रासायनिक अंशमुक्त व्यावसायिक भाजीपाला शेती 

विक्रीसाठी काढणी केलेली वांगी दाखविताना (डावीकडून) सौ. सुजाता व राहुल हे पवार दांपत्य.
विक्रीसाठी काढणी केलेली वांगी दाखविताना (डावीकडून) सौ. सुजाता व राहुल हे पवार दांपत्य.

खुटबाव (जि. पुणे) येथील राहुल पवार या तरुणाने रासायनिक अवशेषमुक्त भाजीपाला शेतीत ओळख तयार करण्यास सुरवात केली आहे. वर्षभर विविध भाजीपाला, त्यासाठी बिगर हंगामाची निवड करून दरांचा फायदा घेणे हे त्यांच्या शेतीचे वैशिष्ट्य आहे. अभ्यास, निरीक्षण वृत्ती, उत्कृष्ट पीक व्यवस्थापन, पीक फेरपालट, करार शेतीद्वारे विक्री व्यवस्था, नर्सरी आदींच्या माध्यमातून राहुल यांनी व्यावसायिक शेतीचा आदर्श उभारला आहे.     पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील खुटबाव हे बागायती गाव म्हणून ओळखले जाते. त्यामुळेच परिसरातील शेतकऱ्यांना भाजीपाला शेती व त्यात विविधता आणणे शक्य झाले आहे. गावातील राहुल पवार यांचा अभ्यासू शेतकरी म्हणून परिसरात परिचय आहे. ते कृषी पदविकाधारक आहेत. त्यांची वडिलोपार्जित सहा एकर शेती आहे.  राहुल यांची व्यावसायिक शेती 

  • या भागात ऊस हे मुख्य पीक असले तरी राहुल यांनी हे पीक घ्यायचे टाळले. कारण कमी कालावधीच्या भाजीपाला पिकांतून त्याहून अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी त्यांना वाटली. 
  • सध्याची मुख्य पिके- वांगे, झेंडू, काकडी, मिरची, खरबूज, कलिंगड, फ्लॉवर. 
  • -भाजीपाला शेतीचा पाच-सहा वर्षांचा अनुभव. 
  • पाण्यासाठी दोन विहिरी, एक बोअरवेल. खडकवासला कॅनाल गावाजवळून गेल्याने पाण्याची उपलब्धता. 
  • व्यवस्थापनातील ठळक बाबी 

  • व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून शेती. दरवर्षी होणारे उत्पन्न, नफा, खर्च यांचा ताळेबंद ठेवतात. 
  • दरवर्षी साधारण नफ्याचे प्रमाण किती असले पाहिजे याची पातळी निश्‍चित करून त्यानुसार शेतीचे अंदाजपत्रक तयार करतात. 
  • दरवर्षी कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या माध्यमातून माती परीक्षणावर भर दिला जातो. त्याद्वारे 
  • खतांचे काटेकोर नियोजन करणे शक्य होते. 
  • रासायनिक व सेंद्रिय अशा एकात्मिक पद्धतीचा वापर. 
  • कीडनाशकांचे लेबल क्लेम व पीएचआय तपासून त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न. 
  • जैविक कीडनाशकांचा यथायोग्य वापर. 
  • -झेंडू, वांगे, खरबूज, मिरची आदी पिकांत मल्चिंगचा वापर. त्यामुळे पाण्याची बचत, तणनियंत्रण, किडींचे नियंत्रण सोपे झाले. 
  • पाणी मुबलक असले तरी काटेकोर वापर करण्याचा प्रयत्न. 
  • सुरवातीला २५ दिवसांपर्यंत मोजून १५ ते २० मिनिटे पाणी. त्यानंतर पिकांच्या वाढीनुसार टप्प्याटप्प्याने पाणी देण्याचा कालावधी वाढविला जातो. 
  • अलीकडील काळात दुष्काळी परिस्थिती सतत येऊ लागली आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून आंतरपिके घेण्यास सुरवात केली. त्यासाठी काकडीची निवड केली आहे. 
  • पीक संरक्षणावरील खर्च कमी करण्यासाठी प्रशिक्षण, कार्यशाळेतून घेतलेल्या 
  • माहितीतून फेरोमोन ट्रॅप्स, चिकट सापळे यांचा वापर केला जातो. 
  • -किडींच्या नियंत्रणाबरोबरच मित्रकीटकांच्या वाढीसाठी झेंडू, मका, मोहरी या सापळा पिकांचा अवलंब. 
  • बाजारात चांगला दर मिळविण्यासाठी ग्रेडिंग व पॅकिंग करण्यास सुरवात केली जाते. शेतमालनिहाय दहा ते पंधरा किलोचे पॅकिंग होते. त्यातून मालाला किमान दहा टक्के दर अधिक मिळू लागला आहे. 
  • नर्सरीतून उत्पन्नाची जोड  उत्पन्नाला जोड म्हणून दहा वर्षापासून नर्सरी व्यवसायास सुरवात केली. त्या माध्यमातून स्वतःच्या शेतीला लागणारी विविध भाजीपाला पिकांची रोपे तयार करणे शक्य झाले. शेतकऱ्यांकडून कोणत्या वेळी कोणत्या रोपांची खरेदी होते हेदेखील त्यातून लक्षात येऊ आल्याने बाजारातील आवक व दर यांचाही अभ्यास त्यातून होऊ लागला.  करार शेतीचा अनुभव  राहुल यांनी परिसरातील शेतकऱ्यांचा गट तयार केला आहे. त्यांना सोबत घेऊन विविध कंपन्या किंवा निर्यातदारांसोबत करार शेती सुरू केली. त्याद्वारे हमीभावही ठरवण्यात येतो. मिरची, भेंडी, स्वीट कॉर्न (मधुमका) ही पिके यानुसार घेतली आहेत. यामुळे जागेवरच मार्केट मिळून दरांविषयीची जोखीमही कमी होते. भविष्यात स्वतः निर्यातदार होण्याचा विचार आहे. याशिवाय पुणे आणि मुंबई बाजार समितीतदेखील विक्री होते.  अशी असते फेरपालट (प्रातिनिधिक)  मिरचीनंतर झेंडू, त्यानंतर खरबूज, त्यानंतर स्वीट कॉर्न 

