AGROWON_AWARDS : अपंगत्वावर मात करीत पोल्ट्री व्यवसायात उत्तुंग भरारी 

अपंगत्वावर मात करीत पोल्ट्री व्यवसायात उत्तुंग भरारी 
अपंगत्वावर मात करीत पोल्ट्री व्यवसायात उत्तुंग भरारी 

ॲग्रोवन स्मार्ट कृषिपूरक व्यवसाय पुरस्कार  - उत्तम डुकरे - औरंगपूर, ता. जुन्नर, जि. पुणे  पुणे जिल्ह्यातील औरंगपूर (ता. जुन्नर) येथील उत्तम डुकरे यांना पायाला अपघाती अपंगत्व आले. मात्र, हिंम्मत न हारता अत्यंत जिद्दीने त्यांनी पोल्ट्री व्यवसायाला वाहून घेतले. चारहजार पक्ष्यांच्या संगोपनापासून सुरवात करून १२ वर्षांच्या या प्रवासात सोळा हजार पक्षी संगोपनाची क्षमता त्यांनी तयार केली. शिवाय आपली पोल्ट्री अत्याधुनिक तंत्राने युक्त म्हणजेच वातानुकूलित व स्वयंचलित केली आहे.  इयत्ता पाचवीत शिकत असताना पायाला लाकूड लागण्याचे निमित्त झाले. जखम वाढत गेली. संपूर्ण पाय काढावा लागला. पण डुकरे हतबल झाले नाहीत. त्यांनी अत्यंत चिकाटीने व प्रचंड मनोबल कायम ठेवत महाविद्यालयीन शिक्षण व ‘आयटीआय’ (इलेक्ट्रॉनिक्स) चा अभ्यासक्रम पूर्ण केला. उदरनिर्वाहासाठी टीव्ही व तत्सम उपकरणे दुरुस्ती केंद्र सुरू केले. इच्छाशक्ती, जिद्द पाठीशी होती. पत्नी सौ. संगीता यांची त्यांना समर्थ साथ लाभली. त्यातूनच २००७ मध्ये पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातील बारकावे, व्यवस्थापन, तंत्र शिकून घेत त्यात कौशल्य मिळवले. आजपर्यंतच्या बारा वर्षांच्या या प्रवासात अत्यंत झोकून देऊन काम केले. त्यामुळेच त्यात भक्कमपणे पाय रोवून उभे राहणे डुकरे यांना शक्य झाले आहे.  असा आहे डुकरे यांचा पोल्ट्री व्यवसाय 

  • २०० बाय ३० फूट व १५० बाय ४० फूट अशी दोन शेडस. 
  • त्यात एकूण १६ हजार ब्रॉयलर पक्षी. 
  • पोल्ट्री व्यवसायातील खासगी कंपनीशी करार शेती केली आहे. 
  • ही कंपनी एक दिवसाचे पिलू देते. 
  • साधारण ३६ दिवसांत वातानुकूलित स्थितीत पिल्ले वाढवून ती कंपनीला दिली जातात. 
  • डुकरे यांनी यापूर्वीही विविध कंपन्यांसोबत अशी करार शेती केली आहे. 
  • या व्यवसायात त्यांना सहा रुपये प्रतिकिलो दर मिळतो. पक्ष्यांची मरतूक कमी ठेवल्यास 
  • हाच दर ८ रुपये मिळतो. आता पोल्ट्री वातानुकुलित केल्याने कंपनीने दर वाढवून दिले आहेत. 
  • पोल्ट्री वातानुकूलित असणे हे डुकरे यांच्या व्यवसायाचे वैशिष्ट्य आहे. हे वातानुकूलित शेड सुमारे आठ हजार पक्ष्यांचे आहे. दुसऱ्या शेडचे वातानुकूलित पद्धतीचे कामही पूर्ण झाले आहे. 
  • पक्ष्यांचे खाद्य, पाणी, तापमान नियंत्रण या अनुषंगाने पोल्ट्री संपूर्ण ‘ॲटोमेशन ’ केली आहे. 
  • एक व्यक्ती संपूर्ण व्यवस्थापन पाहू शकेल अशी अत्याधुनिक यंत्रणा आहे. 
  • पोल्ट्री वातानुकूलित केल्याने शेडमध्ये उग्र वास राहात नाही. स्वयंचलित यंत्रणेमुळे पाण्याचाही अपव्यय होत नसल्याने शेड कोरडे राहते. त्यामुळे स्वच्छता राहते. 
  • या व्यवसायात कोंबडी खत उपलब्ध होत असल्याने त्याचे वर्षाला ३० ते ३२ हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळते. खतासाठी व्यापारी बुकिंग करतात. 
  • तंत्रज्ञानातील काही ठळक बाबी 

