डाळिंब बागेतील आंबेबहारासाठी ताणाचे नियोजन

डाळिंब सल्ला
डाळिंब सल्ला
  • डाळिंबामध्ये प्रामुख्याने तीन बहर घेतले जातात. सध्या हस्त बहरातील फळे वाढीच्या अवस्थेत असतील, तर आंबे बहरासाठी ताण देण्याची तयारी सुरू असेल.
  • डाळिंबामध्ये बहर नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते. प्रथम बहर धरणाऱ्या शेतकऱ्यांनी गडबड न करता डाळिंबाचा पहिला बहर दोन वर्षानंतरच धरावा. वर्षातून फक्त एकच बहर घ्यावा. बहर घेतल्यानंतर बागेला ३ ते ४ महिने विश्रांती द्यावी.
  • आंबे बहर व्यवस्थापन आंबे बहरात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये फुले येतात, तसेच फळांची काढणी जून-ऑगस्टमध्ये येते. या बहरात भरपूर फुले येतात. फळांचा रंग आणि प्रत चांगली मिळू शकते. कारण आंबे बहरात कीड आणि रोगांचे प्रमाण कमी असते. परिणामी संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास या बहराचे नियोजन करावे. योग्य नियोजन केल्यास दर्जेदार व अधिक उत्पादन मिळवणे शक्य आहे.

  • ताण आणि पानगळ : डाळिंबाच्या झाडाला निर्सगत: वर्षभर फुले येत असतात. डाळिंबाला एकाच वेळी फुले आणि फळे येण्यासाठी बहर धरताना झाडांना विशिष्ट कालावधीसाठी विश्रांती द्यावी. त्याकरिता पाणी तोडून, पानगळ करून छाटणी करणे फार महत्त्वाचे आहे.
  • जमिनीच्या मगदुराप्रमाणे डाळिंबाच्या झाडांना किती दिवस ताण द्यायचा ते ठरवावे. बहर धरताना साधारणत: जमीन हलकी असल्यास बहर धरण्याअगोदर ३०-३५ दिवस पाणी तोडावे. तसेच मध्यम ते भारी जमिनीत ४०-४५ दिवस पाणी बंद करावे. झाडांना ताण दिल्यानंतर छाटणीच्या तीन आठवडे अगोदर इथेफॉन २ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करून पानगळ करून घ्यावी. भारी जमिनीमध्ये पानगळ होण्यासाठी अडचणी येतात. विशेष लक्ष द्यावे.
  • छाटणी : डाळिंबात छाटणी न केल्यास फळे टोकाला लागतात म्हणून डाळिंबाची छाटणी करणे गरजेचे आहे. पानगळ केल्यानंतर डाळिंबाची हलकी छाटणी करावी. आंबे बहरात प्रखर सूर्यप्रकाशामुळे फळांवर काळे डाग पडण्याची जास्त शक्यता असते. यासाठी झाडाच्या आतील भागात रिफील आणि पेन्सील आकाराच्या काड्या ठेवून त्यावर फळे धरावीत. छाटणी करताना रोगट, तेलकट डागाच्या फांद्या काढून टाकाव्यात. भरपूर सूर्यप्रकाश, हवा खेळती राहील आणि फळे सावलीत राहतील अशा प्रकारे छाटणी करावी. छाटणी करताना झाडाचा वरचा समतोल बिघडणार नाही याची काळजी घेऊनच छाटणी करावी. छाटणी केल्यानंतर लगेच १ टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
  • अन्नद्रव्य व्यवस्थापन : सध्या वाढीच्या काळात असलेल्या हस्त बहाराच्या बागेतील मातीचे परीक्षण करून रासायनिक खतांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. डाळिंब झाडाच्या वयानुसार रासायनिक खतांचा वापर आपल्या बागेत करावा. डाळिंबाचा बहर धरताना प्रति झाड २० किलो शेणखत, २ किलो निंबोळी पेंड, १ किलो गांडूळखत, २५ ग्रॅम ट्रायकोडर्मा प्लस (यात सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्माबरोबरच पॅसिलोमायसीसचे मिश्रण असते. मात्र, केवळ ट्रायकोडर्मा उपलब्ध असल्यास त्यासोबत वेगळे पॅसिलोमायसिस २० ग्रॅम प्रमाणात द्यावे.) १५ ग्रॅम पीएसबी आणि १५ ग्रॅम अॅझेटोबॅक्टर द्यावे.

