खारपाणपट्ट्यात यशस्वी बटेर पालन

गजानन डाबेराव यांचे बटेरपालन व हॅचरी
गजानन डाबेराव यांचे बटेरपालन व हॅचरी

अकोला जिल्ह्यातील खडका या गावातील आदीवासी शेतकरी गजानन डाबेराव यांची खारपाणपट्ट्यातील केवळ दोन एकर शेती आहे. आठ वर्षांपूर्वी त्यांनी बटेर पक्षीपालन हा पर्याय निवडला. व्यवसायाचे काळजीपूर्वक व नेटके व्यवस्थापन करीत बाजारपेठ मिळवली. सुमारे सातशे पक्ष्यांच्या संगोपनासह दररोज ३५० ते ४०० अंड्यांचे उत्पादन त्यांच्या शेडमध्ये होते. कडकनाथ व गावरान पक्ष्यांचेही संगोपन जोडीला होत असून या व्यवसायातून महिन्याला समाधानकारक सक्षम उत्पन्न मिळविण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे.    बटेर हा पक्षी मासांहारी व्यक्तींच्या आवडीमध्ये कायम आघाडीवर राहतो. छोटासा दिसणारा हा पक्षी तसा रानावनात आढळतो. काही वर्षांत तंत्रज्ञान विकसित झाल्याने या पक्षाचे व्यावसायिक पोल्ट्रीच्या धर्तीवर संगोपन होऊ लागले आहे. अकोला-मूर्तिजापूर या तालुक्यांच्या सीमेवरील खडका (ता. जि. अकोला) हे हजार लोकवस्तीचे गाव आहे. येथे आदीवासी कुटुंबांची संख्या चांगली आहे. यापैकीच गजानन डाबेराव एक आहेत. त्यांची केवळ दोनच एकर शेती आहे. आधीच खारपाणपट्टा, त्यामुळे त्यातून उत्पन्न ते असे कितीसे मिळणार? शेतीला पर्याय म्हणून सुमारे सात ते आठ वर्षांपूर्वी त्यांनी कोंबडीपालन सुरू केले. त्या वेळी केवळ दहा कोंबड्या होत्या. हळूहळू यातील अनुभव वाढत गेल्यानंतर त्यांना बटेरपालनाचा एक पर्याय मिळाला. त्याविषयी अधिक माहिती मिळविण्यास सुरवात केली.  हैदराबाद येथे कामाचा अनुभव  बटेरपालन सुरू करण्यापूर्वी १९९८ पासून २००८ पर्यंत म्हणजेच १० वर्षे हैदराबाद येथे विविध हॅचरीज, कुक्कुटपालन क्षेत्रात काम केले. या विषयात यंत्रांचा वापर कशा पद्धतीने होतो याचे ज्ञान मिळवले.  सन २००८ मध्ये वनमाला यांच्यासोबत विवाह झाला व ते खडका येथेच स्थायिक झाले. मिळवलेले ज्ञान व अनुभव यांची सांगड घातली. बटेर पालनासाठी गोवा राज्यातून जपानी बटेर पक्ष्याची अंडी आणली. या दरम्यान उत्पन्नची जोड म्हणून कडकनाथ कोंबडीपालनाकडेही लक्ष पुरविले. त्यासाठी मध्यप्रदेशातील झाबुआ येथून कडकनाथ पक्षी आणले. अकोला तालुका आत्मा यंत्रणेच्या पुढाकाराने प्रशिक्षण घेतले.  असा आहे डाबेराव यांचा व्यवसाय  टप्पा १- शेड व पक्षीक्षमता 

