राहुल यांच्यकडील विविध उपकरणे व वेदर स्टेशन डाटा प्रणाली.
राहुल यांच्यकडील विविध उपकरणे व वेदर स्टेशन डाटा प्रणाली.

शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक व्यवस्थापन, भाग २

कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची माहिती घेतली. शेतीत निदान (डायग्नॉसिस) ही बाब सर्वांत महत्त्वाची असते. कारण ते अचूक असले तर त्यावरून उपायही अचूक करता येतात. राहुल रसाळ यांनी शेतीतील विविध बाबीं तपासण्यासाठी विविध उपकरणे सज्ज ठेवली आहेत. त्यावरून विविध बाबींचे निदान करता येते.

कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची माहिती घेतली. शेतीत निदान (डायग्नॉसिस) ही बाब सर्वांत महत्त्वाची असते. कारण ते अचूक असले तर त्यावरून उपायही अचूक करता येतात. राहुल रसाळ यांनी शेतीतील विविध बाबीं तपासण्यासाठी विविध उपकरणे सज्ज ठेवली आहेत. त्यावरून विविध बाबींचे निदान करता येते. राहुल यांच्या ताफ्यातील शास्त्रीय उपकरणे १) लक्स मीटर राहुल यांनी द्राक्ष, डाळिंब, कारले, टोमॅटो अशी पीकपद्धती निवडली. त्यामागे केवळ बाजारपेठ एवढाच नव्हे तर विज्ञानाचाही आधार होता. कोणते देश कोणत्या पिकांमध्ये का आघाडीवर आहेत, त्यांना दर्जेदार उत्पादन मिळण्यामागील कारणे काय हे अभ्यासताना त्यांना ‘लक्स’ ही संकल्पना भावली. लक्स म्हणजे काय? ठरावीक क्षेत्रासाठीचे प्रकाशाचे (लाइट) मोजमाप किंवा तीव्रता म्हणजे लक्स. शास्त्रीय भाषेत एक लक्स म्हणजे प्रति चौरस मीटर क्षेत्र वा पृष्ठभागासाठी एक ल्युमेन एवढा पडलेला प्रकाश. मग तो सूर्यप्रकाश असेल किंवा अन्य कोणता स्रोत. एखाद्या मेणबत्तीचा एक मीटर दूर अंतरापर्यंत जो प्रकाश पडतो तो एक लक्स प्रमाणात मोजला जातो. लक्स युनिटमुळे प्रकाशाची दिशाही कळण्यास मदत होते. लक्स मीटरचा उपयोग राहुल यांच्या ताफ्यात लक्स मीटर हे महत्त्वाचे उपकरण आहे. शेतीत आघाडीवरील देशांमध्ये असलेले तापमान व तेथील पिकांना वर्षभर किती लक्स सूर्यप्रकाश मिळतो, त्या तुलनेत आपल्या शेतात वर्षभर विविध वेळी उपलब्ध असलेले तापमान व लक्स यांचा अभ्यास राहुल यांनी केला. कारण त्यातून झाडाची वाढ, प्रकाश संश्‍लेषण क्रिया, झाडाकडून अन्ननिर्मिती आदी बाबी स्पष्ट होतात. राहुल सांगतात की दक्षिण अमेरिकेतील देश (चिली, पेरू, दक्षिण आफ्रिका, इक्वेडोर) पृथ्वीच्या अशा भौगोलिक स्थानावर आहेत की त्यांना वर्षभर प्रखर व अधिक काळ प्रकाश (एक लाख २० हजार ते ३० हजार लक्स) मिळतो. द्राक्ष किंवा अन्य पिकांचे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठी ही बाब महत्त्वाची ठरते. अन्य देशांना भेटी देताना लक्स मीटर, डिजिटल पोर्टेबल ह्युमिडीटी’ मापक सोबत ठेवतो. तेथील शेतात त्याचा वापर करून पाहतो. २) डीओ मीटर - सेंद्रिय स्लरी तयार करताना त्यात विरघळलेला ऑक्सिजन व त्या अनुषंगाने लाभदायक जिवाणूंच्या प्रमाणाबाबत जाणून घेण्यासाठी डिसॉल्व्ह ऑक्सिजन (डीओ) मीटरचा उपयोग होतो. ३) ब्रीक्स मीटर-   याद्वारे सकाळी व संध्याकाळी पानांमधील साखरेचे ‘रीडिंग’ घेतले जाते. दोन्ही वेळेतील फरक पाहून ‘बोरॉन’ची कार्यक्षमता जाणून घेता येते. त्यानुसार वापर करता येतो. ४) वॉटर पीएच मीटर-  द्रावणासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा पीएच (सामू) समजतो. कीडनाशके वा रसायने द्रावण वा बोर्डो तयार करण्यासाठी त्याची मदत होते. ५) वॉटर ईसी मीटर - (इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हीटी)-   पाण्याचा ईसी एक ते दीडपेक्षा जास्त राहिला तर जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे खतांचे प्रमाण, पाण्याची गुणवत्ता अभ्यासण्याच्या दृष्टीने याचा उपयोग होतो. ६) सॉइल पीएच मीटर-   मातीचा पीएच व मातीचे तापमान मोजता येते. ७ ) सॉइल ईसी मीटर-  यातही मातीच्या ईसीसह तापमान समजते.

