agriculture story in marathi, plant bio stimulants are now included in Indian regularization. Now this is an opportunity to increase the market also. | Agrowon

बायोस्टिम्युलंट्‍स’- कायद्याच्या कक्षेत अन् संधीतही वाढ

मंदार मुंडले
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

बिगर नोंदणीकृत किंवा ढोबळमानाने ‘पीजीआर’ अशी ओळख असलेल्या ‘बायोस्टिम्युलंट्‍स’
(जैवउत्प्रेरके) उत्पादनांना केंद्रीय कृषी मंत्रालयाने नुकतेच खत कायदा, १९८५ च्या कक्षेत आणले आहे. जागतिक स्तरावर या उत्पादनांची बाजारपेठ वाढते आहे. भारतातही त्यांचे शास्त्रीय मूल्यमापन होऊन त्यांची गुणवत्ता त्या कसोटीवर सिद्ध होईल. शेतकऱ्यांत विश्‍वासार्हता निर्माण होण्यासह बाजारपेठ वृद्धी होण्यास मदत होईल.

बिगर नोंदणीकृत किंवा ढोबळमानाने ‘पीजीआर’ अशी ओळख असलेल्या ‘बायोस्टिम्युलंट्‍स’
(जैवउत्प्रेरके) उत्पादनांना केंद्रीय कृषी मंत्रालयाने नुकतेच खत कायदा, १९८५ च्या कक्षेत आणले आहे. जागतिक स्तरावर या उत्पादनांची बाजारपेठ वाढते आहे. भारतातही त्यांचे शास्त्रीय मूल्यमापन होऊन त्यांची गुणवत्ता त्या कसोटीवर सिद्ध होईल. शेतकऱ्यांत विश्‍वासार्हता निर्माण होण्यासह बाजारपेठ वृद्धी होण्यास मदत होईल.

 
बिगर नोंदणीकृत किंवा ‘पीजीआर’ अशा दोन्ही नावांनी प्रसिद्ध असलेल्या कृषी निविष्ठा हा विषय
अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात व चर्चेत आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने यंदाच्या २३ फेब्रुवारीस ‘गॅझेट’द्वारा अधिसूचना प्रसिद्ध करून या उत्पादनांना अखेर कायद्याच्या कक्षेत आणण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

कायद्यातील ठळक बाबी

 • खत नियंत्रण (इनऑरगॅनिक, सेंद्रिय व मिश्र) कायदा आदेश, १९८५ मध्ये सुधारणा. त्यात
 • ‘बायोस्टिम्युलंट’(जैव उत्प्रेरके) यांचा समावेश.
 • त्यांची व्याख्या अशी.
 • असा कोणताही घटक किंवा सूक्ष्मजीव किंवा दोन्ही घटकांचे संयुक्त मिश्रण. ज्याचा वापर पीक, बियाणे वा मुळांच्या कक्षेत केल्यास त्याचे प्राथमिक कार्य पुढील प्रकारचे असेल
 • पिकाच्या शरीरक्रिया प्रक्रियेला (फिजिऑलॉजी) उत्तेजना (स्टिम्युलेशन)
 • तसेच पिकाची अन्नद्रव्ये उचलण्याची क्षमता, वाढ, उत्पादन, पोषणद्रव्यांची कार्यक्षमता, पिकाची गुणवत्ता, ताण सहन करण्याची क्षमता यांच्यात वाढ करणे.
 • मात्र कीटकनाशक कायदा, १९६८ नुसार नोंदणी होणारे कीडनाशक किंवा वनस्पती वाढनियंत्रक (प्लॅंट ग्रोथ रेग्युलेटर-पीजीआर) यामध्ये त्यांचा समावेश होणार नाही

  नव्या कायदा सुधारणेनुसार बायोस्टिम्युलंट्‍सचे प्रकार
   

 •  वनस्पतिजन्य अर्क, सागरी तण अर्कासहित
 • जैव रसायने
 • प्रोटीन हायड्रॉलायसेट्‍स व अमायनो ॲसिड्‍स
 • जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स)
 • पेशीमुक्त सूक्ष्मजीव आधारित उत्पादने
 • अँटिऑक्सिडंट्‍स
 • ह्युमिक, फुल्व्हिक ॲसिड आणि त्याची उप-उत्पादने (डेरिव्हेटिव्हज)

अर्जासाठी आवश्‍यक बाबी
उत्पादक निर्माता किंवा आयातदाराला अर्ज करण्यासाठी पुढील तपशील देणे बंधनकारक.

