प्रशांत जाधव यांची पाॅली मल्चिंगवरील शेवगा शेती व दर्जेदार शेंगा
प्रशांत जाधव यांची पाॅली मल्चिंगवरील शेवगा शेती व दर्जेदार शेंगा

‘ए ग्रेड’ शेवगा पिकविण्यातील मास्टर 

अभ्यासातून शेवगा शेती याज प्रशांत संपूर्ण शेती सांभाळतात. हुकमी पीक निवडताना प्रशांत यांनी शेवग्याला पसंती दिली. शेवग्याच्या नफा-तोटा अशा दोन्ही बाजू कानी पडायच्या.मग हंगाम व संपूर्ण बाजारपेठेचा सखोल अभ्यास केला. विविध बाजारपेठा पाहिल्या. वाहतूक खर्च, कमिशन, कोणत्या काळात किती आवक, दर या गोष्टी तपासल्या. त्यादृष्टीने शेवगा शेतीचे नियोजन तयार केले. गेल्या सात- आठ वर्षांतील शेतीतील व त्यातही प्रामुख्याने शेवगा शेतीत प्रशांत मास्टर झाले आहेत.

ठिबक, मल्चिंग, गादीवाफा व बाजारपेठेतील तुटवडा लक्षात घेऊन आटपाडी (जि. सांगली) येथील प्रशांत जाधव यांनी शेवगा शेती यशस्वी केली आहे. उत्कृष्ठ व्यवस्थापनातून ए ग्रेड मालाचे उत्पादन करून  या पिकात त्यांनी चांगले उत्पन्न त्याचबरोबर मास्टरी मिळवली आहे. दर कमी असतेवेळी बियाणे विक्रीतूनही उत्पन्न वाढवले आहे.     युवा शेतकरी प्रशांत जाधव यांचे शिक्षण मुंबई येथे एम. कॉम पर्यंत झाले. एन. डी. नावाने परिचित असलेल्या दत्तात्रय नारायण जाधव या त्यांच्या वडिलांचा मुंबई येथे व्यवसाय आहे. मात्र, आटपाडी गावी त्यांनी सुमारे ४० एकर शेती घेऊन ठेवली होती. मुंबईत शाळेत शिकत असताना प्रशांत यांना कुस्तीची आवड निर्माण झाली. बारावीपर्यंत कुस्तीचे धडे घेतले. शाळा, कुस्ती सुरू असताना सणाला ते सुटीला गावी यायचे. त्या वेळी शेतात जाणं ठरलेलं असायचं. खरीप, रब्बी अशी हंगामी पिकं घेतली जायची. मुळात आटपाडी तालुका डाळिंबाचा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे वडिलांनी देखील डाळिंबाची लागवड केली. प्रशांतदेखील य निमित्ताने शेतीत रूळले. शेतीचा अभ्यास, त्यातील बारकावे पाहू लागले. कालांतराने रोगाचा प्रादुर्भाव, दरात चढ-उतार, मजुरी वाढ अशा कारणांमुळे डाळिंब पिकाचे अर्थकारण जड जाऊ लागले. दुसरीकडे शहर व ग्रामीण जीवन अशी कसरतही सुरू होती. अखेर पूर्ण वेळ शेतीच पाहण्याच्या दृष्टीने गावीच राहण्याचा निर्णय प्रशांत यांनी घेतला.  पीकबदल व शेवग्याची शेती  जाधव कुटुंबाची पूर्वी भुईशेंगाची ऑईलमिल होती. काळाच्या ओघात ती बंद झाली. आज प्रशांत संपूर्ण शेती सांभाळतात. वडील, भाऊ श्रीकांत, अमित मुंबईतील व्यवसाय सांभाळतात. पत्नी सौ. सुषमा गृहिणी असून आई कधी गावी तर कधी मुंबईत असते. शेतीच्या प्रगतीसाठी एखादे हुकमी पीक निवडताना प्रशांत यांनी शेवग्याला पसंती दिली. शेवग्याच्या नफा-तोटा अशा दोन्ही बाजू कानी पडायच्या. मग हंगाम व संपूर्ण बाजारपेठेचा सखोल अभ्यास केला. विविध बाजारपेठा पाहिल्या. वाहतूक खर्च, कमिशन, कोणत्या काळात किती आवक, दर या गोष्टी तपासल्या. त्यादृष्टीने शेवगा शेतीचे नियोजन तयार केले. गेल्या सात- आठ वर्षांतील शेतीतील व त्यातही प्रामुख्याने शेवगा शेतीत प्रशांत मास्टर झाले आहेत.  अशी आहे प्रशांत यांची शेती 

