बहुवीध पीकपद्धती, यांत्रिकीसह प्रयोगशील शेतीचा आदर्श, कांदा बी पेरणी यंत्राच्या निर्मितीतून  वेळ, पैसे, श्रम यांत मोठी बचत  

कांदा बी पेरणी यंत्राविषयी बाळासाहेब म्हणाले की, ४० एचपी क्षमतेच्या ट्रॅक्टरला कांदा बी पेरणीयंत्र जोडले आहे. तथापि २० एचपी क्षमतेच्या पुढील कोणत्याही ट्रॅक्टरचा वापर करता येतो. यात दोन ओळीतील अंतर सुमारे साडेपाच इंच ठेवले आहे. मात्र ते गरजेनुसार बदलता येते. हे यंत्र तयार करण्यासाठी सुमारे २० ते २५ हजार रुपये खर्च आला आहे.
राशिनकर यांनी आपल्या कल्पनेतून तयार केलेले कांदा बी पेरणी यंत्र
राशिनकर यांनी आपल्या कल्पनेतून तयार केलेले कांदा बी पेरणी यंत्र

बेलापूर (जि. नगर) येथील राशीनकर कुटुंबाने सातत्याने वेगवेगळे प्रयोग करून प्रयोगशील शेतीचा आदर्श शेतकऱ्यांपुढे तयार केला आहे. यंदा साडेचार एकरांत कांद्याची यांत्रिक पेरणी करून त्यावरील सुमारे दीड लाख रुपयांचा खर्च वाचवला आहे. ऊस, कांदा, खरबूज, कलिंगड, मधुमका अशी विविधता ठेवत आंतरपिकाचीही रचना त्यांनी खुबीने बसवली आहे. त्याद्वारे शेतीतील अर्थकारण सक्षम केले आहे.  नगर जिल्ह्यात मारुतराव राशीनकर यांचा पत्रकारितेत नावलौकीक आहे. त्या माध्यमातून सामाजिक काम काम करतानाही त्यांनी शेतीवरील लक्ष कमी होऊ दिले नाही. त्यांची बेलापूर (ता. श्रीरामपूर) व चांदेगाव (ता. राहुरी) येथे मिळून ११ एकर शेती आहे. रामेश्वर हा मुलगा बेलापूर येथे डाॅक्टर, मुलगी निर्मला राशीनकर-यमगर या पुसद (ता. यवतमाळ) येथे नगरपालिकेत मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.  दुसरा मुलगा बाळासाहेब पदवीधर आहे. ते पूर्णवेळ शेतीत कार्यरत आहेत.  कांदा बी पेरणी यंत्राचा वापर  राशीनकर कुटुंबाने ऊस, मका, कापूस, कांदा, कलिंगड, खरबूज अशी विविधता शेतीत जपली आहे. त्याचबरोबर या पिकांत विविध प्रयोग करण्याची धडपड सतत सुरू असते. कांदा हे राशीनकर यांचे मुख्य पीक आहे. आत्तापर्यंत मजुरांकरवी त्याची पेरणी व्हायची. त्यावेळी एका एकरासाठी सहा ते सात तास लागायचे. रानबांधणीसह अन्य बाबींसाठी मिळून एकरी २१०० रुपयांपर्यंत खर्च यायचा. वेळ, मजुरी व पैसे यात बचत करण्यासाठी पेरणीत यांत्रिकीकरण करण्याचे त्यांनी ठरवले. त्यानुसार नजीकच्या कारागिराकडून आपल्या कल्पनेतील व गरजेनुसार कांदा बी पेरणी यंत्र तयार करून घेतले.  वेळ, मजुरी व पैशांची बचत  यंदाच्या वर्षी साडेचार एकरांत या यंत्राच्या साह्याने कांदा बी पेरण्याचे तंत्र वापरले आहे.  यामुळे अर्धा ते एक तासातच एक एकरात हे काम आटोपले. केवळ ट्रॅक्टरचा चालक एवढेच काय ते मनुष्यबळ लागले. तेवढ्या कामासाठी डिझेलही साधारण एक लिटर एवढेच लागले. म्हणजेच वेळ, पैसा, मजुरी, श्रम यात मोठी बचत म्हणजे साडेचार एकरांत सुमारे दीड लाख किंवा त्याहून अधिक बचत करणे शक्य झाले. कांद्याची पुनर्लागवड करायची झाल्यास एकरी खर्च १० ते १५ हजार रुपये किंवा त्यापुढेही येतो. शिवाय बियाणे जास्त लागते. हा खर्चही वाचवणे शक्य झाले आहे. राशीनकर यांनी यांत्रिक शेतीवर भर दिला आहे. कापसाच्या झाडाची कुट्टी करणारे, कडबा कुट्टी, पॉली मल्चिंग अंथरणारे अशी यंत्रेदेखील त्यांच्याकडे पाहण्यास मिळतात. त्यातून शेतीतील कामांत सुलभता आली आहे.  कांदा बी पेरणी यंत्राविषयी  बाळासाहेब म्हणाले की, ४० एचपी क्षमतेच्या ट्रॅक्टरला हे यंत्र जोडले आहे. तथापि २० एचपी क्षमतेच्या पुढील कोणत्याही ट्रॅक्टरचा वापर करता येतो. यात दोन ओळीतील अंतर सुमारे साडेपाच इंच ठेवले आहे. मात्र ते गरजेनुसार बदलता येते. हे यंत्र तयार करण्यासाठी सुमारे २० ते २५ हजार रुपये खर्च आला आहे.  उत्कृष्ट उत्पादन  यांत्रिक पद्धतीने पेरणी केलेल्या कांद्याचे एकरी १८ ते २० टनांपर्यंत उत्पादन मिळाले आहे. एका क्षेत्रात हेच उत्पादन २३ टनांपर्यंत आल्याचे बाळासाहेबांनी सांगितले. राहुरी, श्रीरामपूर बाजारात कांद्याची विक्री केली जात आहे. कांदा पेरणी तंत्राचा वापर केल्याने उगवण क्षमता आणि रोपे टिकण्याचे प्रमाण चांगले राहिल्याने बियाण्यांची बचत झाली. शिवाय कांद्याने सुरवातीपासूनच एकसारखा आकार धरला. त्याचा फायदा उत्पादनवाढीत मिळाला. वेगवेगळे प्रयोग राबवताना गेल्या आठ वर्षांपासून ठिबक, तुषार सिंचनाचा वापर होतो. बेलापूर येथील तीन एकरांत अत्यंत अल्प पाण्यावरही कांदा त्यांनी यशस्वी केला आहे. खतांसह पाणीही समतोल वापरले जाते. शेणखाचाही वापर केला जात असल्याने उत्पादनवाढीस मदत होते.  अन्य पिकांचे प्रयोग 