 • रसायनशास्त्र
 • उत्पादनाचा स्रोत (नैसर्गिक अर्क, सूक्ष्मजीव, प्राणिजन्य, कृत्रिम)
 • उत्पादनाचे प्रमाण विश्‍लेषण (स्पेसिफिकेशन)
 • ‘एनएबीएल’ प्रमाणित प्रयोगशाळेद्वारा सक्रिय घटक व ‘ॲडज्युवंट’च्या भौतिक, रासायनिक गुणधर्मांचे परीक्षण
 • परीक्षण करण्याची पद्धत
 • साठवणूक क्षमता

जैवक्षमता चाचण्या

 • भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत (आयसीएआर) राष्ट्रीय संशोधन केंद्र वा राज्य कृषी विद्यापीठात उत्पादनाच्या जैवक्षमतेच्या चाचण्या (बायोइफिकसी)
 • एका हंगामात तीन वेगवेगळ्या कृषी हवामान क्षेत्रात तीन मात्रांमध्ये (डोस)

विषारीपणा (टॉक्सिसिटी) चाचण्या

 • उंदीर, ससे यांच्यावरील मौखिक, त्वचा व श्‍वसन आदींच्या आनुषंगिक
 • पक्षी, गोड्या पाण्यातील मासे, मधमाश्‍या व गांडुळे यांच्या अनुषंगाने विषारीपणाची तीव्रता
 • कीडनाशकांसाठी आवश्‍यक दीर्घकाळ परिणामांच्या चाचण्यांची गरज नाही.

जड धातू (हेवी मेटल्स) विश्‍लेषण अहवाल

 • अन्न सुरक्षिततेच्या (फूट सेफ्टी) दृष्टीने खाद्यपदार्थांमध्ये जड धातूंचा आढळ ही बाब जगभरात गंभीर मानली जाते. संबंधित उत्पादनांमध्ये निश्‍चित केलेले त्यांचे प्रमाण 
  (मिलिग्रॅम प्रति किलो (कमाल))
 • कॅडमियम- ५
 • क्रोमियम- ५०
 • कॉपर- (तांबे)- ३००
 • झिंक- (जस्त) १०००
 • लेड- (शिसे)- १००
 • अर्सेनिक- १०
 • उत्पादनात कोणत्याही कीडनाशकाचे प्रमाण ०.०१ पीपीएम या संमत मर्यादेपेक्षा जास्त नसावे.

नव्या कायद्यामुळे पुढील फायदे होतील

 • उत्पादनांचे मूल्यमापन शास्त्रीय परिमाणांवर आधारित होईल.
 • त्यातून त्यांची गुणवत्ता शास्त्रीय कसोटीवर सिद्ध होईल.
 • बाजारपेठेत त्यांची विश्‍वासार्हता, स्वीकारार्हता वाढेल.
 • बायोस्टिम्युलंट’ उद्योगाचा विकास, बाजारपेठ वाढण्यास चालना
 • जगभरात नावीन्यपूर्ण उत्पादनांवर संशोधन सुरू आहे. त्यांना चालना मिळेल.
 • भेसळयुक्त, बनावट वा दुय्यम दर्जाच्या उत्पादनामुळे किंवा चुकीच्या दाव्यांमुळे पिकाचे, मातीचे नुकसान होण्याचा धोका असतो. यापुढे अशा उत्पादनांच्या गुणवत्तेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना  कायदेशीर संरक्षण मिळेल.
 •  कृषी विद्यापीठे वा राष्ट्रीय संशोधन केंद्रांतील शास्त्रज्ञ ‘लेबल क्लेम’युक्त (कायद्याच्या कक्षेत) निविष्ठांची शिफारस करतात. यापुढे ‘बायोस्टिम्युलंट्‍स’च्या शिफारशी करणे त्यांना शक्य होईल.

