मराठवाड्याच्या मोसंबीची पुण्यात मोठी उलाढाल
मराठवाड्याच्या मोसंबीची पुण्यात मोठी उलाढाल

मराठवाड्याच्या मोसंबीची पुण्यात मोठी उलाढाल

मोसंबी हे पीक मराठवाडा, विदर्भ व नगर जिल्ह्यात प्रामुख्याने घेतले जाते. त्यासाठी पुणे-गुलटेकडीची बाजारपेठ मोठी व महत्त्वाची आहे. येथून राज्याच्या विविध भागांना व राज्यांना मोसंबी पाठवण्यात येते. काही कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या या बाजार समितीत २०१८-१९ मध्ये २४ कोटी ४९ लाख १२ हजार रुपयांची उलाढाल नोंदविण्यात आली आहे .   सध्याच्या थंडीत विविध फळांच्या हंगामात बाजारपेठेत संत्रा, मोसंबी यांची अधिक रेलचेल दिसून येत आहे. नागपुरी संत्र्याच्या तुलनेत किनो संत्रा अधिक प्रमाणात दिसतो आहे. मोसंबीही त्यात उठून दिसते आहे. मोसंबी शेतीसाठी मराठवाडा, नगर आदी भाग विशेष प्रसिद्ध आहेत. मात्र पुणे- गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मोसंबीची मोठी बाजारपेठ आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांसह नगर जिल्ह्यातून येथे मोठ्या प्रमाणावर मोसंबीची आवक होते. आंबिया आणि मृग अशा दोन बहारांमध्ये मोसंबीचे उत्पादन होत असल्याने वर्षभर बाजारात हे फळ उपलब्ध असते. सततच्या दुष्काळामुळे शेतकरी अंबिया बहाराचे उत्पादन कमी करून मृग बहारावर भर देत असल्याचे चित्र आहे. ऑगस्टपासून हंगामास सुरुवात पुणे बाजार समितीमधील प्रमुख अडतदार सोनू ढमढेरे म्हणाले, की मोसंबीचा प्रमुख हंगाम अंबिया बहाराचा असतो. या ळी औरंगाबाद आणि जालना परिसरासह नगर जिल्ह्यातून मोसंबीची आवक सुरू होते. ऑगस्ट ते जानेवारी असा हा कालावधी असतो. ऑगस्टच्या मध्यावधीत मोसंबीच्या आवकेला प्रारंभ होतो. सप्टेंबरपर्यंत दररोज बाजारात सुमारे ४० टनांपर्यंत आवक होते. यावेळी प्रतितीन डझनाला १२० ते २८० रुपये; तर चार डझनांना ४० ते १२० रुपये दर मिळतो. पहिल्या टप्प्यातील आवक हिरव्या फळांची, त्यानंतर टप्प्याटप्प्याने ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये परिपक्व पिवळ्या रसदार फळांची आवक सुरू होते. त्यावेळी प्रतितीन व चार डझनांना अनुक्रमे १८० ते ३५० रूपये व ६० ते १६० रुपये दर मिळतो. यावेळी आवकही वाढलेली असते. हंगामाच्या तिसऱ्या टप्प्यात आवक कमी होऊन हेच दर प्रतितीन डझनांना २२० ते ४००; तर चार डझनांना १०० ते २२० पर्यंत येऊन ठेपतात. फेब्रुवारी ते मे हंगाम अंबिया बहार संपल्यानंतर साधारण फेब्रुवारीत मृग बहारातील फळांची आवक सुरू होते. मार्चपर्यंत ती दररोज ३० ते ४० टनांपर्यंत राहते. एप्रिल-मे मध्ये तापमान वाढायला सुरुवात झाल्यानंतर मागणी व दर वाढतात. त्यावेळी प्रतितीन आणि चार डझनांना अनुक्रमे १८० ते ४०० आणि ८० ते १८० रुपये दर असतात. जून-जुलै हंगाम जून-जुलैमध्ये बिगरहंगाम असतो. या हंगामात आंध्र प्रदेशातून आवक दररोज २० टनांपर्यंत आवक असते. आकाराने मोठी आणि चवीला गोड असणाऱ्या या मोसंबीला प्रतितीन डझन व चार डझनांमागे अनुक्रमे १८० ते ३५० आणि ८० ते १६० रुपये दर मिळतो. प्रतवारी मोठ्या व लहान आकारात प्रतवारी होते. मोठ्या आकाराच्या मोसंबीची तीन डझनाने; तर लहान आकाराच्या मोसंबीची चार डझनांने विक्री केली होते. तीन डझन मोसंबीचे वजन चार ते साडेसात किलोपर्यंत; तर चार डझनाच्या संत्र्यांचे वजन ३ ते साडेचार किलो एवढे असते. अशी होते विक्री पुणे बाजार समितीमधून पुणे आणि पिंपरी-चिंचवड उपनगरांसह जिल्ह्यातील विविध गावांमध्ये, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बेळगावपर्यंत मोसंबी पाठविण्यात येते. परराज्यांमध्ये गोवा आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर खरेदी होते. प्रतिक्रिया माझी मोसंबीची २५० झाडे आहेत. गेल्या वर्षी दुष्काळामुळे अंबिया बहारात चांगले उत्पादन मिळाले नाही. अवकाळी पावसानेही फटका दिला. दिवाळीनंतर झालेल्या पावसाचा फायदा मृगबहाराला मिळाला. विहिरी-तळी भरल्याने बागांना पाणी मिळाले. त्यामुळे अंबिया बहारातील नुकसान मृग बहारात भरून निघेल. -अंकुश सराटे सोमनाथ जळगाव, ता. जि. जालना उलाढाल अलीकडील काळातील अभ्यास करता पुणे बाजार समितीतील २०१४-१५ मधील मोसंबीची उलाढाल १५ कोटी ४ लाख २५ हजार रुपये होती. सन २०१७-१८ मध्ये ती १८ कोटी ८२ लाख ८६ हजार; तर २०१८-१९ मध्ये ती २४ कोटी ४९ लाख १२ हजार रुपयांवर पोचली. संपर्क- पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती- ०२० - २४२६०२०३, २४२६५६६८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com