योग्य उपचाराने दूर करा मायांग बाहेर येण्याची समस्या

मायांग बाहेर येण्याची समस्या प्रामुख्याने म्हशींमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते.
मायांग बाहेर येण्याची समस्या प्रामुख्याने म्हशींमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते.

दुधाळ जनावरांतील गायी व म्हशींमध्ये विण्यापूर्वी (गाभण काळात) किंवा व्याल्यानंतर बऱ्याचदा मायांग बाहेर पडणे ही समस्या उद्‍भवते. ही समस्या साधारणतः म्हशींमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. मायांगाचा ढिलेपणा, दूध उत्पादन जास्त असलेली जनावरे यास कारणीभूत ठरतात.   मायांग बाहेर येण्याची कारणे

  • शरीरातील ओजसरसाचे प्रमाण कमी झाल्यास, उदा. इस्ट्रोजन नावाचा ओजसरस शरीरात जास्त झाल्यास किंवा इस्ट्रोजन जास्त प्रमाणात असलेल्या वनस्पती जनावरांना खाऊ घातल्यास मायांग बाहेर येण्याची समस्या निर्माण होते.
  • मायांग बाहेर येणे हा दोष जनावरांत काही वेळा आनुवंशिकसुद्धा असू शकतो.
  • अशक्त व वयस्कर जनावरांमध्ये मायांगाचे स्नायू ढिले झाल्यामुळेसुद्धा ही समस्या आढळते.
  • शरीरातील क्षार, जसे की कॅल्शियम व फाॅस्फरसचे प्रमाण कमी झाल्यास मायांग बाहेर येते.
  • योनीमार्गावरील जखमा किंवा योनीदाह किंवा गर्भाशयाचा दाह यामुळे जनावर सतत कळा देते व त्यामुळे मायांग बाहेर पडते.
  • विल्यानंतर मायांग बाहेर पडण्याचा प्रकार हा बहुतांशी कष्टाची प्रसूती किंवा व्याल्यानंतर झार अडकल्याने होते.
  • जनावराला होणारी हगवण व बद्धकोष्टता येणाऱ्या कळातसुद्धा मायांग बाहेर पडण्यास कारणीभूत ठरतात.
  • लक्षणे

  • जनावर खात-पित नाही, सतत लाघवी करते, वारंवार शेण टाकते व कळा देते. काही जनावरांत ते बसल्यानंतरच बाहेर येते व जनावर उभे राहिल्यास मायांग आतमध्ये जाऊन त्याची लक्षणे दिसत नाहीत.
  • बाहेर आलेले मायांग, गर्भाशयद्वार व गर्भाशय हे लाल दिसते. कधी कधी मायांग हे जास्त प्रमाणात बाहेर येऊन नंतर आतमध्ये जात नाही व बाहेरच राहते. त्यामुळे गर्भाशयातसुद्धा रोगजंतूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
  • बाहेर आलेले मायांग हे जर जास्त वेळ बाहेरच राहिले तर त्यावरील ताणामुळे रक्तवाहिन्यावर दाब येते व मायांगावर सूज यते, ते ओबड, दोभड व कोरडे दिसते, त्यावर भेगा पडतात व मायांग जमिनीवर लोळते, त्यामुळे त्यावर माती व रोगजंतूंचा प्रादुर्भाव होतो.
  • मायांग कावळ्यांनी टोकरल्यास त्यावर जखमा होतात.
  • निदान पूर्व इतिहास, अनुवंशिकता, कष्टाची प्रसुती, झार अडकणे, गर्भाशय दाह असणे, बद्धकोष्ठता किंवा हगवण लागणे.

    पशुवैद्यकीय उपचार

  • उपचार करताना मायांग पूर्ववत ठिकाणी तात्काळ बसविणे अत्यंत गरजेचे असते. त्यानंतर त्याचे मूळ कारण शोधून त्यावर उपचार करावे.
  • बाहेर आलेले मायांग पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रथमतः पोटॅशच्या किंवा मोरचुदाच्या सौम्य द्रावणाने धुवून घ्यावे. बर्फाचे खडे पातळ स्वच्छ कापडात गुंडाळून लावावेत. त्यामुळे मायांगास थंड शेक दिल्यासारखा होतो व मायांगाची सूज तात्काळ कमी होते व रक्तस्त्राव थांबतो. नंतर हाताच्या तळव्याच्या वापर करून मायांग आत ढकलावे.
  • या उपाययोजना करून इलाज होत नसल्यास पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्जनावराच्या मागच्या भागास भूल देऊन मायांग परत बसवावे लागते व बाह्य जनेंद्रियास गादी टाके (मैट्रेस सूचर) द्यावे लागतात.
  • जनावरांस कॅल्शिअम, फाॅस्फरस व लोहाची इंजेक्शने द्यावीत.
  • जनावरांना इस्ट्रोजनयुक्त खाद्य जास्त प्रमाणात देऊ नये. जनावराचा मागचा भाग चढाकडे राहील व पुढील पाय उताराकडे राहतील अशा रीतीने जनावर बांधावे जेणेकरून पोटातील अवयवांचा ताण गर्भाशयावर पडणार नाही व मयांग बाहेर येणार नाही.
  • जनावराला पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैवकाची इंजेक्शने ३ ते ५ दिवस नियमितपणे द्यावीत
  • जनावरांस कळा थांबिवणारी औषधे कळा थांबेपर्यंत द्यावीत.
  • संपर्क ः डॉ. विलास टाकळे, ९५४५४३३५७४ (पशुप्रजननशास्त्र विभाग, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com