सत्तावीस एकरांतील चंदनासह एकात्मिक फळबाग !

चंदन लागवडीची माहिती घेताना शेतकरी.
चंदन लागवडीची माहिती घेताना शेतकरी.

पिंपळनेर (ता. पारनेर, जि. नगर) येथील राजेंद्र रावसाहेब गाडेकर यांनी माळरानावर तीस एकरांत डाळिंब, संत्रा, आवळा, सीताफळ आणि त्यात आंतरपीक चंदन अशी एकात्मिक पीकपद्धतीची शेती केली आहे. बाजारात असलेला उंची दर, अर्थकारण व अन्य राज्यांना भेटी देऊन चंदन हे पीक त्यांनी निवडले. त्याच्या सुमारे नऊ हजार झाडांची जोपासना करण्याबरोबर अन्य फळपिकांमध्येही त्यांनी मास्टरी मिळवली आहे.   नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील पानोलीचे मूळ रहिवासी असलेले राजेंद्र गाडेकर सध्या पिंपळनेर येथे राहतात. त्यांनी दहा वर्षांपूर्वी संत निळोबाराय यांचे समाधिस्थळ असलेल्या पिंपळनेर शिवारातील माळरानावर ३० एकर जमीन खरेदी केली. हे क्षेत्र म्हणजे जवळपास डोंगरच होता. त्याचे सपाटीकरण करून ती लागवडीयोग्य करण्याचे कष्ट उपसले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रेरणा घेऊन फळझाडेकेंद्रित शेती करण्यावर भर दिला. चंदन लागवडीचा निर्णय गाडेकर यांचे डाळिंब पीक होते. मात्र, तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव, पडलेले दर यामुळे मध्यंतरीच्या काळात हे पीक धोक्यात आले. त्याच काळात चंदन लागवडीबाबत माहिती मिळाली. कर्नाटक भागात या पिकाची शेती विकसित झाली आहे, हे माहीत असल्याने तेथे व गुजरात राज्यात काही ठिकाणी प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्याचे दर, अर्थकारण, जोखीम या बाबी अभ्यासल्या. अखेर आंतरपीक म्हणून त्याची लागवड करण्याचे पक्के केले. लागवडीचे नियोजन, व्यवस्थापन

