‘आरओ प्लांट’ अन् सेंद्रिय स्लरीनिर्मिती

राहुल रसाळ यांनी सेंद्रिय स्लरी व आरओ पाणी युनिट उभारले आहे. या तंत्रज्ञानाद्वारे आपल्या काटेकोर शेतीतील व्यवस्थापन उंचावले आहे. मातीची सुपीकता व सेंद्रिय कर्ब जपला आहे.
सेंद्रिय स्लरी निर्मितीचे युनीट व स्लरी देण्यासाठी  ट्रॅक्टरचलित यंत्राची निर्मिती.
सेंद्रिय स्लरी निर्मितीचे युनीट व स्लरी देण्यासाठी ट्रॅक्टरचलित यंत्राची निर्मिती.

क्षेत्र ६५ एकर असल्याने मजूरटंचाईवर मात करण्यासाठी राहुल रसाळ यांनी यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. ठरावीक कामांसाठीच मजुरांची गरज भासते. ट्रॅक्टरचलित ब्लोअर, स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणा आहेच. द्राक्षात २००६ मध्येच ‘सबसरफेस’ व ‘डबल लॅटरल’ पद्धतीचा वापर सुरू केला.  

‘आरओ प्लांट’ची उभारणी    शेतीला कुकडी कॅनॉलचे पाणी आहे. मात्र मुरमाड जमीन असल्याने पाणी धरून ठेवण्याची क्षमता अत्यंत कमी आहे. पाऊस कितीही झाला तरी तेवढा फायदा होत नाही. प्रत्येक उन्हाळ्यात पाणी बाहेरून आणावे लागते. राहुल सांगतात की शेतीत ‘केमिस्ट्री’चा अभ्यास महत्त्वाचा आहे. कारण उत्पादन खर्चातील ७० ते ८० टक्के खर्च कीडनाशके व विद्राव्य खतांवर होतो. आमच्या पाण्याचा पीएच साडेआठ, ईसी २ तर टीडीएस २५०० मिलिग्रॅम प्रति लिटरपर्यंत आहे. जमिनीत कॅल्शिअम जास्त आहे. फेरस सल्फेट जमिनीला दिला तर कॅल्शिअमसोबत रिॲक्शन होते आणि ‘फेरस’ झाडाकडून शोषला जात नाही. त्यामुळे पिवळकी येते. पाण्याचा टीडीएस जास्त असेल व मेटॅलॅक्झीलयुक्त बुरशीनाशक वापरले तर रिॲक्शन होऊन परिणाम अत्यंत कमी मिळतो. अशावेळी फवारण्या वाढविल्यास ‘रेसीड्यू’ वाढतो आणि परिणाम तर मिळतच नाही.  जगभरात रासायनिक प्रयोगांमध्ये डिस्टिल वॉटर (ऊर्ध्वपातीत पाणी) वापरले जाते. कारण त्यात क्षार नसतात. पण ते आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. म्हणून आम्ही ‘आरओ प्लांट (रिव्हर्स ऑसमॉसिस) उभारला आहे, त्याद्वारे पाण्याचा टीडीएस १० मिलिग्रॅम प्रति लिटरपर्यंत खाली आणता येतो. कीडनाशक, विद्राव्य खते यांच्या फवारणीसाठी त्याचा वापर करतो. ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ ही गरजेचे आहे. कारण परिसरात रासायनिक औद्योगिक प्रकल्प असतील तर पाणी प्रदूषणाचा धोका असतो. त्यामुळे शुद्ध पाणी वापरायला हवे. आम्हाला दिवसाला शेतीत सहा हजार लिटर पाणी लागते. एवढे पाणी साठविण्याचा खर्च वाढतो. त्या तुलनेत पाणी ‘आरओ’युक्त करण्याचा खर्च २० पैसे प्रति लिटर असतो. 

