सुतार यांनी तयार केला दर्जेदार हळद पावडरीचा ब्रॅंड

सौंदर्यप्रसाधनांसाठी आंबे हळदीच्या पावडरीला मागणी आहे. त्याचा अधिक वापर करण्याचा मानस आहे. ड्रायरमध्ये वाळवलेल्या हळदीत कुरक्युमीनचे प्रमाण २.८६ टक्के हते. यामुळे ही हळद कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी अधिक उपयुक्त आहे. हळदीच्या याच वैशिष्ट्यांचा वापर करून त्यास अधिक बाजारपेठ देण्याचा प्रयत्न आहे. -प्रकाश सुतार
सुतार यांची दर्जेदार हळद व त्याचे पॅकींग
सुतार यांची दर्जेदार हळद व त्याचे पॅकींग

सांगली जिल्ह्यात इस्लामपूर येथील प्रकाश परशुराम सुतार यांनी महाविद्यालयात ३५ वर्षे अकउंटंट पदावर नोकरी केली. सेवानिवृत्तीनंतर आरामदायी जीवन जगण्यापेक्षा घरची शेती आणि त्यावर आधारित उद्योग सुरू करण्याचे त्यांनी ठरवले. आज स्वतःच्या ५० गुंठ्यांतून हळदीचे उत्पादन व त्यापासून दोन-तीन प्रकारच्या पावडरींचे उत्पादन घेण्यास त्यांनी सुरवात केली आहे. ज्युपिटरफ्लक्स नावाच्या पाऊच पॅकिंगद्वारे आपल्याच गावात या हळद पावडरीला त्यांनी मार्केटही मिळवले आहे.    सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका ऊस, द्राक्षाच्या शेतीसाठी प्रसिध्द आहे. सांगली ही हळदीची मोठी बाजारपेठ म्हणून देखील तेवढीच प्रसिध्द आहे. याच तालुक्यातील इस्लामपूर येथील प्रकाश परशुराम सुतार यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. घरची शेती होती. त्यामुळे लहानपणापासूनच शेतीचाही अनुभव होता. बी. कॉम पदवी घेतल्यानंतर ते इस्लामपूर येथील महाविद्यालयात नोकरीत रुजू झाले. तेथीलच दोन महाविद्यालयांमधून त्यांनी ३५ वर्षे अकाउंटंटची नोकरी केली. गावातच नोकरी असल्याने उर्वरित वेळेत ते शेतात जाऊन काम करायचे. सन २०१३ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर मग आरामदायी जीवन जगण्यापेक्षा पूर्णवेळ शेतीलाच वाहून घेतले.  शेतीत हळदे हे मुख्य पीक ठेवले. सेलम वाणाची निवड केली.  हळदीचे मूल्यवर्धन  सुतार यांनी हळदीचे उत्पादन तर घेतले. त्या वेळी पिकवलेली हळद विकण्यापेक्षा पावडर करून विकल्यास अधिक फायदा होईल ही बाब ध्यानात आली. मग मूल्यवर्धन करण्याचे विचार डोक्यात सुरू झाले.  मुलगा पराग गुजरात येथे ‘फूड इंजिनिअरिंग’चा अभ्यासक्रम शिकत होता. तेथे सौर ऊर्जेवरील ड्रायर पाहण्यास मिळाला. त्याने हळद प्रक्रियेविषयी अधिक माहिती दिली. मग ड्रायरची खरेदी झाली.  सध्या सूर्यप्रकाशात नैसर्गिक पध्दतीने व ड्रायर पध्दतीने हळद वाळवून तिची पावडर तयार केली जाते.  मार्केटिंगचा अनुभव  महाविद्यालयात नोकरी करत असताना सुतार एका विमा कंपनीचे काम करायचे. त्या वेळी घरोघरी जाऊन ग्राहकांना योजनांची माहिती देत. चार लोकांना भेटल्यास एकजण त्यासाठी तयार व्हायचा. हीच संकल्पना व अनुभव हळद पावडरीसाठी वापरू लागले. पॅकिंग केल्याशिवाय बाजारात उठाव मिळणार नाही हे जाणून त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची माहिती घेण्यास सुरवात केली. पॅकिंग केलेली हळद पावडर मोफत देण्यास सुरवात केली. हळूहळू ग्राहकांकडून मागणी येऊ लागली. मग आत्मिवश्वास वाढला. दरम्यान ‘एफएसएआयआय’ संस्थेकडून परवाना घेतला.  विक्रीसाठी पुढे आले हात  परिसरात मेहरबान बाबूराव पाटील अण्णा फार्म शेतकरी उत्पादक कंपनी कार्यरत आहे. या कंपनीत सुतार यांचे मित्र दिग्विजय पाटील यांचा समावेश आहे. त्यांनी हळद विक्रीसाठी मैत्रीचा हात दिला. इस्लामपूर बाहेरील मार्केटमध्ये या हळदीला बाजारपेठ देण्यासाठी दोघांनी एकत्रित प्रयत्न सुरू केले आहेत.  गुजरात येथे सुतार यांचा भाचा दत्तात्रय आणि मुंबईत भाची सविता राहतात. त्यांनीही आपल्या ठिकाणी या पावडरीची विक्री सुरू करण्याचे ठरवले आहे.  आंबे हळदीची लागवड  हळद लागवडीवेळीस आंबे हळदीचे काही गड्डे आले होते. त्यांची स्वतंत्र लागवड केली. सुरवातीला पाच गुंठ्यांत ही हळद होती. त्यातून एक क्विंटल उत्पादन मिळाले. त्याची पावडर केली. त्याची विक्री इस्लामपूर येथील कृषी प्रदर्शनात केली. सौंदर्यप्रसाधनासाठी महिलावर्गाकडून या पावडरीस मागणी आहे. त्यांच्याकडून या पावडरीचे ‘बुकिंग’ केले जाते.  गरजू विद्यार्थ्यांना काम  महाविद्यालयात नोकरी केल्याने गरजू विद्यार्थ्यांची परिस्थिती सुतार यांना माहीत होती. अशा विद्यार्थ्यांना  आपल्या उद्योगात कामाचा अनुभव दिला. त्यातून शिक्षणासाठी त्यांना आर्थिक मदत होते.  सध्या चार विद्यार्थी कामाचा हा अनुभव घेत आहेत.  सुतार यांच्या हळद उद्योगाची वैशिष्ट्ये 