  • सन २०१७-१८ मध्ये मदुराई (तमीळनाडू) येथून सफेद चंदनाची रोपे आणली.
  • दोन टप्प्यांत एकाच वर्षात सुमारे सत्तावीस एकरांत डाळिंब, संत्रा, आवळा, सीताफळ आदी पिकांत चंदनाच्या सुमारे नऊ हजार रोपांची लागवड. असा प्रयोग करणारे गाडेकर हे जिल्ह्यातील पहिलेच शेतकरी असावेत.
  • सद्यःस्थितीतील पिके - १३ एकर डाळिंब, ४ एकर संत्रा, ९ एकर सीताफळ, एक एकरावर आंबा व आवळा
  • चंदनाच्या झाडाला साधारण तीन वर्षांत बिया येतात. त्यांना ३०० ते ६०० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. यंदापासून विक्रीचे नियोजन.
  • संपूर्ण तीस एकरांत ठिबक. सामूहिक शेततळे योजनेतून एक कोटी ७५ लाख लिटर क्षमतेचे शेततळे. दोन विहिरींचा आधार.
  • चंदनाला आठवड्याला ४ लिटर पाणी पुरते.
  • मिलिया डूबिया, कडुनिंब लागवड चंदन हा परोपजीवी वृक्ष आहे, त्यामुळे आधारासाठी मिलिया डूबियाच्या दोन हजार झाडांची लागवड केली आहे. हे झाड सातव्या वर्षी तोडणीला येते. काडीपेटी निर्मिती, तसेच जहाजांसाठी लागणारे लाकूड, प्लायवूड यासाठी झाडाचा वापर होतो. त्यापासूनही चांगल्या उत्पन्नाची गाडेकर यांना आशा आहे. या भागात प्रयोग म्हणून मोहाच्या दहा झाडांची लागवड केली आहे. चंदनाचे झाड स्वतः अन्न तयार करीत नाही. त्याच्याशेजारी कडुनिंबाचे झाड असले तर चंदनाच्या वाढीला फायदा होतो. त्यामुळे प्रत्येक चंदनाजवळ एक अशी कडुनिंबाची पाच हजार झाडे लावली आहेत. काटेरी वनस्पतीचे व सौर कुंपण या भागात हरिणांसह अन्य वन्यप्राण्यांचा वावर आहे. चंदनाची भविष्यात चोरीही होऊ शकते, त्यामुळे झाडांच्या सुरक्षेसाठी शिकेकाई, सागरगोटा, केकताड आदी काटेरी वनस्पतींची व सौर कुंपणाची सुविधा केली आहे. फळपिके देताहेत उत्पन्न सीताफळाची जुनी साडेचार हजार झाडे आहेत. प्रत्येक झाड सुमारे २५ ते ३० किलो फळ देते. त्यास किलोला ६० ते १०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. संत्र्याचे चार एकरांत ५० टन उत्पादन, तर ६ ते ७ रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे. आवळ्याचे अर्ध्या एकरात अडीच टनाचे उत्पादन, तर ५० ते ६० रुपये दर मिळाला आहे. डाळिंबदेखील उत्पन्नाचा स्रोत झाले आहे. पुणे आणि मुंबई या बाजारांत विक्री होते. दर्जेदार उत्पादनामुळे थेट खरेदीदारांशी संपर्क वाढला आहे. दहा ते पंधरा एकरांवर ताग दरवर्षी दहा ते पंधरा एकरांवर हिरवळीच्या खतासाठी तागाची लागवड होते. यंदा त्याच्या बियाण्याची विक्री करण्याचे नियोजन आहे. त्याच्या बियाण्याला ७० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. यंदा दीड एकरात खरीप बाजरीचे आंतरपीक, तर सात एकरांवर ताग घेतला आहे. याआधीही कांदा, हरभरा, तुरीचेही आंतरपीक घेऊन उत्पन्न मिळवले आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती तीस एकरांवरील फळझाडांना रासायनिक खत दिले जात नाही. त्याऐवजी शेणखत आणि गांडूळ खताचा वापर करतात. पीक अवशेष, हिरवळीच्या खतांचाही वापर होतो. त्याच्या वापरातून घेतल्या जाणाऱ्या उत्पादनाची सध्या सर्वदूर चर्चा होत आहे. पत्नी सौ. शारदा व शिक्षण घेत असलेली मुले साहिल व संपदाही वेळप्रसंगी शेतीत मदत करतात. नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच चंदनाची रोपवाटिका सुरू केली आहे. ३० ते ६० रुपये प्रतिरोप याप्रमाणे आतापर्यंत १३ हजार रोपांची विक्री केली आहे. एकात्मिक फळशेती आणि चंदनाची माहिती घेण्यासाठी आतापर्यंत दोन हजारांवर शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. गाडेकर यांची प्रेरणा घेत पिंपळनेरचे बबनराव लटांबळे व प्रवीण गाजरे यांनीही शेवग्यात चंदनाची लागवड केली आहे. गाडेकर यांच्याकडील वृक्षसंपदा संत्रा- १६००, डाळिंब- ६०००, सीताफळ- ८०००, आवळा व आंबा- प्रत्येकी ४०, चंदन- ९ हजार, कडुनिंब- ५ हजार, शेवगा- ५०, नारळ- १०, पेरू- २५, मिलीया डूबिया- २०००   चंदनाचे अर्थकारण गाडेकर सांगतात की साधारण आठ वर्षांनंतर उत्पादन घेता येते. मात्र मी १३ ते १५ वर्षांनंतरच त्याचा विचार करणार आहे. कर्नाटक राज्यात १३ वर्षे वयाच्या झाडापासून सुमारे २९ किलो उत्पादन मिळाले आहे. त्याला ९००० रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे. भविष्यात हे पीक आर्थिकदृष्ट्या निश्‍चित फायदेशीर ठरू शकते. संपर्क- राजेंद्र गाडेकर- ९६७३४२१४१२  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com