झालेले फायदे 

  • ‘आरओ’द्वारे पाण्याची गुणवत्ता सुधारल्याने कीडनाशकांचे परिणाम प्रभावी.
  • जोडीला डेल्टा टी चार्ट संदर्भानुसार फवारणी.
  • परिणामी, फवारण्यांची संख्या घटली. त्यावरील अतिरिक्त खर्च ३० ते ४० टक्के झाला कमी.
  • पाच वर्षांपासून ‘झिरो डिटेक्शन’ (मालात कीडनाशक अंशाचा शून्य आढळ) पद्धतीने काम.
  • मातीची सुपीकता व सेंद्रिय कर्ब  राहुल यांनी एकरी पीक उत्पादकतेबरोबर मातीची उत्पादकता, सुपीकता वाढविण्याकडेही तेवढेच लक्ष दिले आहे. ते सांगतात, की २००६ मध्ये शेती करू लागलो तेव्हा मातीचा सेंद्रिय कर्ब ०.४ होता. सध्या तो १.८ टक्का इतका चांगला आहे. प्रयोगशाळेत माती, पाणी, पान-देठ परिक्षण करून पीएच, ईसी, टीडीएस, सेंद्रिय कर्ब आदी बाबी तपासल्या आहेत. मातीतील सेंद्रिय घटक तपासण्यासाठी एक प्रयोगही घरच्याघरी करतो. शेतातील एक किलो माती घेऊन उन्हात सुकवायची. ओव्हनमध्ये २०० अंश सेल्सिअस तापमानाला दोन तास ठेवायची. पूर्वीचे व नंतरचे वजन यातील फरक पाहायचा. त्यातून सेंद्रिय घटकांचे प्रमाण समजते. 

    सेंद्रिय स्लरीनिर्मिती  राहुल यांच्याकडे नऊ ते १० साहिवाल गायी, गीर, खिलार असं देशी पशुधन आहे. स्लरीसाठी त्यांच्या शेण-मूत्राचा वापर होतो. अनॲरोबिक (ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत) व ॲरोबिक (ऑक्सिजनच्या उपस्थितीत) अशा दोन प्रकारेच्या स्लरी तयार केल्या जातात. ॲनॲरोबिक पद्धतीत सेंद्रिय घटकांचे उदा. शेणखत, वाया गेलेले अन्नपदार्थ यांचे विघटन जिवाणू ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत करतात. या पद्धतीत जिवाणूंचे विविध समुदायही असू शकतात. या पद्धतीत गोठा धुतलेले पाणी, शेण, गोमूत्र एका टाकीत संकलित केलं जातं. राहुल देशी दुधाच्या ताकाचा वापरही टाकीत वापरतात. त्यात लॅक्टी क ॲसिड जिवाणू असतात. त्यांचाही विघटनात उपयोग होतो. किण्वन प्रक्रिया (फरमेंटेशन) आठ दिवसांसाठी होते.  

    जैवइंधनाचाही फायदा  जैविक विघटन होण्यासह या प्रक्रियेत जैवइंधनवायू (मिथेन) तयार होतो. त्यासाठी बायोगॅस यंत्रणा उभारली आहे. इंधनाचा उपयोग स्वयंपाक निर्मितीसाठी होतो. तयार झालेली स्लरी पुढे ‘बॅलॅंसिग टॅंक’मध्ये एका पाइपद्वारे व तेथून दहा हजार लिटर क्षमतेच्या ॲरोबिक स्लरी टाकीत सोडली जाते. पुढे ऑक्सिजनच्या उपस्थितीत वाढणारे जिवाणू या स्लरीत कार्य करतात. पाच पीपीएम ऑक्सिजन जनरेट करून या टाकीला ‘एरियटर’द्वारे ऑक्सिजन पुरवला जातो. तो हवेचा कृत्रिम धबधबा वा स्रोत तयार करतो. आठ दिवस ही क्रिया सुरू ठेवली जाते. गरजेनुसार वा दर ८ दिवसांनी एकरी ५०० लिटरच्या हिशेबाने शेताला दिली जाते.     स्लरी देण्यासाठी यंत्राची निर्मिती  राहुल यांनी स्लरी देण्यासाठी ट्रॅक्टरचलित यंत्राची निर्मिती केली आहे. ट्रॅक्टरच्या मागे स्लरीटॅंक व मडपंप आहे. ट्रॅक्टर बागेत दोन ओळींमधून चालतो. पुढील बाजूस आडवी पाइप आहे. त्यातून डावीकडे व उजवीकडे झाडांजवळ स्लरी पडत जाते. केवळ एक व्यक्ती (चालक) पुरेशी होते. अशा वापरातून मातीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. संपर्क- राहुल रसाळ-   ९७६६५५०६२४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com