सर्वांत आघाडी युरोपची

कृषी निविष्ठांची गुणवत्ता, रासायनिक अवशेष, अन्न सुरक्षितता (फूड सेफ्टी) आदींबाबत
युरोपीय महासंघाचे कायदे, निकष जागतिकदृष्ट्या अत्यंत कडक आहेत. भारतीय द्राक्ष बागायतदार व अन्य शेतीमाल निर्यातीत भारताला त्याचा चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे ‘बायोस्टिम्युलंट’च्या अनुषंगाने तेथील वस्तुस्थिती माहीत असणे गरजेचे आहे.

युरोपीय खंडातील विविध देशांत ‘बायोस्टिम्युलंट’ना वेगवेगळी नावे व प्रत्येकाचे स्वतंत्र नियम आहेत. त्यात सुसूत्रता वा सामाईक नियमावली आणण्यासाठी युरोपीय महासंघाने सन २००३ च्या कायद्यात बदल करून नवा खत उत्पादन नियमक (फर्टिलायझिंग प्रॉडक्ट्स रेग्युलेशन- एफपीआर) कायदा जून, २०१९ मध्ये मंजूर केला. त्यात ‘बायोस्टिम्युलंट’चा समावेश केला. आंतरराष्ट्रीयदृष्ट्या युरोपने यात आघाडी घेतली असे म्हणता येईल. १६ जुलै, २०२० पासून हा कायदा अमलात येईल.

कायद्यान्वये सात प्रकारात वर्गवारी

 • नव्या कायद्यान्वये उत्पादनांची वर्गवारी प्रॉडक्ट फंक्शन कॅटेगरी’ (पीएफसी) अंतर्गत सात प्रकारांत.
 • त्यातील सहा व काही प्रमाणात सात वर्गात ‘बायोस्टिम्युलंट’ उत्पादनांना स्थान.

वर्गवारी अशी

 • १) खते-
 • इनऑरगॅनिक (उदा. नत्र, स्फुरद, पालाशयुक्त)
 • ऑरगॅनो मिनरल्स
 • ऑरगॅनिक अर्थात सेंद्रिय खते
 • २) भूसुधारके (सॉईल इंप्रूव्हर)
 • ३) लायमिंग मटेरिअल
 • ४) वाढीचे माध्यम (ग्रोइंग मीडिया)
 • ५) इनहिबीटर्स
 • ६) वनस्पती बायोस्टिम्युलंट्‍स
 • ए) मायक्रोबल (सूक्ष्मजीवजन्य)
 • बी) सूक्ष्मजन्य विरहित
 • ७) फर्टिलायझिंग प्रॉडक्ट ब्लेंड्‍स 

  कायद्याची उद्दिष्टे, वैशिष्ट्ये

 • खत कायदा वर्गातील सर्व उत्पादनांना युरोपीय देशांत सामाईक बाजारपेठ मिळणार.
 • सुरक्षितता (सेफ्टी), गुणवत्ता व उत्पादनांचे ‘लेबल’ करण्यासाठी आवश्‍यक बाबी यांच्या अनुषंगाने
 • सर्वसामाईक नियम
 • विषारी दूषित घटकांच्या उत्पादनातील मर्यादा प्रथमच निश्‍चित केल्या. त्यामुळे मातीच्या आरोग्याला सर्वोच्च संरक्षण देण्यासह पर्यावरणातील धोकेही कमी करण्याचे उद्दिष्ट.
 • उद्योजकांनाही उत्पादन निर्मितीत या सर्व निकषांचे पालन करणे गरजेचे.

‘ईबीक’ -युरोपातील उद्योजकांची समिती

युरोपीय महासंघाप्रमाणे तेथील उद्योजकांचीही सुव्यवस्थापित कार्यपद्धती असलेली समिती आहे. ‘ईबीक’ अर्थात युरोपियन बायोस्टिम्युलंट्‍स इंडस्ट्री कौन्सिल’ नावाने ती प्रसिद्ध आहे.