  • सुमारे ५० गुंठ्यात २५ किलो वाळलेल्या हळदीचे उत्पादन होते. 
  • सौर ऊर्जेवरील ड्रायरमध्ये दोन ट्रेंच्या माध्यमातून दोन क्विंटल सुकवणी 
  • वाळवण्यास सुमारे १५ दिवसांचा कालावधी 
  • त्यानंतर पॉलिश व पावडरनिर्मिती 
  • नैसर्गिक वाळवलेल्या पावडरीपासून १३ ते २० क्विंटल 
  • ड्रायरद्वारे वाळवलेल्या हळदीचे २ ते ३ क्विंटल उत्पादन 
  • ज्युपीटरफ्लक्स नावाने ब्रॅंड तयार केला आहे. 
  • दर 

  • आंबे हळद पावडर- ५० ग्रॅम - ४० रुपये 
  • साधी हळद पावडर- ५० ग्रॅम - १५ रुपये 
  • ड्रायर तंत्राद्वारे तयार केलेली पावडर- ६०० रुपये प्रतिकिलो 
  • नैसर्गिक पध्दतीने वाळवलेल्या हळदीची पावडर- ११० ते १२० रुपये प्रति किलो. 
  • इथे होते विक्री  साधी हळद- इस्लामपूर  ड्रायर तंत्रावरील हळद- मुंबई, पुणे, हैदराबाद, कोल्हापूर इस्लामपूर  मुलांना दिले उच्च शिक्षण  सुतार म्हणाले, की मी खडतर प्रवासातून शिक्षण घेतले. त्याचे महत्त्व माहीत असल्याने मुलांना उच्च शिक्षण देण्याचेच ठरवले. मोठा मुलगा पराग हा फूड इंजिनिअरिंग विषयातील पदवीधारक असून सध्या ओडिसा येथे संशोधक आहे. त्याची पत्नी सौ. नम्रता याच विषयातील पदवीधारक आहे. त्यांनीच हळदीच्या पॅकिंगवरील पोषणमूल्यांची माहिती दिली आहे. लहान मुलगा अमोघ हा पर्यावरण क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी घेतली आहे.  संपर्क- प्रकाश सुतार- ९२७२३१६००४  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com