आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील इसुका दार्सी या गावातील शेतकरी जी.
यशोगाथा
सातत्य राखलेले पशुपालन ठरले शेतीलाही भारी
प्रशांत बिजवे यांच्यासाठी शेतीपूरक व्यवसाय म्हणजे सोन्याचे अंडी देणाऱ्या कोंबडीसारखाच ठरला आहे. आजोबांच्या पिढीपासून सातत्य ठेवलेला हा व्यवसाय शेतीपेक्षाही अधिक उत्पन्न देत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील लोही (ता. दारव्हा) येथील प्रशांत बिजवे यांच्यासाठी शेतीपूरक व्यवसाय म्हणजे सोन्याचे अंडी देणाऱ्या कोंबडीसारखाच ठरला आहे. आजोबांच्या पिढीपासून सातत्य ठेवलेला हा व्यवसाय शेतीपेक्षाही अधिक उत्पन्न देत आहे. दुधाळ जनावरे तसेच गावरान कोंबड्यांची पैदास आपल्याच फार्मवर वाढवून खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्याचा बिजवे यांचा प्रयत्न स्तुत्य ठरला आहे.
प्रशांत देविदास बिजवे यांची लोही (ता. दारव्हा, जि. यवतमाळ) या आपल्या गावी बागायती सात एकर तर कोरडवाहू नऊ एकर शेती आहे. बागायती क्षेत्रात यशवंत, गुणवंत चारा एक एकर, रब्बी ज्वारी दोन एकर तर उर्वरित क्षेत्रावर हरभरा लागवड असते. शेतीबरोबरच या कुटुंबाने पूरक म्हणजेच पशुपालनाचा व्यवसाय अनेक वर्षांपासून जोपासला आहे.
दुग्धव्यवसाय
प्रशांत यांचे आजोबा चार जनावरांच्या माध्यमातून दुग्धव्यवसाय करायचे. प्रशांतच्या वडिलांनी त्यात सातत्य राखत जनावरांची संख्या दहावर नेली. त्यानंतर प्रशांत यांनीही देखील हाच वारसा जपत कुटुंबाचा व्यवसाय पुढे नेला. सध्या त्यांच्याकडे १५ म्हशी आहेत. पैकी सात मुऱ्हा म्हशी आहेत. गायींमध्ये जर्सी आणि गीर जातींचा समावेश आहे. दोन्ही वेळचे मिळून सद्यःस्थितीत एकूण ५५ लिटर दूध संकलन होत आहे. काही जनावरे गर्भार असल्याने यापुढील काळात दूध संकलनात वाढ होऊन ते ८० ते ९० लिटर पर्यंत पोचेल असे प्रशांत सांगतात.
शेतकऱ्यांकडून खरेदी
बाजारात दुधाळ जनावरांच्या खरेदीत फसवणुकीची शक्यता अधिक राहते. त्यामुळे थेट दुग्धोत्पादक शेतकऱ्यांकडून जनावरे घेण्यावर प्रशांत यांचा भर असतो. खरेदीवेळी दूध काढून पाहिले जाते. त्याआधारे अंदाज आल्यानंतरच सौदा ठरतो. मुऱ्हा म्हशीची खरेदी ७५ ते ९० हजार रुपयांना केली जाते. प्रति म्हशीपासून सरासरी १९ ते १२ लिटर दूध मिळावे अशी निवड केली जाते.
व्यवस्थापन
पाण्याची सोय नसल्याने पूर्वी गावातच गोठा उभारून जनावरांचे संगोपन व्हायचे. सन २०१४ मध्ये शेतात विहीर खोदली. त्यास मुबलक पाणी लागल्याने जनावरे गावापासून तीन किलोमीटरवर असलेल्या शेतात स्थलांतरित केली. गोठा सध्या टीनपत्र्याचा असून यावर्षी पक्के बांधकाम करण्याचे नियोजन आहे. सहा हजार लिटर क्षमतेचा पिण्याच्या पाण्याचा हौद आहे. वेळेवर लसीकरण होत असल्याने जनावरांच्या आजारपणावर नियंत्रण मिळविता आले आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या डॉ. मनिषा डोणेकर तसेच सांगवी रेल्वे येथील कृषी विज्ञान केंद्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विषय विशेषज्ज्ञ देवानंद राऊत, विस्तार तज्ज्ञ वासुदेव चांदुरकर, कृषी विद्याशाखेचे अक्षय इंझाळकर यांचे मार्गदर्शन मिळते.
