ऑयस्टर मशरूम उत्पादनासह पापड, नूडल्स, बिस्किटे

रामेश्वर शेवाळे यांचा धिंगरी अळिंबी उद्योग
रामेश्वर शेवाळे यांचा धिंगरी अळिंबी उद्योग

एम.एस्सी. मायक्रोबायोलॉजी’ पदवीप्राप्त कुंभेफळ (जि. औरंगाबाद) येथील रामेश्वर शेवाळे या युवकाने धिंगरी अळिंबी उद्योगात आश्‍वासक वाटचाल केली आहे. संशोधन व तंत्रज्ञानाची सुविधा असलेल्या त्यांच्या उद्योग प्रकल्पात प्रतिदिन ४० किलो ताज्या अळिंबीचे उत्पादन होतेच. शिवाय मशरूम पावडर, पापड, नूडल्स, बिस्किटे आदी मूल्यवर्धित उत्पादनांनाही चांगली बाजारपेठ देण्याचा प्रयत्न झाला आहे.  औरंगाबाद शहरापासून आठ किलोमीटरवरील टाकळी वैद्य येथे रामेश्वर शेवाळे या तरुणाने धिंगरी अळिंबी उद्योग प्रकल्प सुरू केला आहे. नुट्रीमिस्ट मशरूम उत्पादन, संशोधन व प्रशिक्षण या नावाने शेवाळे यांनी कंपनी उभारली आहे. या ठिकाणी धिंगरी म्हणजे ऑयस्टर अळिंबीचे ते उत्पादन घेतात.  नोकरीतील अनुभवाचा उपयोग  जालना जिल्ह्यातील माळतोंडी (ता. मंठा) हे शेवाळे यांचे मूळ गाव. वडील अल्पभूधारक शेतकरी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून एम.एस्सी. मायक्रोबायॉलॉजी शाखेची पदवी घेतलेल्या शेवाळे यांनी सुमारे १९ वर्षे दोन बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीचा अनुभव घेतला.  त्यानंतर आपल्याकडील ज्ञानाचा वापर करून स्वतःच उद्योजक होण्याचे त्यांनी ठरवले. अधिक अभ्यासाअंती ‘ऑयस्टर मशरूम’ हाच पर्याय त्यांना योग्य वाटला.  व्यवसायाची वाटचाल  १) पुणे येथील कृषी महाविद्यालयातून अळिंबी उत्पादनाचे तीन दिवसीय, तर हिमाचल प्रदेशातील सोलन येथील मशरूम संशोधन संचालनालयातून सहा दिवसांचे प्रशिक्षण घेत व्यवसायाचा पाया पक्का केला.  हिमाचल प्रदेशातील काही अळिंबी प्रकल्पांना भेटी देत ज्ञानात भर घातली.  २) सध्या टाकळी वैद्य येथे भाडेतत्त्वावरील चार हजार चौरस फूट जागेत उत्पादन होते. जालना रस्त्यावरील अन्य ठिकाणी प्रशिक्षण केंद्र व मार्केटिंग सुविधेसाठी कार्यालय सुरू केले आहे.  ३) व्यवसायात सुमारे सात जणांना थेट रोजगार दिला आहे. शिवाय, मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याचे काम स्थानिक महिला बचत गटांना देण्यात येत असल्याने त्यांनाही अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे.  ४) प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे साडेसहा लाख रुपयांचे भांडवल लागले आहे.  शेवाळे सांगतात, की  धिंगरी मशरूमचे उत्पादन चीन, अमेरिका, तैवान आदी देशांत अधिक होते, त्या तुलनेत आपल्याकडे ते फार कमी आहे. वास्तविक या मशरूममध्ये औषधी गुणधर्म भरपूर आहेत. यात जीवनसत्त्व बी, लोह, जस्त, स्फुरद, अँटिऑक्सिडंट्स भरपूर आहेत.  उत्पादन, मार्केटिंग, विक्री 

  • सध्या ताज्या मशरूमचे दररोजचे उत्पादन- ४० किलो, त्याचा दर- ३०० ते ४०० रुपये प्रतिकिलो 
  • त्यातील ६० ते ७० टक्के होते विक्री 
  • उर्वरित अळिंबी सुकवण्यात येते, 
  • त्यापासून तयार होणारे पदार्थ, त्यांची महिन्याची विक्री 
  • पावडर टीनचे ४० डबे 
  • मशरूम पापड ३०० ते ३२५ पॅकेट्स 
  • नूडल्स १०० पॅकेट्स 
  • बिस्किटे २० पॅकेट्स 
  • मार्केट 

