विविध भाजीपाल्यांची बारमाही सेंद्रिय शेती

चवळीचे पीक
चवळीचे पीक

आपटी (जि. रत्नागिरी) येथील वसंत केरू गायकवाड यांनी प्रगतीशील व प्रयोगशील शेतकरी म्हणून नाव कमावले आहे. कोकणातील नेहमीच्या पिकांबरोबर वर्षभर सुमारे १५ प्रकारच्या विविध भाजीपाला पिकांचे व तेही सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यात ते प्रसिद्ध आहेत. केवळ उत्पन्न कमावणे, हा हेतू न ठेवता मातीची सुपीकता व सेंद्रिय कर्ब जपण्यालाही त्यांनी तेवढेच महत्त्व दिले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील आपटी येथे वसंत केरू गायकवाड यांची सहा एकर शेती आहे. मुंबई विद्यापीठातून बीएससीची पदवी घेतलेले वसंत रायगड जिल्ह्यात खासगी शिकवणी करायचे. शेती हाच पूर्णवेळ व्यवसाय करायचा, हे नक्की केल्यानंतर ते आपटी गावी आले. कोडदाई नदीच्या बाजूलाच त्यांची जमीन आहे. सुमारे पंचवीस फूट खोल मुबलक पाणी असलेली विहीर आहे. स्वतः भाजीपाला घेताना शेजारील शेतकऱ्यांनाही वसंत यांनी भाजीपाला शेतीस प्रोत्साहन दिले. आपल्या विहिरीतून त्यांना पाणीही पुरवले. बघताबघता आपटी गावात भाजीपाला शेती वाढण्यास सुरुवात झाली. वसंत यांची शेतीपद्धती

  • बाजारपेठेतील मागणीनुसार तीन एकरांत पीकपद्धतीचे कौशल्यपूर्ण नियोजन
  • पावसाळ्यात भात, हिवाळ्यात पावटा, चवळी, पालेभाज्या, वेलवर्गीय भाजीपाला
  • उन्हाळ्यात भेंडी, गवार, कारले, दूधी
  • वांगे, टोमॅटो, माठ, मुळा, पालक, कोथिंबीर, पडवळ, घोसाळे, कलिंगड अशी विविधता
  • वर्षभर दहाहून अधिक भाजीपाल्यांचे प्रकार
  • प्रत्येक भाजीसाठी काही गुंठे क्षेत्र
  • मातीकडे सर्वाधिक लक्ष रासायनिक निविष्ठांच्या वापरामुळे जमीन आणि मानवी आरोग्याचेही नुकसान होते हे ओळखून मातीची सुपीकता आणि सेंद्रिय कर्ब वाढविण्यावर भर दिला. अलीकडील वर्षांत ते पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने शेती करतात. त्यासाठी पीक अवशेष जमिनीत गाडतात. मातीपरीक्षण अहवालानुसार, आपल्या मातीचा सेंद्रिय कर्ब दोन टक्क्यांपर्यंत असल्याचे वसंत सांगतात. साहिवाल, कांकरेज व लाल सिंधी अशा मिळून सहा देशी गायी आहेत. त्यांचे दररोज ३० किलो शेण उपलब्ध होते. नॅडेप पद्धतीने ते खत तयार करतात. गोमूत्रापासून घनामृत तयार करून संपूर्ण क्षेत्राला वापरतात. वनस्पती अर्कांपासून कीडनाशके तयार करतात. दापोली तालुक्यात सक्रिय असलेल्या शेतकरी गटाचे वसंत सदस्य आहेत. या गटालादेखील वसंत कीडनाशके देतात. विक्रीव्यवस्था