  • व्यवसाय सुरू करण्यासाठी शेडची गरज होती. डाबेराव यांनी पत्नीची मदत घेतली. दोघांनी दोन महिने राबून शेड तयार केले. यातील काही कप्प्यांत कडकनाथ तर काही कप्प्यात बटेरपालन सुरू केले. 
  • आज एकहजार चौरस फूट क्षेत्रफळाची दोन शेडस. 
  • अंड्यापासून पिले उबवण्यासाठी हॅचरी यंत्राचा वापर. त्यासाठी अडीच लाख रुपये गुंतवणूक. 
  • हॅचरीची सहाहजार अंडी क्षमता. 
  • ग्रामीण भागात विजेची मोठी समस्या असल्याने भारनियमनाच्या काळात पर्याय म्हणून मोठ्या क्षमतेच्या बॅटरीजची सुविधा. व्यवसाय वाढत असल्याने आणखी एक यंत्र डाबेराव यांनी स्वकल्पनेतून तयार करून घेतले आहे. 
  • टप्पा २- व्यवस्थापन  कुक्कुटपालनाच्या तुलनेत बटेर पालनात धोके कमी असतात असे डाबेराव सांगतात. पती-पत्नी मिळून शेडचे व्यवस्थापन करतात. नियमितपणे शेडची स्वच्छता, निर्जंतुकीकरण, लसीकरणाचे काम घरच्याघरी करण्यात येते. पक्ष्यांना खाद्य, पाणी व अन्य कामे डाबेराव यांच्या पत्नी करतात. एक बॅच सुमारे ५५० ते ६०० पक्ष्यांची असते. सुमारे ३५ ते ४० दिवसांत बॅच तयार होते. त्यानंतर विक्रीचे नियोजन सुरू होते.  या भागातील वातावरण लक्षात घेऊन स्वतः खाद्य बनविण्यावर भर दिला जातो. वयानुसार पक्ष्यांना खाद्याचे प्रमाण वेगवेगळ्या स्टेजनुसार खुराक देतात. एक पक्षी विक्रीसाठी तयार होण्यासाठी जवळपास १७ रुपयांचा खर्च लागतो. हा खर्च वजा करता ३० ते ३५ रुपये नफा मिळत असल्याचे गणित त्यांनी मांडले.  टप्पा ३- बटेरचे व्यावसायिक महत्त्व  बटेर पक्ष्याचे मांस रूचकर व स्वादीष्ट असते. त्यामुळे त्यास मोठी मागणी राहते असे डाबेराव सांगतात. काही जमाती पूर्वी या पक्ष्याची शिकार करून त्यांची विक्री करायचे. आता व्यावसायिकदृष्ट्या त्याचे संगोपन होत असल्याने शिकार बंद झाली. बटेर पक्षी व त्याची अंडी असं, दोन्ही घटक विक्रीजन्य असतात. त्यांच्यात विविध पोषणमूल्ये मोठ्या प्रमाणात असल्याने ग्राहकांकडून चांगली मागणी राहते.  टप्पा ४- विक्री व्यवस्था  बटेर पक्ष्यांची विक्री आदीवासी व्यक्ती करीत असल्याने हीच आपली बाजारपेठ असल्याचे डाबेराव सांगतात. ते स्वतः आदीवासीच असल्याने त्यांनी विक्रीचे नियोजन अधिक चांगल्याप्रकारे सुकर झाले आहे. डाबेराव यांच्याकडून पक्षी विकत घेत अनेकांनी रोजगार मिळवला आहे.  विक्री दर 

  • पिलू (एक दिवस वयाचे)- १२ रुपये 
  • (ज्यांना हा व्यवसाय सुरू करायचा आहे, ते पिलू खरेदी करतात.) 
  • मोठा पक्षी- ५५ ते ६० रुपये 
  • दर तीन ते चार दिवसांनी सुमारे ५०० पक्ष्यांची विक्री. हॅचरी असल्याने ही बाब सुलभ झाली. 
  • अन्य आदीवासी बांधव या दराने खरेदी करून पुढे ८० ते १०० रुपयांना त्यांची विक्री करतात. 
  • खवय्यांना हे पक्षी घरपोच पुरविले जातात. 
  • अमरावती, अकोला शहरांतील हॉटेल्समध्येही डाबेराव यांच्या पोल्ट्रीतील बटर जातो. त्यामुळे स्वतंत्र मार्केटिंग करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज अद्याप भासलेली नाही. 
  • कोंबडीपालन 

  • कडकनाथ व अन्य देशी मिळून सुमारे ६० ते ७० पक्ष्यांचे संगोपन 
  • एक दिवसाचे कडकनाथ पिलू- विक्री- ६० रुपये 
  • अंडे विक्री- प्रतिनग- ५० रु. 
  • टप्पा ५- खर्च व उत्पन्न  बटेरचा मोठा पक्षी तयार करण्यासाठी प्रतिपक्षी १८ रुपये खर्च येतो. हॅचरी असल्याने हा खर्च कमी आहे. मात्र हॅचरी नसलेल्या शेतकऱ्यांना हाच खर्च सुमारे २५ रुपये येऊ शकतो. बटेर तसेच अन्य पक्षी अशा एकूण व्यवसायातून महिन्याला सुमारे ३५ हजार ते ४० हजार रुपये उत्पन्न मिळते असे डाबेराव यांनी सांगितले. आगामी काळात तीन ते चार शेडस उभारून व्यवसायाचा विस्तार करण्याचा त्यांचा मानस आहे.  मुलांना चांगले शिक्षण  डाबेराव यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांना परिस्थितीमुळे पुढे शिकता आले नाही. मात्र त्यांची मुले मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकताहेत. दोन्ही मुलांना उच्च शिक्षण देण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.   

    संपर्क- गजानन डाबेराव-९६५७१४५८७०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com