उद्दिष्ट- संबंधित उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासह, नवे तंत्रज्ञान, सार्वजनिक धोरण, उद्योगविकास, शेतकऱ्यांना मार्गदर्शन व साह्य

नव्या कायद्यातील महत्त्वाच्या बाबी
‘ईबीक’ने नव्या कायद्याचे महत्त्व विशद केले आहे. त्यातील ठळक बाबी.

 • पीक पोषण, मातीची सुपीकता या अनुषंगाने पुनर्चक्रीकरण (रिसायकलिंग) व पुनर्वापर होणाऱ्या घटकांना उत्तेजन
 • जड धातूंच्या वापरावर मर्यादा
 • मानव, प्राणी, पर्यावरण यांच्या संरक्षणास सर्वोच्च प्राधान्य
 • लेबलवर केलेल्या दाव्यांप्रमाणे उत्पादनाचा परिणाम मिळणे आवश्‍यक
 • कायद्यानुसार उत्पादकाला आपले उत्पादन त्या प्रकारातील आहे हे सप्रमाण सिद्ध करता आले पाहिजे.
 • उत्पादनाची कार्य करण्याची पद्धत (मोड ऑफ ॲक्शन) लेबलला आधारयुक्त हवी.
 • संशोधकांच्या म्हणण्यानुसार बायोस्टिम्युलंट्‍स हे काय आहेत यापेक्षाही ते काय कार्य करतात यावरून ओळखले जातात.

बायोस्टिम्युलंटचे नेमके कार्य

 • १) खतांची कार्यक्षमता वाढवणे
 • फायदेशीर परिणाम देण्यासह अन्नद्रव्यांच्या वापराची कार्यक्षमता वाढवितात.
 • उदा. स्फुरद जमिनीला उपलब्ध करून देण्यास मदत. त्यामुळे अन्नद्रव्यांचा व्यय टळतो. परिणामी, पीक उत्पादनवाढीस चालना मिळते. म्हणजेच शेतकऱ्यांनी केलेल्या खर्चाचा विनियोग.

२) अजैविक ताणांसाठी साह्य

 • अवर्षण, अतिउच्च तापमान, क्षारता, पूरमय परिस्थिती असे अजैविक ताण सहन करताना पिकांना आपली ऊर्जा खर्ची घालावी लागते. ताण सहन न झाल्यास पीक रोगाला बळी पडते. 
  मृत होऊ शकते. ‘बायोस्टिम्युलंट्‍स’ पिकांना हे ताण झेलण्याची ताकद देण्यासह, मुळांचा विकास होण्यासाठी, पाण्याचा कार्यक्षम होण्यासाठी व एकूणच पीक उत्पादन वाढवण्यासाठी साह्य करतात.

उत्पादनात ५ ते १० टक्के वाढीचा दावा
उत्पादन वापरल्यानंतर त्याचे निश्‍चित परिणाम जोखण्यामध्ये मातीची पूर्वावस्था, पीक व्यवस्थापन व अन्य बाबीही कारणीभूत असतात. मात्र ‘बायोस्टिम्युलंट्‍स’ वापरल्यामुळे पीक उत्पादन ५ ते १० टक्क्यांनी वाढते असे नोंदविण्यात आल्याचे ‘ईबीक’ सांगते.

बाजारपेठ

 • विश्‍लेषणात्मक अहवालांच्या आधारे ‘बायोस्टिम्युलंट्‍स’च्या जागतिक बाजारपेठेपैकी युरोपीय बाजारपेठेचा हिस्सा जवळपास निम्मा
 • येत्या २०२२ पर्यंत ही बाजारपेठ दीड ते दोन अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचेल असा अंदाज
 • वार्षिक वाढीचा दर १० ते १२ टक्के.

का वाढते आहे बाजारपेठ?