  • दरवर्षी सुमारे साडेतीन ते सात एकरांपर्यंत शेवगा शेती- 
  • अन्य पिके- गहू, ऊस, वैरण 
  • देशी गायी, म्हशी अशी २१ जनावरे दावणीला 
  • दोन शेततळी, विहीर 
  • उर्वरित शेतात भाजीपाला 
  • हंगामांचा असा केला अभ्यास 

  • वर्षातून दोनवेळा शेवगा लागवड 
  • जानेवारीत लागवड केल्यास जूनमध्ये शेवगा मार्केटमध्ये आणता येतो. या काळात अनेक ठिकाणी पाऊस लांबलेला असतो. पाणी उपलब्ध असतेच असे नाही. या वेळी आवक कमी असते. त्यामुळे दरांचा फायदा घेता येतो. 
  • दुसरी लागवड मेमध्ये- हा शेवगा ऑक्टोबरमध्ये मार्केटला येतो. 
  • साधारण ११ महिन्यांत दोन पिके घेता येतात. म्हणजे दोनवेळा उत्पन्न घेण्याची संधी असते. 
  • ज्या वेळी दर नाही त्या वेळी बियाणे  अनेकवेळा शेवग्याचे दर खूप खाली येतात. अशावेळी प्रशांत बियाणे तयार करतात. त्याची विक्री  ३००० रुपये प्रतिकिलो दराने होते. अनेकजण त्यांच्याकडून बियाणे घेतात. काहीवेळा मागणीनुसार शेवग्याची पावडर तयार करूनही उत्पन्नाचा स्रोत वाढवला जातो.    प्रशांत सांगतात 

  • भाजीपाला असो वा कोणतेही पीक, बियाणे स्वतः केले तर नक्कीच फायदा होतो. 
  • त्यातून दर्जेदार वाण व शेतमालही मिळतो. 
  • यंदा कांद्याची लागवड केली. दर फारच कमी होता. मग साठवणूक केली. त्याचा दर २० रुपये प्रतिकिलोवर गेल्यानंतरच विक्री केली. बाजारपेठेचा अभ्यास महत्त्वाचा मानतो. 
  • या शेंगा कुठून येतात?  वसंत या शेवगा वाणाच्या शेंगा चकाकदार आणि लांबीला अधिक असल्याने बाजारपेठेत मागणी अधिक आहे. पुणे मार्केटमध्ये व्यापाऱ्यांकडे अनेक शेतकरी शेंगा घेऊन यायचे. काही शेतकरी माझ्या शेंगांची गुणवत्ता पाहून या कुठून येतात असे व्यापाऱ्यांना विचारायचे. मग व्यापारी त्यांना माझ्याकडे पाठवत. अशा रितीनेही सांगली, पुणे, धुळे भागांतील शेतकरी माझ्याकडून बियाणे घेऊन जातात.    व्यवस्थापनातील ठळक बाबी   

  • निरोगी झाड आणि शेंगा बियाण्यासाठी ठेवल्या जातात. 
  • वर्षाकाठी १०० किलो बियाणेनिर्मिती. 
  • ठिबक सिंचन, गादीवाफा यांचा वापर. 
  • पॉली मल्चिंग- 
  • त्याचे फायदे 
  • तणमुक्त बाग. 
  • वाफसा कायम राहतो. 
  • पांढरी मुळी कार्यशील राहते. 
  • उत्पादनात वाढ होते. 
  • दर्जेदार आणि लांब शेंगा मिळतात. 
  • आंतरमशागतीत १० ते १५ टक्के बचत. 
  • दहा बाय पाच फूट अंतरावर लागवड. 
  • रोप दीड फूट उंचीची झाल्यानंतर पहिला शेंडा मारला जातो. 
  • त्यानंतर सहा ते सात सबकेनवर शेंडा मारण्यात येतो. 
  • यामुळे फुलांची संख्या जास्त येते, झाडाला अधिक फुटवा मिळतो. 
  • फवारणी करण्यास सोपे जाते. 
  • उत्पादन व उत्पन्न 

  • प्रतिझाड २५ किलो शेंगा किंवा एकरी १५ टन उत्पादन. 
  • दर- २० रुपये ते ७० रुपये प्रतिकिलो. 
  • बदला (मोठी जाड शेंग) १० ते ११ रुपये प्रतिकिलो. 
  • मध्यम शेंग- ५५ रुपये. 
  • प्रत ३० किलोचे वजन करून पॅकिंग. 
  • मुख्य मार्केट- पुणे, अन्य- कोल्हापूर, सांगली- मात्र येथे १० टक्के कमिशन घेत असल्याने तेथे पसंती कमी. 
  • दोन दिवसांतून ५०० ते ६०० किलो किंवा माल कमी असल्यास दहा दिवसांतून ५०० ते ६०० किलोची काढणी. 
  • महिन्यांत ३ ते साडे तीन टन विक्री. 
  • संपर्क- प्रशांत जाधव- ९९७५६८४२२२  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com