अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल दोनच दिवसांपूर्वी दिल्ल
यशोगाथा
गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादनात ‘मास्टर’
सांगली जिल्ह्यातील नेहरूनगर (निमणी) (ता. तासगाव) येथील अभ्यासू, प्रयोगशील युवा शेतकरी रामदास मारुती जाधव यांनी सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादनाचा ध्यास ठेवला. त्यानुसार उत्कृष्ट व्यवस्थापनातून आगाप हंगाम व सुपर सोनाका वाण उत्पादनात ‘मास्टरी’ मिळवली आहे.
सांगली जिल्ह्यातील नेहरूनगर (निमणी) (ता. तासगाव) येथील अभ्यासू, प्रयोगशील युवा शेतकरी रामदास मारुती जाधव यांनी सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादनाचा ध्यास ठेवला. त्यानुसार उत्कृष्ट व्यवस्थापनातून आगाप हंगाम व सुपर सोनाका वाण उत्पादनात ‘मास्टरी’ मिळवली आहे.
सांगली जिल्ह्यातील तासगाव द्राक्षशेतीत आघाडीचा तालुका आहे. येथील पश्चिम भागात सांगली-पलूस मार्गावरील नेहरुनगर (निमणी) हे गाव आहे. गावातील युवा, अभ्यासू व प्रयोगशील द्राक्ष उत्पादक म्हणून आज रामदास मारुती जाधव यांनी पंचक्रोशीत नाव कमावले आहे. बारावीनंतर ‘ॲग्री डिप्लोमा’चे शिक्षण घेऊन त्यांनी २००४ च्या सुमारास शेतीत करिअर करण्यास सुरुवात केली. अर्थात, यांच्या या प्रगतीसाठी थोडे मागे जावे लागेल.
वडिलांची मेहनत
वडील मारुती यांचे शिक्षण जुनी पाचवी. इच्छा असूनही आर्थिक परिस्थिती नसल्याने पुढचे शिक्षण त्यांना घेता आले नाही. त्यांच्याकडे ऊस होता. तालुक्यात द्राक्ष शेती वाढू लागली. तसा त्याचा अभ्यास परिसरातील शेतकऱ्यांनी सुरू केला. काळाची पावले उचलत १९८० च्या दरम्यान मारुती यांनी अर्धा एकरांत द्राक्ष लागवड केली. त्यातील बारकावे जाणून घेतले. सन १९८८ मध्ये नेहरूनगर ही स्वतंत्र ग्रामपंचायत झाली. त्याचे पहिले सरपंच होण्याचा मान मारुती यांना मिळाला.
रामदास यांच्या आजोबांनी १९३८ साली विहीर घेतली होती. त्याच पाण्यावर शेती पिकवली जात होती.
आईने सांभाळली जबाबदारी
सरपंच म्हटलं की नेत्यांच्या गाठी भेटी, विकासकामे आदी बाबी आल्याच.ते सांभाळून द्राक्ष बागेकडे पूर्ण लक्ष देण्यास वेळ मिळेना. मग शेतीची संपूर्ण जबाबदारी रामदास यांच्या आई लक्ष्मी यांनी घेतली. रामदास देखील आईच्या सोबतीने शेतीचा अनुभव सुरवातीपासून घेऊ लागले. पुढे ते त्यात पारंगत झाले.
पाणीयोजना
तासगाव तालुक्यात पाणीटंचाई कायम असतेच. त्यावर उपाय शोधण्यासाठी १९९७ मध्ये मारुती जाधव यांच्यासह अन्य गावातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेत धनगाव येथून १३ किलोमीटर पाइपलाइन केली. गावात शेतीसाठी पाणी आले. प्रकाश जलसिंचन योजना सुरू झाली. सुमारे १३०० एकर व ५२७ शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला. त्याद्वारे गावातील द्राक्षक्षेत्रात वाढ होण्यास मदत झाली.
शेतीतील करिअर
२००४ च्या दरम्यान रामदास यांनी द्राक्ष पिकाचे व्यवस्थापन हाताळण्यास सुरुवात केली.
आई-वडिलांकडून झालेले मार्गदर्शन तसेच स्वयंअभ्यासही सुरू केला. विविध प्रयोग सुरू केले.
घडांची संख्या कमी -अधिक ठेवणे, वजन, आकार, लांबी अशा अनेक गोष्टी लक्षात ठेवून निष्कर्ष काढून पुढील हंगामात त्यानुसार अवलंब करण्यास सुरवात केली. गुणवत्तेचा ध्यास, शिकाऊवृत्ती व सातत्य यातून रामदास आज द्राक्षशेतीत मास्टर झाले आहेत.
द्राक्षशेतीतील व्यवस्थापन
- एकूण शेती- ११ एकर
- द्राक्षवाण सुपर सोनाका- ८ एकर
- माणिक चमन- ३ एकर
- खरड छाटणी- २० मार्च ते १० एप्रिलअखेर
- फळ छाटणी- २५ सप्टेंबर ते ५ नोव्हेंबर
- जमिनीची प्रत चांगली ठेवण्यावर भर
- नऊ बाय ५ फूट लागवड अंतर
- वर्षातील दोन्ही छाटणीत शेणखताचा वापर
- उसाच्या पाचटाचे आच्छादन
- एकाच वेलीवर २५ ते ३० काड्या ठेवल्या जातात
- एका काडीवर दोनच घड
- घडांचा आकार एकसमान ठेवण्याचा प्रयत्न
- प्रति वेलीवर ४० ते ४५ घड
- घडांची संख्या मर्यादित ठेवल्याने फुगवण, रंग, जाडी, वजन व गोडी चांगली मिळते.
- त्यामुळे व्यापाऱ्यांकडून अधिक मागणी
- सुपर सोनाका घडाला मण्यांची संख्या १५० ते २०० तर माणिक चमनसाठी १००
- व्हॉटस ॲप ग्रुप स्थापन करून त्याद्वारे ज्ञान व तंत्रज्ञान यांची देवाणघेवाण.
उत्पादन व दर
- आगाप छाटणी घेतल्याने द्राक्षाचा दर्जा व दर चांगला मिळतो असा अनुभव
- उत्पादन- एकरी १४ ते १६ टन
- १९८० पासून द्राक्षाची निर्यात
- बाजारपेठा- चीन, दुबई, सौदी, बांगलादेश
- मिळणारा दर प्रति किलो सरासरी- ७० रुपये
- यंदा निर्यातीस सुरुवातीला मिळालेला दर- ९० ते ९५ रुपये
प्रतिक्रिया
शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिले. त्यामुळे एकरी उत्पादन व मालाचा दर्जा वाढवला.
त्यातून तीन एकर शेती नव्याने खरेदी केली. द्राक्ष संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बागेला भेट देऊन
प्रोत्साहन व प्रेरणा दिली आहे. पंचक्रोशीतील द्राक्ष उत्पादकांच्या कायम संपर्कात असतो.
माझे ज्ञान व अनुभव यांची सांगड घालून गरजूंना मार्गदर्शनही करतो. त्यांच्याकडे उत्पादन व गुणवत्तावाढ झाल्यानंतर मिळणारे समाधान वेगळे असते.
संपर्क- रामदास जाधव
९९७०१४३७०७, ९५१८५६२७२३
फोटो गॅलरी
- 1 of 94
- ››