 • युरोपीय देशांसह अन्य देशांमध्ये उत्पादनांचा वाढता वापर
 • संबंधित कंपन्या नेटवर्क विस्तारित आहेत. नव्या जागतिक वितरकांशी संपर्क निर्माण करून नव्या बाजारपेठा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न.
 • पिकाची विशिष्ट गरज ओळखून त्यानुसार नावीन्यपूर्ण उत्पादनांची निर्मिती
 • पूर्वी सेंद्रिय शेती, फळे- भाजीपाला पिकांत अधिक वापर व्हायचा. आता सर्वच प्रकारच्या शेतीपद्धतीत वापर होत आहे.
 • ग्राहकांकडून आरोग्यदायी अन्नपदार्थांची मागणी व पर्यावरणाला अनुकूलता ही कारणे लक्षात घेऊन रासायनिक निविष्ठांचा वापर अधिक कार्यक्षम व परिणामकारक होण्यासाठी शेतकरी ‘बायोस्टिम्युलंट’ना पसंती देत आहे. 

  संशोधनात गुंतवणूक

 • ईबीक अंतर्गत काही सदस्य कंपन्यांची वार्षिक उलाढालीपैकी तीन ते १० टक्क्यांपर्यंत निधीची ‘संशोधन आणि विकास’ शाखेत गुंतवणूक.
 • काही कंपन्यांकडून विद्यापीठे, सार्वजनिक संशोधन संस्था यांच्यासोबत भागीदारी.

अमेरिकेची भूमिका
अमेरिकन सरकारच्या ‘पर्यावरण संरक्षण एजन्सी (ईपीए)ने ‘प्लॅंट रेग्युलेटर्स व बायोस्टिम्युलंट्‌स लेबल क्लेम्स’संबंधी मार्गदर्शक मसुदा दस्तऐवज मार्च, २०१९ मध्ये प्रसारित केला आहे. ‘फेडरल इंसेक्टीसाइड, फंजीसाइड व रोडंटीसाइड ॲक्ट’ (फिफ्रा) अंतर्गत हा मसुदा आहे. सार्वजनिक किंवा उद्योगाशी संबंधित सर्वांसाठी त्याविषयी सूचना मागवल्या आहेत. या उत्पादनांची तुलनेने नवी व वाढती बाजारपेठ असल्याचे त्यात म्हटले आहे. मसुद्यात उत्पादनांच्या संकल्पना वा उपयोग हे युरोपीय महासंघ, ईबीक यांच्या संकल्पनांशी साधर्म्य दाखवणाऱ्या आहेत. मात्र त्यांची कायदेशीर व्याख्या तयार केलेली नाही.

उद्योजकांच्या प्रतिक्रिया

‘बायोस्टिम्युलंट्‍स’ कायद्याच्या कक्षेत आले ते चांगल्या कंपन्यांसाठी निश्‍चित स्वागतार्ह झाले आहे. मात्र काही समस्याही उभ्या ठाकल्या आहेत. ही उत्पादने नैसर्गिक घटकांवर आधारित आहेत. त्यांची वर्गवारी खतप्रकारात आहे. पण नव्या कायद्यात त्यांच्या विषारीपणाच्या अनेक चाचण्या सांगितल्या आहेत. त्या कीडनाशकांसाठी जास्त व्यवहार्य आहेत. आता अशा चाचण्यांसाठी प्रति उत्पादनासाठी दहा ते १५ लाख रुपये तर जैविक क्षमता चाचणी खर्च तीन ‘लोकेशन्स’ साठी १० ते १२ लाख रुपयांपर्यंत आहे. उत्पादने एकाहून अधिक असतील तर खर्च कल्पनेबाहेरचा आहे. राज्यातील सुमारे ९० टक्के ‘बायोस्टिम्युलंट्‍स’ निर्माते लघू व मध्यम उद्योजक आहेत. त्यांना हा आर्थिक डोलारा कसा पेलवणार? उत्पादनात कीडनाशक आढळाचे निश्‍चित केलेले मर्यादा प्रमाणही अत्यंत सूक्ष्म आहे. ते त्याहून अधिक हवे. कारण मूळ पाण्यातही तेवढे आढळू शकते. उत्पादन नोंदणीकरणासाठी गरजेचा अजून तपशील कायद्यांतर्गत संबंधित समिती पुरवेल असे म्हटले आहे. पण त्याबाबत संदिग्धता आहे. ‘सेल फ्री मायक्रोबल प्रॉडक्ट्‍स’बाबतही अजून नेमकेपणा हवा.
-समीर पाथरे
मुख्य कार्यकारी अधिकारी
स्वरूप ॲग्रो केमिकल्स, नाशिक