  • सध्या सहा एकरांत ऊस आहे. पट्टा पद्धतीने लागवड करताना त्यात सातत्याने आंतरपिके घेतात. त्यात कांद्याचेही पीक घेतले आहे. 
  • खोडवा उसाचे पीक अनेक वर्षांपासून विनामशागत तंत्राने. 
  • उसाचा पाला न जाळता तो कुट्टी करून सरीतच गाडतात. 
  • लागवडीच्या उसाचे एकरी ७० ते ८० टनांपर्यंत तर खोडवा उसाचे एकरी ४० ते ३५ टन उत्पादन मिळते. 
  • यापूर्वी चार एकर खोडवा उसात कलिंगड घेतले. त्याचे एकरी १७ टन उत्पादन घेतले. 
  • मागील वर्षी साडेपाच एकरांत ऊस पाचटाचा वापर करून कलिंगड लागवड केली. त्याचे 
  • एकरी ३३ टन उत्पादन निघाले. फळांची मोठी वाढ झाली होती. औरंगाबादच्या बाजारात विक्री केली. काही फळांचे वजन १९ किलोपर्यंत भरले होते. 
  • तीन एकरांत पॉली मल्चिंगवर खरबूज घेऊन तेवढ्या क्षेत्रात ५७ टन उत्पादन घेतले. 
  • दोन वर्षांपूर्वी तीन एकरांत मल्चिंगचा वापर करून मधुमका व त्यात मुगाचे आंतरपीक घेण्याचा प्रयोग केला. मक्याचे एकरी ४ टन तर मुगाचे एकरी ४ क्विंटल उत्पादन मिळाले. मक्यानंतर कांदा घेतला. 
  • अनेक वर्षांपासून कापसूही असतो. बेलापूर शिवारात कांदा घेतलेल्या तीन एकरांत कापसाची जूनमध्ये लावण केली असून काही क्षेत्रावर कापसातही ऊस पाचटाचे मल्चिंग केले आहे. कापसाची झाडे जोमात आहेत. 
  • शेतीत सातत्याने वेगवेगळे प्रयोग करण्याची आम्हाला आवड आहे. केवळ एकच पीक न घेता त्यांची विविधता ठेवल्याने शेतीतील जोखीम कमी होते. यंदा साडेचार एकर कांदा पेरणी यंत्राच्या वापरातून उत्पादन खर्चात मोठी बचत साधली आहे. 
  • संपर्क- बाळासाहेब मारुतराव राशीनकर- ७९७२६८७१८१   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com