  • कूलिंग पॅडवर सोडण्यात येणारे पाणी फिल्टर करण्यासाठी भूमिगत टाक्या. 
  • पक्ष्यांना उष्णता देण्यासाठी गॅस हीटर. 
  • पिण्याच्या पाण्यासाठी पाच हजार लिटर आणि व्हॅक्सीनेशनसाठी पाचशे लिटरची टाकी. 
  • एसीचा वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी २५ केव्हीचा जनरेटर संच. 
  • यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला तर बेल वाजते. 
  • गरजेनुसार प्रकाश व्यवस्थेसाठी पडदे, मंद प्रकाशासाठी निळ्या रंगाच्या बल्बचा वापर. 
  • एसी शेडचे झालेले फायदे 

  • खाद्याची नासाडी थांबली. 
  • शेडमध्ये दीडपट अधिक पक्षी ठेवणे शक्य. 
  • पक्ष्यांची वाढ होण्याचा कालावधी संरक्षित वातावरणामुळे सुमारे ८ ते १० दिवसांनी कमी. 
  • ४२ ते ४५ व्या दिवशी मिळणारे आवश्‍यक वजन ३५ व्या दिवशी मिळते. 
  • उन्हाळ्यात होणारी पक्ष्यांची मरतूक, ‘व्हायरल इन्फेक्शन’चे धोके कमी झाले. 
  • घरच्यांची साथ  पोल्ट्री व्यवसायात डुकरे दांपत्य अथकपणे राबते. केवळ एक मजूर सोबतीला असतो.  त्यांची शेतीही आहे. आई झुंबराबाई, वडील लक्ष्मण, भाऊ संतोष व पत्नी मनीषा असे कुटुंबातील अन्य सदस्य आहेत. ते पशुपालन आणि शेतीची जबाबदारी पाहतात.  व्यवसायाचा विस्तार  डुकरे यांनी व्यवसायाची सुरवात चार हजार पक्ष्यांच्या संगोपनापासून केली होती. उत्कृष्ठ व्यवस्थापनाआधारे आर्थिक उत्पन्न वाढवत पक्ष्यांची संख्या वाढविली. याच व्यवसायातून एक एकर जमीनही खरेदी केली. ‘एसी’ व ॲटोमेशनसाठी (जनरेटरसह) तीस लाख रुपये गुंतवणूक केली. शेडस बांधणी व व्यवसाय विस्तारासाठी कर्ज घ्यावे लागले. पण प्रत्येक उत्पादन व उत्पन्नातून शिल्लक पैसे ठेवत अधिकाधिक कर्ज फेडत राहणे त्यांना शक्य होत आहे.  अपंगत्व येऊनही उभारी  अपघातात पाय काढावा लागल्याने डुकरे यांना चालत शाळेत जाणेही शक्य व्हायचे नाही. मग मित्रासोबत सायकलवर मागे बसून ते शाळेत जात. एक दिवस मित्राने सायकलवर बसवले अन उतारावर सायकल सोडून दिली. त्यातूनच मग पुढे सायकल चालवता येऊ लागली. त्यातून जीवनाला गती मिळाली. डुकरे यांनी कधी सायकल, कधी एसटी असा शक्य तसा प्रवास करून कला शाखेच्या पदवीचे पहिल्या वर्षापर्यंत शिक्षण घेतले. जुनी टू व्हीलर देखील घेतली. त्यात आवश्‍यक बदल करून ती चालवली. सुरवातीच्या काळात सहा वर्षे पिठाची गिरणी चालवित प्रपंच नेटका केला. पत्नी संगीता यांनी प्रोत्साहन दिल्यानेच आयटीआय अभ्यासक्रमही पूर्ण केला. आज ते फोरव्‍हिलरही उत्तम चालवतात. डुकरे दांपत्याचा हा प्रवास सर्वांसाठी खरोखरच प्रेरणादायी ठरला आहे 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com