८)टीडीएस मीटर ः ‘आरओ’च (रिव्हर्स ऑसमॉसिस) पाणी राहुल वापरतात. त्यातील ‘टीडीएस’चे (टोटल डिसॉल्व्ह सॉलीड्‍स- एकूण विरघळलेले घन पदार्थ) प्रमाण १० मिलिग्रॅम प्रति लिटरपर्यंत खाली आणले जाते. कीडनाशके वा खते फवारणीसाठीच्या द्रावणाचा टीडीएस मोजण्यासाठी या उपकरणाची गरज पडते. ९) डिजिटल वेदर मेजरमेंट डिव्हाइस - (हॅंड हेल्ड)- यात आर्द्रता, तापमान, ड्यू पॉइंट, डेल्टा टी, हवेचा वेग आदी बाबी समजतात. वरील उपकरणांमध्ये सेन्सर्स असतात. मातीत ती खोचून रीडिंग घेता येते. जमिनीची क्षारता, अन्नद्रव्यांचे ‘अपटेक’, सोडिअम आदी बाबी त्याद्वारे समजून कोणते अन्नद्रव्य किती प्रमाणात द्यायचे त्याचे नियोजन करता येते. जमिनीतील जिवाणूंची संख्या वा कार्यक्षमता टिकवायची असेल तर ठिबक संचातील ‘ड्रीपर’मधून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा पीएच संतुलित असावा. (साडेसहा ते सात). अशा बाब तपासण्यासाठीही वरील उपकरणे उपयोगी ठरतात. फायदे वरील उपकरणे डिजिटल व ‘पोर्टेबल’ आहेत. त्यामुळे कोणत्याही प्लॉटमध्ये रीडिंग घेणे सोपे होते. अशा उपकरणांच्या वापरातून विद्राव्य खतांचा अनावश्‍यक वापर थांबून त्यात ३० ते ४० टक्क्यांची बचत झाली. कीडनाशकांचाही योग्य परिणाम मिळतो. जलस्रोतांत काही वेळा जड धातूंचा आढळही (उदा. शिसे) असतो. त्याचेही अवशेष आपल्या शेतीमालात येणार नाहीत याची काळजी घेता येते असे राहुल सांगतात. ९) स्वयंचलित हवामान केंद्र (ऑटोमॅटिक वेदर स्टेशन) हे उपकरण शेतात बसविले आहे. शिवाय त्याआधारे हवामानाच्या घटकांचे डाटा संकलन व त्यावरून पृथक्करण करण्यासाठी घरी संगणकीय ‘डाटा’ प्रणाली वा सेंटर बसविले आहे. अक्षवृत्त, रेखावृत्त, वाऱ्याचा वेग, त्यात अचानक झालेली वाढ (गस्ट), ‘विंड चिल’, घरातील तसेच बाहेरील आर्द्रता, तापमान, ड्यू पॉइंट, पर्जन्यमान, त्याची प्रति तास घनता, दिवसाचा, महिन्याचा, वर्षाचा झालेला पाऊस, यूव्ही इंडेक्स, लक्स, ‘व्हिजिबिलिटी’ (९ किलोमीटरपर्यंत अचूकता) आदी अनेक बाबी त्यातून समजतात. विविध आलेख, तक्तेही अभ्यासता येतात. हे हवामान केंद्र ‘वेदर अंदर ग्राउंड ॲप’ला जोडले आहे. केंद्रातील नोंदीच्या आधारे ‘डेल्टा टी चार्ट’ चा संदर्भ घेऊन कीडनाशकांच्या फवारण्या घेतल्या जातात. या चार्टचा वापर पुढील भागात पाहूया. १०) बाष्पीभवन मापक राहुल यांचे घर शेत परिसरातच आहे. हे उपकरण घराच्या अंगणात लावले आहे. अमेरिकेतून मागविलेले हे ‘पेटंटेड’ उपकरण आहे. लांब, निमुळत्या, गोलाकार पांढऱ्या बाटलीसाखी त्याची रचना आहे. त्यावर ‘स्केल’ दिलेले आहेत. याच्या वरती चिनी मातीचे भांडे व त्यावर हिरवे कापड असते. हवेतील तापमान व आर्द्रता या दोन बाबींवर कमी झालेले बाष्पीभवन वा त्याचा वेग ते दाखवते. रीडिंग कसे घ्यायचे? या उपकरणात डिस्टील वॉटर भरावे लागते. एकदा भरल्यानंतर ते ३० दिवसांपर्यंत रीडिंग देऊ शकते. यात पाण्याची पातळी खाली जात राहते. उदा. आदल्या दिवशी सकाळी सातला रीडिंग घेतले. ते ९ मिमी होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता पुढील रीडिंग घ्यायचे. ते ३ मिमी आढळले. म्हणजे २४ तासांत ४ मिमी बाष्पीभवन (दोन्ही रीडिंगमधील फरक) झाल्याचे समजते. जोडीला रेनगेज जोडीला रेनगेजही (पर्जन्यमापक) आहे. समजा २४ तासांत ८ मिमी पाऊस पडला, तर आधीचे चार मिमी झालेले बाष्पीभवन लक्षात घेता पुढील चार मिमी बाष्पीभवन होईपर्यंत पाणी देण्याची आवश्‍यकता नाही हे देखील कळते. म्हणजेच शेतीला पाण्याची गरज या उपकरणातून कळते. याची अचूकता ७ ते १० किलोमीटरपर्यंत आहे. सूर्यप्रकाश आठ दिवस नसला तरी होणाऱ्या बाष्पीभवनाचे रीडिंग समजते.   संपर्क- राहुल रसाळ- ९७६६५५०६२४ 

उद्याच्या भागात- शेतात उभारली प्रयोगशाळा. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com