हरभऱ्याने केले आर्थिक दृष्ट्या सक्षम

राऊत बंधूंनी घेतलेले हरभऱ्याचे पीक
राऊत बंधूंनी घेतलेले हरभऱ्याचे पीक

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, महागाव, उमरखेड या तीन तालुक्यांत खरिपात सोयाबीन व रब्बीत हरभरा ही पीकपद्धती शेतकऱ्यांच्या अंगवळणी पडली आहे. आरेगाव येथील शेतकरी रतिराव व दीपक हे राऊत बंधू विशिष्ट वाणाच्या हरभऱ्याची निवड करून डहाळे म्हणूनच त्याची जागेवरच विक्री करतात व त्यातून फायदा मिळवतात. त्यातून काढणी, वाहतूक, अडत हा खर्चही त्यांनी वाचवला आहे. याव्यतिरिक्तही संभाजी टेटर यांच्यासारख्या प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी हरभरा हे आर्थिक आधार देणारे पीक ठरले आ हे. यवतमाळ जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाळा जेमतेम झाला. पिकांना पोषक वातावरण मिळाल्याने कपाशीसोबतच सोयाबीन, तूर आदी पिकांना फायदा झाला. या भागात सोयाबीन काढणीनंतर रान रिकामे होताच सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेले शेतकरी मोठ्या प्रमाणावर तर भारी जमीन असलेले कोरडवाहू शेतकरी रब्बीत हरभरा पीक घेतात. एकट्या पुसद तालुक्यात तेरा हजार हेक्टरवर हरभऱ्याची लागवड होते. वालतूर रेल्वे, पारडी, आरेगाव, लोणी, काटखेडा, चिलवाडी, पोखरी, हुडी, पिंपळगाव, मुंगशी, वरुड ही तालुक्यातील गावे हरभरा पिकासाठी प्रसिद्ध आहेत. प्रयोगशील टेटर यांचा आदर्श वरुड (ता. पुसद) येथील प्रयोगशील शेतकरी संभाजी शिवाजी टेटर गेल्या पंधरा वर्षांपासून गहू व हरभरा पिकांचे नियमित उत्पादन घेतात. गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याचे नियोजन सुलभ वाटत असल्याने अलीकडील वर्षांत याच पिकाला त्यांनी प्राधान्य दिले आहे. संभाजी यांची सहा एकर शेती आहे. त्यांच्याकडील सोयाबीन परिपक्व झाले असून येत्या आठवड्यात कापणी व मळणी होणार आहे. त्यानंतर रान तयार होताच हरभरा लागवडीचे त्यांचे नियोजन आहे. संभाजी यांनी वडील शिवाजी यांच्याकडून प्रयोगशीलतेची प्रेरणा घेतली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी आपल्या वडिलांना त्या काळात संकरीत ज्वारीचे बियाणे दिले. त्याचे एकरी १८ ते २० क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले. अनेक शेतकरी ते पाहण्यास आल्याची आठवण संभाजी यांनी सांगितली. त्यांना एकरी १२ ते १३ क्विंटल हरभरा व कमाल १४ ते १५ क्विंटल उत्पादन मिळते. बियाणे ते घरचेच वापरतात. मागील वर्षी त्यांनी ४१०० रुपये प्रति क्विंटल दराने हरभरा विकला. सरकारने चांगले दर व हमी शेतकऱ्यांना द्यावी. बाकी काही अपेक्षा नसल्याचे ते सांगतात. दहा जणांचे त्यांचे कुटूंब आहे. हरभरा हे पीक कुटूंबाला आधार होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शेंडा खुडा, उत्पादन वाढवा संभाजी यांनी हरभरा फुलावर येण्याआधी झाडाचे शेंडे खुडण्याचा प्रयोग केला. त्यामुळे फांद्यांची संख्या वाढली, घाटे अधिक धरले. यामध्ये मजुरीचा खर्च वाढतो, परंतु उत्पादन पटीने वाढते असा त्यांचा अनुभव आहे. शिवाय या पिकात रासायनिक खतांचा वापर ते अत्यंत कमी करून पीक अवशेषांच्या वापरावर अधिक भर देतात. माती जपणे अत्यंत महत्त्वाचे झाल्याचे ते सांगतात. पारडी येथील दादाराव ढेकळे हे