक्ती रामचंद्र मांडगे, तत्कालीन सरपंच राधुजी थोरात यांनी गावकऱ्यांना या योजनेची माहिती सांगितली. पुढे ग्रामसभा घेऊन योजनेत सहभाग घेण्याचा ठराव गावाने केला. हा ठराव पुण्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कार्यालयाकडे पाठविला गेला. प्रकल्पाचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी गावाची जिद्द पाहिली. तपासणी करून मंजुरीही दिली. अण्णांच्या हिंदस्वराज ट्रस्टनेच गावाची जबाबदारी घेतली.

सप्तसूत्रीची अंमलबजावणी अवघड
आदर्श गाव योजनेत सहभागी होणे सोपे, मात्र पुढील काम अवघड असते. योजनेत समावेश होताच कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, नसबंदी, नशाबंदी, बोअरवेल बंदी, लोटाबंदी आणि श्रमदान अशी सप्तसूत्री लागू होते. गावात अन्य सूत्रे लागू झाली, पण चराईबंदी व लोटाबंदीला यश मिळत नव्हते. सतत अडचणी येत होत्या. त्यात पुन्हा सरकारशी मतभेद झाल्याने अण्णा या कामातून बाहेर पडले. त्यामुळे अंमलबजावणी संस्था असलेल्या हिंद स्वराज ट्रस्टने देखील कामे थांबविली. गावकऱ्यांनी पुन्हा अण्णांना साकडे घातले. त्यावर तोडगा म्हणून आधार कृषी व ग्रामविकास प्रतिष्ठान ही नवी संस्था स्थापण्याचे अण्णांनी सुचविली. संस्थेतील भाऊसाहेब शिंदे व रामदास सातकर यांनी नेटाने कामे सुरू केली. पुढे संस्था व गावाचे सूत जमेना. अखेर संस्थेनेही अंग काढून घेतले. निफटेम कंपनीने काही वर्षांसाठी गावाला दत्तक घेतले. काहीही झाले तरी गाव संपूर्ण आदर्श करायचे अशी जिद्द मात्र गावकऱ्यांनी सोडली नाही. बहुतेक सर्व कामे खोदाईशी निगडित होती. झपाटलेल्या गावकऱ्यांनी मग चक्क स्वमालकीचे ४३ लाख रूपयांचे पोकलेन यंत्र खरेदी करण्याचे ठरवले. एका दिवसात १५ लाख रुपये जमा झाले. खाजगी बॅंकेत शेतकरी भाऊसाहेब थोरात यांनी स्वतःची १५ एकर शेती तारण ठेवली आणि गावात स्वमालकीचे ‘पोकलेन’ यंत्र आले.

गावकऱ्यांचे उत्तम निर्णय
आता नव्या अंमलबजावणी संस्थेचा शोध सुरू झाला. त्यासाठी गावाने पोपटराव पवार यांनाच साकडे घातले. त्यांनी यशवंत कृषी पाणलोट व ग्रामविकास संस्था या नव्या एजन्सीला जबाबदारी दिली. नवी संस्था नियुक्त करणे किंवा स्वतःचे खोदाई यंत्र विकत घेणे हे दोन्ही निर्णय गावकऱ्यांनी उत्तमपणे घेतले होते. आता जलसंधारणाच्या कामांना गती आली. ती तुलनेने कमी बजेटमध्ये झाली. आम्हाला विविध कामांसाठी केवळ ३५ लाख रुपये मिळाले होते. पण आमचेच यंत्र असल्याने ७० लाख रुपयांची कामे झाली. त्यातून शेतकऱ्यांनी शेततळी, पाझर तलाव, विहिरी, ओढे-नाले खोदून घेतले. सर्व कामे झाल्यानंतर जुने झालेले पोकलेन यंत्र विकण्याचे ठरविले. जाहीर लिलाव करून ते यंत्र साडेसदोतीस लाखांना विकले. ज्या गावकऱ्यांनी यंत्रासाठी पैसे दिले होते ते त्यांना परत केले अशी माहिती भाऊसाहेब थोरात यांनी दिली. गावच्या सरपंच अश्‍विनी थोरात यांनी चळवळीला चांगले रूप दिले. जलसंधारणाच्या कामांमुळे गाव हंगामी बागायत बनले. बाजरी, ज्वारी अशी कोरडवाहू पिके घेणाऱ्या पिंपरी गावात लक्ष्मणराव मांडगे यांच्या प्रयत्नातून आधुनिक शेतीला सुरूवात झाली. धनंजय गवळी, करण थोरात, संतोष मांडगे, तात्याराम मांडगे, राजेंद्र झरेकर यांनी शेडनेट उभारले. निर्यातक्षम डाळिंब बागा उभारल्या. दर्जेदार फळे, भाजीपाला उत्पादन सुरू झाले.

