जनावरांसाठी पशुखाद्यापासून पोषक फीड ब्लॉक्स

जनावरांच्या उत्पादनानुसार खाद्यघटक, चारा व इतर पूरक घटकांचे प्रमाण ठरवावे.
जनावरांच्या उत्पादनानुसार खाद्यघटक, चारा व इतर पूरक घटकांचे प्रमाण ठरवावे.

उत्पादन, उत्पादनकाळ, गाभणकाळ या बाबींचा विचार करून जनावरांसाठी चारा व पशुखाद्याचे परिपूर्ण फीड ब्लॉक तयार करता येतात. स्थानिक पातळीवर उपलब्ध चाऱ्याचा परिपूर्ण उपयोग करून चाऱ्याची कमतरता कमी करता येते. त्यामुळे वर्षभर चारा पुरवठा होण्यास मदत होते. फीड ब्लॉक जनावरांच्या उत्पादनानुसार खाद्यघटक, चारा व इतर पूरक घटकांचे प्रमाण ठरवून दळून घेतले जातात. दळलेल्या मिश्रणाचे हायड्रॉलिक दाबाच्या साह्याने फीड ब्लॉक बनवले जातात.

फीड ब्लॉकचे आहारातील महत्त्व

  • जनावरांना संतुलित आहार मिळण्यास मदत होते.
  • एक-एक खाद्य घटक किंवा चारा वेगवेगळा दिल्यास जनावर केवळ आवडीचा चारा किंवा खाद्य खातात व इतर चारा किंवा खाद्य न खाता वाया जाते. हे टाळण्यासाठी जनावरांना फीड ब्लॉक्स देणे महत्त्वाचे आहे.
  • चारा वाया न गेल्यामुळे कमी चाऱ्यात जास्त जनावरांचे संगोपन होते व चारा बचतही होते.
  • चारा जनावरांना टाकण्यावरील खर्च, वेळ तसेच जनावरांचा चारा खाण्यावरील वेळ वाचतो.
  • चाऱ्याची घनता वाढल्यामुळे कमी जागेत जास्त चारा साठवता येतो.
  • चाऱ्याचा अपव्यय टळून उकिरड्यावरील चाऱ्याचे प्रमाण कमी होऊन वातावरणाचे प्रदूषण टाळता येतो.
  • जनावरांची उत्पादन व प्रजननक्षमता वाढते.
  • रवंथ करणाऱ्या जनावरांच्या शरीरातून मिथेन वायू कमी प्रमाणात उत्सर्जित होतो.
  • जनावरांचे आजार टळून अारोग्य उत्तम राहते.
  • पूरक खाद्य तसेच क्षार मिश्रण, औषधे फीड ब्लाॅक्समधून देता येतात.
  • संपूर्ण चारा ब्लॉक्स किंवा परिपूर्ण फीड ब्लॉक्सचा उपयोग ज्या भागात चारा कमी प्रमाणात उपलब्ध आहे किंवा थोडाही चारा उपलब्ध नाही या भागात होतो.
  • कमी खर्चात व वेळेत जास्त चाऱ्याची वाहतूक करता येते.
  • स्थानिक पातळीवर उपलब्ध चाऱ्याचा परिपूर्ण उपयोग करता येतो त्यामुळे चारा कमतरता जाणवत नाही व सतत वर्षभर चारा पुरवठा होण्यास मदत होते.
  • पोषणतत्त्वांचा अभाव कमी होण्यास मदत होते.
  • फीड ब्लॉक बनवण्यासाठी लागणारी यंत्रे

  • ग्राइंडर ः पशुखाद्य घटक दळून किंवा भरडून घेण्यासाठी ग्राइंडरचा उपयोग होतो.
  • टी.एम.आर. मिक्सर ः यामध्ये हलक्या प्रतीचे खाद्य घटक जसे कडबा, बगॅस, वाळलेले गवत, वाळलेला झाडपाला तसेच पशुखाद्य घटक, पूरक खाद्य मिश्रण आणि मळी यांचे योग्य मिश्रण होऊन फीड ब्लॉक तयार होतो.
  • डेन्सीफायर ः यामध्ये हायड्रोलिकच्या दाबाने संपूर्ण घटकांचा फीड ब्लॉक तयार होतो.
  • परिपूर्ण फीड ब्लॉकसाठी अावश्यक बाबी

  • बाजारात ०.५ ते ३ टन प्रतितास क्षमतेची यंत्रे उपलब्ध आहेत त्यांना २०-४० एचपी क्षमतेच्या मोटारीची गरज असते. प्रतिटन १२ ते १६ किलोवॉट लाईटची गरज असते.
  • या यंत्राचा वापर करून ७ ते ३० किलो वजनापर्यंतचे ब्लॉक्स बनवता येतात.
  • एका फीड ब्लॉकमध्ये एका जनावराची २४ तासांची पोषणतत्त्वांची गरज पूर्ण करण्याची क्षमता असते.
  • परिपूर्ण फीड ब्लॉक तयार करताना जनावरांचे उत्पादन, उत्पादनकाळ, गाभणकाळ या बाबींचा विचार करून चारा घटक व पशुखाद्य घटक निवडावेत.
  • जास्त उत्पादन देणाऱ्या जनावरांसाठी संरक्षित प्रथिने आणि संरक्षित स्निग्ध पदार्थांचाही वापर करता येतो.
  • परिपूर्ण फीड ब्लॉकमध्ये चारा, पशुखाद्य घटक याबरोबरच खनिज मिश्रण, प्रोबायोटिक्स, विकर, ॲन्टिऑक्सिडंटस, बेन्टोनाईट इ. वापर करता येतो.
  • सर्वसाधारणपणे जनावरांच्या शरीरपोषणासाठी ८६ टक्के कडबा, १० टक्के मळी, २ टक्के धारमिश्रण + १ टक्का मीठ असे प्रमाण ब्लॉकमध्ये ठेवावे.
  • दूध उत्पादनवाढीसाठी ब्लॉक तयार करताना यातील कडब्याचे प्रमाण कमी करून आणि पशुखाद्याचे प्रमाण वाढवावे.
  • परिपूर्ण फीड ब्लॉक तयार करण्याची पद्धत

  • जनावरांच्या उत्पादनानुसार खाद्यघटक, चारा व इतर पूरक घटकांचे प्रमाण ठरवून घ्यावे.
  • ग्राइंडरने पशुखाद्य घटक भरडून घ्यावेत.
  • पशुखाद्य मिश्रणामध्ये इतर पूरक घटक मिसळावेत.
  • कुट्टी केलेल्या चाऱ्याचा उपयोग करावा.
  • चारा व पशुखाद्य हे योग्य प्रमाणात मिसळून त्यामध्ये मळी, बेन्टोनाईट इ. चा वापर घट्टपणासाठी करावा.
  • सर्व मिश्रित घटक डेन्सिफायरमध्ये दळून हायड्रॉलिक दाबाच्या साह्याने ब्लॉक बनवावा.
  • संपर्क ः डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ९४२३८७०८६३ (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com