सुधारीत वाण, एकात्मिक तंत्रज्ञानातून वाढले भुईमुगाचे उत्पादन

तेलबियांचे घटते क्षेत्र, उत्पादकतेची समस्या लक्षात घेऊन पाल (जि.जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राने तीन वर्षे भुईमूग पिकात प्रात्यक्षिक प्रकल्प शेतकऱ्यांच्या शेतात राबवला. पूर्वी एकरी ७ ते ८ क्विंटल मिळणारे उत्पादन त्यातून १२ ते १४ क्विंटलपर्यंत (वाळवलेले) मिळाले.
चोपडा तालुक्यात राबवलेल्या प्रकल्पातून उत्पादित भुईमूग पीक
चोपडा तालुक्यात राबवलेल्या प्रकल्पातून उत्पादित भुईमूग पीक

तेलबियांचे घटते क्षेत्र, उत्पादकतेची समस्या लक्षात घेऊन पाल (जि.जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राने तीन वर्षे भुईमूग पिकात प्रात्यक्षिक प्रकल्प शेतकऱ्यांच्या शेतात राबवला. पूर्वी एकरी ७ ते ८ क्विंटल मिळणारे उत्पादन त्यातून १२ ते १४ क्विंटलपर्यंत (वाळवलेले) मिळाले. सुधारीत वाण व निविष्ठांचा शास्त्रीय दृष्ट्या वापर करण्याबरोबर एकात्मिक व्यवस्थापन केल्यास पिकाची एकरी उत्पादकता वाढू शकते हे त्यातून सिद्ध झाले. यंदाच्या उन्हाळ्यात चोपडा तालुक्यात राबवलेल्या प्रकल्पाची ही प्रातिनिधीक यशकथा. तेलबियांखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहे ही चिंतेची बाब आहे. उत्पादकता हा देखील महत्त्वाचा विषय आहे. भुईमूग हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे पीक आहे. जळगाव जिल्ह्यातील काही भाग उन्हाळी भुईमुगासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. या शेतकऱ्यांना या पिकाचे सुधारीत वाण मिळावे, एकात्मिक पीक व्यवस्थापनाबाबत ते अधिक जागरूक व्हावेत व त्यांचे उत्पन्न वाढावे या हेतूने पाल (ता. रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) पुढाकार घेतला. भुईमूग उत्पादकता वाढ प्रकल्प केव्हीके गेल्या तीन वर्षांपासून रावेर व यावेल या भागात भुईमूग पिकात ‘क्लस्टर फ्रंटलाईन डेमोस्ट्रेशन’ म्हणजे पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम राबवत आहे. त्याचे प्रातिनिधीक उदाहरण यंदाच्या उन्हाळी हंगामातील देता येईल. चोपडा तालुक्‍यातील लोणी व माचला या गावांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. माचला येथे सात एकरांत तर लोणी येथे १८ एकरांत प्रत्येकी एक एकरांत अशा २५ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. प्रशिक्षण या प्रकल्पांतर्गत सुरुवातीला शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. यात योग्य लागवड पद्धतीपासून ते अन्नद्रव्य, पाणी, व्यवस्थापन, किडी-रोग नियंत्रण, आंतरमशागत आदी सर्व बाबींचा समावेश असतो. सुमारे आठ प्रशिक्षणे, चार क्षेत्र भेटी व एक क्षेत्रीय दिन राबवून शेतकऱ्यांत तंत्रज्ञान प्रसार करण्यात येतो. फुले भारती वाणाचा प्रसार महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत जळगाव येथील तेलबिया संशोधन केंद्र संशोधित फुले भारती या वाणाचा वापर करण्यात आला. या वाणाची वैशिष्ट्ये

  • उपट्या वाण
  • अन्य वाणांच्या तुलनेत लवकर म्हणजे १०५ दिवसांत पक्व होणारा वाण
  • तेलाचे प्रमाण ५१ टक्के
  • उत्पादनक्षमता चांगली- हेक्टरी ३० क्विंटल
  • उन्हाळी व खरिपासाठीची अनुकूल
  • एकरी ३८ ते ४० किलो बियाणे लागते.
  • प्रकल्पातील ठळक बाबी

  • सहभागी शेतकऱ्यांना बियाणे, बीज प्रक्रियेसाठी रायझोबियम व पीएसबी ही जीवाणूखते,
  • एकरी पाच पिवळे चिकट सापळे, एकरी १० किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये, एकरी २० लीटर निंबोळीवर आधारीत कीटकनाशक मोफत देण्यात आले.
  • शेतकऱ्यांनी गादीवाफा तंत्राचा वापर केलाच. त्याबरोबर उपलब्धतेनुसार तुषार सिंचन किंवा ठिबक किंवा पारंपरिक सिंचन पद्धतीचा वापर केला.
  • केव्हीकेचे विषय विशेषज्ज्ञ महेंद्र महाजन यांच्याकडे प्रकल्पाची जबाबदारी होती.
  • वापरलेल्या वाणाची बियाणे बॅंक प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांकडे तयार होईल. त्यातून दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे.
  • राबवलेले तंत्रज्ञान (एकात्मिक पीक व्यवस्थापन)