पूर्वी कायद्याच्या कक्षेत नसल्याने सगळीच उत्पादने एकाच माळेतील मणी गणली जायची.
आता गुणवत्ताप्रधान कंपन्या व वैज्ञानिक उद्योजक मंडळींसाठी सुवर्णसंधी तयार झाली आहे.
उत्पादननिर्मिती ते विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता नियंत्रण, ‘रेग्युलेशन’ आले
आहे. संबंधित उद्योजकाला शेतकऱ्यांकडे जाऊन आत्मविश्‍वासपूर्वक उत्पादनाची शास्त्रीय माहिती व गुणवत्तेची हमी देता येईल. जैविक क्षमता व विषारीपणा चाचण्यांचा खर्च मात्र लघू उद्योजकांना परवडणारा नाही. मात्र संघटना पातळीवर ‘डाटा कलेक्शन’ केल्यास खर्च विभागला जाईल. कोणा एकावर आर्थिक ताण येणार नाही. आम्ही हे काम करून ठेवले आहे. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुढील दोन वर्षांचा कालावधी कमी वाटतो. राज्यात उद्योजकांची संख्या भरपूर आहे. कमी काळात विद्यापीठांतील चाचण्या सर्वांनाच कशा शक्य होणार? ‘डाटा कलेक्शन’ही एकाचवेळी मोठ्या प्रमाणात कसे होणार हे प्रश्‍न आहेत.

-प्रदीप कोठावदे
व्यवस्थापकीय संचालक
ॲग्रीसर्च इंडिया

जागतिक स्तरावर पाहत भारताने ‘बायोस्टिम्युलंट्‍स’ना कायद्याच्या कक्षेत आणण्यात उशीर केलेला नाही ही नक्कीच चांगली बाजू आहे. आता संशोधन, उत्पादन ते नोंदणीकरण, ‘सॅंपलिंग’पर्यंतच्या सर्व प्रक्रियेत ‘सिस्टीम’ तयार होईल. अपप्रकारांवर नियंत्रण येऊ शकेल. शेतकऱ्यांत या उत्पादनांविषयी विश्‍वास वाढेल. येत्या काळात सूक्ष्मजीवांवर आधारित अशा उत्पादनांच्या निर्मितीला सुरुवात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विविध लाभदायक जिवाणू शेतीत बहुपयोगी ठरत असल्याने त्या दृष्टीने कायद्यात अजून तरतुदी करणे गरजेचे आहे.

-संदीपा कानिटकर
अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक
कॅन बायोसिस

‘बायोस्टिम्युलंट’ जागतिक बाजारपेठ

 • सन २०१९ मध्ये अंदाजे २.५० अब्ज बिलियन अमेरिकी डॉलरच्या आसपास.
 • -कोरोना संकटामुळे २०२० मध्ये काही घट.
 • मात्र शेती, हवामान व एकूण परिस्थिती अनुकूल राहिल्यास अपेक्षित बाजारपेठ
 • २०२५ पर्यंत ३.४५, ३.८ अब्ज ते ४.४९ अब्ज अमेरिकी डॉलर.
 • २०२७ मध्ये ५.३५ अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याचा अंदाज.
 • युरोपीय देश या उत्पादनांसाठी जगातील सर्वांत मोठी तर त्यानंतर उत्तर अमेरिका, आशिया पॅसिफिक.

