थेट अंडी विक्री व्यवस्थेतून विस्तारला पोल्ट्री व्यवसाय

 दुर्गंधीमुक्त व स्वच्छता ठेवलेले पोल्ट्री शेड दाखविताना रश्मीन माळी
दुर्गंधीमुक्त व स्वच्छता ठेवलेले पोल्ट्री शेड दाखविताना रश्मीन माळी

नाशिक येथील रश्‍मीन मधुकर माळी यांच्या कुटुंबांचे शेतीत मोठे नाव होते. मात्र नैसर्गिक अडचणींमुळे १९८० च्या दशकात त्यांची बागायती शेती संक्रमणात सापडली. या दरम्यान सक्षम पर्याय म्हणून माळी यांनी उच्च महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर कृषिपूरक व्यवसाय करण्याचे ठरविले. वय कमी, व्यवसायातील माहितीचा अभाव व मर्यादित भांडवल त्यामुळे सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. मात्र जिद्द, चिकाटी व जोखीम व्यवस्थापन, सुधारित तंत्रज्ञान या आधारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू ठेवला. प्रतिकूल परिस्थितीत बाजारांत भेटी देत थेट अंडी विक्रीची सक्षम व्यवस्था उभी केली. त्यातून संपूर्ण नाशिक शहरात व्यावसायिक कौशल्यातून ग्राहक जोडले. आज व्यवसायाचा चांगला विस्तार व काही लाख रुपयांची उलाढाल करणे शक्य झाले आहे. नाशिक शहरात साधारण १९९० च्या दशकात बाहेरील राज्यांतून अंडी पुरवठा होत असे. या दरम्यान अंड्यांचे उत्पादन नाशिक व परिसरामध्ये मागणीच्या तुलनेत होत नव्हते. हा तुटवडा, ग्राहकांची मागणी आणि पर्यायाने कुक्कुटपालन व्यवसायातील संधी नाशिक येथील रश्मीन मधुकर माळी यांनी ओळखली. ओळखली. त्यांची पाच ते सहा एकर शेती आहे. मात्र बागायती शेतीत अनेक नैसर्गिक अडचणी उद्भवल्या. मग सक्षम व्यावसायिक पर्यायाची जोड देणे गरजेचे होते. कुक्कुटपालन त्या दृष्टीने माळी यांना आश्‍वासक वाटला. तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व अनेक ठिकाणी अभ्यास भेटी देऊन व्यवसायाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यास सुरुवात केली. कामांना गती मिळाली. यातूनच औरंगाबाद रस्त्यावर पंचवटी भागात १९८५ साली ‘प्रगती पोल्ट्री फार्म’ नावाने व्यवसाय सुरू झाला. लेअर पोल्ट्री व्यवसायाचा विस्तार : व्यवसायात भांडवल ही गोष्ट सर्वांत महत्त्वाची असते. त्या दृष्टीने सुरुवातीला नऊ लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यातून तीन हजार लेअर पक्षांचे (अंडी) संगोपन सरू झाले. मेहनत, जोखीम व्यवस्थापन, संवाद हातोटी आणि परिश्रम या गुणांच्या जोरावर व्यवसाय वाढू लागला. नाशिक शहरात अंडी पुरवठा होऊ लागला. आत्मविश्‍वास वाढू लागला तसा व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी बँकेकडून १५ लाख रुपयांचे अर्थसाह्य घेतले. त्यातून पुन्हा प्रत्येकी तीन हजार पक्षी क्षमतेचे दोन पोल्ट्री फार्म उभे केले. या व्यवसायासाठी आवश्यक सर्व सुविधा उभ्या राहिल्या. त्यामुळे विस्तार सुकर झाला. सद्यःस्थितीतील पोल्ट्री व्यवसाय

  • सध्याची एकूण पक्षिक्षमता- ९ हजार
  • एकूण पोल्ट्री शेड- ३ (प्रत्येकी ३ हजार पक्षिक्षमता )
  • दररोज अंड्याची सरासरी विक्री- सुमारे ८ ते साडेआठ हजार
  • अंड्यांचे दर- वर्षिक- सुमारे २.७० ते साडेचार रुपये.