  • सुधारीत वाणाची निवड (फुले भारती- जेएल ७७६)
  • बीजप्रक्रिया- पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा. सोबत रायझोबियम व स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक- २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे
  • खत व्यवस्थापन- पेरणीवेळेस २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद पायाभूत डोस.
  • आऱ्या सुटताना सूक्ष्म अन्नद्रव्ये १० किलो प्रति एकर
  • आंतरमशागत- पेरणीनंतर १० ते १२ दिवसांच्या अंतराने कोळपणी व निंदणी
  • ३० दिवसांपर्यंत पीक तणविरहित ठेवले.
  • आऱ्या लागण्याच्या वेळेस पिकावर ड्रम फिरवून घेतला. जेणे करून जास्त प्रमाणात त्या जमिनीत जातील व शेंगांची संख्या प्रति झाड वाढेल.
  • पीकसंरक्षण- रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी कडुनिंबावर आधारीत कीटकनाशकाचा वापर- जोन फवारण्या. पाच पिवळे चिकट सापळे प्रति एकर व व्हर्टिसिलीयम लेकॅनी ५० ग्रॅम प्रति १० लीटर पाणी फवारणी
  • पक्षी थांबे ५ प्रति एकर उभारण्यात आले
  • पिकात २०० ग्रॅम ज्वारी प्रति एकर बांधालागत पेरली. जेणेकरून जास्तीत जास्त पक्षी ज्वारीवर येतील व किडींचे नियंत्रण होईल.
  • पाणी व्यवस्थापन- तुषार व ठिबकद्वारे
  • पेरणीनंतर त्वरित, पेरणीनंतर २० दिवसांनी, आऱ्या सुटण्याच्या वेळेस (४० दिवसांनी), शेंगा पोसण्याच्या अवस्थेत (६० ते ७० दिवसांनी) वेळेस
  • जमिनीचा पोत व गरजेनुसार
  • उत्पादन पूर्वी या भागातील शेतकरी घुंगरी नावाचे स्थानिक वाण व घरचेच बियाणे वापरायचे. त्याचे एकरी उत्पादन ७ ते ८ क्विंटल मिळायचे. तीन वर्षांतील प्रकल्पांतून हेच उत्पादन एकरी १२ ते १४ क्विंटलपर्यंत (वाळवलेले) मिळाले आहे. लावणीपासून ते काढणीपर्यंतचा खर्च १७ हजार रुपये आला. विक्री व्यवस्था प्रकल्पात सहभागी शेतकरी दीपक पाटील यांच्याकडून सुमारे १५ क्विंटल भुईमुगाची खरेदी पाल केव्हीकेने ५५०० रुपये प्रति क्विंटल दरात केली. बाजारात सध्या कोरोनाच्या संकटामुळे दर दबावात आहेत. ऑईल मिला बंद असल्याने उठाव कमी आहे. सध्या बाजारात क्विंटलला ४५०० रुपये दर आहे. काही शेतकऱ्यांनी गावपरिसरात ५५०० रुपये दराने तर काहींनी शिरपूर (जि.धुळे) येथील बाजारात विक्री केली. अपेक्षित दरांसाठी माचला व लोणी येथील काही शेतकऱ्यांनी साठवणूकही केली आहे. कोरोनाचे संकट कमी होण्याची त्यांना प्रतीक्षा आहे. प्रतिक्रिया दोन एकरांत भुईमूग लागवड केली होती. एकात्मिक तंत्रज्ञान आत्मसात केल्याचा व तुषार सिंचनाचा मोठा लाभ झाला. जैविक कीडनाशकांमुळे एकरी तीन ते चार हजार रुपयांचा खर्च वाचला. उत्पादन एकरी १४ क्विंटल (कोरडी शेंग) मिळाले. बाजारात सध्या ४५०० ते ५००० रुपये प्रति क्विंटल दर सुरू आहेत. कृषी विज्ञान केंद्र कोरोनाचे संकट दूर झाले की हमीभावाने म्हणजे ५२०० रुपये दराने खरेदी करणार आहे. निव्वळ उत्पन्न एकरी किमान ४५ हजार रुपये मिळेल अशी अपेक्षा आहे. - पंकज पाटील-  ७०२०६०३७९८, माचला मी दीड एकरांत भुईमूग घेतला होता. एकरी सुमारे १४ हजार रुपये खर्च आला. कोरड्या शेंगेचे उत्पादन एकरी १७ ते १८ क्विंटलपर्यंत मिळाले. विक्रीनंतर एकरी किमान ४० हजार रुपये नफा मिळणे अपेक्षित आहे. - दीपक पाटील, माचला शेतकऱ्यांना फुले भारती हा दर्जेदार वाण या निमित्ताने मिळाला आहे. त्याचबरोबर खतांचा संतुलित वापर व एकूणच व्यवस्थापन यामुळे भुईमुगाचे उल्लेखनीय उत्पादन लोणी, माचला भागात होऊ शकले. यामुळे तेलबियांचे क्षेत्र वाढण्यास चालना मिळेल. - महेश महाजन,  ९९७०६६१५४६ विषय विशेषज्ज्ञ, केव्हीके, पाल

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com