‘पीजीआर’ म्हणजे बायोस्टिम्युलंट्‍स नव्हेत.
पीजीआर म्हणजे असे रसायन (जैविक किंवा रासायनिक) जे शिफारस मात्रेत दिल्यास पिकाची वाढ वा विकास गरजेनुसार नियंत्रित करते किंवा कमी करते किंवा वाढवते किंवा त्यात सुधारणा करते. (पिकाच्या शरीरक्रिया अनुषंगाने) त्याला प्लॅंट ग्रोथ रेग्युलेटर (पीजीआर) म्हणतात.
उदा. क्लोरमेक्वाट क्लोराईड, इथेफॉन, जिबरेलिक ॲसिड, नॅप्थिल ॲसिटिक ॲसिड
अशी उत्पादने ‘सेंट्रल इन्सेक्टीसाइड बोर्ड ॲण्ड रजिस्ट्रेशन कमिटी’ (सीआयबीआरसी) या कायद्याच्या कक्षेत येतात. पीजीआर म्हणजे बायोस्टिम्युलंट्‍स नव्हेत.

संपर्क- मंदार मुंडले, ९८८१३०७२९४
(लेखक ‘ॲग्रोवन’चे उप मुख्यउपसंपादक आहेत)


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
तळलेले गरे, फणसाची फ्रोझन भाजी, फणसाचे...फणस हे कोकणातील महत्त्वाचे मात्र दुर्लक्षित पीक...
फुलशेतीतून सुखाचा बहर जिद्द, चिकाटी, मेहनत, ज्ञान व व्यावसायिक...
म्यानमारी शेतकऱ्याची जीवनदायिनी : इरावडीइरावडी ही म्यानमारमधील सर्वांत मोठी आणि देशातील...
ओल्या काजूगरासाठी प्रसिद्ध कुणकवणसिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकवण (ता. देवगड) हे गाव...
माळरानावर फळबागांतून समृद्धीरांजणगाव देवी (ता. नेवासा, जि. नगर) येथील संयुक्त...
प्रयत्नवाद, उद्योगी वृत्तीने उंचावले...पणज (जि. अकोला) येथील अनिल रामकृष्ण रोकडे यांनी...
सव्वाशेहून देशी बियाणे संवर्धन,...उस्मानाबाद जिल्ह्यातील आरळी बुद्रुक येथील धनाजी...
दुष्काळात घडविला पोल्ट्री...नाशिक जिल्ह्यातील सायगाव (ता.येवला) येथे सतीश...
दुर्गम सिरोंचा झाले लाल मिरचीचे हबदुर्गम गडचिरोली जिल्ह्याची ओळख आर्थिक दृष्ट्या...
परराज्यांतही पोहोचला मसाल्याचा स्वादकुंडल (ता. पलूस, जि. सांगली) येथील सौ. दीपाली...
पिरॅमिड ड्रायर’मुळे वाढली प्रक्रिया...कोसबाड (डहाणू) येथील कृषी विज्ञान केंद्राने...
भूमिहीन ते प्रयोगशील शेतकरी, केली...नंदापूर (जि. जालना) येथील विलासराव टेकाळे यांनी...
म्यानमारी वाळूचे कण रगडिता तेलही गळे म्यानमार देशात फिरताना घाटरस्ता उतरताना एक लहानसं...
वाघा घेवड्याच्या पट्ट्यात कांदा...सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग...
संघर्षमय वाटचालीतून समृद्ध शेडनेट शेतीबुलडाणा जिल्ह्यातील परतापूर येथील बेडवाळ...
आधुनिक गुऱ्हाळघराद्वारे फायदेशीर...कासुर्डी (ता. दौड, जि. पुणे) येथील आखाडे बंधूंनी...
फळबागा, आंतरपिकांतून व्यावसायिक शेतीबीड जिल्ह्यातून पुणे येथे शिक्षणासाठी येऊन कर...
शून्यातून विकसित केले बहुविध जातींचे...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हुमरस येथील मधुसूदन व...
पीठनिर्मिती उद्योगातून नवी ओळखबाजारपेठेची मागणी आणि ग्राहकांचा प्रतिसाद लक्षात...
शाश्‍वत शेती, ग्राम विकासाची गंगाघाटंजी (जि.यवतमाळ) येथे १९९६ मध्ये विकासगंगा...