दुष्काळात मुक्तसंचार गोठा पद्धतीचा दुग्धव्यवसाय किफायतशीर 

मुक्तसंचार गोठा
मुक्तसंचार गोठा

परभणी जिल्ह्यात राजेवाडी (ता. सेलू) येथील गणेशराव काष्टे यांनी दुष्काळात सातत्याने संकटात येणाऱ्या शेतीला संकरीत गायींच्या दुग्धव्यवसायाची जोड देत उत्पन्नाची स्थिरता निर्माण केली आहे. दुग्धव्यवसाय आणि मुक्त संचार गोठा पद्धतीचे प्रशिक्षण घेत व्यवस्थापन सुधारण्यावर भर दिला आहे.  गावात दूध संस्थेची स्थापना करून स्वतःबरोबर परिसरातील दूध उत्पादकांचाही दूधविक्रीचा प्रश्‍न  सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.  परभणी जिल्ह्यात राजेवाडी (ता. सेलू) येथील गणेशराव रखमाजी काष्टे यांची खोल काळी माती असलेली तेरा एकर जमीन आहे. त्यांचे शिक्षण एमएपर्यंत (अर्थशास्त्र) झाले आहे. शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागत घरच्या शेतीतच प्रगती करण्याचे त्यांनी ठरवले. सन २००४ पासून ते शेती व्यवसायात कार्यरत आहेत. सिंचनासाठी विहीर आणि बोअरची व्यवस्था आहे. गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेती हंगामी बागायती झाली आहे. दरवर्षी सोयाबीन अधिक तूर सहा ते सात एकर, हळद अडीच ते तीन एकर, कापूस दोन एकर असे नियोजन असते. दोन एकरांवर चारापिके असतात. यंदा कपाशीत मुगाचे आंतरपीक घेतले आहे. रब्बीत हरभरा आणि ज्वारी असते.  दुग्धव्यवसायाचा पर्यायी स्त्रोत  शेतीला उत्पन्नाचा पर्यायी स्त्रोत म्हणून गणेशराव आणि गावातील काही मित्रांनी दुग्धव्यवसाय करण्याचे ठरविले. त्यासाठी नगर जिल्ह्यातील लोणी (प्रवरानगर) येथून ‘एचएफ’ जातीच्या गायी खरेदी करीत  २००६ मध्ये दुग्धव्यवसाय सुरू केला. त्या वेळी शासकीय दुग्ध योजनेंतर्गंत दुधाला प्रतिलिटर ९ रुपये दर मिळत होता. या व्यवसायातून दररोजचे उत्पन्न मिळू लागले; परंतु दुष्काळी स्थितीमुळे पाण्याची उपलब्धता कमी झाली. मग व्यवसाय बंद करावा लागला. तरीही यातील अनुभव स्वस्थ बसू देत नव्हता. दरम्यानच्या काळात निम्न दुधना धरणाच्या कालव्यामुळे पाण्याची उपलब्धता झाली. मग मात्र २०१६ मध्ये पुनःश्‍च दुग्धव्यवसायाचा श्रीगणेशा केला.  पुन्हा एकदा व्यवसायाचे नियोजन  नेकनूर (जि. बीड) येथील बाजारातून दोन एचएफ गायी घेतल्या. टप्प्याटप्प्याने अजून खरेदी सुरू झाली. सध्या काष्टे यांच्याकडे नऊ एचएफ गायी आहेत. वर्षभर व्यवसाय सुरू राहील या पद्धतीने गायींचे व्यवस्थापन केले जाते. सध्या तीन गायींपासून दूध उत्पादन मिळत आहे.  व्यवसायाचे प्रशिक्षण  गेल्या वर्षी काष्टे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गोकूळ दूध संघाअंतर्गत चिखली (निपाणी) येथील अरविंद पाटील यांच्या डेअरी फार्ममध्ये मुक्तसंचार गोठा व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतले. त्यात शिकायला मिळालेल्या बाबींवर आधारे पुढील आखणी केली.  मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब  पूर्वी गोठ्याला लागून ९५ बाय ३८ फूट आकाराची मोकळी जागा होती. त्याला तिन्ही बाजूंनी लोखंडी जाळी लावून कुंपण तयार केले. पाणी पिण्यासाठी दोन ठिकाणी पाण्याचे हौद बांधले आहेत.  