agriculture story in marathi, Rajesh Patil is doing successful sericulture with precise management. | Agrowon

अभ्यासपूर्ण व्यवस्थापनातून दर्जेदार रेशीम कोषनिर्मिती

चंद्रकांत जाधव
मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021

जळके (ता.जि. जळगाव) येथील राजेश पाटील यांनी केळी, कापूस व अन्य नगदी पिकांची प्रगतिशील शेती करताना रेशीम उद्योगही सुरू ठेवला आहे. प्रशिक्षण, अन्य शेतकऱ्यांच्या व्यवस्थापनातील त्रुटी अभ्यासून तशी सुधारणा, व्यावसायिक दृष्टिकोन या बळांवर प्रति १०० अंडीपुंजांमागे ८५ किलो दर्जेदार उत्पादन घेत कोषांना सातत्याने चांगले दरही मिळवले आहेत.

जळके (ता.जि. जळगाव) येथील राजेश पाटील यांनी केळी, कापूस व अन्य नगदी पिकांची प्रगतिशील शेती करताना रेशीम उद्योगही सुरू ठेवला आहे. प्रशिक्षण, अन्य शेतकऱ्यांच्या व्यवस्थापनातील त्रुटी अभ्यासून तशी सुधारणा, व्यावसायिक दृष्टिकोन या बळांवर प्रति १०० अंडीपुंजांमागे ८५ किलो दर्जेदार उत्पादन घेत कोषांना सातत्याने चांगले दरही मिळवले आहेत.
 
जळके हे जळगाव जिल्हा- तालुक्यातील प्रमुख गावांपैकी दोन हजार लोकसंख्येचे गाव आहे. शिवारात मध्यम, काळी कसदार जमीन आहे. काही भागांत जलसाठे मुबलक तर काही भागात ते कमी आहेत. मध्यंतरी जलसंधारणाची कामेही झाली. गावातील राजेश पाटील प्रगतिशील शेतकरी असून, त्यांची ६० एकर शेती आहे. इतरांची ४० एकर शेती ते ‘लीज’वर करतात. सहा विहिरी, चार कूपनलिका, ट्रॅक्टर, पाच सालगडी, तीन बैलजोड्या, आठ देशी गायी अशी यंत्रणा त्यांच्याकडे आहे. पत्नी वैशाली, बंधू राहुल यांची शेतीत समर्थ साथ आहे. केळी, कापूस, मका, कांदा, सोयाबीन, पपई, हळद ते घेतात.

रेशीम शेतीची सुरुवात
राजेश यांनी पूरक म्हणून शेळीपालनही केले. काही कारणांमुळे ते बंद करावे लागले. उसाची दरवर्षी ३० एकरात लागवड होती. त्यासाठी गुऱ्हाळही सुरु केले होते. पण जलसंकट व अन्य कारणांमुळे ऊसशेती व गुऱ्हाळही बंद झाले. दरम्यान ‘ॲग्रोवन’मधून रेशीम शेतीची माहिती मिळाली. अधिकारी, तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली. हाच व्यवसाय करायचा निश्‍चित झाल्यावर म्हैसूर (कर्नाटक) येथे दहा दिवसांचे प्रशिक्षण घेतले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, रेशीम अधिकारी रवींद्र सांगळे, श्री. बडगुजर, श्रीकांत झांबरे, संगीता सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.

व्यवस्थापन- ठळक बाबी

  • सध्या पावणेतीन वर्षांचा अनुभव तयार झाला आहे.
  • ‘आरसीसी’चे ७० बाय ४० फूट आकाराचे हवेशीर कीटक संगोपन शेड. मध्यभागातील उंची १५ फूट.
  • बायव्होल्टाइन कीटक. तुतीचे क्षेत्र सहा एकर. जात व्ही-वन. छाटणी, कापणी जेवढी अधिक होईल तेवढा अधिक दर्जेदार पाला उपलब्ध होतो हे सूत्र लक्षात घेऊन त्यानुसार नियोजन. हिवाळ्यात हलक्या जमिनीत महिन्यातून तीनदा तर उन्हाळ्यात चार वेळेस किमान सिंचन.
  • उन्हाळ्यात तापमान नियंत्रित करण्यासाठी शेडच्या आजूबाजूला हिरवे नेट.पाठीवरील बॅटरीचलित पंपाची नळी व ठिबकची नळी याद्वारे नेटवर पाणी सोडून ओलावा तयार केला जातो. त्यामुळे शेडमध्ये थंड हवा तयार होते. फॉगर्सचाही वापर.
  • शेडमध्ये चार मजबूत लोखंडी रॅक्स. (सुमारे सहा हजार चौरस फुटांचे)
  • शेतात मजूर भरपूर आहेत. त्यांची मदत होतेच. शिवाय पाच मजुरांची सतत आवश्यकता.

दर्जेदार चॉकीचा वापर
पूर्वी राजेश अंडीपुंजांचा वापर करायचे. आता रुई (ता. गेवराई, जि. बीड) व धामणगाव (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) येथून चॉकी (लहान अवस्थेतील अळ्या) मागवून घेतात. त्या दर्जेदार असल्याने उत्पादनाचा कालावधी १० दिवसांनी कमी होऊन २१ दिवसांत व तेही दर्जेदार कोषांचे उत्पादन मिळते. बॅचला ११ ते १२ दिवस पाला द्यावा लागतो.