  • वसंत यांचा सकाळी सहापासून दिनक्रम सुरू होतो. भाजीपाला काढणीनंतर पाण्याने स्वच्छ धुवून जुड्या बनविण्यात येतात. स्वतःचे पीकअप वाहन आहे. त्यातून दापोली येथील बाजारपेठेत भाजीपाला घेऊन जातात. पत्नी लक्ष्मी विक्रीची संपूर्ण जबाबदारी घेतात.
  • दापोली नगरपालिकेतर्फे शेतकऱ्यांना विक्रीसाठी जागा उपलब्ध केली आहे. त्या माध्यमातून
  • थेट ग्राहकांना विक्री होते.
  • सेंद्रिय भाजीपाला असल्याने शहरातील व्यापारी, कृषी विभागाचे अधिकारी, कृषी विद्यापीठातील अधिकारी आदींकडून मागणी राहते. त्यांना ‘होम डिलिव्हरी’ दिली जाते.
  • दिवसाला सरासरी १५० ते २०० पर्यंत व काहीवेळा ३०० पर्यंत जुड्यांची एकूण विक्री होते.
  • खर्च वजा जाता प्रतिहंगाम एकूण क्षेत्रातील भाजीपाला पिकांतून ७५ हजार ते एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असल्याचे वसंत सांगतात.
  • शेती व्यवस्थापनातील ठळक बाबी

  • दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मार्गदर्शन घेऊन काही वाण विकसित केले आहेत. वसंत यांचे प्रयोग पाहण्यासाठी विद्यापीठातील प्राध्यापक व विद्यार्थी त्यांच्या शेतावर भेट देतात. कणगर लागवडीचे आपले तंत्रही विकसित केले आहे. त्याचे प्रशिक्षणही वसंत शेतकऱ्यांना देतात.
  • शेतीतील उत्पन्नातून शिल्लक रक्कम टाकत अवजारे वा तत्सम साहित्य खरेदी केले.
  • सन २०१० मध्ये शासनाचे अनुदान न घेता संपूर्ण क्षेत्रावर ठिबक सिंचनाची व्यवस्था केली. त्यासाठी दीड लाख रुपये खर्च केला. विहिरीवर पंप बसविला असून, त्याचे पाणी शेजारच्या शेतकऱ्यांनाही देण्यात येते. येणारे वीजबिल सर्व मिळून भरतात.
  • सुमारे ८० हजार रुपये किमतीचे यंत्र विकत घेतले आहे. जमिनीवर पडणाऱ्या पालापाचोळ्याची कुट्टी त्याद्वारे होते. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी त्याचा वापर होतो.
  • घरापुरते लागणारे भात, नाचणी शिल्लक ठेऊन उर्वरित मालाची दापोलीच्या बाजारात विक्री होते.
  • दापोलीतील काही नागरिक बाजारभावाप्रमाणे भात व नाचणी घेऊन जातात.
  • दुग्धव्यवसायाची जोड तीन गायींना पूर्णिमा, राधा आणि तुळसी अशी नावे दिली आहेत. दररोज सहा लिटर दूध मिळते. गावात वैद्यकीय महाविद्यालय आहे. तेथील कॅन्टीनला ७० रुपये प्रतिलिटर दराने दररोज पाच लिटर दुध पुरवण्यात येते. त्यातून महिन्याला उत्पन्नाचा चांगला आधार होतो. मागणीनुसार तुपाची विक्रीही तीन हजार रुपये प्रतिकिलो दराने होते. कष्टासोबत समाधानही आले वसंत म्हणतात की शेतीत कष्ट आहेत, तितकेच समाधानही आहे. भाजीपाला व्यवसायाने मला सुखी केले आहे. गावातील शेतमजुरांना ते हंगामानुसार रोजगार उपलब्ध करून देतात. गावात जांभा दगडाचे घर बांधले आहे. आंब्याची सुमारे २५; तर काजूची २०० झाडे आहेत. भाजीपाला शेतीकडे अधिक वेळ द्यावा लागत असल्याने या फळपिकांकडे तेवढे लक्ष देता येत नाही. तरीही ही पिके समाधानकारक उत्पन्न देऊन जातात. प्रयोगशीलतेचा सन्मान नेहमीच प्रयोगशील वृत्ती ठेवलेल्या वसंत यांना तालुकास्तरीय राजवैभव, जिल्हास्तरीय सेवानिवृत्त शिंदे पुरस्कार, राज्याचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, बळीराजा अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. संपर्क- वसंत गायकवाड- ९२७३११७४७१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com