दुधाची विक्री
हॉटेल व घरगुती ग्राहकांना दुधाचे रतीब पूर्वी घातले जायचे. आता यवतमाळ शहरातील दोन दूध संस्थांना पुरवले जाते. संकलन केंद्र गावातच असल्याने विक्रीचा प्रश्न सुटला आहे. सहा रुपये ३० पैसे प्रति फॅट दराने दुधाची खरेदी होते. म्हशीच्या दुधाला लिटरला ४८ रुपयांपर्यंत तर गायीच्या दुधाला २७ ते ३० रुपये दर मिळतो.
चारा व्यवस्थापन
हिरव्या चाऱ्याची कुट्टी करून ती जनावरांना दिली जाते. त्यासाठीचे यंत्र पंचायत समितीकडून अनुदानावर मिळाले आहे. वाळलेल्या चाऱ्यामध्ये गहू, हरभरा भुसा याप्रमाणे प्रति जनावर दोनवेळचे मिळून ४० किलो खाद्य देण्यात येते. दुधाळ जनावरांना ढेप, सरकी पेंड, गहू भुसा, मका भरडा यांचे मिश्रण दिले जाते.
किफायतशीर अर्थकारण
खाद्यावरचा दररोजचा प्रती जनावर खर्च १०० रुपये आहे. दूध काढणे, गोठ्याची स्वच्छता, वैरण कापणे व अन्य कामांसाठी दोन मजूर आहेत. त्यांना प्रत्येकी ५०० रुपये दररोज याप्रमाणे मजुरी मिळते. दररोजचा खर्च, उत्पन्न व दर यांचा विचार करता महिन्याला ४० टक्क्यांपर्यंत नफा मिळतो. गोठ्यातच अधिकाधिक जनावरांची पैदास केली जात असल्याने त्यांच्या खरेदीवरील खर्च कमी झाला आहे. चाऱ्यावरील खर्चातही बचत होत असल्याने उत्पादन खर्च कमी करणे शक्य झाले आहे. शिवाय घरच्या शेतीला वापरून उर्वरित वर्षाला २० ते ३० ट्रॉली शेणखताची विक्री २००० ते २५०० रुपये प्रति ट्रॉली दराप्रमाणे होते.
देशी कोंबडीपालन
प्रशांत यांनी देशी कोंबडीपालनावरही भर दिला आहे. सुरवातीला पाच कोंबड्यांपासून त्यांनी सुरवात केली होती. आज ही संख्या शंभरवर पोचली आहे. एक किलो वजनाच्या कोंबडीची विक्री सरासरी ५०० रुपयांना केली जाते. तर १५ रुपये प्रति नग याप्रमाणे अंडी विक्री होते. दररोज १५ ते २० अंडी मिळतात. महिन्याला एकूण पाच हजार रुपयांपर्यंत अर्थप्राप्ती होते.
अनुभवले अनेक चढउतार
लोही गावातील अनेक शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसायावर भर दिला आहे. परंतु गावातील दूध संकलन केंद्र सातत्याने बंद पडायचे. त्यामुळे २५ किलोमीटर अंतरावरील तालुक्याचे ठिकाण असलेल्या दारव्हा येथे दूध नेऊन विकावे लागायचे. त्यामुळे काहींनी आपला व्यवसाय थांबवण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रशांत यांनी खचून न जाता त्यात सातत्य राखले. लोही गावची लोकसंख्या दहा हजारांपर्यंत आहे. आजमितीला दुग्ध व्यावसायिक सुमारे ११४ आहेत. दररोजचे चे दूध संकलन दोन हजार लिटरपर्यंत होते. प्रशांत यांना आई मंगला, पत्नी सोनाली यांची शेतीत मदत मिळते. मुले श्रवण व कुणाल शिक्षणासाठी बाहेरगावी असतात.
प्रतिक्रिया
शेतीत हंगामी पिके घेतो. आमच्या आजवरच्या अनुभवातून लक्षात आले आहे की शेतीतील वार्षिक उत्पन्नापेक्षा जनावरांच्या संगोपनातून मिळणारे उत्पन्न काही पटींनी निश्चित अधिक आहे. त्याच जोरावर नऊ एकर शेती घेतली. घरातील लग्नकार्ये यशस्वी पार पडली.
संपर्क- प्रशांत बिजवे- ९६०४८२०३४८
फोटो गॅलरी
- 1 of 91
- ››