हिंमत, परिश्रमातून पूर्णाबाईंनी साधली कुटुंबाची प्रगती

शिरेगाव (जि. नगर) येथील अल्पभूधारक पूर्णाबाई होन यांनी पतीच्या निधनानंतर घर आणि शेतीची जबाबदारी स्वीकारली. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनही हिमतीने मुलांना वाढवले. सर्वांनी एकदिलाने कष्ट करीत एका गायीपासून १८ गायींपर्यंत दुग्ध व्यवसायाचा विस्तार केला. आज आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण, समाधानी व कर्जमुक्त झाल्याचे समाधान कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर आहे.
पूर्णाबाई होन व गायींचे केलेले संगोपन.
पूर्णाबाई होन व गायींचे केलेले संगोपन.

शिरेगाव (जि. नगर) येथील अल्पभूधारक पूर्णाबाई होन यांनी पतीच्या निधनानंतर घर आणि शेतीची जबाबदारी स्वीकारली. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनही हिमतीने मुलांना वाढवले. सर्वांनी एकदिलाने कष्ट करीत एका गायीपासून १८ गायींपर्यंत दुग्ध व्यवसायाचा विस्तार केला. आज आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण, समाधानी व कर्जमुक्त झाल्याचे समाधान कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर आहे.   नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात शिरेगाव आहे. येथील होन कुटुंबाने अत्यंत कष्टातून दुग्ध व्यवसायात प्रगती साधली आहे. सुमारे ६० ते ६५ वयोगटातील पूर्णाबाई या कुटुंबाच्या प्रमुख आहेत. त्यांना लहानपणापासून कुक्कुटपालन, शेळीपालन, शेतीची आवड होती. लग्न कमी वयात झाले. सासरकडची आर्थिक परिस्थिती बिकट होती. शेती केवळ दोन एकर असल्याने त्या पतीसोबत शेतमजुरी करत. राहण्यासाठी पक्के घर नव्हते. कौलाच्या छोट्या घरात खूप वर्षे काढली. पूर्णाबाईंना तीन मुले आहेत. परिस्थितीमुळे त्यांचे शिक्षण करता आले नाही. मुलांवरही शेती व मजुरी करण्याची वेळ आली. पुढे पती आजारी पडले. आजार गंभीर असल्याने मुंबई येथील दवाखान्यात हलविण्यात आले. उपचारांसाठी पैसे नव्हते. नातेवाइकांकडून तीन लाख उसने घेतले. खूप प्रयत्न करूनही पती वाचू शकले नाहीत. पूर्णाबाईंच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शेती, घर सावरले पूर्णाबाई पूर्ण खचून गेल्या. पण कुटुंबासाठी दुःख बाजूला ठेवून मोठ्या हिमतीने उभ्या राहिल्या. कर्ज परत करणे, मुलांचे संगोपन या विवंचना होत्या. पण स्वतःला सावरत जिद्दीने त्यांनी घर व शेतीची सूत्रे हाती घेतली. पुरेसे पाणी नव्हते. शेतीचे नुकसानही झाले. पण हार मानली नाही. मुलांची लग्ने झाली. तीन सुना घरी आल्या. हे सारे बळ मदतीला आले. पुढे पूर्णाबाईंना शेतमजुरी करणे झेपेना. पण काहीही करून परिस्थिती सुधारली पाहिजे असे सतत वाटायचे. शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसायाची कल्पना त्यांनी कुटुंबासमोर मांडली. भांडवल नव्हते. पण शिलकी उत्पन्नातून गाय घेतली. मुले पूर्ण वेळ शेतीला देऊ लागली. दुग्ध व्यवसाय वाढवला गायीसाठी मका, ऊस घेतला. हळूहळू एकेक करीत गायींची संख्या वाढली. व्यवसाय विस्तारला. आजमितीला गोठ्यात सुमारे १८ ते २० जनावरे आहेत. एक खिलार, एक गावरान, शेतीकामासाठी दोन बैल, १४ जर्सी गायी, कालवडी असं पशुधन आहे. घरासमोरच गोठा बांधला. त्याला तारेचे कुंपण केले. मुक्तसंचार गोठ्याची सोय केली. तो ७५ फूट लांब आणि २५ फूट रुंद आहे. एक एकरावर लसूणघास लावला आहे. महिन्याला सहा टन ऊस २५०० रुपये प्रति टन दराने खरेदी होतो. पशुखाद्य २५ हजार रुपये, औषधे व दवाखाना असा मासिक खर्च सुमारे तीन हजार रुपये होतो. आर्थिक नियोजन दररोज सुमारे ८० ते ११०, १२० लिटरपर्यंत दूध संकलन होते. बहुतांशी दूध २३ रुपये प्रति लिटर दराने खासगी डेअरीला दिले जाते. तर ३० लिटरपर्यंत दुधाचा तीस रुपये प्रति लिटर दराने रतीब दिला जातो. दुधाचे फॅट ३.९ ते ५.८ पर्यंत असतो. वर्षभरात तीस टनांपर्यंत शेणखत उपलब्ध होते. सुमारे पाच ट्रॉली खत स्वतःच्या शेतात वापरले जाते. त्यातून रासायनिक खतांवरील खर्चात बचत होते. उर्वरित खताची तीन हजार रुपये प्रति ट्रॉली दराने विक्री होते. त्यातून पूरक उत्पन्न मिळते. वर्षभरात पाच ते आठपर्यंत कालवडी विक्रीसाठी तयार होतात. काही कालवडी गोठ्यात ठेऊन काहींची गरजेनुसार प्रति वीस हजार रुपयांप्रमाणे विक्री होते. वर्षभरात सुमारे दोन भाकड गायीही त्याच किमतीदरम्यान विकल्या जातात. गोबरगॅसची यंत्रणा होन कुटुंबाने शेणाचा उपयोग करून गोबरगॅस यंत्रणा उभारली आहे. त्यापासून मिळणाऱ्या इंधनामुळे सिलिंडर गॅसचा वापर करावा लागत नाही. घरचा संपूर्ण स्वयंपाक गोबरगॅसवर केला जातो. वर्षभरात त्यातून काही हजार रुपयांची मोठी बचत होते. पूर्णाबाई आजही कामांत मग्न कुटुंबाचा पहाटे साडेपाच दरम्यान दिनक्रम सुरू होतो. शेण काढणे, जनावरे धुऊन घेणे, मिल्किंग मशिनचा वापर करून दूध काढणे आदी कामे मुले व सुना करतात. दररोज गोठ्याची स्वच्छता केली जाते. मजूर तैनात करून काम करून घेणे परवडणारे नाही. त्यासाठी लागणाऱ्या खर्चात बचत होते. पूर्णाबाईंनी आजही आपले कष्ट थांबविलेले नाहीत. पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत त्या गोठा व्यवस्थापन, चारा-वैरण, दुधाचा व्यवहार, घराचा कारभार अशा विविध टप्प्यांपर्यंत अखंड कामात मग्न व उत्साही असतात. मुख्य म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी लिलया पेलली आहे. भाडेतत्त्वावर दहा एकर जमीन घेतली आहे. तेथे कांदा व ऊस ही पिके आहेत. कष्टाचे फळ मिळतेय पूर्णाबाई म्हणतात, की दुग्ध व्यवसायात खूप कष्ट करावे लागतात. पूर्ण वेळ द्यावा लागतो. त्याची तयारी असणे गरजेचे आहे. मी सर्व जबाबदाऱ्या सांभाळते. मला कधीही थकवा जाणवत नाही. एकेकाळी रोजगार हमी योजनेमध्ये मजुरीचे काम केले. आम्ही परिस्थिती बदलवली आहे. आज शेतातच मुलांनी टुमदार बंगला बांधला आहे. नातवंडांचे चांगले शिक्षण सुरू आहे. कर्जमुक्त झालो आहोत. अजून संसाराला काय हवं, असा प्रश्‍नही त्या विचारतात. संपर्क-  रंगनाथ होन, ९६२३२६३३५९ (पूर्णाबाई यांचा मुलगा) (लेखिका विश्‍वकर्मा विद्यापीठ, पुणे येथील पत्रकारिता व संवाद माध्यम विषयाच्या विद्यार्थिनी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com