  • वैशिष्ट्ये :

  • अर्ध स्वयंचलित (सेमी ऑटोमेशन)- पारंपरिक कुक्कुटपालन व्यवसायाला फाटा देऊन पाणी देणे, संतुलित खाद्य पुरवठा आदी कामे या यंत्रणेमुळे सुकर झाली आहेत.
  • स्वच्छ व पारदर्शक कारभार- शेडमध्ये पक्ष्यांची ‘प्लेसमेंट’ झाल्यांनतर वेळोवेळी सर्व नोंद फलकांवर अपडेट केली जाते. यात देण्यात येणारी औषधे, विविध वैद्यकीय तपासण्या, दैनंदिन खाद्य पुरवठा, पक्ष्यांची मरतूक व दैनंदिन अंडी उत्पादन आदींचा तपशील ठेवण्यात येतो.
  • लसीकरण- पक्षी सुदृढ राहावेत यासाठी उत्पादनांचे सर्व निकष पळून औषधांचा वापर खूप कमी होतो. त्यासाठी ऋतुचक्रातील हवामान बदलानुसार पक्ष्यांची काळजी घटली जाते. ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण करण्यात येते.
  • जैवसुरक्षेला विशेष महत्त्व पोल्ट्री व्यवसायात स्वच्छता व दुर्गंधीमुक्त परिसर हे माळी यांच्या व्यवसायाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे पक्षिगृहांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण, उंदीर व माशी नियंत्रण या बाबींना विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे उत्पादन वाढले असून रोगराईला आळा बसला आहे. यांत्रिकीकरणातून मनुष्यबळाची गरज केली कमी सध्या अर्ध स्वयंचलित पद्धतीचा वापर आहे. शंभर टक्के स्वयंचलित यंत्रणा वापरण्यासाठी पक्षांची संख्या ४० हजार ते ५० हजारांपर्यंत असावी लागते, असे माळी यांनी सांगितले. सध्या केवळ तीन मजुरांची मदत घेऊन व्यवसाय चालवला जात आहे. पारंपरिक कुक्कुटपालन पद्धतीत मोठे मनुष्यबळ लागते. त्यावर होणारा खर्च, लागणारा वेळ यामुळे कामात सुसूत्रता येण्यास अडचणी होत्या. हीच बाब ओळखून कार्यक्षमता वाढविण्यावर माळी यांनी भर दिला. यासाठी हैदराबाद परिसरातील पोल्ट्री व्यवसायाचा अभ्यास केला. येथे काही उत्पादक ५० हजारांहून अधिक पक्ष्यांचे पालन करतात. यासाठी यांत्रिकीकरण महत्त्वाचे आहे ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यादृष्टीने व्यावसायिक बदल अंगीकारले. पक्ष्यांची प्रत्येक बॅच सुरू होण्यापूर्वी आणि ती संपल्यानंतर फार्म पूर्णपणे निर्जंतुक केला जातो. त्याच्या बाजूचा परिसर स्वच्छ ठेवला जातो. खाद्याची भांडी व पाणी पिण्याची यंत्रणा नियमितपणे साफ केली जाते. त्यामुळे पक्ष्यांचा रोग प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. फक्त स्वच्छता व अंडी संकलन हे काम कर्मचाऱ्यांकडून केले जाते. फीडिंग यंत्रणा पोल्ट्री खाद्य तयार केल्यानंतर ते ट्रॉलीमध्ये टाकले जाते. तीनही शेडमध्ये प्रति ५ क्विंटल क्षमता असलेल्या फीडर ट्रॉलीच्या माध्यमातून ते पक्ष्यांना दिले जाते. त्यामुळे खाद्य वितरणासाठी लागणारे मनुष्यबळ कमी झाले आहे. त्यामुळे कार्यक्षमताही वाढली आहे. स्वयंचलित ड्रिंकर कोंबड्यांना पाणी पिण्यासाठी स्वयंचलित ड्रिंकर बसविले आहेत. त्यामुळे पक्ष्यांना गरजेप्रमाणे पाणी उपलब्ध राहते. पोल्ट्री फार्मजवळ पाण्याची व्यवस्था आहे. या विहिरीचे पाणी टाकीत घेऊन निर्जंतुक करून पक्ष्यांना दिले जाते. पक्ष्यांना लागणारी औषधे पाण्यातूनच दिली जातात. जेणेकरून ती पिण्याच्या पाण्यातून योग्य प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे मानवी स्पर्शरहित औषधे व पाणी पुरवठा होतो.
