फळबागा केंद्रीत कोरडवाहू शेतीचा साधला विकास

राजाभाऊ रगड यांची सीताफळ लागवड.
राजाभाऊ रगड यांची सीताफळ लागवड.

परभणी जिल्ह्यातील उजळंबा येथील प्रगतिशील शेतकरी राजाभाऊ रगड यांनी हलक्या जमिनीवर उत्पादनाची जोखीम कमी करण्यासाठी फळपिकांचा पर्याय निवडला. सिंचन स्रोतांचे बळकटीकरण केले. सीताफळ, पेरू, लिंबू आदी पिकांच्या माध्यमातून फळबाग केंद्रित शेती विकसित केली. कोरडवाहू शेतीला अनुसरून पीक पद्धती व शेतीचे व्यवस्थापन करणाऱ्या राजाभाऊ यांना पुरस्कार देऊन गौरविण्यातही आले आहे.   कोरडवाहू शेतकऱ्यांना सातत्याने कोरड्या तर काही वेळा ओल्या दुष्काळालाही सामोरे जावे लागत आहे. अवेळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट आदी नैसर्गिक संकटांमुळे खरीप, रब्बी पिकांच्या उत्पादनाची खात्री राहिलेली नाही. सिंचनासाठी पाणी उपलब्धतेची खात्री नसल्याने अनेक शेतकरी सिंचन स्रोतांचे बळकटीकरण करून फळपिकांचे उत्पादन घेत आहेत. परभणी शहरापासून १४ किलोमीटरवर उजळंबा (जि. परभणी) येथे राजाभाऊ बाबाराव रगड यांची ४५ एकर शेती आहे. त्यांनी बीएची पदवी घेतली आहे. क्षेत्र ४५ एकरांपर्यंत असल्याने नोकरीऐवजी त्यांनी शेतीच करण्याचा निर्णय घेतला. पाच वर्षे सरपंचपद भूषविले. त्यानंतर पूर्ण वेळ शेतीतच झोकून दिले. सुरुवातीला गावाजवळील मळ्याच्या जमिनीवर सीताफळ, लिंबू, पेरू आदींची लागवड केली. सध्याचे फळबाग लागवड क्षेत्र