जमिनीची बांधबंदिस्ती
अण्णा हजारे, पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महाएफपीसी’चे अध्यक्ष योगेश धोरात, माजी सरपंच रामचंद्र मांडगे, सरपंच महापरिषदेच्या उपाध्यक्षा अश्‍विनीताई थोरात, डी. एन. थोरात, शेतकरी भाऊसाहेब थोरात, ग्रामकार्यकर्ता धनंजय मांडगे यांनी वेळोवेळी एकत्रित केलेल्या प्रयत्नातून गाव आदर्श बनले. आदर्श गाव योजनेचे तत्कालीन उपसंचालक बाबासाहेब कराळे व विद्यमान उपसंचालक महादेव निंबाळकर यांचे सतत मार्गदर्शन मिळाले.

झालेली ठळक कामे

 • जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून घेतले. त्यातून ७५८ हेक्टर क्षेत्रात बांधबंदिस्ती. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून न जाता जमिनीत मुरण्यास मदत.
 • गावाला चहूबाजूंनी डोंगर लाभले आहेत. यातून डोंगरांवर ३२० हेक्टर तर वन हद्दीत ६० हेक्टरवर खोल चर. खोदाईची कामे गावाच्या मालकीच्या पोकलॅनमुळे व्यवस्थित झाली.
 • गावात १९७२ च्या दुष्काळात गावकऱ्यांनी पाझर तलाव बांधला होता. मात्र तो सुस्थितीत नव्हता. या तलावाची दुरुस्ती केली. त्यामुळे गळती कमी होऊन तो पूर्ण क्षमतेने भरू लागला.
 • ओढ्याचे पाणी अडवण्यासाठी दोन सिमेंट नालाबांध.
 • ऑरेंज रिन्युएबल्स कंपनीच्या ‘सीएसआर’ निधीतून जलशुद्धीकरण संयंत्र उभारणी. याद्वारे ‘वॉटर एटीएम’ कार्यान्वित. ‘एल ॲण्ड टी’ कंपनीकडून जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी ४० हजार रुपये किमतीचे स्वतंत्र आरओ युनिट.
 • जिल्हा परिषद व लोकसहभागातील निधीमुळे गावात टुमदार शाळा.

तनिष्का चळवळीचेही योगदान
गावलगतच्या ओढ्यांचे खोलीकरण सरपंच थोरात यांच्या तनिष्का चमूने केला. त्यातून दोन लाखांची खोलीकरणाची कामे झाली. भूजल सर्वेक्षण विभागाने जल पुनर्भरण मोहिमेतून ओढ्यात १०० फूट खोलीचे काम केले. यामुळे अतिरिक्त पाणी ओढ्यातच मुरविले जाते. त्याचा फायदा आजूबाजूच्या शेतीला होतो.

सचोटीने ग्रामविकासाची मोट
सरपंच थोरात म्हणाल्या, की आपले ध्येय शुद्ध असले की कामे आपोआप होतात. सरकारी निधीतून आलेल्या रुपयांतून आम्ही सचोटीने ग्रामविकासाची मोट बांधत आहोत. चांगल्या कामाला निधी कमी पडताच स्वतःच्या घरातून पैसा गुंतवला आहे. आदर्श गावाचा कारभार स्वच्छपणे करतो याचा अभिमान वाटतो. अश्‍विनीताईंची कामगिरी पाहून त्यांना अखिल भारतीय सरंपच परिषदेने महिला आघाडीचे प्रदेश उपाध्यक्षपद दिले आहे. त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांशी दोन वेळा बोलण्याची संधी त्यांना मिळाली. सौर पद्धतीने चालणारे पिण्याचे पाणी व सिंचन अशा दोन्ही समस्या सोडविणारी पाच गाव पाणीपुरवठा योजना राबविण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे.

अजून पुढे जायचेय
केवळ गाव आदर्श करून थांबायचे नाही. कुकडी धरणाचे पाणी विसापूर प्रकल्पात येते. तेथून पाच गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी मिळावे यासाठी मुख्यमंत्री महोदयांकडे पाठपुरावा सुरू आहे. याशिवाय गावात खुली व्यायामशाळा, स्वतंत्र अभ्यासिका, वाचनालय, डिजिटल स्कूल, सुसज्ज ग्रामपंचायत भवन अशी भविष्यकालीन कामांची यादी करून ठेवल्याचेही आश्‍विनीताई निर्धारपूर्वक सांगतात.

शेतकरी कंपनीची स्थापना
गावची काम करण्याची तडफ पाहून निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी ५० हजारांची, तर संपतराव मांडगे यांनी प्रसाधनगृहाला सामग्री दिली. बाळासाहेब गुंजाळ यांनी एक लाखाची फरशी शाळेला दिली. गावात पाणी उपलब्ध झाल्यानंतर ३१८ गावकऱ्यांनी एकत्र येत पीजी फार्मसीस एग्रोव्हेट प्रोड्यूसर्स कंपनी स्थापन केली. योगेश थोरात, भाऊसाहेब थोरात, भाऊसाहेब रणसिंग, अनिल मांडगे, सूर्यकांत मांडगे, देवराम मांडगे यांनी या शेतकरी उत्पादक कंपनीला चालना दिली. यंदा ६५० टन कांदा कंपनीने हाताळला. क्लीनिंग-ग्रेडिंग युनिटही उभारले. त्यातून वार्षिक दोन कोटी उलाढाल कंपनी करू लागली आहे.