  • औरंगाबाद शहरातील सुपरमार्केट्स, बिग शॉपीज, निवडक विक्री केंद्रे 
  • औरंगाबाद, मराठवाड्यातील काही शहरे, पुणे, नागपूर आदी मिळून सुमारे ८ वितरक 
  • सुरवातीला मार्केट तयार करण्यासाठी कष्ट करावे लागले; मात्र त्याची फळे आता मिळू लागली आहेत. 
  • येत्या १० सप्टेंबरला सोलन येथे मशरूम मेळावा होणार असून, तेथे उत्पादने सादर करण्यासाठी आमंत्रण आले आहे. या निमित्ताने माझ्या कंपनीचा प्रसार देशभर करणे शक्य होणार असल्याचे शेवाळे यांनी सांगितले. 
  • प्रशिक्षणातून उत्पन्न  मशरूम प्रकल्प चालवण्याच्या दृष्टीने अतिरिक्त उत्पन्न म्हणून प्रशिक्षणाची जोड शेवाळे यांनी दिली आहे.  अनेक इच्छुकांनी त्यांच्याकडे सशुल्क प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे. अन्य राज्यांतही शेवाळे प्रशिक्षणासाठी जातात.  मशरूम उत्पादनातील ठळक बाबी 

  • मशरूम निर्मितीमध्ये पीक अवशेषांचे माध्यम तयार करावे लागते, त्यासाठी 
  • गव्हाचे काड, भाताचा पेंढा, सोयाबीन, मका, बाजरी, ज्वारी यांची बारीक कुट्टी यांचा वापर केला जातो. 
  • रासायनिक प्रक्रिया करून या माध्यमाचे निर्जंतुकीकरण केले जाते. 
  • कुट्टीत सुमारे ७० टक्के ओलावा असताना मशरूमचे बियाणे म्हणजे स्पॉन मिसळून ते विशिष्ट आकारमानाच्या व मायक्रॉन जाडीच्या प्लॅस्टिक बॅगेत थरावर थर असे दाबून भरण्यात येते. 
  • पुणे येथील कृषी महाविद्यालयातू बियाणे ७० रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केले जाते. 
  • या बॅग्ज इनक्युबेशन चेंबरमध्ये सुमार २० दिवस ठेवल्या जातात. या वेळी तापमान २२ ते २८ अंश सेल्सिअस व ह्युमिडीटी ७० ते ९० टक्के ठेवली जाते. 
  • ही खोली अंधारी, प्रकाश नसलेल्या स्थितीत ठेवण्यात येते, यामुळे कर्बवायूचे प्रमाण वाढते. यामुळे मशरूमची वाढ होण्यास मदत होते. 
  • बुरशीची चांगली वाढ झाल्यानंतर बॅगेचे कव्हर काढून बेड पीक घेण्याचा खोलीत स्थलांतरित केले जातात. येथे विशिष्ट अंतरावर दोऱ्यांच्या शिंकाळ्यावर विशिष्ट अंतरावर हे बेड बांधले जातात. दुसऱ्या दिवसापासून दोनवेळा स्प्रे पंपाने हलकेसे पाणी दिले जाते. 
  • बेड बांधल्यानंतर पहिली काढणी पाच दिवसांनी, दुसरी पुन्हा पाच दिवसांनी असे करीत 
  • योग्य तापमान व ह्युमिडीटी ठेवल्यास ३५ ते ४० दिवसांत उत्पादनाची एक साखळी पूर्ण होते. 
  • मशरूम नाशवंत असते. काढणीनंतर स्वच्छ करून सछिद्र प्लॅस्टिक बॅगेत पॅक केली जाते. 
  • अशा स्थितीत ती दोन दिवसांपर्यंत टिकते. फ्रिजमध्ये १० अंश सेल्सिअस तापमानात तीन-चार दिवस टिकते. 
  • अळिंबी उत्पादन झाल्यानंतर या बेडच्या आधारे गांडूळ खतनिर्मिती करणे शक्य होते. अशारीतीने 
  • कोणताही घटक या व्यवसायात टाकाऊ ठरत नाही. 
  • साधारण एक किलो ताज्या मशरूमपासून शंभर ग्रॅम वाळलेले मशरूम मिळते. कोमट पाण्यात ते सुमारे १५ मिनिटे ठेवल्यास ताज्या अळिंबीप्रमाणे होते. 
  • मशरूमचे उत्पादन हे अत्यंत काळजीपूर्वक करावे लागते. या पद्धतीत काड तसेच अन्य घटकांचे निर्जंतुकीकरण योग्य न झाल्यास रोग- किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तसेच, 
  • शेडमध्ये योग्य तापमान व आर्द्रता न राखल्यासही उत्पादनात फरक पडतो किंवा प्रादुर्भाव होऊ शकतो. 
  • संपर्क - रामेश्वर शेवाळे - ९६०७६६६६३५  (लेखक औरंगाबाद येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com