गोठ्याच्या एका बाजूला ३२ फूट लांबीची गव्हाण आहे. सिमेंट काँक्रीटच्या बांधकामातून  जनावरांना जमिनीवर व्यवस्थित बसण्याची व्यवस्था केली आहे. दुसऱ्या बाजूला चिंच आणि कडूनिंबाचे झाड आहे. या दोन्ही झाडांखाली गायी निवारा घेऊ शकतात.  मुक्त संचार गोठ्याचे फायदे  सेलू-राजेवाडी भागात उन्हाळ्यात ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असते. अशावेळी पत्र्याचा निवारा असलेल्या बंदिस्त गोठ्यातील वातावरण या संकरीत गायींना मानवत नाही. त्यांच्यासाठी मुक्त संचार गोठा पद्धती फायदेशीर ठरते. विनादोरखंड मोकळेपणे फिरता येते. दुधाळ जनावरांना कासदाह रोग, गोचीड यांचा त्रास होत नाही. जनावरांना चारा व पाणी घेण्यासाठी  मुक्त वातावरण मिळते. परिणामी, त्यांचे आरोग्य चांगले राहते. गोठ्यामध्ये कोंबड्या फिरतात. त्यामुळे गोचीड तसेच अन्य किडींचा त्रास होत नाही.  आहाराचे व्यवस्थापन  किफायतीशर दुध उत्पादनाच्या दृष्टीने जनावरांना सकस खाद्य देणे आवश्यक समजून दोन एकर क्षेत्र केवळ चाऱ्यासाठी राखीव ठेवले आहे. थोड्या-थोड्या क्षेत्रावर यशवंत, गजराज, यशवंत, बाजरी.  कडवळ, आफ्रिकन टॅाल मका आदी चारापिकांची लागवड होते. वर्षभर चारा पुरेशा प्रमाणात राहील याची काळजी घेतली जाते. हिरव्या तसेच वाळलेल्या चाऱ्यासोबत क्षारांचे मिश्रण तसेच कुट्टीद्वारे चारा देण्यात येतो. या सर्व बाबींमधून दुधाचा दर्जा चांगला ठेवण्याचा प्रयत्न असतो. सरकीची पेंड प्रतिलिटर दुधासाठी ४०० ग्रॅम याप्रमाणे दिली जाते. वेळोवेळी आरोग्याची तपासणी; तसेच आजारांचे प्रतिबंधक लसीकरणही केले जाते.  सहकारी संस्थेमार्फत दूधपुरवठा  वर्षभर दररोजचे सरासरी २५ लिटरच्या पुढे दूधसंकलन होते. परिसरातील काही शेतकरीदेखील  दुग्धव्यवसायात कार्यरत आहेत. सर्वांकडील दुधाची सुकर विक्री व्हावी यासाठी गणेशरावांच्या पुढाकारातून गावात माउली सहकारी दूध उत्पादक व पुरवठा संस्थेची स्थापना झाली आहे. संकलन झालेले सर्व दूध वाहनाद्वारे शासकीय दूध योजनेंतर्गत परभणी येथील दुग्धशाळेकडे पाठविले जाते. दुधाला फॅट, एसएनएफ नुसार दर सध्या २५ ते २८ रुपये प्रतिलिटर दर मिळतो आहे. गणेशरावांनी ‘मिल्किंग मशिन’चा वापर सुरू केल्याने सहजरीत्या कमी वेळेत संपूर्ण, स्वच्छ दूध मिळण्यास मदत होते.  शेतीतील उत्पन्नाची जोड  दुग्धव्यवसायवर लक्ष केंद्रित करताना गणेशरावांनी शेतीकडेही दुर्लक्ष केलेले नाही. सोयाबीनचे एकरी ८ ते १० क्विंटल, तुरीचे चार क्विंटल, हळदीचे (वाळलेल्या) १६ ते १८ क्विंटल, कोरडवाहू हरभऱ्याचे ७ ते ८ क्विंटलपर्यंत उत्पादन ते घेतात. रब्बी ज्वारीचे एकरी ५ क्विंटल उत्पादनाबरोबर कडबाही मिळतो. दुग्धव्यवसाय व शेती अशी योग्य सांगड घातल्याने उत्पन्नाची पातळी वर्षभर चांगली ठेवण्यात गणेशराव यशस्वी झाले आहेत. 

संपर्क- गणेश काष्टे - ९४२२५६९८६१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com