उत्पादन व विक्री
उत्पादकता सांगायची तर प्रति १०० अंडीपुंजांमागे ८० ते ८५ किलो उत्पादन मिळते. प्रति ५०० अंडीपुंजाची बॅच असते. वर्षभरात सुमारे १० बॅचेस होतात. उत्पादन खर्च २० ते २५ टक्के असतो. राजेश सांगतात, की जालना बाजारपेठ जवळ आहे. आमच्या भागात १० किलोमीटर अंतरापर्यंत सुमारे २० रेशीम उत्पादक आहेत. सर्वांचे मिळून उत्पादन तेथे पाठवण्यात येते. आतापर्यंतच्या अनुभवात किलोला ३०० रुपयांपासून ते कमाल ५००, ५५० रुपयांपर्यंत दर ग्रेडनुसार मिळाला आहे. कोविड काळात मात्र दर कमी मिळाले. तरीही विक्री ३५० रुपयांपेक्षा कमी दरात करण्याची वेळ फारशी आलेली नाही. जालना येथील बाजारात जळगावच्या रेशीम कोषांना मोठा उठाव आहे. व्यापारी या उत्पादकांच्या कायम संपर्कात असतात. राजेश सांगतात, की जालना येथे बाजारपेठ असली तरी चॉकीनिर्मिती केंद्र जळगाव जिल्ह्यात उभारण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधी व अन्य यंत्रणांनी त्यात लक्ष घालायला हवे.

‘ॲग्रोवन’ची प्रेरणा
‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून रेशीम शेतीला दिशा मिळाल्याचे राजेश सांगतात.
यात प्रसिद्ध यशकथांपैकी पाच ते सहा रेशीम उत्पादकांकडे प्रत्यक्ष भेट दिल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर एकूण २५ शेतकऱ्यांचीही शेती अभ्यासली. त्यांच्याकडील त्रुटीही जाणल्या. त्यानुसार स्वतःच्या व्यवसायात सुधारणा केल्या. आता दर महिन्याला विविध भागांतून सुमारे ६० ते ८० शेतकरी राजेश यांची रेशीम शेती पाहण्यासाठी येतात. रेशीम शेतीसंबंधीच्या सहा व्हॉट्सॲप ग्रुपवरही राजेश सक्रिय आहेत. चांगल्या व्यवस्थापनातून सुमारे २१ दिवसांत चांगले पैसे देणारा रेशीम शेती हा व्यवसाय असून, आता नवे शेड उभारणार असल्याचेही राजेश सांगतात.

पीक उत्पादनात हातखंडा
केळीची प्रति २० किलोची रास, कापसाचे एकरी सात क्विंटलपर्यंत उत्पादन, सोयाबीन एकरी आठ क्विंटल, मका एकरी २० क्विंटल उत्पादन ते घेतात. मिश्र पिके, आंतरपिकांचे प्रयोगही करतात.

संपर्क- राजेश पाटील, ९४२३१८५५७७


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
शेती- निर्यातक्षम टोमॅटोची, भाग ७ राहुल रसाळ यांच्या व्यावसायिक पीकपद्धतीतील टोमॅटो...
शेळी, कुक्कुटपालनाचे बर्वेंचे आदर्श...माडसांगवी (ता.जि. नाशिक) येथील बापू बर्वे यांनी...
जमीन सुपीकता, पीक फेरपालट हेच सूत्रअनियंत्रित पाणी, खतमात्रा वापरामुळे जमीन सुपीकता...
तेलकट डागविरहित डाळिंब अन् बारमाही...तेलकट डाग, सूत्रकृमी किंवा अन्य कारणांमुळे...
क्रिमसन रेड द्राक्षे व करटुलीचे आंतरपीक...एकच पीक पद्धतीत नैसर्गिक आपत्ती वा कोरोनासारख्या...
कोळींनी जपलेली खपली गव्हाची दर्जेदार...पाच्छापूर (जि. सांगली) येथील महेश नरसाप्पा कोळी...
 ‘आरओ प्लांट’ अन् सेंद्रिय स्लरीनिर्मितीक्षेत्र ६५ एकर असल्याने मजूरटंचाईवर मात...
ट्रायकोडर्मा निर्मितीसाठी शेतात उभारली...राहुल रसाळ यांनी शेत परिसरात छोटेखानी प्रयोगशाळा...
गुणवत्तापूर्ण आंब्याला मिळवली ग्राहक...मालगुंड (ता. जि. रत्नागिरी) येथील विद्याधर...
शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...
जातिवंत पैदाशीसह आदर्श गोठा व्यवस्थापनमाणकापूर (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील प्रफुल्ल व...
युवा शेतकऱ्याचे अभ्यासपूर्ण प्रिसिजन...शेतीतील विज्ञानाचा अभ्यास, विविध देशांतील...
ग्राम, पर्यावरण अन शेती विकास हेच ध्येय...चांदूररेल्वे (जि. अमरावती) येथील साईबाबा ग्रामीण...
बचत अन् पूरक उद्योगातून आर्थिक...भाजीपाला लागवडीसह कुक्कुटपालन, पशुपालन, शिलाईकाम...
तिसऱ्या पिढीने जपला प्रयोगशिलतेचा वारसागोलटगाव (जि. औरंगाबाद) येथील कृषिभूषण सुदामअप्पा...
शेतीमाल मूल्यवर्धनात दत्तगुरू कंपनीची...हिंगोली जिल्ह्यातील प्रयोगशील व अनुभवी शेतकरी...
गाजराचे गाव म्हणून कवलापूरची ओळखकवलापूर (जि. सांगली) गावातील शेतकऱ्यांनी...
सेंद्रिय, रासायनिक पद्धतीने दर्जेदार...मुर्ठा (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथील युवा...
फळबाग केंद्रित व्यावसायिक शेतीचा उभारला...ओणी (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील कृषी...
वाशीच्या बाजारात लोकप्रिय झेंडेचा अंजीर...दुष्काळी पुरंदर तालुक्यात दिवे येथील झेंडे कुटुंब...