  • डाळिंबाच्या पूर्ण वाढ झालेल्या झाडांना ३२५:२५०:२५० ग्रॅम नत्र:स्फुरद:पालाश पहिले पाणी देतेवळी द्यावे. उर्वरित नत्राची अर्धी मात्रा गाठ सेट झाल्यानंतर दोन ते तीन हप्त्यांत विभागून द्यावी. तसेच बहर धरतेवळी २०० ग्रॅम मॅग्नेशिअम सल्फेटची मात्रा द्यावी. फळे लिंबू आकाराची असताना ५०० ग्रॅम डीएपी आणि १०० ग्रॅम एमओपी द्यावा. फळे पेरू आकाराची असताना २०० ग्रॅम १९:१९:१९ आणि १०० ग्रॅम एमओपी द्यावा.
  • विद्राव्य खतांचा वापर करताना झाडाच्या वाढीच्या अवस्थेनुसार १२:६१:०, १९:१९:१९, १३:४०:१३, १३:०:४५, ०:५२:३४ आणि ०:०:५० या ग्रेडचा वापर करावा.
  • फळ काढणी :

  • उशीरा मृग बहार घेतलेल्या बागांमध्ये सध्या काढणी सुरू असेल. डाळिंब झाडाच्या वयाप्रमाणे फळांचे उत्पादन घ्यावे. पूर्ण वाढ झालेल्या झाडाला ६० ते ८० फळे घ्यावीत. त्यासाठी पक्वतेच्या योग्य अवस्थेत काढणी करावी. डाळिंबाचे फळ पक्व झाले की टोकाकडील पुष्प पाकळ्या मिटतात. फळांचा गोलाकारपणा किंचित कमी होऊन फळांना चपटा आकार येतो. साधारणत: फुलो­ऱ्यानंतर १५० ते २१० दिवसांनी आणि फळधारणेनंतर १२० ते १३० दिवसांनी डाळिंब काढणीस येतात.
  • - पॅकेजिंग लक्ष द्यावे. देशांर्गत बाजारपेठेसाठी १० किलो क्षमतेचे कोरुगेटेड बॉक्स वापरले जातात. आतमध्ये फळे सुरक्षित राहण्यासाठी कागदाचे कुशन दिले जाते.
  • परदेशी बाजारपेठेसाठी मागणीनुसार ४ ते १२ किलो क्षमतेचे बॉक्स असतात. फळांची प्रतवारी करून घ्यावी.
  • निर्यातीसाठी आकारानुसार प्रतवारी

    प्रकार फळाचे वजन ग्रॅम खोक्याचा आकार ( इंचामध्ये)
    सुपर किंग ७५० १३ बाय ९ बाय ४
    किंग ५०० ते ७०० ग्रॅम १५ बाय ११ बाय ४
    क्वीन ४०० ते ५०० ग्रॅम १५ बाय ११ बाय ४
    प्रिन्स ३०० ते ४०० ग्रॅम १४ बाय १० बाय ४
  • साठवणीसाठी शीतगृहाचे तापमान ५ अंश सेल्सिअस, ८० ते ९५ टक्के आर्द्रता ठेवणे आवश्यक आहे. या तापमानामध्ये डाळिंब २ महिन्यापर्यंत टिकू शकते.
  • उशिरा काढणीमध्ये वाढलेल्या थंडीच्या वातावरणामध्ये फळांचे क्रॅकिंग होऊ शकते. त्यावर सध्या काढणीच्या वेळी काही उपाययोजना शक्य नाही. मात्र, हे टाळण्यासाठी वाढीच्या काळामध्येच कॅल्शियमची पूर्तता केली पाहिजे. त्यासाठी फळाच्या वाढीच्या काळामध्ये कॅल्शियम नायट्रेट फवारणीद्वारे किंवा ड्रिपद्वारे द्यावे.
  • ज्याच्याकडे हस्त बहाराची फळे झाडावर असतील. ती सध्या वाढीच्या अवस्थेत असतील. या फळांसाठी बागेमध्ये कॅल्शियम पूर्तता करणे शक्य आहे. ठिबकद्वारे एकरी दोन किलो कॅल्शियम नायट्रेट पंधरा दिवसाच्या अंतराने दोन वेळा द्यावे.
  • डॉ. सचिन हिरे, ९४०५८५१८४८ ०२५५५-२३५५५५ (प्रभारी अधिकारी, डाळिंब संशोधन आणि तंत्रज्ञान प्रसार केंद्र, लखमापूर, ता. सटाणा, जि. नाशिक.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com