  • उत्पादन (प्रति एकर) 
  • मिरची- ३० टन 
  • झेंडू- १० टन 
  • कलिंगड- ३० ते ३५ टन 
  • खरबूज- २० ते २५ टन 
  • काकडी- ३० टन 
  • बिगर हंगामाचा फायदा  मिरची ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लावण्यात येऊन जानेवारीच्या दरम्यान सुरू होते. त्याला त्या वेळी किलोला ३० ते ५० रुपयांपर्यंत दर मिळतो. साधारण मार्च-एप्रिलमध्ये झेंडू लावल्यास मेमध्ये बाजारात येतो. त्या वेळी लग्नसराई वा अन्य कार्यक्रमांसाठी रंगीत फुलांची गरज असते. त्या वेळी झेंडूचा दर किलोला ३० रुपयांपासून कमाल क्वचित १०० रुपयांपर्यंतही जातो. हे पीक कमी कालावधीत एकरी ५० हजार ते एक लाख रुपयांपर्यंतही उत्पन्न मिळवून देते. बाजारपेठांच्या मागणीनुसार मिरचीच्या विविध जाती घेतल्या जातात. कलिंगड, खरबूज रमजानसाठी घेतल्याने त्या वेळीही दरांचा फायदा होतो.  मार्गदर्शन व सहकार्य  आई सौ. कुंता, वडील पोपटराव यांचे मार्गदर्शन व पाठबळ मिळते. कृषी विभाग- आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर, बारामती कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. मिलिंद जोशी, विवेक भोईटे, सतीश टुले, अप्पासाहेब सोनवणे, डॉ अंकुश चोरमुले यांचे तांत्रिक मार्गदर्शन मिळते.  प्रशिक्षण, अभ्यास दौऱ्यातून ज्ञानवृद्धी  आत्मा, केव्हीके यांच्या माध्यमातून आयोजित केलेली प्रशिक्षणे व अभ्यास दौऱ्यामध्ये राहुल आवर्जून सहभागी होतात. ॲग्रोवनचे ते नियमित वाचक आहेत. या अंकातील विविध विषयांची स्वतंत्र कात्रणे काढून त्यांना स्वतंत्र संग्रह त्यांनी केला आहे. या सर्व ज्ञानामुळेच शेती फायदेशीर होण्यास मदत होत असल्याचे ते सांगतात.  संपर्क- राहुल पोपट पवार-  ९९७५८०५२५२, ९८८१९०३००६   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com