आंबा, काजू, फणसापासून चॉकलेट मोदकांची निर्मिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोरे (वाडोस) येथील रामचंद्र धुरी यांनी आंबा, काजू व फणसांवर आधारित चॉकलेट निर्मिती व्यवसाय चिकाटीने यशस्वी केला. बाजारपेठेची मागणी ओळखून अजून मूल्यवर्धन करताना चॉकलेट मोदकनिर्मिती करून त्यासही बाजारपेठ देत वार्षिक उलाढाल ६० लाखांवर पोहोचवली आहे.
काजू मोदक व त्याचे पॅकिंग.
काजू मोदक व त्याचे पॅकिंग.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोरे (वाडोस) येथील रामचंद्र धुरी यांनी शून्यातून सुरुवात करीत आंबा, काजू व फणसांवर आधारित चॉकलेट निर्मिती व्यवसाय चिकाटीने यशस्वी केला. बाजारपेठेची मागणी ओळखून अजून मूल्यवर्धन करताना चॉकलेट मोदकनिर्मिती करून त्यासही बाजारपेठ देत वार्षिक उलाढाल ६० लाखांवर पोहोचवली आहे.   सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील मोरे (वाडोस) गावात आंबा, काजू, बांबूसह भातशेती केली जाते. गावातील रामचंद्र धुरी यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण माणगाव येथे घेतले. पुढे ‘डीएड’साठी त्यांचा प्रवेश निश्‍चितही झाला. परंतु घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची आणि त्यातही सर्व जबाबदारी रामचंद्र यांच्यावर होती. त्यामुळे उत्पन्नस्रोत सुरू ठेवण्यासाठी त्यांना नोकरीशिवाय पर्याय नव्हता. एक वर्ष हॉटेलमध्ये त्यानंतर माणगाव येथील डॉ. हेडगेवार स्मृती सेवा केंद्रात सहा वर्षे नोकरी केली. येथेच त्यांच्या मनात स्वयंरोजगाराची बीजे रोवली गेली. व्यवसायाला प्रारंभ नोकरी करीत असताना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वयंपूर्ण व्हावे, असे धुरी यांना सतत वाटायचे. परिसरातील प्रमुख शेतीमाल उत्पादनात काजू महत्त्वाचा घटक होता. त्याची बाजारपेठेतील मागणी पाहून मग घरीच काजू प्रकिया युनिट सुरू करण्याचे निश्‍चित केले. परंतु समोर भांडवलाचा प्रश्‍न उभा राहिला. सुरुवातीला किमान ५० हजार रुपयांची गरज होती. बँकेकडे कर्ज प्रस्ताव केला. सतत पाठपुरावा केल्यानंतर अखेर कर्ज मंजूर झाले. अनुभव, बाजारपेठेतील मागणी यानुसार मग विस्तार करण्याचे ठरवले. माणगाव येथे भाडेतत्त्वावर जागा घेतली. आज त्याच जागी प्रकिया व्यवसाय कार्यरत आहे. चॉकलेट उत्पादने सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. शिवाय गोवा राज्यही लगतच असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यांना कोकणातील फळांची चव बारमाही चाखता येत नाही. मग धुरी यांनी २०१२ च्या सुमारास आंबा, काजू व फणस यावर आधारित चॉकलेट निर्मितीला सुरुवात केली. गुणवत्ता व स्वादाच्या निकषावर ही चॉकलेट्स पर्यटकांच्या पसंतीला उतरली. कोरोना संसर्गामुळे मार्च २०२० मध्ये देशात लॉकडाउन करण्यात आले. पुढेही हे संकट कायमच राहिले. पर्यटकांचे येणे थांबले. दुकाने बंद झाली. संपूर्ण व्यापार थांबला. त्याचा मोठा फटका धुरी यांनाही बसला. मार्च ते जुलै हे पाच महिने प्रकिया उद्योगाचे कामच ठप्प झाले. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक महिला कामगाराच्या हाताला देखील काम नव्हते. मोदकांनी घालवली निराशा संकटातच मार्ग मिळतो असे म्हणतात. संकटांमुळे कासावीस असलेल्या धुरींबाबतही असेच झाले. त्यांनी प्राप्त स्थितीत नवे पर्याय शोधण्यास सुरुवात केली. गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात मोदकांची मागणी असते. ही संधी हेरून काजू, आंबा, फणसांपासून साधे व चॉकलेट मोदक तयार करण्यास सुरुवात केली. गावोगावी त्यांची विक्री केली. हा प्रयोग कोरोना संकटातील निराशेला कमी करणारा ठरला. आता व्यवसायाने पुन्हा गती घेतली आहे. कायमस्वरूपी १२ महिला व तीन स्थानिक पुरुषांना या व्यवसायाने रोजगार उपलब्ध केला आहे. शिवाय हंगामातही २५ पर्यंत महिलांना रोजगाराचे साधन तयार होते. उत्पादन निर्मितीचे नियोजन पत्नी संपदा सांभाळतात. त्यामुळे धुरी यांना ‘मार्केटिंग’, विक्री व अन्य कामे करणे सोपे जाते. त्यांची पाच एकर शेतीही आहे. अलीकडे त्यात काजूच्या ३०० झाडांची लागवड केली आहे. उद्योगाची वाटचाल उत्पादनांसाठी लागणारा सुमारे आठ टनांपर्यंत काजूगर प्रतवारीनुसार परिसरातील लघू प्रक्रिया उद्योगाकडून खरेदी केला जातो. रसाळ फणसाची ६ टनांपर्यंत गरज असते. तो प्रति किलो सहा रुपये दराने खरेदी होतो. हापूस आंबा खरेदी करून आपल्या मित्राच्या युनिटमधून साडेचार टनांपर्यंत पल्प तयार करून घेतला जातो. गरजेनुसार त्याचा वापर होतो. आंबा, काजू व फणस अशा तीनही चॉकलेट मोदकांच्या १० ग्रॅमचा दर सुमारे १२० रुपये आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार २१ मोदकांचे पाकीटही तयार केले आहे. या व्यतिरिक्त आंबा वडी, पोळी, फणसवडी, काजूगर यांचीही ग्रेडिंगप्रमाणे विक्री होते. सन २००६ मध्ये घरगुती स्वरूपात सुरू केलेल्या या उद्योगात आता १५ वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. वार्षिक उलाढाल सुमारे ५० ते ६० लाख रुपयांपर्यंत नेण्यापर्यंत प्रयत्न धुरी यांनी केला आहे. त्यातील मोदक व्यवसायाची उलाढाल १५ लाख रुपयांपर्यंत आहे. ‘मूनलाइट’ ब्रँडखाली चॉकलेट्स तर निधी ब्रँडखाली मोदकांची विक्री केली जाते. मुंबई, गोवा, पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील स्थानिक बाजारपेठांमध्ये तसेच पर्यटकांकडून उत्पादनांना मागणी असते. सन २०१६ मध्ये धुरी यांनी गोव्यातील प्रसिद्ध ‘कळंगुट बीच’च्या सान्निध्यात भाडेतत्त्वावर गाळा घेत तेथे थेट विक्री केंद्र सुरू केले आहे. कष्टांतून केले साध्य सुरुवातीला उत्पादनांची विक्री करण्यासाठी धुरी एसटी बसमधून प्रवास करीत. व्यवसायात थोडाफार जम बसल्यानंतर त्यांनी ‘सेंकडहॅन्ड’ स्कूटर खरेदी केली. त्यावरून ते जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडे माल पुरवीत. त्यानंतर मोटरसायकल, जुनी व्हॅन आणि आता नवी जीपगाडी घेतली आहे. त्यातून मालाची वाहतूक करणे सुकर झाले आहे. बॅंकेत तयार केली पत सन २०१२ मध्ये उद्येागासाठी दोन लाख रुपये कर्ज घेतले. खेळत्या भांडवलाची गरज भासत असल्याने ‘कॅश क्रेडिट’ची मर्यादा पाच लाखांवर नेली. कर्जाची वेळेत परतफेड होत असल्यामुळे बँकेत पत निर्माण झाली. आजमितीला बँकेत नऊ लाख रुपयांचे ‘कॅश क्रेडिट’ ठेवण्यापर्यंत पत तयार केली आहे. तरीही नाही डगमगले नेहमीप्रमाणे लाखो रुपयांचा माल पुरविला आणि अचानक ‘लॉकडाउन’ची घोषणा झाली. तो व्यापाऱ्यांकडे पडून राहिला. अशातच काही महिने कालावधी गेला. पुरविलेल्या मालाची अंतिम तारीख संपली. यात चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. पण धुरी डगमगले नाहीत. नव्या यंदा गणेशोत्सवासाठी १५ हजार मोदक बनविले आणि त्यांची यशस्वी विक्री देखील केली. आता हक्काच्या जागेत उद्योग सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी माणगाव येथे जमीन खरेदी देखील केली आहे. संपर्क-  रामचंद्र धुरी, ९४२११९०१४९, ९८३४६२३४७६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com