  • वर्षातील बॅचेस पिलू ते पक्षी अंडी अवस्थेत येईपर्यंत सुमारे ३२०० पक्ष्यांची एक बॅच साडेपाच महिने चालते. अशा वर्षभरात तीन बॅचेस घेण्यात येतात. त्याची योग्य साखळी तयार केली आहे. ज्या कंपन्यांकडून पक्षी घेण्यात येतात त्यानुसार ७२ ते १०० आठवडे असा कालावधी पक्षी विकसित होण्यामध्ये लागतो. विक्रीचे सुरुवातीचे प्रयत्न पोल्ट्रीमधून अंडी उत्पादन सुरू झाल्यानंतर अंडी विक्री करण्याचे मुख्य आव्हान होते. मात्र माळी यांनी बाजारपेठेचा अचूक अंदाज घेतला. सुरुवातीच्या काळात स्वतः बाजारात फिरून ग्राहक मिळविले. या काळात रश्मीन नावाऐवजी ‘दादा माळी’ या नावाने ते लोकप्रिय झाले. त्यांनी ‘उत्पादक ते ग्राहक’ अशी भूमिका स्वीकारली. होलसेलर, मध्यस्थ अशी साखळी मोडीत काढत थेट विक्री व्यवस्था उभारली. त्यातून नफ्याचे प्रमाण वाढण्यास मदत झाली. मागणी व वेळेवर पुरवठा होऊ लागल्याने ग्राहकांकडूनही मालाला पसंती येत गेली. थेट विक्री व्यवस्था : ‘माउथ पब्लिसिटी’च्या जोरावर माळी यांनी ग्राहकांचे जाळे निर्माण केले. छोटे- मोठे विक्रेते त्यांच्याकडून दररोज मागणी आगाऊ नोंदवितात. त्यानुसार थेट पुरवठा केला जातो. मध्यम स्वरूपाचे ग्राहक थेट पोल्ट्रीमध्ये येऊन माल खरेदी करतात. त्यामुळे थेट बाजारात जाण्याची वा विक्रीसाठी फिरण्याची गरज उरलेली नाही. ग्राहकच थेट त्यांच्याशी जोडले गेले आहेत. दररोज सर्वसाधारण ८ ते साडेआठ हजार अंड्यांची विक्री होते. त्यामुळे सक्षम अशी विक्री व्यवस्था मार्केटिंगच्या माध्यमातून उभी राहिली आहे. अंड्यांचा पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र वाहने आहेत. मागणीनुसार होतो पुरवठा दररोज संकलित केलेली अंडी त्याच दिवशी विक्री होतात. ठोक स्वरूपासह किरकोळ स्वरूपातली मागणी असते. त्यासाठी तपोवन परिसरात नाशिक-औरंगाबाद महामार्गालगत विक्री केंद्र उभारले आहे. अनेक वर्षांपासून या व्यवसायात कार्यरत असल्याने माळी यांनी आपले ग्राहक स्रोतही पक्के केले आहेत. त्यानुसार तारांकित हॉटेल्स, बेकरी, किराणा दुकानदार, विविध कॅन्टीन्स, किरकोळ अंडी व्यापारी तसेच शहरातील विविध नामवंत रुग्णालयांना मागणीनुसार पुरवठा करण्यात येतो. पोल्ट्री खाद्यनिर्मितीचे युनिट सुरुवातीला दररोज कुक्कुट खाद्य विकत घ्यावे लागत असे. त्यामुळे त्यावर अतिरिक्त खर्च व्हायचा. ही बाब लक्षात घेऊन स्वमालकीचे खाद्यनिर्मितीचे युनिट उभारले. त्याची प्रति तास एक टन क्षमता आहे. साधारण