  • सीताफळ- जुने २.५ एकर, नवे ५ एकर
  • पेरू- जुने २.५ एकर, नवे ८ एकर
  • लिंबू- १२ एकर
  • उर्वरित क्षेत्र शेततळे, शेतरस्ते, विहिरी आदींसाठी आहे.
  • जमीन सुधारणा, सिंचन बळकटीकरण हलकी मुरमाड जमीन असल्याने फळबाग लागवडीसाठी खोदलेल्या खड्ड्यात काळी माती आणून टाकावी लागली. दगडगोटे काढून टाकले. अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याऱ्या उपाययोजना केल्या. तीन विहिरी आहेत. परंतु पाणी दरवर्षी जेमतेम फेब्रुवारी-मार्चपर्यंत पुरेशा प्रमाणात उपलब्ध असते. दुष्काळी परिस्थितीत टॅंकरने पाणी विकत घेऊन फळबागा वाचविल्या. त्यानंतर तीन विहीरींजवळ मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत शेततळे खोदले. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरून विहिरींची पाणीपातळी वाढली. राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानांतर्गत प्लॅस्टिक अस्तरीकरण असलेले शेततळे उभारले. एकूण एक कोटी लिटर पाणीसाठवण क्षमता निर्माण झाली. ठिबक सिंचन व जोडीला उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर यामुळे फळपिकांपासून वर्षभर उत्पादन घेणे शक्य होत आहे. सीताफळ शेती सन २०१३ मध्ये अडीच एकरांत सीताफळांच्या बाळानगर जातीच्या झाडांची १० बाय १० फूट अंतरावर लागवड केली. दरवर्षी उन्हाळ्यात शेणखत आणि जून महिन्यात रासायनिक खते, सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा देण्यात येतात. अडीच एकरांतून पहिले उत्पादन ५० क्विंटलपर्यंत तर पुढील वर्षी ते १०० क्विंटलपर्यंत पोचले. सीताफळाचा हंगाम सप्टेंबर-ऑक्टोबर कालावधीत असतो. यंदा हंगामास उशीर झाला. यंदा दीडशे क्विंटलपर्यंत उत्पादन अपेक्षित आहे. परभणी येथील बाजारपेठेत ३५० ते ५०० प्रति क्रेट तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर ४० ते ८० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. यंदा पाच एकरांवर सीताफळाच्या सुपर गोल्ड जातीची लागवड होणार आहे. लिंबू उत्पादन सुमारे सात वर्षांपूर्वी १२ एकरांत लिंबाची (प्रमालिनी वाण) २० बाय २० फूट अंतरावर लागवड केली. प्रति एकरी झाडांची संख्या ११० आहे. मृग आणि आंबिया असे बहार घेतात. वर्षभर कमी अधिक प्रमाणात उत्पादन सुरू असते. उन्हाळ्यात दर चांगले मिळतात. चांगल्या वाढ झालेल्या झाडापासून एक क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. प्रतवारी केल्यानंतर क्रेटमध्ये भरून वाहनांद्वारे परभणी येथील मार्केटमध्ये लिंबे पाठवली जातात. सन २०१७ मध्ये पंजाब राज्यातील अमृतसर येथे २५ क्विंटल लिंबू पाठविले होते. यंदा सरासरी ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो दर मिळाले. वर्षभरात १२ एकरांतून १२० टन उत्पादन मिळाले. पेरू उत्पादन पेरूच्या लखनौ ४९ जातीची लागवड अडीच एकरांत आहे. प्रति झाड सरासरी ५० किलो उत्पादन मिळते. परभणी, नांदेड येथील व्यापाऱ्यांना विक्री होते. गेल्या वर्षी प्रति किलो १० ते १५ रुपये दर मिळाले. शेतमाल साठवणुकीची व्यवस्था शेतमाल साठवणुकीसाठी ग्रामीण गोदाम योजनेतून ६० बाय ३० फूट आकाराचे गोदाम तर ४० बाय २० फूट आकारमानाचे पॅकहाउस बांधले. ट्रॅक्टर, पाॅवर टिलर, बैलजोडी, चार सालगडी आहेत. फळांच्या विक्रीसाठी चुलतभावांची मदत होते. फळबागांमुळे स्थानिक महिलांना सुमारे दहा महिने रोजगार मिळतो. रोपवाटिका यंदापासून लिंबू आणि पेरूची शासनमान्य रोपवाटिका सुरू केली आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार रोपांचा पुरवठा होतो. त्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळते. कोरडवाहू शेतकरी पुरस्कार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत अखिल भारतीय समन्‍वयित संशोधन प्रकल्‍पाच्‍या कोरडवाहू शेती संशोधन केंद्रातर्फे उजळंबा येथे हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषी उपक्रम प्रकल्प (निकरा) राबविण्यात येत आहे. राजाभाऊंनी प्रकल्पांतर्गत शेततळ्यातील पाण्याचा कार्यक्षम वापर करून उत्पादनात वाढ केली. सीताफळ, पेरू अशा कोरडवाहू फळपिकांची लागवड केली. विद्यापीठ विकसित सोयाबीनचे सुधारित वाण, आंतरपीक पद्धती, रुंद वरंबा सरी पद्धतींचा वापर करून कोरडवाहू शेतीत शाश्‍वत उत्‍पादन मिळविले. या कामगिरीबद्दल भारतीय कृषी संशोधन परिषदेंतर्गत हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेतर्फे उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार देऊन राजाभाऊंना सन्मानित करण्यात आले आहे. ग्रामविकासात कामगिरी राजाभाऊ २००५ ते २०१० या कालावधीत उजळंबा ग्रामपंचायतीचे सरपंच होते. या काळात गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक, फुले-शाहू-आंबेडकर स्वच्छता, अंगणवाडी, महात्मा गांधी तंटामुक्त गाव आदी पुरस्कार लाभले. महात्मा जोतिराव फुले जलसंधारण अभियानांतर्गत गाव शिवारात ५० वनराई बंधाऱ्यांची उभारणी झाली. तत्कालीन कृषी सचिव जे. एस. सहारिया यांनी शिवारात भेट देऊन कामांची दखल घेतली. संपर्क- राजाभाऊ रगड- ८००७५५०४४४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com