प्रतिक्रिया

गाव आदर्श होण्यासाठी प्रसंगी कठोर भूमिका घेतली. आदर्श गावाचा सप्तसूत्री कार्यक्रम राबविण्यासाठी जिवाचे रान केले. त्यामुळे दुष्काळाचे सतत चटके बसणाऱ्या पिंपरी गवळीचे शिवार आज पिकांनी फुलून आले आहे.
-भाऊसाहेब थोरात - ८६६९९५५५६०
प्रगतिशील शेतकरी

आदर्श गाव योजनेत सहभागी झाल्याने गावातील शेतीही आदर्श झाली आहे. गावात पहिल्यांदा डाळिंबाची तीन एकर बाग मी विकसित केली. आता पाच एकरांवर कष्टाने निर्यातक्षम डाळिंब पिकवतो आहे.
-अनिल संभाजी मांडगे - ९२७३६९१३९१

गावातील महिलांनी गावात सहा बचत गट तयार झाले. जलसंधारणाची कामे, वनीकरण, स्वच्छता किंवा प्रयोगशील शेतीत महिलांचा वाटा मोठा आहे. आदर्श गाव चळवळीत प्रत्येकाला झोकून देऊन काम करावे लागते. मी गावासाठी दोन लाखांची पाण्याची टाकी बांधून दिली.
-सौ. उज्ज्वला राजेंद्र झरेकर - ७८७५२०१६२५
आदर्श गाव समिती सदस्या

पिंपरी गवळी गावाची वाटचाल

 • सहा हजार झाडांची लागवड
 • पशुपक्ष्यांसाठी पाणी, निवारे सुविधा, शिकारीवर बंदी
 • पर्यावरणपूरक नियमांमुळे गावाभोवती ससे, हरिण, मोर यांचा वावर
 • दुष्काळी गावात आता १५ शेततळी
 • कोरडवाहू पिकांकडून फळबागांकडे वाटचाल. ७० एकरांवर बागा.
 • दहा लाखांचे वॉटर एटीएम
 • मतभेद विसरून गाव एकत्र. त्यामुळे तंटामुक्त गावाचा पुरस्कार
 • गावात अडीच हजार लिटर्स दुग्धोत्पादन

संपर्क-ः सरपंच अश्‍विनीताई थोरात- ९०६७४०९०९१, ९८२२२५०५६५v


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
मूळ दुखण्यावर इलाज कधी?सरकार कितीही सांगत असले की आम्ही शेतकऱ्यांना...
‘सूक्ष्म उद्योग’ घडवतील मोठा बदल पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन...
केंद्र सरकारचा समितीचा प्रस्ताव...नवी दिल्ली : विज्ञान भवनात झालेली बैठक कोणत्याही...
यंदा हिवाळ्यात गारठा जरा अधिकच राहणारपुणे : चालू वर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी या हिवाळा...
इथेनॉल प्रकल्प तारण घेऊन कारखान्यांना...पुणे : “राज्याच्या शेती व ग्रामीण अर्थकारणाला...
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सक्रिय;...पुणे : बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...
नव्या कायद्यामुळेच मिळाले पैसे;...धुळे : कृषी व पणन सुधारणा कायदा अस्तित्वात...
शेतकरी संघटनांचा उद्या राज्यव्यापी...नगर : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या...
कापूस खरेदीतील कटती अयोग्य; सीसीआय...जळगाव : कापूस महामंडळ (सीसीआय) शेतकऱ्यांसाठी काम...
राज्यात ‘पणन’ची दहा हजार क्विंटल कापूस...नागपूर : राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी...
मराठवाड्यात कुठे मोहर, तर कुठे...औरंगाबाद : मराठवाड्यातील केसर आंब्याच्या झाडाला...
विविध तंत्रांचा वापर सांगणारी लंबे...बुलडाणा जिल्ह्यातील माळखेड येथील गणेश लंबे यांनी...
संवादातून मिटेल संघर्षकृषी व पणन सुधारणांबाबतच्या तीन नव्या...
हमीभाव ः वादीवाल्यांचा सापळालातूरला पुर्वी वादीवाले लुटारु टोळके असायचे. ते...
केंद्राचा चर्चेचा प्रस्ताव नाकारला;...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या वतीने...
...येथे कांदा रोपे राखणीसाठी...विसापूर, जि. सातारा  : सोन्याचे दाग-दागिने,...
कृषी विभागात आगामी बदल्या समुपदेशनाने...पुणे : कोविड-१९ साथीमुळे कृषी विभागात यंदा...
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...पुणे :  निवार चक्रीवादळाचा प्रभाव निवळत...
कृषी पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश...पुणे : राज्यातील चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत...
सातत्य राखलेले पशुपालन ठरले शेतीलाही...यवतमाळ जिल्ह्यातील लोही (ता. दारव्हा) येथील...