तेवढे खाद्य दररोज लागतेच. यासाठी कच्चा माल मका, सोयाबीन, सूर्यफूल यांच्यासह मिश्रित करण्यात येणारे आवश्यक घटक विकत आणून वापरले जातात. त्यातून गुणवत्तापूर्ण पोषक खाद्यनिर्मिती केली जाते. त्यातून उत्पादन खर्चात घट झाली आहे. आपल्या पक्षांची गरज भागवून अन्य पोल्ट्री उत्पादकांच्या मागणीनुसारही त्याची विक्री केली जाते. कामाचे आदर्श व्यवस्थापन : माळी यांना या व्यवसायात सुमारे ३५ वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. आजपर्यंत विविध अनुभव घेत अनेक व्यावसायिक बदल करीत नवे तंत्रज्ञान त्यांनी स्वीकारले आहे. आता थोरला मुलगा निशाल हा व्यवस्थापन पाहतो. त्यामुळे कुटुंबकेंद्रित स्वरूपाच्या व्यवसायात त्यांनी वेगळी ओळख नाशिक व परिसरात निर्माण केली आहे. असे होते कामकाज :

  • सर्व तांत्रिक व व्यावसायिक निकष कामांची अंमलबजावणी
  • व्यक्तिनिहाय कामकाजाच्या जबाबदाऱ्या निश्चित करून दिला आहेत.
  • व्यवसायात गुणवत्ता व दर्जेदार सेवा या बाबींकडे विशेष लक्ष
  • दैनंदिन सर्व कामकाजांच्या अचूक नोंदी
  • पक्षिगृहातील आर्द्रता व तापमान नियंत्रण
  • प्रकाश व पाणी व्यवस्थापन
  • संतुलित खाद्य वितरण
  • अचूक व वेळेनुसार लसीकरण
  • अन्य शेतकऱ्यांसाठी पक्षिसंगोपन व्यवसायातील दीर्घ अनुभवाचा फायदा घेताना माळी अन्य पोल्ट्री उत्पादकांसाठीही पक्षी संगोपन करतात. साधारण साडेपाच महिन्यांसाठी हे संगोपन केले जाते. वर्षाला सुमारे ६० हजार ते ७० हजार पक्ष्यांचे संगोपन या पद्धतीने मागणीनुसार केल्याचे माळी सांगतात. कोंबडी खतविक्रीतून उत्पन्न नाशिक जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, सिन्नर, नाशिक या तालुक्यांमध्ये द्राक्ष, ऊस, भाजीपाला पिके यासाठी पोल्ट्री खताची मागणी असते. अनेक शेतकरी थेट येऊन खरेदी करतात. दरवर्षी अनेक शेतकरी आगाऊ मागणी नोंदवितात. प्रतिकिलो साडेतीन रुपये प्रतिकिलो दराप्रमाणे विक्री होते. त्यामुळे अंडी विक्रीसह हादेखील उत्पन्नाचा एक स्रोत ठरला आहे. साठवणुकीचे नियोजन होते म्हणून... सध्याच्या काळात अमेरिकन लष्करी अळीमुळे मका शेती संकटात आली आहे. त्यामुळे मक्याचे दरही वाढले आहेत. वर्षभर पुरेल एवढ्या खाद्याचे नियोजन केल्याने आत्तापर्यंत तरी नुकसान झाले नाही. मात्र त्याचा फटका व्यवसायाला निश्‍चित बसणार असल्याचे माळी म्हणाले. संपर्क : रश्मीन माळी - ८८८८८ ७३७२१v

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com