देखील अनुभवी हरभरा उत्पादक आहेत. रानाच्या उपलब्धतेनुसार मागील वर्षी तीन टप्प्यात त्यांनी हरभऱ्याची लागवड केली. पहिल्या टप्प्यातील पाच एकरांत ४५ क्विंटल व नंतरच्या टप्प्यात ४० क्विंटल उत्पादन मिळाले. उशिरा पेरणी केल्यास उत्पादनात थोडीफार घट होते असे ते सांगतात. राऊत यांची हरभरा शेती आरेगाव येथील रतीराव व दीपक हे राऊत बंधू हरभऱ्याचे १५ वर्षांपासून उत्पादन घेत आहेत. शिवारातून पूस प्रकल्पाचा डावा कालवा गेल्याने सिंचनाची व्यवस्था उपलब्ध आहे. त्यांचा सुमारे सात एकरांवर हरभरा असतो. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांची लागवड सुरू होते. दीड ते दोन एकर अशी टप्प्याटप्प्याने लागवड होते. राऊत बंधूंच्या हरभरा शेतीची दोन वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे सीएव्हीटू या जातीची लागवड. हे फार जुने वाण असल्याचे रतीराव सांगतात. पंधरा वर्षांपूर्वी त्यांना हे बियाणे मिळाले होते. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ओल्या हरभऱ्याची विक्री. डहाळे विक्री राऊत यांच्या शेतीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ओल्या हरभऱ्याची विक्री. लगतच्या पुसद बाजारपेठेत हिरव्या हरभऱ्याला मोठी मागणी असते. त्याचा फायदा राऊत घेतात. हरभऱ्याच्या या डहाळ्याला या भागात 'टहाळ' नावाने संबोधण्यात येते. राऊत बंधू दरवर्षी घरचेच बियाणे वापरतात. दीड फूट बाय चार इंचावर लागवड असते. लागवडीपासून सुमारे ७५ दिवसांत घाट्यांचा हरभरा विक्रीसाठी तयार होतो. लागवड टप्प्याटप्प्यात केल्याने ही विक्री संक्रांतीच्या आधीपासून ते संक्रांतीच्या पुढेपर्यंत सुरू राहते. त्याला प्रति किलो १० ते १२ रुपये दर जागेवर मिळतो. रतीराव सांगतात की ओला हिरवा विकत असल्याने काढणीचे श्रम, त्याचा खर्च होत नाही. व्यापारी स्वतः जागेवर येऊन तोडणी करतात. त्यामुळे वाहतूक, अडत हे देखील खर्च वाचतात. काही वेळा बाजार समितीतही हरभऱ्याची विक्री होते. सन २०१७ मध्ये ६५६५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याचे त्यांनी सांगितले. बियाण्यालाही मागणी राऊत यांच्याकडील हरभरा बियाण्यालाही मागणी असते. यंदा प्रति क्विंटल ७००० रुपये दरने एक क्विंटल बियाणे विकल्याचे रतीराव म्हणाले. त्यांच्याकडे उसाचीही लागवड असते. चार फुटी उसातही हरभऱ्याचे आंतरपीक घेण्यात येते. त्यातून उसातील बराचसा खर्च भरून निघतो. उसाचे एकरी ६४ टनांपर्यंत उत्पादन ते घेतात. रतीराव परिसरातील साखर कारखान्याचे संचालक आहेत. तसेच विविध संस्थांत पदाधिकारी म्हणूनही त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. वाणाविषयी राऊत सांगतात, की आमचा हरभरा वाण गोडीला खूप चांगला आहे. त्यामुळेच ग्राहकांकडून त्याला मागणी असते. शिवाय ७२ दिवसांत तो पक्व होतो. त्याला पाण्याचे एकूण तीन हप्ते स्प्रिंकलरद्वारे देतो. पेरणी आधी स्प्रिंकलरद्वारे जमीन भिजविण्यात येते. ओल्या हरभऱ्यासाठी पाण्याचे नियोजन काटेकोरपणे मर्यादित स्वरूपात करावे लागते. जादा पाणी दिल्यास झाडांची वाढ जास्त होते व घाटे कमी लागतात. संपर्क - रतिराव राऊत - ९४२१८५३०६४ दीपक राऊत-  ९४२३३०८३४० संभाजी टेटर- ९९२२२६५७५८  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com